अंगोला : (पोर्तुगीज पश्चिम आफ्रिका). पोर्तुगीजांची आफ्रिकेतील वसाहत. क्षेत्रफळ १२,४६,६९३ चौ.किमी. लोकसंख्या ५६,७३,०४४६ (१९७०). आकारमानाने पोर्तुगालच्या सु. १४ पटींनी मोठ्या असलेल्या ह्या वसाहतीचा विस्तार अक्षवृत्त ६ ते १७ द. व रेखावृत्त १२ ते २४ पू. इतका आहे. अंगोलाच्या उत्तरेस झाईरे, पूर्वेस झाईरे व झँबिया, दक्षिणेस नैऋत्य आफ्रिका व पश्चिमेस अटलांटिक महासागर असून काबिंदा हा ७,२५२ चौ. किमी. चा अंगोलाचाच प्रदेश मुख्य भूमीपासून उत्तरेस ४० किमी.वर झाईरेने वेढलेला आहे. अंगोलाची भूमिसीमा ४,८३७ किमी. व किनारा सु. १,६५० किमी. आहे.

 

भूवर्णन : पश्चिमेस ३० ते १०० किमी. रुंदीची चिंचोळी किनारपट्टी असून तिचा उत्तर भाग डोंगराळ व दक्षिण भाग सपाट आहे. तिच्या पूर्वेस एकदम वेगाने चढत गेलेला १,००० ते २,००० मी. उंचीचा-आफ्रिकेच्या मोठ्या पठाराचाच भाग असलेला-प्रदेश आहे. पठारी प्रदेश पूर्वेकडे, काँगो व झँबीझी ह्या नद्यांच्या खोऱ्यांकडे हळूहळू उतरता होत गेला आहे. पठाराच्या पश्चिम कडेवर उंच पर्वत आहेत. त्यांत काटुंबेला हे २,६२० मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. ही रचना कोकण, सह्याद्री व त्यांच्या पूर्वेस पठार यांसारखी दिसते. पठारावरील काही भाग कँब्रियनपूर्व खंडकांचा आहे. मध्य भाग व किनाऱ्याला समांतर असलेला डोंगरांचा भाग प्राचीन स्फटिकी खडकांचा आहे त्यांच्यातील ग्रॅनाइटांवर पुराजीव महाकल्पातील वालुकाश्म व पिंडाश्म यांचे थर आहेत त्यांत जीवाश्म सापडत नाहीत. दूरवर जमिनीबाहेर दिसणाऱ्या डोंगरांच्या भागात जांभा खडक आढळतो. किनारपट्टीच्या भागात मात्र तृतीय युगातील व क्रिटेशस-कालखंडातील जीवाश्मयुक्त खडक असून त्यांच्या खाली तांबडा वालुकाश्म आहे. बेंग्वेला व मोझॅमीडीस यांच्या दरम्यान बेसाल्ट आढळतो. डोम्बेजवळच्या भागात जिप्सम, तांबे व गंधक आढळते. लूअँडाच्या आसपास हिरे, मॅंगेनीज व अस्फाल्ट सापडते. इतर काही ठिकाणीही तांबे सापडते. दक्षिणेकडील काही भागात लोखंड असून त्याचा साठा सु. ८० लक्ष टन असावा. त्याचे उत्पादन वाढत आहे १९५५ मध्ये पेट्रोल सापडले मुलेंबा येथे १९५८ मध्ये तेलशुध्दी कारखाना निघाला. कुनेने नदीच्या उगमाजवळ व कासिंगा येथे सोने सापडते. कोळसा, लिग्नाइट, शिसे, अभ्रक ही खनिजेही थोड्या प्रमाणात सापडतात.

 

बीए या मध्यपठारावरून क्वांगो, क्वीलू व कासाई या नद्या उत्तरेस जाऊन काँगोस मिळतात. लुंग्वेबुंगु, लुआंगिगा व क्वांडो या नद्या पूर्वेस व नंतर आग्नेयीस जाऊन झॅंबीझीला मिळतात. कुबांगो, कुइटो या बेचुआनालँडमध्ये न्गामी सरोवरास मिळतात. दांदे, कुआंझा कुवो, कुटुंबेला, कुनेने व इतर अनेक प्रवाह पश्चिमेकडे थेट अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. कुआंझा ही पूर्णपणे अंगोलात असून किनाऱ्यापासून १५० किमी पर्यंत नौकानयनास उपयोगी आहे.

