यवतमाळ जिल्हा : महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ १३,५८४ चौ. किमी. लोकसंख्या १७,३५,३७७ (१९८१). राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ४·४१% क्षेत्रफळ व एकूण लोकसंख्येपैकी २·७४% लोकसंख्या यवतमाळ जिल्ह्याची आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १९० २६’ ते २०० ४२’ उ. व ७७० १८’ ते ७९० ९’ पू. यांदरम्यान. पूर्व–पश्चिम कमाल लांबी १९२ किमी. व दक्षिणोत्तर कमाल रुंदी १६० किमी. यवतमाळ जिल्ह्याच्या उत्तरेस अमरावती जिल्हा, पश्चिमेस अकोला व परभणी हे जिल्हे, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश राज्य आणि पूर्वेस चंद्रपूर व वर्धा हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडून वर्धा नदीची, तर दक्षिणेस पैनगंगा नदीची नैसर्गिक सरहद्द लाभली आहे.

ब्रिटिश काळात वऱ्हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी हा जिल्हा ‘वणी’ (मराठी) किंवा ‘ऊन’ (उर्दू) या नावाने ओळखला जाई. १९०५ मध्ये त्याचे यवतमाळ जिल्हा म्हणून नामांतर करण्यात आले. १९५६ पर्यंत या जिल्ह्याचा मध्य प्रदेश राज्यात राज्यात समावेश होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत तो मुंबई राज्याला जोडण्यात आला त्यानंतर १ मे १९६० पासून त्याचा महाराष्ट्र राज्यात समावेश करण्यात आला. यवतमाळ (लोकसंख्या –  ८९,०७१–१९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

भूवर्णन : जिल्ह्याची भूमी उंचसखल आहे. संपूर्ण जिल्ह्यात अजिंठा डोगरमाला पसरलेल्या असून, त्यांमधून वर्धा-पैनगंगा व त्यांच्या उपनद्यांनी खोदलेल्या रुंद दऱ्यांमुळे अजिंठ्याचे डोंगर अनेक ठिकाणी खंडित झाले आहेत. वर्धा–पैनगंगा व त्यांच्या उपनद्यांनी आपल्या काठांवर ५ ते १५ किमी. रुंदीचे मैदानी प्रदेशाचे पट्टे तयार केले आहेत. जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग सस.पासून ३०० ते ५०० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाने व्यापला असून हा पठारी प्रदेश सामान्यपणे पूर्वेकडे एक किमी.ला दोन मीटर अशा मंद ढाळमानाने उतरत गेलेला दिसतो. ठिकठिकाणी तीव्र उतारही आढळतात. पठारी प्रदेशावर ७० ते १०० मी. उंचीचे कटक निर्माण झालेले असून त्यांवर तीव्र उताराची उंच शिखरे व मेसा आढळतात. पठाराचे उत्तरेकडील वर्धा नदीवरील कडे नदीपासून सरासरी २० किमी. अंतरावर आहेत. त्या मानाने दक्षिणेकडील पैनगंगा नदीकडील कडे नदीपात्रापासून फारच जवळ आहेत. उत्तरेस ५ किमी.च्या अंतरातच पठाराची उंची २०० मी.नी कमी झालेली दिसते. वर्धा नदीखोऱ्याकडून पठाराचे उत्तर तट करवतीच्या दात्यांप्रमाणे, तर दक्षिणेकडील तट अधिक खडबडीत असल्याचे दिसतात. पुसद तालुक्याच्या पूर्व भागात एकाआड एक अशा टेकड्या व खोगीरसदृश प्रदेश आणि उंच टेकड्या आढळतात. जमिनीच्या उंचसखलपणावरून जिल्ह्याचे मुख्य तीन भौगोलिक विभाग पडतात : (१) उत्तर भागातील बेंबळा व वर्धा या नद्यांकाठचा सखल प्रदेश, (२) नैर्ऋत्य व मध्यवर्ती भागांतील डोंगराळ व पठारी प्रदेश व (३) दक्षिणेकडील पैनगंगा नदीखोऱ्याचा सखल प्रदेश. नद्यांच्या खोऱ्यांतील कमी उंचीच्या सखल प्रदेशात काळी सुपीक मृदा व जास्त उंचीच्या प्रदेशांत जाडीभरडी तपकिरी किंवा तांबडी (मुरमाड किंवा ब रड) मृदा आढळते. वणी तालुक्यात जाडीभरडी तांबडी मृदा, केळापूर तालुका, यवतमाळ तालुक्याचा दक्षिण-मध्य भाग व पुसद तालुक्यातील डोंगराळ प्रदेशात फिकट तपकिरी व करड्या रंगाची जाडीभरडी, खडीयुक्त व भुसभुशीत मृदा आढळते. यवतमाळ तालुक्याच्या पश्चिम भागात आणि दारव्हा व पुसद तालुक्यांच्या मध्य भागात सुपीक गाळाच्या मृदा आहेत. चुनखडी व कोळसा ही जिल्ह्यात सापडणारी प्रमुख खनिजे आहेत.

