गुजरात — १ :  भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य. २० ६’ उ. ते २४० ४२’ उ. ६८४’ पू. ते ७४ २४’ पू. क्षेत्रफळ १,९५,९८४ चौ.किमी. लोकसंख्या २,६६,९७,४७५ (१९७१). याच्या उत्तरेस पाकिस्तान व राजस्थान पूर्वेस राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र दक्षिणेस महाराष्ट्र व अरबी समुद्र आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. भारताच्या ६·१% क्षेत्रफळ आणि ४·८ %लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे.

भूरचना : गुजरात राज्यात १,१२० मी.पेक्षा उंच प्रदेश कोठेही नाही. तथापि या राज्याचे (अ) उत्तरेकडील व पूर्वेकडील आणि कच्छ-काठेवाडमधील डोंगराळ प्रदेश, (आ) सौराष्ट्राचे म्हणजे काठेवाडचे पठार, (इ) मैदानी प्रदेश व (ई) किनारी सखल प्रदेश व कच्छचे रण असे चार स्वाभाविक विभाग पडतात. (अ) उत्तरेकडे साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अरवलीचे फाटे आलेले आहेत. त्यांच्या पश्चिम भागातून बनास व पूर्व भागातून साबरमती नद्या वाहतात. पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशाच्या उत्तर व मध्य भागांत विंध्याचे व सातपुड्याचे फाटे आलेले असून उत्तर भागात रतनमाळ व पावागढ (८२९ मी.) डोंगर असून त्यांच्या उत्तरेस मही व पानम नद्या आहेत व दक्षिणेस नर्मदा व तिच्या ओरसंग व कर्जन या उपनद्या आहेत. मध्य भागात छोटा उदेपूर व राजपीपला डोंगर असून त्यात नर्मदा व तापी यांच्या दरम्यानचा डोंगराळ प्रदेश येतो. यात मठसर हे ८०० मी. उंचीचे शिखर आहे. तापीच्या दक्षिणेस सह्याद्रीच्या रांगा किनाऱ्याला समांतर गेलेल्या आहेत. त्यांत डांग व धरमपूरचे डोंगर अधिक उंच आहेत. सह्याद्रीवरून पूर्णा, अंबिका, औरंगा, पार व दमणगंगा या नद्या पश्चिमेकडे खंबायतच्या आखातास मिळतात. कच्छमध्ये पश्चिमपूर्व गेलेल्या तुटक डोंगरटेकड्यांच्या तीन रांगा आहेत. उत्तरेकडील रांग कच्छच्या रणातील बेटांच्या रूपाने दिसते. त्यातील पछम बेटावरील डोंगर कच्छमध्ये सर्वांत उंच (४६५ मी.) आहे. काठेवाडमधील उत्तरेकडील मंडा डोंगराळ प्रदेश राजकोटच्या पूर्वेस असून त्याचे चोटिल शिखर ३४० मी. उंच आहे. हा भाग पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय या नद्यांदरम्यानच्या एका अरुंद डोंगराळपट्टीने दक्षिणेकडील गीर रांगेशी जोडलेला आहे. गीर हा अनेक टेकड्यांचा समुदाय असून त्यात सारकाला (६४३ मी.) सर्वांत उंच व आग्नेयीकडील नंदीवेला (५२९ मी.) त्याखालोखाल आहे. गिरनारचा पर्वत मैदानात अलग उभा असून त्याचे गोरखनाथ हे १,११७ मी. उंचीचे शिखर गुजरातमध्ये सर्वांत उंच आहे. या सर्व डोंगराळ प्रदेशांच्या पायथ्याचा ७५ मी. ते १५० मी. उंचीचा उताराचा प्रदेश १० ते २५ किमी. रुंदीचा असून त्यावर काही भागात गवत व काही भागात अरण्ये आहेत. (आ) सौराष्ट्र पठार ७५ ते ३०० मी. उंचीचे असून ते लाव्हाचे बनलेले आहे. ते मध्यवर्ती डोंगराळ भागाकडे उंचावत गेले असून त्यावरून उत्तरेकडील मच्छू व अजी, पश्चिमेकडील भादर व पूर्वेकडील शत्रुंजय व भगवा या नद्या वाहतात. या पठाराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील ६० मी.पर्यंत रुंदीच्या व ६० किमी.पर्यंत व त्यापेक्षाही जास्त लांबीच्या अनेक भित्ती हे होय. (इ) पश्चिमेस किनारी सखल प्रदेश व पूर्वेस डोंगर पायथ्याचा प्रदेश यांदरम्यान गुजरातच्या मुख्य भूमीचे अत्यंत सपाट गाळमैदान आहे. ते सु. ९६ किमी. रुंद व दक्षिणोत्तर ४०० किमी. लांबीचे आहे. याच्या उत्तरभागात वालुकामय आणि खेडा जिल्ह्याच्या काही भागात वातोढ मृदा असून दक्षिणभागात नर्मदातापीच्या खोऱ्यात काळी रेगुड मृदा आहे. या मैदानातून साबरमती, मही, नर्मदा व तापी या प्रमुख नद्या वाहतात. (ई) दक्षिण काठेवाडाखेरीज गुजरातचा किनारा भरतीच्या वेळी पाण्याखाली जाणाऱ्या पंकपाटांनी व खारजमिनींनी भरलेला आहे. कच्छच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांवर अशा १०—१२ किमी. रुंदीच्या दलदली आहेत. भरतीचे पाणी ओहोटीच्या वेळी त्यावरील पंकिल प्रवाहमार्गांनी परत जाते. या पंकपाटांच्या दोन्ही बाजूंस वाळूच्या टेकड्या आहेत. कच्छच्या आखाताच्या दोन्ही बाजूंचा किनारी प्रदेश असाच आहे. काठेवाडच्या पश्चिम किनाऱ्यावर पंकपाट आढळत नाहीत परंतु दलदली मात्र आहेत. पोरबंदर व भादर नदीचे मुख यांदरम्यानची दलदल विस्तीर्ण आहे. खंबायतच्या आखाताचा किनारा खाड्यांनी युक्त आहे. येथेही दलदली असून त्यांत मधूनमधून बेटे आहेत. खंबायतच्या आखाताचा सर्व भाग उत्थान पावलेला आहे. एके काळी खंबायतचे आणि कच्छचे आखात निदान वर्षातून काही दिवस पाण्याने जोडले जाऊन काठेवाड हे एक बेट बनत असे. १८१९ च्या भूकंपामुळे मधील भाग उचलला जाऊन काठेवाड गुजरातच्या मुख्य भूमीशी कायमचे जोडले गेले. १९५६ मध्ये कच्छमधील अंजार येथे मोठा भूकंप झाला व २३ मार्च १९७० च्या भूकंपाने दक्षिण गुजरातचे बरेच नुकसान झाले होते. खंबायतपासून बलसाडपर्यंतचा सर्व किनारा मही, नर्मदा, किम व तापी आणि इतर नद्यांच्या खाड्यांनी भरलेला आहे. त्यावरही पंकपाट आढळतात. गुजरातला इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त लांबीचा २,५६० किमी. किनारा लाभलेला असून त्यावर कांडला, बेडी, ओखा, पोरबंदर, वेरावळ, भावनगर, खंबायत, भडोच, सुरत ही प्रमुख बंदरे आहेत. काठेवाडच्या दक्षिण किनाऱ्याजवळ दीव हे गोवा, दीव, दमण या केंद्रशासित प्रदेशाचे बेट आहे. कच्छचे रण : कच्छच्या उत्तरेस मोठे रण व पूर्वेस छोटे रण या विस्तीर्ण खाऱ्या दलदली सु. २१,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापतात. मोठे रण २५६ किमी. पूर्वपश्चिम व १२८ किमी. दक्षिणोत्तर विस्ताराचे आहे. दोन्ही रणे पावसाळ्यात पाण्याखाली जातात. एरवी ती कोरडी असतात व त्यांतून पायवाटाही जातात. छोट्या रणातील पाणी नल सरोवरामार्गे खंबायतच्या आखातात येते. दोन्ही रणे म्हणजे समुद्रबूड जमिनीचा उचलला गेलेला भाग आहे. बनास, सरस्वती व लुनी या कच्छच्या रणास येऊन मिळतात. सौराष्ट्रातील नल व कच्छमधील नारायण या खाऱ्या पाण्याच्या सरोवरांखेरीज काही किरकोळ तळी गुजरातेत आहेत परंतु मोठे तलाव नाहीत.

