नागालँड : (नागभूमी). भारताच्या पूर्व सीमेवरील अत्यंत मोक्याच्या जागी वसलेले डोंगरी जमातींचे एक स्वायत्त राज्य. क्षेत्रफळ १६,५२७चौ. किमी. लोकसंख्या ५,१६,४४९ (१९७१). विस्तार – २५° उ. ते २७°उ. आणि ९३°२० पू. ते. ९५°१५ पू. यांदरम्यान. याच्या दक्षिणेस मणिपूर, पश्चिमेस मेघालय, मीकीर टेकड्या व आसामचा जोरहाट जिल्हा, उत्तरेस अरुणाचल प्रदेशाचा तिराप जिल्हा आणि पूर्वेस ब्रह्मदेश आहे. कोहीमा ही राजधानी आहे. लोकसंख्या २१,५४५ (१९७१). बांगला देश आणि चीन हे देश नागालँडपासून जवळच आहेत. राजकीय दृष्ट्या नागालँड हा भारताचा अत्यंत महत्त्वाच्या जागी असलेला प्रदेश आहे.

भूवर्णन : नागालँड हा डोंगराळ प्रदेश तृतीययुगीन खडकांचा व घड्या पडून झालेल्या रांगांचा आहे. राज्याच्या नैर्ऋत्येकडून शिरलेली बरैल डोंगररांग पूर्वेकडे वळते व ईशान्येकडे तिचे अनेक फाटे ब्रह्मपुत्रेस समांतर जातात. त्यांतील सर्वांत पूर्वेकडचा फाटा राज्याच्या व देशाच्या पूर्व सीमेवरील पातकई श्रेणीत विलीन होतो. त्याच श्रेणीत राज्यातले सर्वोच्च (३,८२६ मी.) उंचीचे सरमती शिखर आहे. दक्षिण सीमेवरचे जापवो (३,०१४ मी.), कापू (२,८८९ मी.), पाओना (२,८३८ मी.) आणि कापामेझू (२,४७१ मी.) ही राज्यातली इतर शिखरे आहेत. राज्यातील सर्वांत मोठी नदी दोईआंग मध्यभागातून उत्तरेकडून वाहून पश्चिमेस सीमेबाहेर पडते तिला मिळणारी रंगमापानी, नैर्ऋत्येत उगम पावून दिमापूरजवळ राज्याबाहेर पडणारी धनसिरी व व तिला मिळणारी दिफुपानी, उत्तर भागातल्या दिसई, झांसी व दिखो या सर्व नद्या पश्चिमेकडे आसाममध्ये ब्रह्मपुत्रेला मिळतात. राज्याच्या आग्नेय सीमेवरची तिझू मात्र तिच्या लानिएर या उपनदीसह पूर्वकडील ब्रह्मदेशातील चिंद्‌विनला मिळते.

मृदा : जंगलात कुजलेल्या पालापाचोळ्याच्या आणि नद्यांकाठी गाळाच्या जमिनी आहेत. कोहीमा जिल्ह्यात मात्र डोंगरउतारावरील शेल खडकांपासून बनणारी कठीण चिकणमाती आहे. ‘झूम’ किंवा फिरत्या शेतीपद्धतीमुळे मृदा निकृष्ट होत चालल्या होत्या पण अलीकडे शासकीय मार्गदर्शनाने डोंगरउतारावरची पायऱ्यापायऱ्यांची शेतीपद्धत येऊन लागवडीचे क्षेत्र वाढत आहे आणि खतांनी मृदा संपन्न करण्याचा उपक्रम चालू आहे.

खनिजे : वेगवेगळ्या रंगछटांचे चुनखडक बांधकामाला उपयुक्त दगड पुरवितात, काही टेकड्यांत लिग्नाइटचा शोध लागला आहे. बोर्जन येथे एक कोळशाची खाण आहे आणि कित्येक ठिकाणी विहिरींच्या खाऱ्या पाण्याचे मीठ बनवण्यात येते. दिखो खोऱ्यात चुन्याचे समृद्ध साठे व खनिज तेलही सापडण्याची चिन्हे दिसली आहेत.