वर्धा व पैनगंगा ह्या जिल्ह्यातील दोन मुख्य नद्या आहेत. त्यांपैकी वर्धा नदी जिल्ह्याच्या ईशान्य व पूर्व सरहद्दींवरून, तर पैनगंगा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून ३२० किमी. अंतर वाहते. वर्धा नदीने यवतमाळच्या वर्धा व चंद्रपूर यांदरम्यानच्या सरहद्दी, तर पैनगंगा नदीने यवतमाळच्या आंध्र प्रदेश राज्य, परभणी, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यांदरम्यानच्या सरहद्दी सीमित केल्या आहेत. जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणाऱ्या व वर्धा– पैनगंगा नद्यांना येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. वर्धा नदीचे पात्र रुंद व खोल असून बेंबळा व निरगुडा व उजवीकडून वाहत येऊन वर्धा नदीला मिळणाऱ्या मुख्य उपनद्या आहेत. निरगुडा (लांबी ६४ किमी.) नदीचा संपूर्ण प्रवाह वणी तालुक्यातून, तर बेंबळा नदी यवतमाळ तालुक्याच्या उत्तर भागातून ३४ किमी. अंतर वाहते. याशिवाय इतरही अनेक लहान-मोठे प्रवाह यवतमाळ पठाराचे जलवाहन करून उत्तरेस, ईशान्येस किंवा पूर्वेस वाहत जाऊन वर्धा नदीला मिळतात. पैनगंगा या जिल्ह्यातील दुसऱ्या मुख्य नदीच्या पूस, अरुणावती, अडाणा, वाघाडी, खूनी व विदर्भा या सहा प्रमुख उपनद्या आहेत. त्यांपैकी पूस नदी पुसद तालुक्यातून, अरुणावती व अडाणा नद्या दारव्हा व केळापूर तालुक्यांतून, खूनी नदी केळापूर तालुक्यातून, तर विदर्भा नदी वणी तालुक्यातून वाहते. अगदी दक्षिण भागात मुरली गावाजवळ पैनगंगेवर सहस्रकुंड धबधबा निर्माण झाला आहे. वर्धा व पैनगंगा या दोन्ही नद्या जिल्ह्याच्या आग्नेय सरहद्दीजवळ एकमेकींना येऊन मिळतात. वणी तालुक्यात कायर येथे गरम पाण्याचे झरे आहेत.

यवतमाळ जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून हिवाळे साधारण थंड असतात. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४५·  २० से. व ९० से. आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९९ सेंमी. आहे. वायव्येकडून आग्नेयीकडे पर्जन्यमान वाढत जाते. वायव्य भागात वार्षिक पर्जन्यमान ९० सेंमी., मध्यवर्ती भागात ११० सेंमी., तर आग्नेय भागात ते ११२ सेंमी. आहे. पुसद तालुक्यात सर्वांत कमी (८४ सेंमी.) व यवतमाळ तालुक्यात सर्वांत जास्त (११२ सेंमी.) पाऊस पडतो. एकूण पर्जन्यापैकी ८६% पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो. वर्षातील ५० ते ५८ पावसाचे दिवस असतात.

जिल्ह्यातील ३·  ७२ लाख हेक्टर म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% क्षेत्र अर ण्यां खाली आहे. जंगलांत साग, ऐन, बेल, तिवर, लेंडिया, धावडा, तेंडू, सेमल, कारम, बांबू हे वृक्षप्रकार आढळत असून, साग ह्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. जंगलांतून इमारती लाकूड, बांबू, तेंडूची पाने, मोह, गवत, जळाऊ लाकूड, डिंक ही प्रमुख उत्पादने मिळतात. अरण्यांत वाघ, बिबळ्या, अस्वल, नीलगाय, सांबर भारतीय कुरंग (चिंकारा), चितळ, रानडुक्कर हे प्राणी व मोर, कबूतर, तितर, लावा इ. पक्षी आढळतात.