जीर्ण स्फटिकजन्य खडकापासून बनलेल्या मृदा निकृष्ट आहेत. तथापि बांधकामास उपयोगी असे पोरबंदर दगडासारखे व सिमेंटला उपयुक्त असे चुना खडकासारखे मूल्यवान खनिजप्रकार जमिनीतून मिळतात. सौराष्ट्रातील नद्या पावसाळ्यात वाहून एरवी कोरड्या असतात. बाकी गुजरातच्या मृदा किनाऱ्याला दलदलीचा रेतीमिश्रित गाळ, सपाटीवर जलोढ नदीगाळ, भडोच व सुरत जिल्ह्यांत काही रेगुड माती, कच्छमध्ये आणि उत्तर गुजरातेत रेताड व वातोढ माती, अशा प्रकारच्या आहेत.

राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खनिज गेल्या दशकात सापडलेले खनिज तेल व वायू होत. अंकलेश्वर, कलोल व खंबायतखेरीज अहमदाबादजवळही त्याचा प्रचंड भूमिगत साठा असण्याची शक्यता दिसली आहे. कच्छ व सौराष्ट्रात सु. १·७५ कोटी टन बॉक्साइट, शेकडो कोटी टन चुनाखडक, चिनी माती व इतर जातींची चिकण माती आहे. छोटा उदेपूर भागात आशियातील अत्यंत मोठा, १ कोटी मे. टनाहून जास्त फ्ल्यूओराइटचा संचय, कच्छमधील लखपतजवळील व भडोच जिल्ह्यात मिळू सु. २४ लाख टन लिग्नाइट, शिवाय क्वॉर्ट्‌झ, डोलोमाइट, फ्रोट, कॅल्साइट, जिप्सम व मँगॅनीज ही खनिजे गुजरातेत उपलब्ध आहेत.


उत्तर भाग कर्कवृत्तावर असणाऱ्या गुजरातचा प्रदेश बव्हंशी उष्ण कटिबंधातच येतो. कच्छ सौराष्ट्रासारखे तुटक भूभाग, सागरसानिध्य आणि वेगवेगळ्या भागांतील उंचसखलपणा या कारणांनी या राज्यातल्या तपमानात व पर्जन्यात विविध प्रकार आहेत. दक्षिण गुजरातेत ७५ ते १५० सेंमी. पाऊस पडतो आणि किमान व कमाल तपमानात आत्यंतिक फरक नसतो, डांगमध्ये २०० सेंमी. पाऊस पडतो. उत्तर गुजरातेत पाऊस ५० ते १०० सेंमी. असतो व थंडीत तपमान बरेच खाली जाते. उत्तर व पश्चिम सौराष्ट्रात पाऊस ६७ सेंमी.पेक्षा कमी, हवा शुष्क व थंडी कडक, तर दक्षिण व पूर्व सौराष्ट्रात पाऊस थोडा अधिक व हवामानही तुलनेने समशीतोष्ण असते. कच्छच्या वैराण प्रदेशात पाऊस फारच कमी असतो, किमान तपमान १५·६ से. ते २१·१ से. तर बाकीच्या गुजरात राज्यात ते २१·१ से. ते २३·९ से.इतके असते. कमाल तपमान पूर्व सौराष्ट्र, कच्छ व उत्तर गुजरातेत २९·४ से. ते ३२·२ से. आणि कच्छ व सौराष्ट्राच्या पश्चिम व दक्षिण किनाऱ्यांना व मध्य गुजरातेत २६·७से. ते २९·४ से. असे राहते. अहमदाबादचे किमान तपमान १४ से. ते २७ से., कमाल तपमान २९ से. ते ४२ से. व सरासरी ३४·७ से. याप्रमाणे असते. राज्यात वनप्रदेश थोडा आहे. सौराष्ट्रातील गीरच्या जंगलाखेरीज भडोच व सुरत जिल्ह्यांचे पूर्वभाग आणि डांग जिल्हा एवढ्याच भागात जंगले आहेत. उल्लेखनीय प्राणी म्हणजे आशिया खंडात फक्त गीरच्या जंगलात आढळणारे अवशिष्ट सिंह व नल सरोवरावर दरवर्षी उतरणारे हंसक (फ्लॅमिंगो) हे स्थलांतरी पक्षी आहेत.

