लिबियन वाळवंट : आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटाचा ईशान्य भाग ‘लिबियन वाळवंट’ म्हणून ओळखला जातो. याचा विस्तार उत्तर आफ्रिकेतील लिबिया, ईजिप्तचा पश्चिम भाग व सूदानचा उत्तर भाग यांमध्ये म्हणजेच नाईल नदीच्या पश्चिम भागात आहे. साधारणपणे २१° ते २८° उ. अक्षवृत्त व २०° ते ३१° पू. रेखावृत्तांच्या दरम्यान हे वाळवंट असून ईजिप्तमधील याचा भाग ‘वेस्टर्न डेझर्ट’ या नावाने ओळखला जातो. लिबियन वाळवंटाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र, पूर्वेस नाईल नदी, नैर्ऋत्येस चॅडमधील तिबेस्ती पर्वतीय प्रदेश, तर पश्चिमेस लिबियातील फेझान व ट्रिपोलिटेनिया प्रदेश आहेत. दुसऱ्या महायुद्धात ईजिप्तमधील वेस्टर्न डेझर्ट हा भाग लष्करी हालचालींसाठी अत्यंत कसोटीचा ठरला होता. लिबियन वाळवंटी प्रदेशाची सस. पासून उंची सर्वसाधारणपणे २०० ते ६०० मी. आहे. लिबिया ईजिप्त व सूदान हे तीन देश जेथे मिळतात, तेथील जेबेल अल् ओवेनॅट (१,९३४ मी.)  हे या वाळवंटातील सर्वोच्च ठिकाण आहे, तर ईशान्येस ईजिप्तमध्ये असलेला कॉटारॉ खळगा सस. पासून १३२ मी खोल आहे. या प्रदेशात पर्वतसदृश भूमी, पठारी भाग, उथळ खोरे व सखोल मैदाने असे सर्व प्रकार आढळतात. या भूरूपाखाली मात्र प्राचीन आफ्रिकन ढालीचा अतिकठीण भूखंड आहे. या वाळवंटाचा उत्तर भाग भूमध्य समुद्राच्या बाजूस मंद उताराचा आहे. या भागात कमी उंचीचे अनेक कडे असून येथील पठारी भाग चुनखडकाचा आहे.उत्तर भागातील खडक जुरासिक ते तृतीयक कालखंडांतील असून मध्यभागातील खडक स्थलांतरित वाळूपासून तयार झालेला आहे. काही भागांतील खडक पुराजीव व मध्यजीव-पूर्व काळांतील असून त्यांत वालुकाश्माचे प्रमाण जास्त आढळते. अनेक ठिकाणी वाळूच्या टेकड्या आहेत. येथील तापमान कक्षा जास्त असल्याने अपक्षय होऊन खडकांचे तुकडे सर्वत्र पसरतात. त्यांतील लहान कणांचे वाऱ्यामुळे वहन होते. खडकांपासून बारीक रेती (अर्ग-वाळूचा थर व वालुकागिरियुक्त) तयार होते. वाऱ्यायमुळे वालुकागिरींचे अनेकवेळा स्थलांतर होते. वाऱ्याच्या सखलीकरणामुळे या प्रदेशात खड्डे निर्माण होतात. ईजिप्त मधील फायूम येथे असा प्रकारचा ८५ मी. खोलीचा खळगा तयार झाला आहे. काही ठिकाणी भूमध्य खडक आढळतात, त्यांना ‘गारा’ असे म्हणतात.

या प्रदेशातील हवामान उष्ण वाळवंटी प्रकारचे असून वर्षभर हवा कोरडी असते. जानेवारीतील तापमान १५° ते २०° से,. तर जुलैमधील तापमान ४५° से. पर्यंत जाते. रात्री तापमान जलद कमी होते. हिवाळ्यात बाष्पविरहित हरमॅटन वारे ईशान्येकडून वाहतात. ‘सीमून ’ ही वाळूची स्थानिक वादळेही होतात. वारे अतिशय उष्ण व कोरडे असतात. उत्तर व दक्षिण भागांत वार्षिक सरासरी पाउस २० सेंमी. पेक्षा कमी पडतो. परंतु इतर भागांत सरासरी पाऊस २.५ सेंमी. पेक्षाही कमी असतो. दोन तीन वर्षांतून एकदातरी वादळी पाउस पडतो. त्यामुळे नद्यांची शुष्क पात्रे (वाडी) पाण्याने तात्पुरती (एखादा महिना) भरून वाहतात. येथील नद्या अस्थायी आहेत.