आर्थिक स्थिती : शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकूण काम करणाऱ्या (४६·२२%) लोकसंख्येपैकी ३०·२७% शेतकरी, ५३·४०% टक्के शेतमजूर, १·५१% टक्के घरगुती उद्योगांत व १४·७२% इतर उद्योगांत काम करणारे लोक आहेत (१९८१). पिकांखालील एकूण जमिनीपैकी ५२· ८३% जमीन अन्नधान्यांच्या पिकांखाली व ४७· १७% बिगर अन्नधान्यांच्या पिकांखाली आहे. ज्वारी (३२· ९६% क्षेत्र) हे जिल्ह्यातील अन्नधान्याचे, तर कापूस (४१% क्षेत्र) हे मुख्य नगदी पीक होते (१९७९-८०). यांशिवाय गहू, तांदूळ, हरभरा, तूर, ऊस, भुईमूग,  विड्याची पाने इ. पिके घेतली जातात. १९७९-८० मध्ये काही प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (उत्पादन मे. टनांमध्ये) : तांदूळ १२,२००, गहू २३,८००, ज्वारी २,३५,८००, हरभरा २,१००, तूर ४५,७००, भुईमूग १४,९००, कापूस २,४४,९०० (गासड्या), ऊस ८,३००. अलीकडे ज्वारी, कापूस आणि इतर पिकांच्या संकरित व जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या एकूण ५३७ कृषिपतसंस्था असून त्यांची एकूण सभासदसंख्या २,१४,०३८ होती (१९८०-८१). जिल्ह्यातील ८,२७,८०० हेक्टर या लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी २· ६% म्हणजे २१,५१० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. जलसिंचनाखालील एकूण क्षेत्रापैकी १२,९९४ हे. विहिरीखाली व ७,०६० हे. क्षेत्र कालव्यांखाली असून १,४५६ हे. क्षेत्राला इतर मार्गांनी पाणीपुरवठा केला जातो (१९७९-८०). अपर पैनगंगा व अरुणावती हे प्रमुख जलसिंचन प्रकल्प, पूस, निंगनूर, टाकळी, सायखेड, वाघाडी, गोकी, लोअर पूस, साखळी, देवगाव, अंतरगाव, अडाणा व बोरगाव हे मध्यम जलसिंचन प्रकल्प तसेच १३५ लघू पाटबंधारे प्रकल्प व ९ उद्धरण सिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्यांतील बरेचसे पूर्णही झाले आहेत (१९८०). शेतीला पूरक म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो. १९८०-८१ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : गुरे ८६४, म्हशी १०३, मेंढ्या ७, शेळ्या ३०९,  इतर जनावरे ९, कोंबड्या ४९८.

द्योगिक दृष्ट्या यवतमाळ हा विदर्भातील एक मागासलेला जिल्हा आहे. येथे मोठ्या उद्योगांचा विकास फारच कमी झालेला आहे. बरेचसे उद्योग कृषी उत्पादनांवर आधारित आहेत. तेल व डाळ-गिरण्या ,  कापूस वटणी व दाबणी ,  अन्नधान्य प्रक्रिया ,  लोहारकाम ,  सुतारकाम ,  मातीची भांडी ,  लाकूड कापणी ,  विणकाम ,  बेकरी उत्पादने ,  पादत्राणे ,  दोर ,  कौले व विटा तयार करणे यांसारखे लघू ,  परंपरागत व कुटिरोद्योग बरेच आढळतात. यांतील बहुतेक उद्योग तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतात. वणी तालुक्यातील चुनखडीच्या साठ्यांमुळे त्यातील राजूर येथे चुनाभट्‌ ट्या  आहेत. चुनखडी उत्पादनांवर आधारित उद्योगधंदे स्थापन करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. वणी तालुक्यातील चनाखा येथे सिमेंट कारखाना उभारण्याची योजना आहे  कारण तेथील चुनखडी सिमेंट उत्पादनयोग्य आहे. राजूर–वणी–चनाखा, मुकुटबन, गौराळा व चनाखा–भिवकुंड हे मुख्य चुनखडी उत्पादक प्रदेश असून पिसेगाव, वरूड, चिंचोली इ. ठिकाणी कोळशाचे साठे आहेत. पुसद व पांढरकवडा येथे सूत व कापडगिरण्या, तर पोफळी (ता. पुसद) तेथे साखरकारखाना आहे. लाकूड कापण्याच्या गिरण्या, लाकडी सामान, खेळणी, पेन्सिली तयार करणे इ. वनोत्पादनावर आधारित उद्योगधंद्यांच्या वाढीस जिल्ह्यात खूपच वाव आहे. १९८०-८१ मध्ये इमारती लाकडाचे उत्पादन २०,९६८ घ. मी. व जळाऊ लाकडाचे उत्पादन ८८,१८४ घ. मी. झाले असून इतर वनोत्पादने रु. ५४,३९,६४० किंमतीची झाली. जिल्ह्यात मत्स्यसंवर्धनासाठी ४,४५० हे. क्षेत्र उपलब्ध असून त्यातून दरवर्षी ६२६ मे. टन मासे पकडले जातात. जिल्ह्यातील वस्ती असलेल्या एकूण १,६१७ गावांपैकी १,३८२ गावांचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून एकूण १९,३०५ पंपांना वीज पुरविण्यात आली आहे. पतपुरवठा करणाऱ्या ४७ अनुसूचित व ५१ सहकारी अशा एकूण ९८ बँका आहेत. यवतमाळ–मुर्तिजापूर (अकोला जिल्हा) व राजूर–वणी–मांजरी (चंद्रपूर जिल्हा) असे दोनच लोहमार्ग असून त्यांची जिल्ह्यातील एकूण लांबी केवळ ८२ किमी. आहे. सर्व प्रकारच्या रस्त्यांची मिळून एकूण लांबी ४,४४३.७३ किमी. असून त्यांपैकी राष्ट्रीय महामार्ग ६५·४० किमी., राज्य महामार्ग ६०२·९४ किमी., मुख्य जिल्हा रस्ते १,०४८·९३ किमी., इतर जिल्हा रस्ते ८१३·५८ किमी. आणि ग्राम रस्ते व इतर रस्ते १,९१२·८८ किमी. लांबीचे आहेत. जिल्ह्यात ३३४ डाक कार्यालये, ५४ तार कार्यालये, २,०७१ दूरध्वनी संच व ११,८६९ रेडिओ संच होते (१९८०–८१).