हवामान : नागालँडचे हवामान डोंगराळ भागात हिवाळ्यात थंड व जोमदार असते. दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाश व रात्री दहिवर पडण्याचा पुष्कळदा अनुभव येतो. उन्हाळ्यात कोहीमा येथील तपमान २६·४° से. च्या वर जात नाही. तथापि वातावरणात आर्द्रता फार असल्याने हवामान निरुत्साही असते. सखल भागात व खोऱ्यांत तर हवामान आरोग्यविघातक असून हिवताप व इतर ज्वरांचा प्रजेला उपद्रव होतो. राज्याचे सर्वसाधारण तपमान हिवाळ्यात १७·५° से. तर उन्हाळ्यात २७·५° से. पर्यंत असते. सरासरी वार्षिक पर्जन्य दक्षिणेत १७५ सेंमी. पासून उत्तरेकडे २५०सेंमी. पर्यंत वाढत जातो.

वनस्पती व प्राणी : या भागातला निसर्गतः समृद्ध वनप्रदेश ‘झूम’ शेतीपद्धतीने, अवाजवी व बऱ्याच प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे एकूण क्षेत्रफळाच्या १७·४६% एवढाच उरला आहे. १९७०च्या नागा हिल्स झूमलँड ॲक्टखाली २,०७२ चौ.किमी. क्षेत्र आहे. या उंचीवरचा सदाहरित पावसाळी जंगलाचा वनस्पतिवर्ग खासी टेकड्या व सिक्कीममधील वनस्पतींसारखाच आहे. इमारती लाकडाच्या उपयोगी वृक्ष, झुडुपे, बांबू, वेत, बोरू व इतर जातींची गवते त्यात विपुल आहेत.

