कोळसाझारलँड : प. जर्मनीचे लक्सेंबर्गच्या व फ्रान्सच्या मोझेल प्रांताच्या सीमेवरील राज्य. क्षेत्रफळ २,५६७ चौ. किमी. लोकसंख्या ११,१९,७४२ (१९७०). राजधानी झारब्रुकेन. झार नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या प्रदेशाचे विस्तृत कुरणे व वनराजी हे वैशिष्ट्य असुनही यात कोळशाचे प्रचंड साठे असल्याने प्रदेशभर भट्‌ट्या व पोलाद, काच व मृत्तिकाशिल्पे यांचे कारखाने आणि लोहमार्गांचे जाळे पसरले आहे. येथील कोळसा आणि फ्रान्सच्या लॉरेनमधील लोखंड परस्परावलंबी असल्याने दोन्ही परगणे आलटून पालटून फ्रान्स व जर्मनीच्या ताब्यात गेल्याचा इतिहास आहे. व्हर्साय तहाने (१९१९) खाणी फ्रान्सला मिळून प्रदेश राष्ट्रसंघाच्या देखरेखीखाली फ्रान्सकडे देण्यात आला. १९३५ च्या सार्वमतानुसार हा जर्मनीस परत मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतर हा पुन्हा फ्रान्सच्या ताब्यात आला. १९४७ मध्ये हा स्वायत्त झाला परंतु संरक्षण व परराष्ट्रसंबंध फ्रान्सकडे राहिले. याच वर्षी फ्रान्सशी याने जकात संघ केला. १९५० मध्ये हा कौन्सिल ऑफ यूरोपचा सहयोगी सदस्य झाला. १ जानेवारी १९५७ रोजी झारलँड नावाने हा प्रदेश जर्मन संघीय गणराज्याचा घटक राज्य झाला. १९५९ मध्ये फ्रान्सबरोबरचे आर्थिक करारही रद्द होऊन झारलँड प. जर्मनीत पूर्णतया विलीन झाला.

शहाणे, मो. ज्ञा.