लोक व समाजजीवन : जिल्ह्याच्या १७,३५,३७७ या एकूण लोकसंख्येत ८,८५,८६६ पुरुष आणि ८,४९,५११ स्त्रिया असून, दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९५९ आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.ला १२८ होती (१९८१). जिल्ह्याच्या १९७१ च्या १४,२३,७०० या एकूण लोकसंख्येत ११,८८,३०० हिंदू, १,३१,१०० बौद्ध, १,४०० ख्रिश्चन, ८,६०० जैन, ९३,७०० मुस्लिम व ५०० शीख धर्मीय होते. अनुसूचित जातींचे ५६,००० आणि अनुसूचित जमातींचे १,९८,००० लोक आहेत. गोंड, बंजारा, कोलान, आंध, सरोदी, फासेपारधी व परधान हे गिरिजन जिल्ह्यात आढळतात. जिल्ह्यात १३ रुग्णालये व ४९ दवाखाने असून त्यांतील खाटांची एकूण संख्या ७६५ आहे. जन्म व मृत्यू यांचे प्रमाण दर हजारी अनुक्रमे ३०·५५ व ९·९ आहे. गुरांचे दवाखाने ३० आहेत. (१९८०-८१). जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण ३९·२३% असून ते पुरुषांमध्ये ५१·१८% व स्त्रियांमध्ये २६·७६% होते (१९८१). १९८०-८१ मध्ये जिल्ह्यातील १,८४५ प्राथमिक शाळांत २,२४,०७४ विद्यार्थी व ५,७०० अध्यापक १७३ माध्यमिक शाळांत ७०,५८० विद्यार्थी व २,४४५ अध्यापक आणि १३ उच्च शिक्षण संस्थांत ७,११८ विद्यार्थी व ३२९ अध्यापक होते.

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले यवतमाळ, खूनी नदीच्या काठावर वसलेले व केळापूर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले पांढरकवडा, वाघाडा नदीकाठावरील घाटंजी, निर्गुडा नदीच्या काठावर वसलेले व वणी तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले वणी, दारव्हा तालुक्यातील दिग्रस, पूस नदीच्या तीरावर वसलेले व पुसद तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले पुसद तसेच उमरखेड, राळेगाव, मुकुटबन, बोरीअरब ही जिह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत. कवडसी, जांभोरा, ढाणकी, वणी, तपोना, महागाव कसबा, पुसद, धनोडा, रावेरी, तुपटाकळी, आसेगावदेवी, मुळावा व पांढरकवडा ही जिल्ह्यातील यात्रेची ठिकाणे आहेत. (चित्रपत्रे १, २१)

लेखक : चौधरी, वसंत

माहूरच्या मंदिरातील रेणुकादेवीचा अलंकृत मुखवटा
हेमाडपंती शैलीतील महादेवाचे मंदिर, लोहारा १८ वे शतक
वटण गिरणीचे बाह्य दृश्य, पांढरकवडा
सुत गिरणीचे अंतर्गत दृश्य, पुसद