 

लोबितोच्या उत्तरेस किनारपट्टीवर व काबिंदात हवा उष्ण-कटिबंधीय व रोगट आहे. सरासरी वार्षिक तपमान २४ ते २७से. असते. लोबितोच्या दक्षिणेस बेंग्वेला या थंड समुद्रप्रवाहामुळे हवामान काहीसे सौम्य आहे परंतु त्याच कारणाने पाऊस फार कमी पडतो. दक्षिणेकडील मोझॅमीडीसला फक्त ५ सेंमी. पाऊस पडतो. उत्तरेस काबिंदामध्ये तो ६५ सेंमी.पर्यंत पडतो. पठारावर हवा सौम्य आहे वार्षिक सरासरी तपमान १८ ते २१ से. असते व पाऊससुद्धा सु. १५० सेंमी. पडतो. पठारावर पर्जन्यमान उत्तरेकडून दक्षिणेकडे १५०, १००, ६० सेंमी. असे कमी कमी होत जाते. आग्नेय भागात पाऊस बराच कमी आहे. ऑक्टोबर ते मे पावसाळा असतो. एप्रिलमध्ये वादळे होतात व जास्त पाऊस पडतो. जूनपासून सप्टेंबरपर्यंत हवा थंड असते.

 

आग्नेय भागात सॅव्हाना प्रकारचे गवत आढळते कुनेने नदीजवळपासच्या प्रदेशात काटेरी झुडपे आहेत. बेंग्वेलाच्या उत्तरेच्या किनारपट्टीत तेल्या ताड व सुंद्रीसारख्या वनस्पतींची बने आहेत. उत्तर भागात व काबिंदा प्रदेशात दाट अरण्ये असून त्यांत चांगले इमारती लाकूड मिळते ताकुला वृक्षाचे लाकूड लालभडक असते. मुसुएंबाची साल कातडी कमावण्याला उपयोगी पडते. मॉहॉगनी व रबराची झाडे पुष्कळ आहेत पण फार मोठ्या प्रमाणात चीक काढल्यामुळे रबराची झाडे आता कमी झाली आहेत. अंगोलात हत्ती, बिबळ्या, चित्ता, पाणघोडा, गेंडा, सिंह, रानरेडा, झेब्रा, जिराफ, अनेक तऱ्हेचे हरिण, शहामृग, रानडुक्कर, बॅबून व इतर माकडे, सुसरी, कासवे असून पुष्कळ तऱ्हेचे मासे आढळतात. अगुल्हास हा गरम पाण्याचा व बेंग्वेला हा थंड पाण्याचा असे दोन प्रवाह आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्याजवळ एकत्र येतात. या ठिकाणी माशांच्या खाद्यास उपयुक्त अशा तपमानाचे व समुद्रतळाकडून वर येणारे पाणी असते. हा भाग अंगोलाच्या किनाऱ्याजवळ असल्याने अंगोला मच्छीमारीचे उत्तम क्षेत्र बनले आहे.

 