वन्य प्राण्यांपैकी हत्ती, रानरेडा, वाघ, चित्ता, अस्वल, सांबर, भुंकणारे हरिण, उडते लेमूर आणि महोका, तित्तिर, रानकोंबडा इ. वनपक्षी दऱ्यांत व निबिड अरण्यांत आढळतात. विविधरंगी फुलपाखरे सर्वत्र आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : आर्यपूर्व काळापासूनच्या भारताच्या अनेक आदिवासींपैकी प्राचीन किरात हेच मूळचे नागा, असा अभ्यासकांचा कयास आहे. वैदिक युगापासून नागांचे उल्लेख वरचेवर येतात. ऋग्वेदातील काही सूक्तांचे द्रष्टे नाग होते, त्याचप्रमाणे कित्येक ऋषी, लव, कुश, मेघनाद, यदू, उग्रसेन अशा राजपुरुषांच्या राण्या आणि अर्जुनाच्या उलूपी व चित्रांगदा या स्त्रिया नागवंशीय होत्या, असे पुराणे सागतात. ‘नग’ म्हणजे पर्वत व त्यात राहणारे ते नागा, ही त्यांच्या नावाची एक व्युत्पत्ती तर दुसरी तिबेटी-ब्रह्मी भाषेत ‘नोक’ म्हणजे ‘लोक’ या शब्दाचा अपभ्रंश ‘नागा’ अशी आहे. स्वतः हे लोक आपला उल्लेख कोन्याक, अंगामी, सेमा अशा जमातवाचक नावांनी करतात. नागा हे दुसऱ्यांनी त्यांना दिलेले नाव आहे. हे लोक कष्टाळू, मानी, स्वावलंबी, युद्धप्रिय परंतु आनंदी, विनोदप्रिय असून लय व संगीतप्रेम त्यांच्या हाडीमाशी रुजले आहे. रंग आणि आकृतिबंध यांचे त्यांना उपजत ज्ञान असते. नागांचा आर्यांशी संघर्ष सुरुवातीपासूनच सुरू झाला. तो दीर्घकालपर्यंत चालू राहून काही नागा आर्यवंशात विलीन झाले आणि प्रतिकार करणारे हटतहटत भारताच्या अतिपूर्व गिरिप्रदेशात जाऊन स्वतंत्र राहिले. आर्यांनी त्यांच्या शक्य तेव्हा कत्तली केल्या. त्यांना जंगली व समाजबाह्य ठरवून कायमचे दूर केले. त्यामुळे आणि दुर्गम पर्वतप्रदेशाच्या अलगपणामुळे गिरिजन नागांना भारत देशाबद्दल, त्यातील लोकांबद्दल किंवा त्यांच्या धर्मांबद्दल कोणतीही आत्मीयता उरली नसल्यास नवल नाही. इतिहासकाळात तेराव्या शतकात उत्तर ब्रह्मदेशातल्या एका शान सरदाराने आक्रमण करून नागांना दास केले. त्यानंतर नागा आसामच्या आहोम राजांचे अंकित झाले व हस्तिदंत, हत्यारे, वस्त्रे, कापूस अशा रूपांनी त्यांना खंडणी देत राहिले. आहोमांची सत्ता गेल्यावर नागा मुसलमानांच्या किंवा इंग्रजांच्या अंमलाखाली पूर्णपणे गेले नाहीत. दुर्गम गिरिप्रदेशात ते मुक्त व निर्भय राहत. दीड शतकापूर्वीपर्यंत त्यांच्यात गुलामगिरी, नरमेध, मुंडकेशिकार असे रानटी आचार प्रचलित होते. मैदानी भागात उतरून त्यांनी धाडी घालण्यास सुरुवात केली, तेव्हा मात्र ब्रिटिश सत्तेला प्रतिकार करणे भाग पडले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक दण्डिक मोहिमा काढून ब्रिटिशांनी नागाभूमीवर अंशतः नियंत्रण बसवले. १८६६मध्ये आसाम प्रांत झाला, १८८०मध्ये नागा हिल्सचा जिल्हा म्हणून त्यात समावेश झाला. १९१७–१९मध्ये मणिपूरमधील कुकी जमातीविरुद्धच्या मोहिमेत भारत-ब्रह्मदेश सीमा निश्चित झाली, तेव्हा तिच्या पूर्वेकडचा नागा जमात प्रदेश अशासित ठेवण्यात आला, पण नागा हिल्स जिल्ह्याचा कारभार मात्र कोहीमा ठाण्यातून चालू राहिला. दुसऱ्या महायुद्धात मार्च ते जून १९४४ कोहीमा जपान्यांच्या ताब्यात होते. त्यांना घालवण्यात ब्रिटिशांना नागांनी मदत केली. युद्धात मिळविलेल्या शस्त्रांमुळे आणि ब्रिटिश, भारतीय व जपानी सैन्यांशी आलेल्या संपर्कामुळे ह्यांचे एकाकी जीवन विचलित होऊन त्यांच्या डोक्यात नवीन विचार येऊ लागले. नंतर लौकरच भारताला स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली, तेव्हा ब्रिटिशांनी व परकीयांनी – विशेषतः अमेरिकन बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी – नागांना पढवले की, तुम्ही किंवा तुमची भूमी भारतात नाही, ब्रिटिश सत्ता गेल्यावर तुम्ही स्वतंत्र राहू शकाल. अगोदरच धर्मांतराने जवळजवळ निम्मे नागा ख्रिस्ती व बरेचसे साक्षर झाले होते. आशियातील पहिले स्वतंत्र खिस्ती राष्ट्र नागालँड करता येईल, अशी अँग्लो-अमेरिकन फूटपाड्यांनी नागांना चिथावणी दिली. परिणामी भारत स्वतंत्र होताच नागांचे स्वातंत्र्यांदोलन सुरू झाले. महायुद्धातली शिलकी हत्यारे घेऊन सु. १,५००गनिमी नागांनी भारताशी युद्ध पुकारले, आपले प्रतिसरकार स्थापन केले आणि धाकदपटशाही, लुटालूट, अत्याचार व हिंसा या मार्गांनी सारी नागभूमी पेटवून दिली. भारताने धीमेपणाने प्रतिकार केला, प्रतिहिंसक धोरण न ठेवता शक्य तेवढ्या समजावणीच्या मार्गांनी नागा प्रजेशी बोलणी चालू ठेवली. हळूहळू इष्ट तो परिणाम दिसू लागला. नागालोकांचे आपापसांत मतभेद, वेगवेगळ्या राजकीय आकांक्षा, १५-१६जमाती व ३०हून अधिक बोलीभाषा यांमुळे त्यांच्यात एकी होणे कठीण होते. लौकरच शांततेसाठी सामोपचाराचे बोलणे ऐकणारे नागा पुढे येऊ लागले. १९५२च्या निवडणुकांवर संपूर्ण बहिष्कार घालणारे नागा १९५७च्या नागाप्रजा परिषदेला कोहीमात भारत शासनाच्या आवाहनाने हजर झाले. बंडखोर नागांचा एक पुढारी फीझो लंडनला जाऊन राहिला. त्यानंतर नागा हिल्स व तुएनसांग (त्वेनसांग) मिळून प्रदेश वेगळा काढून केंद्रशासित करण्यात आला व १९५९मध्ये प्रजेच्या इच्छेनुसार त्याला ‘नागालँड’ नाव मिळाले. ही व्यवस्थाही नागांना न पटल्यानंतर १९६१मध्ये अंतरिम सभा व कार्यकारी मंडळासह वेगळे नागालँड राज्य संघटित करून त्यावर तात्पुरती आसामच्या राज्यपालाची देखरेख ठेवली. लौकरच १९६२मध्ये भारतीय संसदेने संविधानाचे तेरावे संशोधन विधेयक मान्य करून धर्म, सामाजिक चालीरीती, जमातींच्या न्यायपद्धती, प्रादेशिक स्वायत्तता यांबाबत राज्याला अभिरक्षण ठेवून ‘नागालँड’ राज्याचे १ डिसेंबर १९६३ रोजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन्‌ यांच्या हस्ते रीतसर उद्‌घाटन केले. नंतर ४०दिवसांनीच निवडणुका होऊन विधानसभा आणि मंत्रिमंडळासह नव्या राज्याचा कारभार सुरू झाला. पहिली दोनतीन वर्षे राज्यात स्थैर्य नव्हते. हटवादी भूमिगत नागांचे उपद्रव चीन व पाकिस्तानच्या मदतीने चालू राहिले पण बहुसंख्य नागा प्रजेला शांततामय जीवनाचे महत्त्व पटून १९६४पासून राज्याचा गाडा बराच सुरळीत चालू लागला. बंडखोर नागांशी शांततेसाठी केलेली बोलणी १९६५मध्ये निष्फळ ठरली व १९७३मध्ये बंडखोर नागांचे क्रांतिकारक शासन बरखास्त करण्यात आले. विधानसभेतील नागा राष्ट्रीय संघटना पक्षाच्या ४६म्हणजे सर्वच सदस्यांतील ६तुएनसांग जिल्हा प्रादेशिक मंडळाने निवडून दिले होते. त्या जिल्ह्याचा कारभार स्थानिक प्रजेच्या इच्छेनुसार चालावा, ही विशेष सवलत देण्यात आली होती. फेब्रुवारी १९७४ च्या निवडणुकीत युनायटेड डेमॉक्रॅटिक फ्रंट या पक्षाच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्याखेरीज ५मंत्री व २उपमंत्री होते. नागालँडमधील अस्थिर परिस्थितीमुळे २२मार्च १९७५रोजी तेथे राष्ट्रपती राजवट सुरू करण्यात आली व २०में १९७५रोजी विधानसभा बरखास्त करण्यात आली. आसामचेच उच्च न्यायालय या राज्याचे वरिष्ठ न्यायदानाचे काम पाहते. नागालँडमधून लोकसभेत एक व राज्यसभेत एक सभासद निवडून दिले जातात. राज्यकारभाराच्या सोयीसाठी नागालँडचे कोहीमा, मॉन झुन्हेवोटो, वोखा, फेक, मोकोकचुंग व तुएनसांग असे सात जिल्हे केलेले आहेत. १९७४-७५ मध्येही राज्यात कोहीमा, दिमापूर, मोकोकचुंग व तुएनसांग आणि वोखा व मॉन या १५ हजारांपेक्षा जास्त वस्तीच्या शहरांशिवाय सु. ९६६गावे होती.