या वाळवंटी प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप कमी असले, तरी खोल विहिरी खोदून भूमीगत पाणी भूपृष्ठावर आणले जाते. असा विहिरी येथील मरूद्यानांत आढळून येतात. लिबियामधील झीगेन, कूफ्रा ईजिप्तमधील एल् खार्ग, दाखला, फराफ्र, बहरिया व सीवा तसेच सूदानमधील सेलीमा व बिर ही या वाळवंटातील  महत्त्वाची मरूद्याने आहेत. नाईल नदीच्या पश्चिमेस असलेल्या फायूम मरूद्यानाला नाईल नदीचे पाणी मिळते. फायुम मरूद्यानाने या वाळवंटांतील विस्तृत खोलगट भाग व्यापलेला आहे. मोठ्या मरूद्यानांत दाट लोकवस्ती असलेली अनेक खेडी आहेत. यांतील घरांची छते सपाट व भिंती दगडमातीने बांधलेल्या आढळतात. खेड्यांत शाळा, मशिदी व बाजारपेठ असते. वाऱ्याणच्या आघातापासून संरक्षण व्हावे म्हणून वस्तीभोवती उंच भिंतींचे कोट बांधलेले असतात. काही मरूद्याने अतिशय लहान आहेत. शेतकऱ्यांची उपजीविका होईल इतकेही शेतीउत्पन्न या ठिकाणी होत नाही. सैनिकांच्या चौक्या व प्रवाशांसाठी पाणीपुरवठा करणारी ठिकाणे म्हणून यांचा उपयोग होतो. या प्रदेशात खोऱ्यांच्या किंवा टेकडी पायथ्याला असलेल्या मरूद्यानात किंवा पाणथळीच्या भागात खजुराची लागवड केली जाते. खजूरवृक्षांच्या सावलीत ज्वारीवर्गीय धान्ये सातू, गहू ही पिके थोड्याफार प्रमाणात घेतली जातात. झुडुपेसुद्धा अतिशय विरळ आढळतात. काही भागांत कडक गवताचे झुपके दिसतात.

उंट हा येथील महत्त्वाचा प्राणी आहे. काही भागांत कोल्हे, तरस, गोंडेरी शेपटीचा प्राणी, लहान काळवीट, वाळवंटी खार, उंदीर, सरडा, बिनविषारी साप हे प्राणी आढळतात. तसेच चंडोल, तितर, गरुड, गिधाड, ससाणा इ. पक्षीही काही प्रमाणात दिसतात.

या भागात १९५० नंतर खनिज तेल काढण्यास सुरुवात झाली. लिबियामधील इजेल येथे खनिज तेलाचे साठे आहेत. येथील तेल नळांनी बंदरांकडे पाठविले जाते. तसेच झाल्टन व इतर काही ठिकाणीही खनिज तेल उत्पादन होते.

या वाळवंटी प्रदेशात अनेक शतकांपासून, बव्हंशी उंटावरूनच, वाहतूक व व्यापार चालतो. मोटारी, ट्रक वाहतूकही अल्प प्रमाणात होते. परंतु त्यांचा वेग ताशी २० ते ४० किमी. इतका असतो. येथील रस्ते लांबीने कमी असून विहिरी व मरूद्याने यांना जोडणारे असतात.

येथील लोक सेमिटिक वंशाचे असून ते आफ्रो-आशियाई भाषा बोलतात. बहुतेक लोक मुसलमान आहेत. लोकसंख्येची घनता अत्यंत विरळ (दर चौ. किमी. स ४-६ माणसे) असून फक्त मरूद्यानांत दाट लोकसंख्या आढळते. 

मगर, जयकुमार