इतिहास : पोर्तुगीज समन्वेषक ⇨काउँ द्योगू याने १४८२ मध्ये अंगोलातील काँगो नदीच्या मुखाकडील प्रदेश व किनाऱ्याच्या बाजूचा दक्षिणेकडील केप ऑगस्टीनपर्यंतचा मुलूख शोधून काढला. तेथील स्थानिक सत्तांशी पोर्तुगीजांनी मैत्री जोडली. पोर्तुगीज मिशनऱ्यांनी तेथे ख्रिश्चन धर्माचा प्रसारही सुरू केला. १५७० सालापर्यंत बहुतेक सर्व प्रजा ख्रिस्ती बनली. सध्याची अंगोलाची राजधानी लूअँडा १५७५ मध्ये वसवली. १६२७ पासून लूअँडा हे धर्मप्रसाराचे एक केंद्र बनले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी समुद्रापासून दूरच्या अंतर्भागात वर्चस्व स्थापण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. गुलामांचा मोठ्या प्रमाणावर व्यापार हाच पोर्तुगीजांचा मुख्य व्यवसाय बनला. बहुतेक गुलाम मध्य व दक्षिण अमेरिकेत पाठविण्यात येत असत कारण अंगोलातील रहिवाशी उसाच्या मळ्यात काम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जात असत. १८३० मध्ये गुलामांच्या व्यापारास बंदी घालण्यात आल्यामुळे त्यांची दृष्टी अंतर्गत प्रदेशाकडे वळली. परंतु आपले साम्राज्य प्रस्थापित करण्याचा फारसा प्रयत्न पोर्तुगालने केला नाही. १८८० च्या सुमारास आफ्रिकेचा कबजा मिळविण्यासाठी यूरोपीय राज्यसत्तांची स्पर्धा सुरू झाली, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यापासून दूरपर्यंत शक्य तेवढा भूप्रदेश काबीज करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला व इतर राष्ट्रांना आपला कबजा मान्य करण्यास लावले. १८८५ पासून १९०५ पर्यंत फ्रान्स, जर्मनी, काँगो फ्री स्टेट, ब्रिटन व १९२७ मध्ये बेल्जिअम ह्या राष्ट्रांनी अंगोलाच्या सरहद्दीस मान्यता दिली.

 

आफ्रिकेतील इतर राष्ट्रांप्रमाणे अंगोलाही बराच काळ मागासलेलेच राहिले. दुसऱ्या महायुद्धानंतर आफ्रिकेतील फ्रेंच व ब्रिटिश अमलाखालील बहुतेक सर्व प्रदेश स्वतंत्र झाले. त्यामुळे पोर्तुगालने १९५३ मध्ये अंगोलाचा वसाहतीचा दर्जा बदलून त्यास पोर्तुगालचा एक प्रांत असा दर्जा दिला व तेथील जनतेस किरकोळ स्वरूपाचे अधिकार दिले. परंतु अंगोलातील लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळ सुरू केली. १९६१ मध्ये अंगोलात ठिकठिकाणी बंडाचे झेंडे उभारले गेले परंतु हा स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रयत्न अयशस्वी झाला. १९६२ मध्ये अंगोलातील राष्ट्रवादी लोकांनी किन्शासा येथे प्रतिसरकारची स्थापना केली. तेथून अंगोलात सशस्त्र उठाव करण्याचे प्रयत्न चालू आहेत. संयुक्त राष्ट्रांतील आशियाई व आफ्रिकी राष्ट्रांचा गट पोर्तुगालवर दडपण आणून अंगोलास स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

राज्यव्यवस्था : अंगोला ही मूळची पोर्तुगीज वसाहत आता पोर्तुगालच्या कायद्यानुसार हा प्रदेश पोर्तुगालच्या राज्याचाच एक सागरपार प्रांत आहे. काही आर्थिक व कारभारविषयक बाबतींत त्यास थोडी स्वायत्तता देण्यात आलेली आहे. अंगोलाचा कारभार गव्हर्नर-जनरल पाहतो व त्याची नेमणूक पोर्तुगालचा अध्यक्ष करतो. गव्हर्नर-जनरलच्या मदतीस एक विधीमंडळ आणि एक आर्थिक व सामाजिक मंडळ अशी दोन मंडळे आहेत. विधिमंडळाचे १८ निवडलेले व ८ नेमलेले सभासद असतात. हे विधीमंडळ इतर अनेक बाबतींत कायदे करू शकत असले, तरी वार्षिक अंदाजपत्रकास पोर्तुगीज सरकारची मान्यता मिळावी लागते. आर्थिक व सामाजिक मंडळाचे कार्य म्हणजे गव्हर्नर-जनरलला त्याच्या नियोजित कामात सल्ला देणे हे होय. त्याखेरीज विधिमंडळात चर्चेसाठी कोणताही विषय येण्यापूर्वी ह्या मंडळास त्यासंबंधी आपले मत देता येते. १९५५ व १९६१ मध्ये काढण्यात आलेल्या विशेष हुकुमांन्वये ह्या प्रदेशाची पंधरा जिल्ह्यांत विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्याचे पोटभाग करण्यात आले असून त्या प्रत्येकावर एक कारभारी नेमण्यात आला आहे. लूअँडा येथे उच्च न्यायालय आहे.