आर्थिक स्थिती : नागालँडच्या लोकसंख्येपैकी ९०% लोक शेतीवर अवलंबून आहेत. भात, भरडधान्ये व डाळी ही मुख्य पिके असून तेलबिया, कपाशी, ताग, ऊस, बटाटे, रताळी अशाही पिकांचे उत्पादन काही प्रमाणात होते. सु. ६,९३२चौ. किमी. जमीन शेतीयोग्य आहे. तीपैकी फक्त ३१८चौ. कि.मी. क्षेत्राला जलसिंचनाची सोय आहे. १९७५मध्ये लागवडीखाली १,०३०चौ. किमी. क्षेत्र होते. विविध पिकांखालील क्षेत्र चौ. किमी. मध्ये — अन्नधान्ये ९४९ डाळी ३८ बटाटे ३५ तेलबिया ३,४४२ मिरची १३ ऊस २० कपाशी, ताग, घायपात मिळून २६ फळे १७·३८व इतर पिके ६असे होते. मुख्य पिकांचे उत्पादन हजार मेट्रिक टनांत – अन्नधान्ये ६०·४ (पैकी ६४·२५% तांदूळ) तेलबिया व इतर पिके २९९·४ कपाशी, ताग, घायपात ५००गासड्या असे होते. १९७२-७३मध्ये भाताचे उत्पन्न ९०हजार मे. टनांपर्यंत वाढले होते. १९७३-७४मध्ये जंगलांपासून एकूण उत्पन्न २२०·३ लक्ष रुपयांचे झाले होते. अंतर्गत जलाशयांतील मासेमारी वर्षास सु.५०टनच आहे. प्रत्येक कुटुंबात कोंबड्या, डुकरे व मिथान नावाचे रानबैल पाळतात. कुक्कुटपालन, वराहपालन व पशुपालन यांची केंद्रे शासनाने चालविली आहेत.

