विषुववृत्तीय गिनी : (इक्वेटोरिअल गिनी). आफ्रिका खंडाच्या पश्चिममध्य भागातील एक छोटासा स्वतंत्र देश. अधिकृत नाव रिपब्‍लिक ऑफ इक्वेटोरिअल गिनी. क्षेत्रफळ (बेटांसह) २८,०५१ चौ. किमी. लोकसंख्या ४,२०,००० (१९९२ अंदाज). विषुववृत्तीय गिनीमध्ये रीओमूनी या मुख्य भूमीचा तसेच बीओको, अन्नाबॉन (पागलू), कोरीस्को, एलोबे ग्रांदे व एलोबे चीको या पाच बेटांचा समावेश होतो. रीओमूनीच्या (क्षेत्रफळ २६,०१७ चौ.किमी.) उत्तरेस कॅमेरून, पूर्वेस व दक्षिणेस गाबाँ आणि पश्चिमेस अटलांटिक महासागरातील गिनीचे आखात आहे. रीओमूनीचा अक्षवृत्तीय विस्तार १° १’ते ३° ४८’ उ. व रेखावृत्तीय विस्तार ८° २६’ ते ११° २०’ पूर्व यांदरम्यान आहे. आयताकृती रोओमूनीची कॅमेरूनशी १८३ किमी. लांबीची व गाबाँशी ३८६ किमी. लांबीची सरहद्द असून समुद्रकिनाऱ्याची लांबी १६७ किमी. आहे. बीओको हे सर्वांत मोठे बेट (क्षेत्रफळ २,०१७ चौ. किमी.) रीओमूनीपासून वायव्येस १६० किमी. अंतरावर गिनीच्या आखातात आहे. बीओकोचा आकारही आयताकृतीच आहे. १९७३ ते १९७९ या काळात बीओकोला मादीअस एंज्वेम बियोगो या नावाने तर त्यापूर्वी फर्नांदो पो नावाने ओळखले जाई. या बेटाला १७४ किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. रीओमूनीपासून नैऋत्येस ४८० किमी. तसेच बीओकोच्या नैऋत्येस सु. ६४० किमी. वर अन्नाबॉन (क्षेत्रफळ १७ चौ.किमी.) हे बेट आहे. त्याचा विस्तार १° २५’ द. व ५° ३६’ पू. असा आहे. त्याची रुंदी फक्त ३ किमी. तर तिच्या दुपटीपेक्षा थोडी कमी लांबी आहे. बीओको-अन्नाबॉन यांच्या दरम्यान साऊँटोमे व प्रिन्सीपे बेटे (आफ्रिकेतील सर्वांत लहान देशांपैकी एक) आहेत. रोओमूनीच्या नैऋत्येस किनाऱ्याजवळील कोरीस्को, एलोबे ग्रांदे व एलोबे चीको ही बेटे आहेत. १९७३ पर्यंत देशाची फर्नांदो पो व रीओमूनी अशा दोन प्रांतात विभागणी केली होती. त्यांपैकी पहिल्या विभागात फर्नांदो पो व अन्नाबॉन बेटांचा समावेश होत असे तर दुसऱ्या प्रदेशात रीओमूनी या मुख्य भूमीचा आणि कोरीस्को, एलोबे ग्रांदे व एलोबे चीको बेटांचा समावेश होत असे. १९७३ मध्ये हे प्रांत रद्द करून फर्नांदो पो याचे नाव मादीअस एंज्वेम बियोगो व अन्नाबॉनचे नाव पागलू असे करण्यात आले. १९७९ मध्ये फर्नांदो पो याचे नाव बीओको असे करण्यात येऊन अन्नाबॉन हे नाव कायम ठेवण्यात आले. रीओमूनी किंवा एम्‌बिनी या देशातील मुख्य नदीवरील मुख्य भूमी रीओमूनी या नावाने ओळखली जाते. बीओको बेटावरील मालावो पूर्वीचे सांता इझाबेल (लोकसंख्या १०,०००-१९८६) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. मुख्य भूमीवरील बाटा (लोकसंख्या१७,०००-१९८६) हे देशातील सर्वांत मोठे शहर आहे.