 

आर्थिक परिस्थिती : अंगोला हा मागासलेला देश आहे. शेती, गुरे पाळणे व मासे पकडणे हे प्रमुख उद्योग आहेत. जमीन सुपीक आहे. उंची व हवामान यांना अनुसरून येथे पुढील पिके होतात : कॉफी, मका, सिसल, कसावा, नारळ, एरंडी, तेल्या ताड, ऊस, कापूस, भुईमूग, तंबाखू, वाटाणा, घेवडा, तीळ, गहू, तांदूळ, बटाटे, केळी, अननस, पेरू, पपई इत्यादी जास्त पैसा मिळवून देणारी पिके अद्याप यूरोपीयांच्या हाती आहेत. कॉफीला निर्यातीच्या दृष्टीने विशेष महत्व आहे १९६२ साली एकूण निर्यातीच्या ४३.७ टक्के किंमत कॉफीची होती.

 

शेतीखालोखाल महत्त्वाचा व्यवसाय पशुपालनाचा असून अंगोलाचे मध्यपठार यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. अलीकडे मरीनो व काराकल जातीच्या मेंढ्या, शेळ्या, दुभती जनावरे, घोडे व डुकरे ह्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने अंगोलाला आर्थिक दृष्टीने महत्त्व येत आहे.


दक्षिणेकडील बऱ्याच बंदरांचा मच्छीमारीसाठी उपयोग होतो परंतु हा धंदा पोर्तुगीज लोकांनी सर्वस्वी आपल्या ताब्यात ठेवला आहे.

 

अंगोलाच्या आर्थिक जीवनात कॉफीच्या खालोखाल खनिज द्रव्यांना महत्त्व आहे. हिऱ्यांच्या खाणींतून १९१७ पासून उत्पादन होऊ लागले. १९२० ते ४० पर्यंत ह्या प्रदेशाची अर्थव्यवस्थाच हिऱ्यांच्या निर्यातीवर अवलंबून होती. हिऱ्यांच्या खाणी इंग्लिश व बेल्जिअन लोकांच्या ताब्यात असून सरकारशी झालेल्या लांब मुदतीच्या करारान्वये बहुतेक सर्व माल त्या देशांस निर्यात होतो. १९६४ मध्ये निर्यात झालेल्या हिऱ्यांचे वजन १,०९४.५४१ कॅरेट होते व त्याची किंमत ७४,७६,१०,७५६ एस्क्युडो म्हणजे सु. १०,५३,७८,७८० रु. होती.

 

ह्या प्रदेशात कोळसा फारसा सापडत नाही परंतु तेलाच्या खाणीचा शोध लागल्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. १९६३ मध्ये सु. एक दशलक्ष टन तेल ह्या खाणीतून मिळाले. तेलाखेरीज दांदेवरील माबुबास, कुआंझावरील कंबांबे, कटुंबेलावरील बिओपिओ व कुनेनेवरील माताला येथे जलविद्युतकेंद्रे आहेत परंतु विजेचे उत्पादन अजून फार मोठया प्रमाणात होत नाही.

 

अंगोलातील इतर महत्त्वाचे उद्योगधंदे म्हणजे माशांचे व ताडाचे तेल व त्यांपासूनचे पदार्थ, पीठ-गिरण्या, मासे खारविणे, मांस टिकविणे, साखर, कापड, बिअर बनविणे व सिमेंट तयार करणे हे होत. यांशिवाय काच, खते, टायर्स, व तंबाखू यांचे कारखाने येथे आहेत.