हातमागावर कापड विणणे, ते रंगविणे, मातीची भांडी घडविणे, लोहारकाम, लाकूडकाम, बांबू, वेत आणि गवत यांचे विणकाम तसेच परशू, भाले यांसारखी हत्यारे बनविणे इत्यादींमध्ये नागालोक प्रवीण आहेत. लघुउद्योगांचा विकास आता शासकीय प्रयत्नांनी होत आहे. राज्यात लघु-व कुटिरोद्योगांची केंद्रे १,३६९आहेत. विणकाम, कुटिरोद्योग, हस्तव्यवसाय इ. शिकविण्याची व उत्पादनाची केंद्रे कित्येक ठिकाणी उघडण्यात आली असून, रेशीम पैदाशीस सुरुवात झाली आहे. मधमाशा पाळणे, गूळ तयार करणे, साबण व मेणबत्त्या बनविणे अशा लहानलहान धंद्यांना उत्तेजन आहे. प्लॅस्टिक, ह्यूम पाइप, पॉलिथीन पिशव्या, रबरी पादत्राणे या उद्योगांस परवाने दिले आहेत. दिमापूर येथे औद्योगिक वसाहतयोजना मूर्त स्वरूपात येत असून लाकूड रापविणे, कापणे, दारे-खिडक्या बनविणे, छत व तक्तपोशी यांसाठी फळ्या पाडणे, लाकडाच्या भुशापासून हार्डबोर्ड तयार करणे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. राज्यात कागद, साखर, दारू गाळणे, प्लायवुड, फळे टिकविणे व डबाबंद करणे हे कारखाने सुरू झाले आहेत. मोकोकचुंग येथे कागद व लगद्याची गिरणी व तुएनसांग जिल्ह्यात (व्हिनीअर) काष्ठकवच कारखाना निघाला आहे. १९६५मध्ये खाणीतून २०,१४७मे. टन कोळसा काढण्यात आला होता. वीजपुरवठ्याची क्षमता ७·३मेगॅवॉट आहे. १९७४अखेर शहरे व खेडी मिळून १५२ठिकाणी वीज पोहोचली होती. आसामकडून घाऊक प्रमाणात वीज आणून तिचा प्रसार व उपयोग वाढविण्याची योजना कार्यान्वित आहे. नागालँडच्या १९७४-७५च्या अर्थसंकल्पात, जमेच्या बाजूस एकूण ४७·४३३२कोटी रु. व खर्चाच्या बाजूस ४७·५३१९कोटी रु. याप्रमाणे ९·८७लाख रुपयांची तूट होती. अर्थ आयोगाचे अनुदान २३·७७कोटी रु., केंद्राकडून करांचा वाटा १·१७१८कोटी, योजना अनुदान ६·४०८कोटी, केंद्राकडून कर्ज ७१·२०लक्ष, रस्त्यांसाठी अनुदान ३·६४९४  कोटी रु. होते. पाचव्या पंचवार्षिक योजनेसाठी दिलेल्या १४ कोटी रु. पैकी १·१५ कोटी रु. नागालँड पल्प अँड पेपर मिल्सच्या भागभांडवलासाठी होते.

दळणवळण : दिमापूर हे प्रमुख स्थानक आहे. ईशान्य रेल्वेचा ८·०४ किमी. लोहमार्ग राज्याच्या पश्चिम सीमेला स्पर्श करून जातो. १९७४-७५ मध्ये राज्यरस्ते १,११४ किमी. जिल्हामार्ग २४०किमी. इतर मार्ग ५१५ किमी. व खेड्यांतील रस्ते १,८१२ किमी. होते.