 

भूवर्णन : रीओमूनी हा प्रदेश देशाचा सु. ९३% भाग व्यापतो. त्यामध्ये कोरीस्को (क्षेत्रफळ १६ चौ.किमी.) आणि दोन्ही एलोबे बेटे (क्षेत्रफळ २.५ चौ.किमी.) यांचाही समावेश होतो. पूर्व-पश्चिम साधारण २२५ किमी. आणि दक्षिण-उत्तर सु. १३० किमी. पसरलेल्या रीओमूनी प्रदेशात सरासरी २५ किमी. रूं दीचा किनारी मैदानी प्रदेश आहे. या मैदानी प्रदेशालगतच्या भागाची उंची एकदम वाढते आणि गाबाँ सरहद्दीवर क्रिस्टल पर्वतरांगांच्या सान्निध्यात असणाऱ्या ओबडधोबड पठारी प्रदेशामध्ये (उंची १,२०० मी.) त्याची परिणती होते. या प्रदेशाच्या साधारण मध्यावरून एम्‌बिनी नदी पूर्व-पश्चिम दिशेत वाहते. तेंबोनी ही नदी दक्षिण सरहद्दीवरून काही अंतर वाहत जाऊन रीओमूनी खाडीला मिळते, तर उत्तर सरहद्दीच्या काही भागातून एन्तेम नदी वाहते. या नद्यांचा जलवाहतुकीच्या दृष्टीने उपयोग मर्यादित आहे. किनारपट्टीवर एक लांब पुळण असून तिच्या दक्षिणेकडील भागात छोटे डोंगर आढळतात. रीओमूनीच्या पठारी प्रदेशातील मृदा विशेष सुपीक नसली, तरी किनारपट्टीच्या मैदानातील मृदा सुपीक असून ती सखोल शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

बीओको व अन्नाबॉन ही पर्वतीय बेटे असून त्यांची निर्मिती ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. बीओको बेटावर तीन मृत ज्वालामुखी शंकू आढळतात. त्यांपैकी सांता इझाबेल हे देशातील सर्वोच्च शिखर (३,००८ मी.) बेटाच्या उत्तर भागात आहे. ज्वालामुखींच्या तोंडाशी अनेक सरोवरे निर्माण झाली आहेत. तसेच तेथे शिलारसापासून तयार झालेली उत्तम मृदा आहे. या बेटाचा दक्षिण भाग खडकाळ व दंतुर श्रेणींनी व्यापलेला असून त्यात प्रपात आहेत. तथापि त्यांचा जलविद्युत्‌निर्मितीसाठी अद्याप वापर केलेला आढळत नाही. वनाच्छादित पर्वतीय उतार, ज्वालामुखी सरोवरे, अखुडशीघ्रवाही नद्या व किनाऱ्यावरील काळ्या वाळूची पुळणे ही बीओको बेटाची प्रमुख भूदृश्ये आहेत. अन्नाबॉन बेट बीओको बेटापेक्षा कमी ओबडधोबड असून येथील सर्वोच्च उंची ७५० मी. आहे.

हवामान : देशाची मुख्य भूमी आणि बीओको बेट यांवरील हवामान उष्ण व आर्द्र स्वरूपाचे आहे. पाऊस भरपूर पडत असला तरी अंतर्भागातील पठारी प्रदेशात तो कमी होत जातो. जून ते ऑगस्ट रीओमूनीचे हवामान कोरडे, तर बीओकोचे हवामान आर्द्र असते. बीओकोमध्ये पर्जन्यमान तुलनात्मक दृष्ट्या जास्त असून नोव्हेंबर ते मार्च दरम्यानचे कोरडे हवामान वगळता उर्वरित सर्व काळ ते आर्द्र असते. बीओको तसेच अन्नाबॉन बेटांवर आकाश बरेच वेळा मेघाच्छादित असते. अन्नाबॉन बेटावर बहुतेक दररोज पाऊस पडतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान मालाबो येथे १९३ सेंमी. तर युरेका येथे १,०९० सेंमी. आहे. रीओमूनीचे सरासरी तापमान २७° से. असते. विषुववृत्ताला जवळ असल्याने ऋतुनुसार तापमानात विशेष फरक पडत नाही. कमी उंचीच्या प्रदेशात तापमान जास्त, तर अधिक उंचीवर ते कमी आढळते.  