इतिहास : प्रागितिहास काळापासून मानववस्ती असल्याचे पुरावे गुजरातेत ठिकठिकाणी सापडले आहेत. अतिप्राचीन मानवांच्या वसाहतींच्या अवशेषांनंतर सिंधू खोरे संस्कृतीशी संबंध सिद्ध करणारे सु. ३,५०० वर्षांपूर्वीचे अवशेष अहमदाबाद जिल्ह्यात धंधुकाजवळ लोथल व सौराष्ट्रातील रोझ्डी येथील उत्खननांत मिळाले आहेत. मोहें-जो-दडो आणि हडप्पाच्या समकालीन मातृदेवता पूजक संस्कृतीचे पुरावे आहेत, असे तज्ञांचे मत आहे. फार पूर्वीपासून गुजरातचा सागरी व्यापार दूरदूरच्या देशांशी चालत होता, याची साक्ष राज्याच्या विविध भागांत सापडलेली ग्रीक व रोमन नाणी देतात. गुजरात हे नाव गुज्जरठ्ठ या प्राकृत अथवा गुर्जर राष्ट्र या संस्कृत नावापासून आले. मध्य आशियातून हूणांबरोबर भारतात आलेले मुळचे गुर्जर प्रथम पंजाबात स्थायिक होऊन हळूहळू दक्षिणेकडे सरकत, अबू पर्वताभोवती राहू लागले असा समज आहे. त्यांच्या प्रदेशाला गुजरात हे नाव दहाव्या शतकापासून रूढ झाले तथापि तो प्रदेश अधिक प्रमाणात पश्चिम राजस्थानच्या मिनमाळच्या आसपास होता. ज्ञात इतिहासारंभी चंद्रगुप्त मौर्याच्या सेनेने गुजरातची लहानलहान राज्ये साम्राज्याला जोडून घेतली. मौर्य सम्राटाने नेमलेला पुष्यगुप्त वैश्य हा गिरिनगर अथवा गिरनार-जुनागढ येथे ख्रि. पू. तिसऱ्या शतकात राज्यपाल होता. चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोक याने गिरनारच्या विख्यात शिलालेखाने या भागात आपली स्मृती कायम ठेवली आहे. मौर्यामागून काही वर्षांनी डीमीट्रिअसच्या नेतृत्वाखाली घुसलेल्या ग्रीकांची सत्ता येथे होती. ख्रिस्तोत्तर पहिल्या चार शतकांपर्यंत गुजरातवर क्षत्रपांचे राज्य होते. त्यांच्यापैकी इ.स. १५० मधल्या रुद्रदामनने अशोकाच्या शिलालेखाखाली आपला लेख कोरवून ठेवला आहे. त्याच शिळेवरचा तिसरा लेख क्षत्रपानंतर गुजरातचे स्वामी झालेल्या गुप्त सम्राटांपैकी स्कंद गुप्ताचा इ.स. ४५२ मधला आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकाअखेर गुप्तसत्ता दुबळी झाली, तेव्हा त्यांचाच एक सेनापती मैत्रक याने सौराष्ट्रात स्वतंत्र राज्य स्थापून, वल्लभीपूर ही आपली राजधानी केली. मैत्रकाच्या प्रबळ राज्यात गुजरातचा व माळव्याचाही बराच प्रदेश होता आणि वैभवाबरोबर विद्येचाही उत्कर्ष झाला होता. वल्लभीपूर येथे नालंदाच्या तोडीचे विद्यापीठ असल्याची नोंद आहे. वल्लभीच्या ऱ्हासानंतर त्या राज्याचे उत्तर गुजरातमधील मांडलिक चावडा राजपूत वनराजाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र झाले व इतिहासप्रसिद्ध अनहिलपूरपाटण किंवा अनहिलवाडा ही त्यांची राजधानी झाली. शेवटचा चावडावंशीय सामंतसिंह याने ज्या सोळंकीवंशीय मूळराजाला दत्तक घेतले, तो शूर असून विद्येचा पुरस्कर्ता होता. त्याने उत्तरेतून व देशाच्या अन्य भागांतून अनेक विद्वान ब्राह्मण आणवून गुजरातेत स्थायिक करवले. त्याने जुनागढच्या गृहरिपूंचा आणि कच्छच्या लाखो फलाणींचा पराभव करून त्यांची राज्ये घेतली. सोळंकी वंशाच्या दहा राजांपैकी बाराव्या शतकातले सिद्धराज जयसिंह व कुमारपाल हे विख्यात झाले. प्रभासतीर्थाचा सोमनाथ हे सोळंकीचे आद्य दैवत. ते जरी दोनदा भ्रष्ट होऊन लुटले गेले, तरी कुमारपालाने ते पुन्हा बांधले होते. सोळंकीचा अस्त होताच त्यांचे मांडलिक वाघेला उदयास आले व त्यांनी तेरावे शतकभर गुजरातवर राज्य केले. त्याच्या आठ राजांपैकी वीरधवल व विशालदेव हे प्रसिद्ध आहेत. वीरधवलाच्या कारकीर्दीतच त्याचे अमात्य वस्तुपाल व तेजपाल यांनी अबू, गिरनार, शत्रुंजय व कुंभारिया येथील सुंदर देवळे बांधली. विशालदेवाने उत्तर गुजरातमधील विशालनगर स्थापन केले आणि डभई येथील वैद्यनाथ मंदिर व भारतातील शुद्ध हिंदू स्थापत्य शैलीचा एकमेव म्हणून प्रसिद्ध असलेला भूमिदुर्ग बांधला. करण वाघेला या शेवटच्या रजपूत राजाचा पाडाव करून, गुजरातवरील हिंदू राजवट अलाउद्दीन खल्‌जीने संपुष्टात आणली. मग इ.स. सु. १३०० पासून ४०० वर्षेपर्यंत गुजरातवर मुसलमानी अंमल होता. त्याच्या सुरुवातीच्या काळात हिंदूंच्या जुन्या राजधान्यांचा आणि पवित्र स्थानांचा सर्रास विध्वंस झाला. पहिली अदमासे १०० वर्षे गुजरातवर दिल्लीच्या खल्‌जी व तुघलक सुलतानांची सत्ता होती. १४०९ मध्ये पहिल्या अहमदशाहने गुजरातचे स्वतंत्र राज्य स्थापन करून, अहमदाबाद शहर वसवले. तो आणि पहिला महमूद (महमूदशाह बेगडा) हे गुजरातच्या १६६ वर्षांतील १५ सुलतानांपैकी सर्वांत नामवंत होऊन गेले. दोघांच्याही राजवटी दीर्घकालीन, यशस्वी व भरभराटीच्या झाल्या आणि पूर्वी लुटींनी व जाळपोळीने झालेले गुजरातचे नुकसान त्यांच्या वैभवसंपन्न कालखंडात भरून निघाले. १५७३ मध्ये अकबराने गुजरात जिंकून, तो मोगल राज्याचा एक सुभा बनवला. तेव्हापासून १८५ वर्षांपर्यंत बहुधा राजघराण्यातील सुभेदार आणि ठाणेदार यांच्यामार्फत गुजरातवर मोगलांचे राज्य होते. औरंगजेबाच्या मरणानंतर थोड्याच दशकांत मोगलांना हुसकावून मराठे गुजरातेत सत्तेवर आले. गायकवाडांनी गुजरातच्या बऱ्याच भागांत आणि सौराष्ट्रात आपले राज्य स्थापन केले. यूरोपीय लोकांपैकी गुजरातशी पहिला संपर्क पोर्तुगीजांचा आला. १५३७ मध्ये त्यांनी सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावरील दीव बेटावर पाय रोवले व नंतर कित्येक वर्षे अरबी समुद्रकिनाऱ्यावर आरमारी सत्ता गाजवली. तथापि त्यांच्यामागून लवकरच दाखल होऊन, सुरतेस वखार घालणाऱ्या इंग्रजांनी देशभर हळूहळू आपला जम बसवीत पोर्तुगीजांना निष्प्रभ केले, सागरी व्यापाराचा कबजा मिळवला आणि भारतावर सार्वभौम सत्ता स्थापन केली. ती सत्ता १९४७ पर्यंत टिकली. त्या आधी अर्धशतकापासून भारतीयांची स्वराज्यासाठी चळवळ चालू झाली होती. १९२० मध्ये गुजरातचे सुपुत्र महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाच्या अभिनव तंत्राने अहिंसात्मक आंदोलनाचा पहिला प्रयत्न करून देशभर जागृती केली. थोड्याच वर्षांनंतर बार्डोली सत्याग्रहाच्या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल यांचा राजकीय क्षितिजावर उदय झाला. ते गांधीजींचा उजवा हात बनले. १९३० च्या मिठाच्या सत्याग्रहासाठी अहमदाबादजवळील साबरमती आश्रमातील १२ वर्षांचे वास्तव्य सोडून, महात्माजींनी दांडीमोर्चाने स्वातंत्र्य-आंदोलनाचे दुसरे पर्व सुरू केले. त्यांच्या प्रत्येक हाकेला गुजरातच्या जनतेने हार्दिक प्रतिसाद दिला. गांधीजींची जन्मभूमी आणि कर्मभूमी म्हणून गुजरातला असाधारण महत्त्व आले. १९४२ च्या अंतिम स्वातंत्र्य संग्रामात गुजरात एकजुटीने महात्माजींच्या मागे होता. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्यातून गुर्जर नरेश गायकवाडांच्या बडोदे राज्याप्रमाणे इतरही अनेक लहानमोठ्या संस्थानांची प्रजा वगळल्यासारखी झाली होती. त्या प्रजेच्या आंदोलनाने उग्र स्वरूप घेण्याआधीच नवानगरच्या जामसाहेबांसारख्या सूज्ञ व दूरदृष्टी संस्थानिकांच्या नेतृत्वाने गुजरात व सौराष्ट्रातली, पूर्वी ब्रिटिशांशी स्वतंत्र तहनामे असलेली संस्थाने, भारतीय संघराज्यात विलीन झाली. अपवाद म्हणून पाकिस्तानला मिळू पाहणाऱ्या जुनागढच्या नबाबाला त्याच्या प्रजेने हाकलून देऊन संस्थान भारतात आणले. १९४८ मध्ये सौराष्ट्राचा एक संयुक्त संस्थान संघ होता व गुजरातची इतर संस्थाने तत्कालीन मुंबई राज्याला जोडलेली होती. १९५६ च्या राज्यपुनर्घटनेत कच्छ-सौराष्ट्रासकट गुजरात द्विभाषिक मुंबई राज्यात आले आणि १९६० साली गुजरात वेगळे होऊन पंधरावे राज्य म्हणून भारतीय संघराज्यात दाखल झाले. अहमदाबाद, बडोदे, बनासकांठा, भडोच, मेहसाणा, खेडा, पंचमहाल, डांग, सुरत, साबरकांठा, जामनगर, अमरेली, जुनागढ, कच्छ, राजकोट, सु रेंद्रनगर, भावनगर, बलसाड आणि गांधीनगर या राज्याच्या १९ जिल्ह्यांत, १८६ तालुके व अहमदाबाद महानगरपालिकेसह ५९ नगरपालिका आहेत. शिवाय ४९ नगरपंचायती व ११,५६२ ग्रामपंचायती स्थानिक कारभार पाहतात. भारतीय संविधानानुसार राज्यशासनाने सांभाळण्याचा खात्यांचा कारभार पाहणारी गुजरातची अंतर्गत शासनव्यवस्था सामान्यतः देशातील इतर राज्यांप्रमाणेच आहे. राजधानी तूर्त अहमदाबाद असून, तिच्यापासून थोड्या अंतरावर गांधीनगर ही नवी राजधानी बांधण्यात येत आहे. राज्याला विधान परिषद नाही. विधानसभेच्या १६८ सदस्यांपैकी बहुसंख्य, ९३ काँग्रेस पक्षाचे असून तो पक्ष अधिकारारूढ आहे. त्या खालोखाल संख्याबल स्वतंत्रपक्षाचे, ६६ आहे. लोकसभेवर २४ व राज्यसभेवर ११ सदस्य गुजरात राज्यातून निवडून दिले जातात.