लोक व समाजजीवन : १९७१च्या शिरगणतीत नागालँडच्या ५,१६,०००लोकांपैकी ४,५७,६०२म्हणजे बहुसंख्य अनुसूचित जमातींचे गिरिजन होते. लोकसंख्येपैकी जैन ०·१२% खिस्ती ६६·७६% मुसलमान ०·५८% शीख ०·१३% बौद्ध ०·०४% हिंदू ११·४३% व अन्य धर्मीय २०·९४%होते. नागांच्या प्रमुख जमाती अंगामी, सेमा, लोथा, रेंगमा, चखेसांग, शंगताम, कोन्याक, चंग, फोम, यिमचुगर, खिएन्मुन्गन, झेलिआंग, कचारी अशा असून त्यांच्यात तिबेटो-ब्रह्मी भाषासमूहांतील ३०पेक्षा जास्त बोली भाषा आहेत. त्यांच्या भाषांना लिपी नाही व सर्वांना सामायिक भाषा असमिया, इंग्रजी वा हिंदीशिवाय दुसरी नाही. शासकीय कारभाराची आणि शिक्षणासाठी अधिकृत भाषा म्हणून, विधानसभेने १९६७ मध्ये ठराव करून इंग्रजी ही अधिकृत भाषा ठरविलेली आहे. नागालोक मंगोलॉइड वंशाचे असले तरी रूपाने, गुणधर्मांनी किंवा चालीरीतींनी एकजिनसी नाहीत. उंच, गोऱ्या, देखण्या नागांप्रमाणेच खुजे, काळे, कुरूप नागाही असतात. राज्यात सात जिल्ह्यांतील ७मुख्य गावांत १,२०,२४२व ९६६खेड्यांत ३,९६,२०७अशी यांची वस्ती विखुरली आहे. राज्यातील नागरी वस्ती एकूण लोकसंख्येच्या १०टक्क्यांपेक्षाही कमी म्हणजे अवघी ९·९५% आहे. नागालँडची लोकसंखया १९०१-६१ दरम्यान साडेतीन पट झाली. १९६१-७१च्या दरम्यान वस्तीवाढ ३९·८८म्हणजे भारतातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक होती. राज्यातील लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. सु. ३१होती. दर हजार पुरुषांमागे ८७१या प्रमाणात स्त्रिया होत्या. म्हणजेच पुरुषांची संख्या २,७६,०८४, तर स्त्रियांची संख्या २,४०,३६५ होती. १९७१ साली काम करणाऱ्या २,६२,४१४ लोकांपैकी २,०३,३४१ शेतकरी ३,७९७ शेतमजूर पशुपालन, मासेमारी, शिकार यांत १,०६१ खाणकामात ७६ घरगुती उद्योगांत ३,७८८ बांधकामात ३७९७ व्यापारउद्योगात ४,७२५ दळणवळणात २,३८८लोक होते. 


नागांची खेडी टेकडीमाथ्यावर पाण्याची सोय पाहून वसलेली असतात. भोवती दगडी किंवा बांबूचे मजबूत कुसू असते. बांबूची घरे जमिनीपासून थोड्या उंचावर बांधून वर गवती छपरे असतात. घराच्या पुढल्या भागात जनावरे, मधल्या भागात माणसांची वस्ती व मागच्या बाजूस शेतीची अवजारे असतात. दर्शनी भाग जनावरांच्या मुंडक्यांनी (पूर्वी माणसांच्या कवट्यांनी) शृंगारलेले असत. वेग-वेगळ्या जमातींचे भिन्नभिन्न पोषाख पुष्कळदा नाममात्रच असून अलंकारांची मात्र रेलचेल असते. शिंपा, कवड्या, पोवळी, काचमणी यांच्या माळा हस्तिदंत, शिंगे, बांबू, पिसे, हाडे अशा वस्तूंचा साज तसेच परशूसारखे ‘डाओ’, फेकण्याचे भाले, तिरकमठा अशी हत्यारे धारण करून समारंभाला किंवा लढाईला पुरुष जात असत. अंगावर गोंदवून घेणाऱ्या व विविध प्रकारांनी देह नटविणाऱ्या स्त्रिया सामूहिक नृत्यांनी मन रिझवीत. आता निबिड अरण्यातील जमातींखेरीज शिकलेले नागा स्त्रीपुरुष आधुनिक वेशभूषा करू लागले आहेत. फक्त उत्सवप्रसंगी ते परंपरागत वस्त्राभरणे चढवितात. हत्यारांत बंदुकांची भर पडली आहे. हे लोक कुटुंबसंस्था मानतात. पितृप्रधान कुटुंबपद्धती असली, तरी स्त्रियांना मान आहे. प्रत्येक खेड्यात तरुण मुलांची व मुलींची वेगवेगळी शेजघरे ‘मोरुंग’ असतात. तेथेच सर्व समारंभ, निवाडे इ. होतात. त्यांतील शिस्त कडक असते. वयात आलेल्या मुलामुलींची लग्ने आईबाप किंवा पुष्कळदा ते स्वतःच ठरवितात. भिन्न-भिन्न जमातींतील लग्नविधी अगदी मामुली स्वरूपाचे असतात. त्यांत नातेवाइकांना एक मोठी जेवणावळ हाच मुख्य समारंभ असतो. लग्नानंतर नवराबायको नवीन घर करतात. बहुतेक जमातींत बहुपत्नीकत्व नाही आणि घटस्फोट सुलभ आहे. जाळणे, पुरणे, प्रेत झाडाला टांगणे, तुकडे करून दूर टाकणे अशा वेगवेगळ्या पद्धतींचे अंत्यसंस्कार असतात. नागांचे अन्न तांदूळ, डाळी, भाजीपाला, कोणत्याही पशूचे मांस, मासे असे सोईस्कर असते. दुभती जनावरे त्यांना माहीत नव्हती, इतकेच नव्हे, तर दूध निषिद्ध असे. आता त्यांना दुधाची ओळख होत आहे. तांदुळापासून बनविलेली बिअरसारखी मधू, झू इ. सौम्य व पोषक दारू ते सेवन करतात. ख्रिस्ती नसणाऱ्या नागांच्या धर्मात सूर्यदेवतेला महत्त्वाचे स्थान आहे इतर देवतांत धनदायी व धान्यरक्षक सुष्ट व काही दुष्ट देवताही आहेत. भूकंपदेवता विश्वनिर्मिती करते अशी त्यांची समजूत आहे. जुन्या जडात्मवादी नागा जमातीत यज्ञासारखा एक व्यवस्थित विधी असे. त्यात ते मिथाननामक पाळीव जनावराचा बळी देत. गावकारभार ग्रामप्रमुख, ज्येष्ठमंडळ किंवा सार्वमत अशा वेगवेगळ्या पद्धतींनी जमातींनुसार चालतो.

