काबूल : अफगाणिस्तानची व काबूल प्रांताची राजधानी. लोकसंख्या ४,८८,८४४ (१९७० अंदाज). हिंदुकुश पर्वतराजींमध्ये, काबूल नदीच्या दोहो तीरांवर, चहारदे व बेग्राम ह्या सुपीक दर्‍यांमध्ये हे शहर समुद्रसपाटीपासून १७९६ मी. उंचीवर वसलेले आहे. हे पेशावरच्या २२४ किमी. वायव्येस असून त्याच्याशी खैबर खिंडीद्वारा सडकेने जोडलेले आहे. येथील उन्हाळे आल्हाददायक तर हिवाळे अतिथंड असतात.

काबूल : एक विहंगम दृश्य.

वैदिक काळापासून काबूल ज्ञात असल्याचे प्राचीन साहित्यावरून आढळते. कपिशा देशातील म्हणून कित्येकदा कपिशा नावाने हिचा उल्लेख आढळतो. फार पूर्वीपासूनच पाश्चिमात्त्य देशांकडून मध्य आशियामधून भारत व चीन ह्यांकडे जाणाऱ्या प्रमुख खुष्कीच्या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर म्हणून हे प्रसिद्ध आहे. प्राचीन हिंदू व बौद्ध संस्कृतीचे अवशेष अद्यापही शहराभोवती सापडतात. सातव्या शतकात अरबांनी ह्या शहराचा ताबा घेतला. मोगल सम्राट बाबराची ही राजधानी (१५०४—२६) होती. नंतर नादिरशाहने कबजा घेईपर्यंत १७३८) काबूल मोगलांच्या ताब्यात होते. १७७५मध्ये तिमुरशाहची राजधानी येथे होती. भारतात ब्रिटीश साम्राज्याची प्रस्थापना झाल्यानंतर काबूलला राजकीय व लष्करी महत्त्व प्राप्त झाले, ते रशियासारखे राष्ट्र शेजारी असल्यामुळेच. अब्द-अर्‌ रहमानखनाने काबूल सुधारण्याचा व तेथे उद्योगधंदे उघडण्याचा प्रयत्न केला. शहराचा कायापालट करण्यासाठी १९३० पासून खास कार्यक्रम आखण्यात येऊन वीज, पाणीपुरवठा, डांबरी सडका आदी सोयी केल्या गेल्या. गर्दीने भरलेले बाजार, अरुंद रस्ते, जुनी घरे हे जुन्या काबूलचे वैशिष्ट्य, तर प्रशस्त रस्ते, शासकीय व खासगी वास्तू, भव्य प्रदर्शनालय, उद्याने, क्रीडांगण वगैरंची आधुनिक नगरस्थापत्यानुसार योजना केल्याने नदीच्या डाव्या तीरावरील नव्या काबूलचे सौंदर्य वाढले आहे. शहराबाहेर राजप्रासाद असून, बाबाराची कबर आणि बला हिस्सार ही मध्ययुगीन गढी आहे.

काबूल हे शैक्षणिक केंद्र आहे. येथे काबूल विद्यापीठ, वैद्यकीय, शेतकी व इतर अनेक महाविद्यालये असून तांत्रिक व माध्यमिक शिक्षणाची उत्तम सोय आहे. लष्करी सामग्री, साबण, फर्निचर, कापड, संगमरवरी वस्तू इत्यादींचे कारखाने येथे असून काराकुल मेंढ्या, लोकर,सुकामेवा व फळफळावळ ह्यांच्या व्यापराचे ते केंद्र आहे.

 

दिवाकर, प्र. वि.