आर्थिक स्थिती : या राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी निम्म्याहून थोडी अधिक भूमी शेतीखाली आहे. कच्छचा विस्तीर्ण वैराण प्रदेश या राज्याच्या हद्दीत असल्यामुळे उजाड व नापीक जमिनीचे प्रमाण चतुर्थांशाहून जास्त आहेत. गवताळ मैदाने व कायम चराऊ कुरणे मात्र राज्यात पुष्कळ आहेत. तांदूळ, ज्वारी, बाजरी व गहू ही मुख्य अन्नधान्ये त्यांपैकी तांदूळ दक्षिण गुजरातच्या खेडा, पंचमहाल, बडोदे व सुरत जिल्ह्यांत, ज्वारी व बाजरी उत्तर गुजरातेत व सौराष्ट्रात आणि गहू मुख्यतः उत्तर गुजरातेत व काही प्रमाणात सौराष्ट्रात पिकवण्यात येतो. पंचमहाल जिल्ह्यात मकाही काढण्यात येतो. नगदी पिकांत कापूस, भुईमूग व तंबाखू ही महत्त्वाची आहेत. बटाटे, मिरची, सुंठ यांचेही उत्पन्न येते. देशातील पंचमांश कापूसक्षेत्र या राज्यात आहे. गुजरात प्रदेश सुपीक असूनही राज्याला अन्नधान्याची तूट आहे. चालू पाटबंधारे योजना उकाई, कडाणा, नर्मदा, काक्रापारा, मही उजवा काठ, दंतीवाडा, हठमती, सरस्वती, शत्रुंजयी-पालिताणा, भादर, शत्रुंजयी-खोडिआर, मच्छू व साबरमती-धोरोई अशा एकंदर १४ असून त्या सर्वांनी मिळून सु. ११·४७ लाख हे. जमिनीला पाणी मिळेल. १९६१ च्या शिरगणतीच्या वेळी राज्यात पशुधन ६५·५ लाख गुरे (गाई-बैल), ३० लाख म्हशी, १५ लाख मेंढरे, २२ लाख बकरी, १ लाख घोडी व तट्टे, १ लाख इतर जनावरे असे होते. १९६५-६६ च्या अधिकृत अंदाजानुसार एकूण गुरेढोरे १·४३ कोटी व कोंबडी २३ लाख होती. अहमदाबाद, आणंद, बडोदे, भावनगर, जामनगर, जुनागढ, राजकोट, सुरेंद्रनगर, मेहसाणा व सुरत येथे दुग्धालय कारखाने चालू असून, आणंद व मेहसाणा येथील दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन लक्षणीय आहे. सौराष्ट्राच्या गीर गाई, उ. गुजरातची काँकरेज गुरे, जाफराबादी व मेहसाणा म्हशी ही राज्यातली नामांकित जनावरे आहेत. गुजरातला कच्छच्या लखपत बंदरापासून दक्षिणेकडच्या उंबरगावपर्यंत सु, १,६०० किमी. समुद्रकिनारा आणि कच्छ खंबायतच्या आखातासह एकूण ६७,६०० चौ.किमी. मच्छीमारीस उपयोगी समुद्र लाभला असून ५१ मच्छीमार बंदरे, १२५ मच्छीमार वस्त्या व छोटी नांगरठाणी आहेत. २·५ लाख मच्छीमारांपैकी प्रत्यक्ष व्यवसायात ३०,००० असून १ ते १५ टनांच्या नौकांतून १९६५-६६ मध्ये त्यांनी ३ कोटी रु. किंमतीचे सु. १ कोटी टनाहून अधिक मासे पकडले. बोंबिल, सॅमन, सरंगे, कोळंबी, झिंग्या पर्च, हिल्सा व इतर अनेक जातींच्या माशांचा स्थानिक खप होऊन बाकीचे मुंबईच्या बाजारात विक्रीस जातात. माशांखेरीज शंख, शिंपले व मोती सागरातून काढण्यात येतात. त्याशिवाय माशांपासून मिळणारे आयसिंग्लास (चिनी गवत), मच्छीखत, शार्क लिव्हर ऑइल असे अनेक अर्थोत्पादक पोटधंदे मच्छीमारीतून विकसित करण्यात आले आहेत. अंतर्देशीय गोड्या पाण्याच्या मच्छीमारीत २,००० कोळी ९ जिल्ह्यांत उपजीविका करतात. तळ्यांमधील मासे पुरवठ्यासाठी २ मत्स्यजलाशय व २ अंडीकेंद्रे चालवण्यात येतात. मासे टिकवून ठेवण्यासाठी ८३ बर्फाचे कारखाने व ११ शीतगृहे आहेत. अहमदाबादेस मच्छीमार प्रशिक्षण संस्था असून, अन्यत्र ४ मच्छीमार शाळा, ३ मदतकेंद्रे आणि वेरावळ येथे एक संशोधन केंद्र आहे. शासकीय प्रोत्साहनाने मच्छीमारांच्या ८४ सहकारी संस्था चालू आहेत. १९६४-६५ मध्ये राज्याचे ९ टक्के क्षेत्र सु. १८·६ लाख हे. वनाच्छादित होते. त्यापैकी ११ लाख हे. डांग, जुनागढ, पंचमहाल, बडोदे, भडोच, सुरत, बनासकांठा आणि अंशतः जामनगर व कच्छ या जिल्ह्यांत होते. जंगल उत्पादन साग, वेळू, पिवळे, लाल व काळे लाकूड, चंदन, खैर, मिमल, धुमडा, धुडिजा अशा जातींच्या झाडांचे लाकूड असून, दुय्यम उत्पादन गवत, मध, लाख, रंगांसाठी लाकूड व साली या मालाचे होते. डांगमधले सागाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय होते. उद्योगधंद्यांत गुजरात राज्य व्यापाराप्रमाणेच झपाट्याने प्रगती करीत आहे. स्वतः शासनाने बडोद्याला एक खत कारखाना काढला असून, भावनगर सार्वजनिक दुग्धालयासारख्या विविध उद्योगात शासन पुढाकार घेत आहे. खाजगी क्षेत्रात मुख्य कारखानदारी धंदे, सूत व कापडगिरण्या, सिमेंट, रासायनिक द्रव्ये, यांत्रिकी व विजेची उपकरणे, खाद्य तेलावर प्रक्रिया असे आहेत. सूत व कापडगिरण्या अहमदाबादेत केंद्रित असल्या तरी भडोच, नवसारी, नडियाद अशा अन्य ठिकाणीही चालू आहेत. कापूस पिंजून गठ्ठे दाबण्याच्या जिन्स अनेक जिल्ह्यांत असून, सु. ३५ लाख सूत चात्या व ६३,००० यंत्रमाग अहमदाबादच्या ६९ व बाकी गुजरातच्या ४३ मिळून एकूण ११२ गिरण्यांत आहेत. त्यांतून सर्व पाळ्यांचे मिळून १·७५ लाखांवर कामगार १६,७२८ टन किंवा जवळजवळ १ लाख गासड्या कापसाचे कापड विणून तयार करतात. कापडधंद्याला पूरक अशा इतर उद्योगांचे कारखाने अहमदाबादप्रमाणेच इतर गिरणगावांभोवती निघाले आहेत. सिमेंट कारखाने सौराष्ट्रात पोरबंदर, द्वारका व सिक्का येथे आणि रासायनिक मालाचे कारखाने बडोद्याच्या परिसरात आहेत. सुती, कृत्रिम धाग्याचे व रेशमी विणकाम आणि जरीकाम सुरतेत केंद्रित आहे. दोन लोकरगिरण्या सौराष्ट्रात जामनगरला असून, तीत सु. १२,००० चात्या व १६७ यंत्रमाग आहेत. राज्यात ६ औद्योगिक वसाहती असून त्यांची संख्या आणखी वाढून वेगवेगळे कारखानदारी धंदे अधिक विकसित होत आहेत. खेडा जिल्ह्यातील आणंद येथील सहकारी दुग्धोद्योगाचे उत्पादन देशभर नाव मिळवीत आहे. गुजरातेत खनिज तेल आणि ज्वलनवायू सापडल्यामुळे बडोद्याजवळ कोयाली येथील खनिज तेलशुद्धीकरणाचा कारखाना केंद्राने चालू केल्यामुळे गुजरातच्या उद्योगधंद्यांना औष्णिक शक्तीसाठी इंधनाची मोठीच सोय झाली आहे. ज्वलनवायू खंबायत, धुवरण, अंकलेश्वर-उत्रण व बडोदे, अशुद्ध तेल अंकलेश्वर ते कोयाली आणि खनिज तेल उत्पादने कोयाली ते अहमदाबाद याप्रमाणे नळांनी पोहोचविण्यात येत आहेत. १९६६ मध्ये औष्णिक व २ डीझेल केंद्रांतून २·५ लाख किवॉ. विद्युत्‌शक्ती निर्माण झाली. तिसऱ्या योजनेअखेर ५३ टक्के किंवा गावे व खेडी मिळून १,८४० ठिकाणांना वीज पोहोचू लागली व विद्युत् उत्पादनक्षमता ६०८ मेगॅवॉटपर्यंत वाढली. अहमदाबाद, बडोदे, सुरत, भावनगर, जामनगर व राजकोट या ठळक बाजारपेठांपैकी व्यापार केंद्र म्हणून अहमदाबादचे स्थान पश्चिम भारतात मुंबई खालोखाल आहे.