शिक्षण : नागालँडमध्ये १९७१मध्ये २७·४%लोक साक्षर होते. १९७५मध्ये ९८६प्राथमिक व ३३५माध्यमिक शाळा, ९४प्रशाला, एक तंत्रविद्यालय व १२महाविद्यालये होती. प्रौढशिक्षणकेंद्रे १७१असून ३अध्यापक प्रशिक्षणसंस्था होत्या. सर्व शिक्षणसंस्थांत मिळून १,२२,११८विद्यार्थी व ५,०५५ शिक्षक होते.

आरोग्य : नागालँडमध्ये सामान्य रुग्णालये २८ क्षय रुग्णालये २ प्राथमिक आरोग्यकेंद्रे १० उपकेंद्रे ४१ रक्तदानकेंद्रे २ हिवताप व देवी निर्मूलनकेंद्रे प्रत्येकी १ क्षयरोग प्रतिबंधक पथके ३ कुष्ठरोग उपचारकेंद्रे १० गुप्तरोग उपचारकेंद्रे २या आरोग्यसेवा उपलब्ध असून एकूण १,०५८रुग्णशय्या आहेत. ५१५ लोकांमध्ये एक रुग्णशय्या असे प्रमाण पडते. कलाक्षेत्रात समूहनृत्ये व वृंदगान या बाबतींत काही जमाती बऱ्याच प्रगत आहेत.  होडीच्या आकाराचे जंगी ढोल व कित्येक काष्ठवाद्ये उल्लेखनीय आहेत. नागांच्या कलांचा सांभाळ व विकास शासकीय सांस्कृतिक विभागाकडून पद्धतशीरपणे होत आहे. नागा लोकांचे वर्णन प्रामाणिक, शूर, विश्वासू, कष्टाळू, स्वातंत्र्यप्रिय, निश्चयी, आनंदी, करारी, आतिथ्यशील, सौंदर्यप्रेमी, कलाप्रवीण अशा शब्दांप्रमाणेच संशयी, दीर्घद्वेषी. सूडबुद्धीचे, अविचारी, हिंसाप्रिय अशा विशेषणांनीही झाले आहे. तथापि विद्यमान स्वायत्त राज्यात त्यांच्या सद्‌गुणांची वाढ होऊन दुर्गुण लोप पावतील, अशी आशा करण्यास हरकत नाही.