 

अंगोलात १९७० साली आयात झालेल्या मालाची किंमत सु. १०,५९५ दशलक्ष एस्क्यूडो होती. ह्या मालात कापड, यंत्रसामग्री, मोटारी, खाद्यपदार्थ, लोखंडी व पोलादी वस्तू ह्यांचा मुख्यत्वे समावेश होता. १९७० साली १२,१७२ दशलक्ष एस्क्यूडो किंमतीची माल निर्यात झाला. निर्यातीच्या प्रमुख बाबी कॉफी, हिरे, सिसल, कापूस, साखर, कच्चे लोखंड, माशांची भुकटी, मका, अशुद्ध तेल व ताडाचे तेल ह्या होत.१९७० मध्ये फक्त कॉफीची निर्यात ३,२३४ दशलक्ष एस्क्यूडोची होती व त्यातही निम्म्याहून अधिक माल एकट्या अमेरिकेला पाठविण्यात आला होता.

 

बेंग्वेला, लोबितो, लूअँडा, नोवो, रेडोंडो, मोझॅमीडीस व आँबॉइम ही अंगोलातील महत्वाची बंदरे आहेत. लोबितोपासून पोर्तूगाल, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण आफ्रिका या देशांशी नियमित जहाजवाहतूक चालते. अंगोलामध्ये ३,२५६ किमी. लांबीचे लोहमार्ग असून ते लूअँडा, लोबितो, बेंग्वेला, मोझॅमीडीस या बंदरांपासून अंतर्भागात गेलेले आहेत. बेंग्वेला रेल्वे ५,६३८ किमी. लांबीची असून ती मोझॅविकची राजधानी लोरेंसू मरकेशपर्यंत गेलेली आहे. अंगोलामध्ये सु. ७,८०० किमी. लांबीचेच पक्के रस्ते आहेत. लूऑडा, अब्रिझ, अब्रिझट, काबिंदा, लोबितो, से द बंदेझरा, मोझॅमीडीस इ. शहरे हवाई मार्गाने जोडलेली असून लूअँडा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. पूर्व, पश्चिम व दक्षिण आफ्रिकेशी तारायंत्रांचे दळणवळण आहे. त्यासाठी १६८ तारायंत्रकेंद्रे आहेत. ६५ दूरध्वनीकेंद्रे असून २७,१५१ दूरध्वनी वापरात आहेत. १७० बिनतारी संदेशवहनकेंद्र आहेत. दूरचित्रवाणी अद्याप नाही. १९६८ मध्ये येथे ३३ चित्रपटगृहे होती.

 

एस्क्युडो हे येथील चलनी नाणे आहे. १ एस्क्युडो = १०० सेंतेव्हो. एक इंग्लिश पौंड = ८०·२० एस्क्युडो एक अमेरिकन डॉलर = २८·७५ एस्क्युडो, असा विनिमय – दर आहे. बॅंक ऑफ अंगोला ही येथील प्रमुख बॅंक असून तिची मुख्य कचेरी लिस्बनमध्ये आहे. दोन स्थानिक बॅंकाही आहेत.

 

लोक व समाजजीवन : अंगोलाच्या लोकसंख्येपैकी सु. ३,००,००० यूरोपीय, सु. ५०,००० मिश्रवंशीय व बाकीचे बहुतेकतद्देशीयच आहेत. आग्नेय भागात लोकवस्तीफार कमी आहे (दर चौ.किमी. ०·५) पठाराचा पश्चिम भाग, लूअँडाच्या आसपासचा प्रदेश व उत्तरेकडील कॉफी-उत्पादनाचा प्रदेश येथे सर्वांत दाट (दर चौ. किमी. ९·६) आहे. आग्नेयीकडील व दक्षिणेकडील निमओसाड भागात अजूनही धनुष्यबाण वापरणाऱ्या आदिवासी जमाती आहेत. १०,००० बुशमेन व ४५ लक्ष लोक मुख्यत: निग्रोवंशीय बांटू जमातीचे आहेत. त्यांच्या काँगो, अँबुडो, अंबो इ. अनेक जमाती आहेत. सर्वांत महत्त्वाची जमात म्हणजे ओव्हिंबुंडो त्यांची भाषा २० लक्षांहून अधिक तद्देशियांना समजते.