१९७०-७१ मध्ये राज्यातील एकूण ५,६५६ किमी. लोहमार्गांपैकी १,१३४ किमी. रुंदमापी ३,३८१ किमी. मीटरमापी व १,१४१ किमी.अरुंदमापी होते. लोहमार्गांचे जाळे सौराष्ट्र व बडोदे भागात अधिक दाट आहे. कच्चे व पक्के रस्ते मिळून एकंदर ३२,७९७ किमी. असून चांगले रस्ते डांग, अमरेली, जुनागढ, राजकोट व भावनगर जिल्ह्यांत तर निकृष्ट रस्ते मेहसाणा, साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अशी स्थिती होती. सर्व प्रकारची मोटार वाहने सु. ९९,६२१ असून त्यांपैकी राज्य वाहतुकीच्या ३,१४६ गाड्या रोज अंदाजे १·३७ लाख किमी. मार्गक्रमण करून सरासरी ८·४५ लाख उतारू वाहून नेतात व ४·८८ लाख रु. मिळवतात. राज्याचे सर्वात मोठे कांडला बंदर वर्षाला १५·७५ लाख टन मालाची चढउतार करते. बाकीच्या ८ मध्यम व ४२ सामान्य बंदरांपैकी ओखा, बेडी, वेरावळ, सिक्का व पोरबंदर या बंदरांतून कमाल ६ पासून किमान २ लाख टनांपर्यंत मालाची चढउतार होते. अहमदाबाद, राजकोट आणि भूज येथे नभोवाणी केंद्रे आहेत. १९६७ अखेर राज्यात सु. ६ लाख रेडिओ संच होते. गुजराती भाषेची एकूण १३ ते १५ लाख खप असणारी ४९५ नियतकालिके असून त्यांपैकी ३५ दैनिके, १२८ साप्ताहिके व २२८ मासिके आहेत.


