बर्कली : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याच्या ॲलमीडा परगण्यातील प्रमुख औद्योगिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या १,१६,७१६ (१९७०). हे सॅन फ्रॅन्सिस्को शहराच्या ईशान्येस १३ किमी. वर सॅन फ्रॅन्सिस्को उपसागराच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. स्पॅनिशांचे वर्चस्व असलेला हा प्रदेश अमेरिकनांनी १८५३ मध्ये खरेदी केला. येथील त्यांची वसाहत ‘ओशन व्ह्यू’ या नावाने ओळखली जाई. प्रसिद्ध आयरिश तत्त्वज्ञ व बिशप ⇨ जॉर्ज बर्क्‌ली (१६८५-१७५३) याच्या सन्मानार्थ या वसाहतीला बर्कली असे नाव देण्यात आले (१८६६). जवळच्याच ओकलंडमधील कॅलिफोर्निया महाविद्यालय येथे हरविण्यात येऊन (१८६४) त्याचेच पुढे जगप्रसिद्ध कॅलिफोर्निया विद्यापीठात रूपांतर झाले (१८७३). या विद्यापीठाचे प्रमुख केंद्र येथेच आहे. बर्कलीला १८९५ मध्ये शहराचा दर्जा प्राप्त झाला. सॅन फ्रॅन्सिस्को-बर्कली यांदरम्यानच्या उपसागरावर पूल बांधल्याने (१९३०) शहराचा विकास वेगाने झाला.

शहराचा विस्तार पश्चिमेकडील किनाऱ्यापासून पूर्वेकडील बर्कली टेकड्यांत सु. ५४५ मी उंचीपर्यंतच्या भागात झालेला आहे. किनाऱ्यावरील सपाट प्रदेशात मोठमोठे कारखाने, तर उंचीवरील भागात निवासी-इमारती आहेत. येथील ६० टक्के निवासस्थाने ही स्वतंत्र अशा छोट्या कुटुंबांची घरे असल्यामुळे बर्कलीला ‘घरकुलांचे शहर’ असेही संबोधण्यात येते. येथे औषधे, रसायने, कापड, यंत्रे, काचसामान, लाकडी वस्तू, छपाई इ. विविध उद्योग चालतात. येथे आर्मस्ट्राँग व्यवसाय महाविद्यालय (स्था. १९१८), अंध व बहिरे यांचे कॅलिफोर्निया विद्यालय, सहा धार्मिक पाठशाळा यांसारख्या शैक्षणिक सोयी आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेली ‘लॉरेन्स रेडिएशन लॅबरेटरी’ प्रसिद्ध असून तीत ‘सायक्लोट्रॉन’ची पहिली क्रियाशील प्रतिकृति तयार करण्यात आली (१९३१). विद्यार्थी व शिक्षक यांच्या मोठ्या संख्येमुळे शहरात चैतन्यमय शैक्षणिक वातावरण प्रत्ययास येते. शहराच्या अंतर्भागात आणि किनाऱ्यावर सुंदर उद्याने असून किनाऱ्यावर जलविहाराच्या उत्तम सोयी आहेत.

चौधरी, वसंत