तर्नोव्हो : बल्गेरियाच्या व्हेलिको तर्नोव्हो प्रांताची राजधानी व जुने वैभवशाली शहर. लोकसंख्या ४५,५७४ (१९७०). यांत्रा नदीच्या नागमोडी निदरीच्या उतारावर वसलेले हे शहर पूर्वीपासून कलाकौशल्याचे केंद्र असून येथे अन्नपदार्थ, पेये, फर्निचर, कापड इत्यादींचे उद्योग आहेत. ११८५ ची दुसऱ्या बल्गेरियन साम्राज्याची व १९०८ ची स्वतंत्र राजसत्तेची घोषणा तर्नोव्होलाच झाली, १३९४ ते १८७७ पर्यंतच्या जुलुमी तुर्की अंमलातही ते सांस्कृतिक, शैक्षणिक, व्यापारी व तुर्काविरुद्धच्या चळवळीचे केन्द्र होते. अनेक बल्गेरियन नामवंतांचे कार्यक्षेत्र येथेच होते. तुर्की अंमलात आणि १९११ च्या भूकंपात तर्नोव्होची बरीच नासधूस झाली.

कुमठेकर, ज. ब.