लोक व समाजजीवन : गुजरातचे बहुसंख्य म्हणजे ८०% च्यावर लोक जरी हिंदू असले, तरी त्यांच्यात अनुसूचित जाती (६·७%) व अनुसूचित जमाती (११·६%) बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग, दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या सु. ६२% हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी, वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव, पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील १७·५ लाख मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत. पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे. हिंदूंची दैवते द्वारकेचा कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात केंद्रित झाले आहेत. गुजरातमधील बहुसंख्य मुसलमानही गुजरातीच आपली भाषा मानतात व काही पंथांचे धर्मग्रंथदेखील गुजराती लिपीत आहेत. गुजरातची जनता परधर्म सहिष्णू असली, तरी जातिभेदाच्या बंधनातून मुक्त नाही व अस्पृश्यता निर्मूलनाची प्रगतीही खुद्द महात्माजींच्या गुजरातेत अजून म्हणण्यासारखी दिसत नाही. अनुसूचित जाती व ‘साळीपरज’ जमाती वगळता बाकीचा गुजराती समाज एकोप्याने व गुण्यागोविंदाने राहतो. व्यापारी वर्ग अन्य कोणत्याही राज्यापेक्षा येथे जास्त असल्याने ‘महाजन’ वर्गाकडे समाजाचे नेतृत्व असते. या वैश्यप्रधान संस्कृतीत अनुत्पादक विद्येला व व्यापारेतर पराक्रमाला महत्त्व नसल्याने, ब्राह्मणक्षत्रियांचे स्थान दुय्यम आहे. ज्ञातीचे नियंत्रण मानण्याची रूढी सामाजिक जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात कायम आहे. तथापि परंपरागत आचारविचारांच्या पद्धतीत व्यावहारिक दृष्ट्या लवचिकपणाही आला आहे व उच्चनीचतेच्या कल्पना जन्मापेक्षा आर्थिक स्थितीवरूनही ठरू शकतात. १९७१ च्या शिरगणतीतील २·६ कोटीहून अधिक लोकसंख्येपैकी १·९ कोटीहून अधिक लोक, अठरा हजारांवर खेड्यांत आहेत. १ लाखावर वस्तीची अहमदाबाद, बडोदे, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर व नडियाद ही सात शहरे असून आणखी १७ शहरांची लोकसंख्या ५० हजारांवर आहे. शिवाय पुरे किंवा छोटी छोटी शहरे गुजरातेत आणखी १९३ आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक छोट्या संस्थानांच्या राजधान्या व व्यापार उद्योगाची विविध लहानलहान केंद्रे मिळून इतर राज्यांच्या तुलनेत नगरांची संख्या गुजरातेत अधिक प्रमाणात आहे. साक्षरतेचे प्रमाण ३५·७२% आहे. २०,७३,०५३ कामगारांपैकी ५·५७% शेतकरी, ४·६२% शेतमजूर, ८९·८१% इतर कामगार आहेत. व्यापारात अन्यत्र कमाई करून आपल्या गावी चांगली घरे बांधण्याची प्रवृत्ती गुजरातेत असल्याने इतर राज्यातील खेड्यांपेक्षा इकडची खेडी अधिक संपन्न वाटतात. खेड्यातील सामान्य घरे कुडाच्या भिंतींची व गवती छपराची आणि बऱ्यापैकी घरे विटांनी बांधलेली व कौलारू असतात. लहानमोठ्या शहरांमधून मात्र सिमेंट काँक्रीटचा वापर सर्रास आढळतो. अनेक गावांचे जुन्या तटबंदीचे भाग अजून शिल्लक आहेत. गुजराती लोक अधिकांश शाकाहारी असून खेड्यात बाजरी वा ज्वारीची भाकरी, डाळी, तेल व भाज्या त्यांच्या भोजनात असतात.  नागरी वस्तीत गहू, तांदूळ, दूधदुभते व साखर यांचा समावेश रोजच्या आहारात नित्य असतो. खेड्यातून पुरुषाचा वेश धोतर, कोपरी, सदरा आणि प्रसंगी अंगरखा, साफा किंवा पागोटे व बायकांचा चोळी, घागरा, उजव्या खांद्यावर पदराची साडी किंवा ओढणी असा असतो. तसेच पायात मोठाले पोकळ वाळे, हस्तिदंती बांगड्या, गळ्यात वजनदार अलंकार आणि दंडांवर व नाकाकानांत ठळक दागिने घालण्याची आवड ग्रामीण स्त्रियांत आढळते. शहरी वस्तीत पुरुष धोतर, शर्ट, डगला व टोपी घालतात आणि स्त्रिया उजव्या खांद्यावर पदर असलेली सहावारी साडी नेसतात. उत्तर गुजरातेत व कच्छ-सौराष्ट्रात लोकांच्या पेहरावावर राजस्थानची छाप दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांची राहणी मध्य व दक्षिण गुजरातपेक्षा वेगळी असते. उत्तर गुजरात व कच्छ-सौराष्ट्राचे लोक जास्त काटक, कष्टाळू व कडवे , तर मध्य व दक्षिण गुजरातचे सौम्य, हौशी व सुखवादी वाटतात.