नागालँडमधील विविध जमातींत विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासूनच होत असलेला सांस्कृतिक बदल बऱ्याच अंशी जाणवतो. शासकीय कार्यालये, तेथील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, सैन्याच्या बराकी, दुकाने, शाळा, काही नागांची आधुनिक घरे, विजेचे दिवे, नळाचे पाणी, पूर्वीच्या दाट जंगलांतून जाणाऱ्या पायवाटा आणि मधूनमधून फिरत्या शेतीमुळे उघडे पडलेले जमिनीचे तुकडे यांऐवजी जीपगाड्यांच्या रस्त्यांचे जाळे, उतारावरील फिरत्या शेतीचे उघडे पट्टे, आसाममधील पक्क्या रस्त्यांपर्यंत सहज पोहोचण्याची शक्यता या गोष्टी सहज लक्षात येतात. नागा खेड्यांतील गवती छपरांची लाकडी व बांबूंची प्रशस्त घरे, डोंगर उतरून पाणी घेऊन वरपर्यंत दिवसातून तीनतीन खेपा करणाऱ्या स्त्रिया, त्यांच्या तरुण मुलांचे ‘मोरुंग’, त्यांनी पूर्वी मारलेल्या माणसांची व जनावरांची मुंडकी, त्यांचे युद्धनृत्य इ. वरवरच्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी कायम असल्या, तरी नृत्यातील पूर्वीचा जोम, जुन्या धार्मिक चालीरीती, स्त्रीपुरुष संबंधांतला निरागस मोकळेपणा इत्यादींत आलेल्या उणिवाही जाण त्यांच्या लक्षात येतात. बऱ्याच नागांनी खिस्ती धर्म स्वीकारला असला, तरी त्यांची तत्त्वे व आचार अद्याप वरवरचेच आहेत. जुने तर टाकले आणि नवे तर पुरते बाणले नाही, यांमुळे येणारी पोकळी भारताच्या इतर काही भागांप्रमाणे येथेही जाणवते. भारताच्या केंद्रशासनाने या प्रदेशाच्या विकासासाठी येथे ओतलेल्या अमाप पैशामुळे मूळच्या निर्वाहशेतीला अनुरूप असलेल्या जीवनात, नव्याने आयात केलेल्या आधुनिक वस्तूंच्या उपभोगाने झालेला बदल लक्षणीय आहे. हळूहळू या वस्तूंबाबतचे परावलंबित्व कमी करून त्यांच्या बदली याच भूमीत झालेले उत्पादन निर्यात करणे आवश्यक आहे हे सुजाण नागांच्याही लक्षात आले आहे. नागांच्या विशिष्ट संस्कृतीवर या नवजीवनाचा होणारा परिणाम लक्षात घेऊन, त्या संस्कृतीची वैशिष्ट्ये टिकवून धरण्याची आवश्यकता सर्वांनाच पटली आहे. मुंडकेशिकारीचा लोप आणि सुलभ वैद्यकीय सेवा यांमुळे सामान्य माणसांचे जीवन अत्यंत निर्भय व मोकळे झाल्यामुळे,जगाकडे पाहण्याची नागांची दृष्टी आदराची व स्वागताची आहे. शाळा, रुग्णालये, सुलभ पाणी पुरवठा, वीजउत्पादक यंत्रे, मोटारींचे रस्ते इ. सुखसोयी आणि नवीन जीवनाला आवश्यक असलेली कारभारयंत्रणा यांचा खर्च आज भारत-सरकारच्या साहाय्याने चालू असला व आणखी बराच काळ तो चालू ठेवावा लागणार असला, तरी केव्हाना केव्हातरी यासाठी आपणच आपल्यावर कर बसवून घेणे अपरिहार्य होणार आहे हे तेथील लोक बोलून दाखवीत नसले, तरी जाणून आहेत. शेतीपद्धतीत सुधारणा, जंगलउत्पन्नात वाढ, फळबागांचे व चहाच्या मळ्यांचे संवर्धन, पर्यटन-उद्योग इत्यादींच्या रूपाने नवीन पावले पडू लागली आहेत. नागांचे शौर्य, बुद्धी, कष्टाळूपणा यांमुळे ते या नव्या आव्हानांस सामोरे जातील आणि भारताच्या किंवा जगाच्या इतर भागांतील बरेचसे आदिवासी ज्याप्रमाणे बाहेरून आलेल्या सावकारांचे, जमीनदारांचे व समर्थांचे अंकित होऊन स्वत्व गमावून बसले तशी वेळ नागांवर येणार नाही, असे विचार नागाप्रदेशात बराच काळ वास्तव्य केलेल्या फुरेर हॅमनडॉर्फसारख्या यूरोपीयांनीही व्यक्त केले आहेत.

ओक, शा. नि. कुमठेकर, ज. ब.

नागालँड नायजर

हातमागावर कापड विणणारी नागा युवतीनागांच्या पारंपरिक चित्राकृतींनी सजविलेला घराचा दर्शनी भागकोहीमा परिसरातील पारंपरिक वसाहतनागांची मृत्तिकाशिल्पे