अंगोलातील बहुतेक तद्देशीय लोकांचा धर्म म्हणजे परंपरागत रूढीप्रमाणे पूजा करणे व श्रद्धा ठेवणे हा होय. तथापि ख्रिश्चन धर्माचा प्रसारही बराच झाला आहे रोमन कॅथॉलिक लोकांची संख्या सु. साडेतेरा लक्ष आहे. प्रॉटेस्टंट लोक सु. साडेपाच लक्ष आहेत. अंगोलात पोर्तुगीजांची व यूरोपीयांची संख्या वाढविण्यासाठी देशांतर करून येथे येण्यास मोठे उत्तेजन दिले जाते. १९५०-५७ या काळात दर वर्षी सु. १७,००० पोर्तुगीज लोक येथे आले. १,५०० मी. उंचीवरील सेला येथील प्रायोगिक वसाहतकेंद्रात २,००० कुटुंबांची सोय आहे. वसाहत करण्यासाठी लोक येण्यापूर्वीच तेथे गावे, शेते, पूल, कालवे, रास्ते इ. सर्व सुखसोयी केलेल्या होत्या. प्रत्येक कुटुंबाला ४·८ हेक्टर बागायत, १२ हेक्टर कोरडवाहू आणि ४० हेक्टर चराऊ जमीन दिली जाते. प्रत्येक गावाला विहीर, धान्य-कोठार, चर्च व शाळा दिलेली आहे. या वसाहतीमध्ये तद्देशीय मजूरांना कामावर घेण्यास बंदी आहे. कुनेने खोऱ्यातील वसाहत यूरोपीय व स्थानिक लोकांसाठी असून तेथे ८,००० कुटुंबांची सोय आहे. स्थानिक लोकांसाठी फक्त सहा प्रायोगिक वसाहती आहेत.

 

दुसऱ्या महायुद्धानंतर समाजकल्याण व आरोग्य ह्या दृष्टीने प्रगती होत आहे. उत्तरेकडील भागात निद्रारोग बराच दिसून येत असे. परंतु त्याचा प्रादुर्भाव नवीन लस टोचण्याच्या पद्धतीमुळे कमी होत आहे. त्याखेरीज क्षयरोग, हिवताप, नारू, देवी, रक्तपिती, हत्तीरोग इ. ह्या बाजूने सामान्य रोग आहेत. हल्ली प्रत्येक लहानमोठ्या शहरी दवाखाने काढण्यात आले असून काही रुगणालये मिशनतर्फेही चालविण्यात येतात. स्थानिक लोकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी एक विशेष निधी उभारण्यात आला आहे.

 

लोकसंख्येच्या मानाने शिक्षणात फारशी प्रगती झालेली नाही. १९६९-७० मध्ये देशात ३,५७६ प्राथमिक, ६६ माध्यमिक, ६३ तांत्रिक, ६ धार्मिक विद्यालये असून, १२ शिक्षक-प्रशिक्षक-महाविद्यालये व एक शेती-महाविद्यालय होते.

 

महत्त्वाची स्थळे : लूअँडा हे राजधानीचे शहर व प्रमुख बंदर आहे. त्याची लोकवस्ती सु. ४,७५,३२८ (१९७०) होती. लोबितो हे दुसरे महत्त्वाचे बंदर असून तेथे सीमेंट, बोटी बांधणे, धान्य दळणे, पदार्थ डबाबंद करणे इत्यादींचे कारखाने आहेत. त्याखालोखाल मोझॅमीडीस हे बंदर असून तेथून मासे व त्यांचे पदार्थ ह्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. यांशिवाय बेंग्वेला, से द बंदेइरा, मालांगे, नोव्हा लिस्बोआ (पूर्वीचे हुआंबो) ही इतर महत्वाची शहरे आहेत.

 

संदर्भ : 1. Duffy, James Portuguese Africa, Cambridge, 1959.

            2. Hance, William A. The Geography of Modern Africa, New York, 1964.

 

नरवणे, द. ना.


अंगोला


अटलांटिक किनारा व पार्श्र्वभागी राजधानी लुअँडा अंगोलातील मिठागराचे द्दश्य
अंगोलन स्त्रिया                      अंगोलातील वैशिष्ट्यपूर्ण धान्यकणग्या
अंगोलन लोहार बाहोलो जमातीचे शिकारनृत्य
वेतकाम : अंगोलातील विकसित कुटिरोद्योग