गुजराती भाषा नवव्या ते दहाव्या शतकांत शौरसेनीपासून विकसित झाली, असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत-प्राकृतशी संबंध असल्यामुळे तत्सम व तद्‌भव शब्दांचा भरणा तिच्यात आहे. त्याशिवाय फार पूर्वीपासून व्यापाराच्या निमित्ताने इराण-अरबस्तानशी संबंध आल्यामुळे त्या देशांच्या भाषांतले, पोर्तुगीजांशी संपर्क आल्यामुळे त्यांचे आणि मराठी-कन्नडच्या शेजारामुळे त्या भाषांचे, असे अनेकविध शब्द गुजरातीत आले आहेत. देवनागरीतील काही अक्षरांचा आकार बदलून व शिरोरेखा वगळून गुजराती लिपी बनली आहे. जुने कवी या भाषेला प्राकृत किंवा अपभ्रंश म्हणत. महाकवी प्रेमानंदाने हिला प्रथम गुजराती हे नाव दिले. तिचा विकास दहाव्या शतकापासून होऊ लागला. तेव्हापासून गुजराती साहित्याची निर्मिती होऊ लागली. प्राचीन गुजराती साहित्य ‘गौर्जरी अपभ्रंश’ भाषेतील आहे. दहाव्या शतकात रासो हा व्रज-मारवाडी भाषांतील राजस्तुतिपर काव्यप्रकार सुरू झाला. त्याचा उपयोग जैन कवींनी धर्मप्रचारासाठी केला. अकराव्या ते चौदाव्या शतकापर्यंत धार्मिक व नैतिक स्वरूपाच्या तरंगलोलासारख्या रचना निर्माण झाल्या. भरतेश्वर बाहुबलिरास  हा जैनरास सर्वांत प्राचीन आहे. त्याशिवाय सिरिस्थूलिभद्रफागूसारखी फागुकाव्ये किंवा ऋतूपरत्वे गाणी व बारमासी हा ऋतुगीतांचाच एक प्रकार जैन कवींनी व नंतर उत्तरकालीन कवींनीही हाताळला. त्या उत्तर कालातल्या ऐतिहासिक किंवा चरित्रात्मक आख्यानकाव्यांना प्रबंध म्हणत. इ. स. १४५६ मधील झालोरच्या पद्मनाभाचा कान्हडदे प्रबंध  विख्यात आहे. दुसरा कालखंड गुर्जर भाषेच्या  भक्तियुगाचा. त्यात नरसी मेहता, मीरा, आखो, भगत, प्रेमानंद, पुरोगामी विचारसरणीचा शामळ, दयाराम, भालण, भीम अशा अनेकांनी काव्ये रचली. त्यात नरसी-प्रेमानंद-दयाराम या त्रिमूर्तींनी गुजरात काव्यात श्रेष्ठ स्थान मिळविले. अर्वाचीन कालखंड १८५० मध्ये सुरू झाला. त्यांत नवप्रेरणेचा उद्‍गाता नर्मद, वेन चरित्रकार दलपतराम, विद्वान साहित्यिक नरसिंहराव दिवेटिया, प्रेमकवी कलापी, कान्त, सरस्वतीचंद्र  ह्या युगप्रवर्तक कादंबरीचे लेखक गोवर्धनराम त्रिपाठी, भावकवी नानालाल, कांदबरीकार कन्हैयालाल मुनशी यांची नावे उल्लेखनीय आहेत. महात्मा गांधींच्या लेखनाने तर गुजराती भाषेत नवे गांधीयुग अवतरले. मोटेचा नाडा धरणाऱ्या माणसालाही समजेल, अशी सुबोध गुजराती भाषा लिहिण्यास कृतसंकल्प होऊन त्यांनी ती समाज प्रबोधनासाठी राबवली. त्यांचे समकालीन व अनुयायी काका कालेलकर, किशोरलाल मशरूवाला, महादेवभाई देसाई, रामनारायण पाठक व धूमकेतू अशांच्या लेखनाने दुसऱ्या महायुद्धकालापर्यंत गुजराती भाषा संपन्न झाली. १९४० नंतरच्या काळात कादंबरीकार रमणलाल देसाई, चुनीलाल मडिया, आचार्य गुणवंतराय, पन्नालाल पटेल कथालेखक गुलाबदास ब्रोकर, ईश्वर पेटलीकर नाटककार चंद्रवदन मेहता विनोदलेखक ज्योतिंद्र दवे टीकाकार विजयराय वैद्य, विष्णुप्रसाद त्रिवेदी सौराष्ट्राचे सव्यसाची साहित्यकार झवेरचंद मेघाणी त्याचप्रमाणे उमाशंकर जोशी, राजेंद्र शाह, निरंजन भगत अशा वाङ्‍मयसेवकांनी गुजराती भाषेच्या साहित्यात मोलाची भर घातली आहे.


