बूकारामांगा : द. अमेरिकेतील कोलंबिया देशाच्या सांतादेर प्रांताची – डिपार्टमेंटची – राजधानी. लोकसंख्या ३,८७,८८६ (१९७८ अंदाज). हे बोगोटाच्या ईशान्येस ४३२ किमी. ओरिएंटाल पर्वताच्या ईशान्य उतारावर, लिब्रिजा नदीकाठी वसलेले आहे. देशातील तंबाखू व कॉफी उत्पादनाचे एक प्रमुख व्यापारी केद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. ते हवाईमार्गाने बोगोटाशी जोडलेले आहे.

हे शहर १९२२ च्या सुमारास वसले. शहराच्या परिसरातील कॉफी, तंबाखू, कापूस, हेंप, ऊस यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन आणि सोने, चांदी, लोखंड इत्यादींच्या खाणी यांमुळे शहराचा विकास वेगाने घडून आला. येथे लोखंड – पोलाद, कापड, सिगारेट इ. उद्योग प्रगत झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रातही हे शहर आघाडीवर असून येथील ‘इंडस्ट्रियल युनिव्हर्सिटी ऑफ सांतांदेर’ (स्था. १९४७) उल्लेखनीय आहे. औद्योगिक शहर तसेच अनेक उद्याने, जुन्या कॅथीड्रल वास्तू यांकरीता हे शहर प्रसिद्ध आहे.

गाडे, ना. स.