शिक्षण : १९६७ च्या शासकीय अंदाजानुसार १४% प्रजा शिक्षणाचा लाभ घेत होती. तिसऱ्या योजनेत ६ ते ११ वयाच्या मुलांपैकी ९२% मुले विनाशुल्क अनिवार्य प्राथमिक शिक्षण घेत होती. १९७४-७५ मध्ये २१,९०० प्राथमिक शाळांत ३५,००,००० विद्यार्थी असून माध्यमिक शाळांची संख्या २,१५० होती. त्यांत ७,७५,००० विद्यार्थी होते. उच्च माध्यमिक शिक्षणाच्या २७० शाळांत १,३७,००० मुले व ३,३०० इतर शाळांतून १,५०,००० मुले होती. तिसऱ्या योजनेअखेर ५ अभियांत्रिकी महाविद्यालये, १२ विविध हुन्नर संस्था व ४२ तंत्रशाळा चालू होत्या. १८ कामगार प्रशिक्षण केंद्रांत ४,२०० विद्यार्थी होते. शिक्षणावर सु. २० कोटी रु. पर्यंत खर्च झाला. १९७४-७५ मध्ये राज्यात एकूण आठ विद्यापीठे असून त्यांपैकी एक निवासी, एक शुद्ध आयुर्वेदीय व एक कृषी विद्यापीठ आहे. महाविद्यालयांपैकी ७६ कला व विज्ञान, १३ व्यापार, १ शारीरिक प्रशिक्षण व १३ अध्यापन प्रशिक्षण या विषयांची होती. विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ९४,००० होती.

कला व क्रीडा : गुजरातमधील हस्तकलांत मातीची भांडी, सुरती जरीकाम, कच्छी जडावकाम, पाटण येथील गोमेद (अकीक) अलंकार, अखेडा लाखकाम, पालनपूरचा सुंगधी माल आणि अहमदाबाद व इतर ठिकाणचे कोरीव लाकूडकाम उल्लेखनीय आहेत. गुजरातच्या चित्रकलेचे वैशिष्ट्य बाराव्या ते पंधराव्या शतकांतील जैन ग्रंथांत व नंतर पंधराव्या शतकातील हिंदू पोथ्यांत मिळालेल्या चित्रांतून आढळते. राजपूत शैली आधीची ही ‘दक्षिणी राजस्थान’ शैली खास गुजरातची मानण्यात येते. ‘शिलावत’ शैलीतील कच्छ व सौराष्ट्रातील भित्तिचित्रेही गुजरातच्या प्रादेशिक चित्रकलेची स्वतंत्र शैली दाखवितात. आधुनिक काळात गुजराती चित्रकलेचे पुनरुज्जीवन होऊन लाठीनरेश मंगलसिंगजी, ब्रिजलाल भगत, खोडीदार परमार, आचार्य रविशंकर रावळ, श्यावक्ष चावडा, कनू देसाई आदी चित्रकार ख्याती पावले आहेत. गुजरातच्या रंगभूमीची परंपरा अंबाजी-बहुचराजी या देवींच्या उत्सवातून होणाऱ्या ‘भवाई’ नामक प्रहसनात्मक नाट्यप्रकाराइतकी जुनी आहे. आधुनिक रंगभूमीची सुरुवात गुजरातेत १८५०च्या सुमारास झाली. त्या कामात पारशी मंडळींनी पुढाकार घेतला. हौशी नाट्यप्रयोगापासून सुरुवात होऊन, नंतर हळूहळू धंदेवाईक नाटक मंडळ्या नाटके करू लागल्या. प्रथम रूपांतरित नाटके होत पण लौकरच स्वतंत्र कृती होऊ लागल्या. १८६८ पासून नर्मद, मणिलाल त्रिभुवनदास, प्रभुलाल द्विवेदी, कन्हैयालाल मुनशी, चंद्रवदन मेहता यांच्या नाटकांनी गुजराती रंगभूमी गाजविली. गुजरातच्या परंपरागत सामूहिक क्रीडा, रास व गरबा ही नृत्ये आणि मार्गी व देसी हे लोकसंगीताचे प्रकार आहेत. खेळ व करमणूक भक्तीवर आधारल्यामुळे लोकनृत्ये व समूहगायने यांत स्त्री-पुरुषांच्या संमिश्र समाजाला निःसंकोचपणे भाग घेता येतो. व्यापारी साहस, सुखोपभोग, दानशूरता, कला, पुरस्कार, व्यवहारचातुर्य व श्रद्धाळूपणा ही गुजरातची विशेष लक्षणे मानता येतील.

संदर्भ : 1. Dixit, K. R. Geography of Gujarat, New Delhi, 1970.

            2. Munshi, K. K. Glory that was Gurjara Desa, Bombay, 1955.  

ओक, शा. नि.

गुजरात


द्वारकाधीशाचे मंदिर, द्वारकाप्राचीन सूर्यमंदिर, मोढेरा (११ वे शतक).कीर्तिमंदिर, पोरबंदर.शासकीय खत कारखाना, बडोदे.हरिजन आश्रम, साबरमती.कांकरिया तलाव, अहमदाबाद.गीर जंगलातील सिंह.सोमनाथ मंदिराच्या एका स्तंभावरील शिल्प, पाटण.आदिवासी स्त्री. बनासकंठा.