विषुववृत्तीय स्थानामुळे विषुववृत्तीय घनदाट जंगलाने देशाचा बराचसा प्रदेश व्यापला आहे. त्यात ताड, माड, ओक, ओकमे, मॅहॉगनी, आफ्रिकन वॉलनट इ. कठिण लाकडाच्या सु. १४० जातींचे भिन्न प्रकारचे वृक्ष आढळतात. जंगलातून गोरिला, चिंपँझी, माकडे, चित्ते, हत्ती, सुसरी हे प्राणी आढळतात. शिकारीमुळे त्यांचे प्रमाण घटले आहे. बीओको किनारपट्टीत कच्छ वनस्पतियुक्त दलदलीचा प्रदेश असून तेथे मोठी शिकार फारशी होत नाही.

इतिहास : विषुववृत्तीय गिनीचा प्रागितिहास पुरातत्वीय अवशेषांवरून ज्ञात होतो. रीओमूनी येथे इ. स. पू. काळात अशूलीअन संस्कृती अस्तित्वात असून पिग्मी हे येथील सुरूवातीचे रहिवासी असावेत, असा एक तर्क आहे. तेराव्या शतकात बुबी लोक बीओको बेटावर आले, तोपर्यंत येथे फारशी वस्ती नव्हती. बुबी लोकांनंतर याच शतकात प्रथम बांतू व त्यानंतर बेंगा, बुजेबा, कोम लोक येथे आले. रीओमूनीमध्ये बांतूंनी प्रवेश केल्यावर पिग्मींची संख्या घटली. त्यानंतर पुढे काँगो खोऱ्यातून फँग आले. अन्नाबॉन जरी निर्जन होते, तरी पोर्तुगीजांनी त्याचा १४७१ मध्ये शोध लावल्यावर तेथे वसाहत केली. ही एकच दूरवरची वसाहत पुढे विषुववृत्तीय गिनीत समाविष्ट करण्यात आली. १४७२ मध्ये पोर्तुगीजांनी फर्नांदो पो बेटाचा शोध लावला व ही दोन्ही बेटे आणि रीओमूनी यांवर आपला हक्क सांगितला. १७७८ मध्ये पोर्तुगालने आपल्या अखत्यारीतील नायजर नदीच्या त्रिभुज प्रदेशापासून विद्यमान गाबाँ देशाच्या लोपेझ भूशिरापर्यंत सर्व समुद्रकिनारा स्पेनला दिला आणि स्पेनकडून त्या मोबदल्यात दक्षिण ब्राझीलमधील चाचेगिरीचे हक्क सोडल्याचे कबूल करून घेतले. स्पेनने १७७८ मध्ये येथे वस्ती करण्याचा प्रयत्‍न केला. पण येथील रोगराईमुळे तीन वर्षांनी तो प्रयत्‍न सोडून दिला. यामध्ये स्पेनच्या ५४७ लोकांपैकी ३७० जण मरण पावले. गिनीच्या आखातामध्ये गुलामगिरीविरोधी गस्त घालणाच्या ब्रिटनच्या शाही नौदलाला सोयीचे व्हावे, म्हणून स्पेनने मालाबो बंदर ब्रिटनकडे १८२७ मध्ये भाडेपट्‌ट्याने सोपविले. तेथील ब्रिटिश तळ उठल्यावर (१८४३) स्पेनने बीओकोवर पुन्हा अंमल बसविला. स्पॅनिश क्यूबामधील राजकीय हद्दपारितांना येथे सोडून दिले जात असे.

भूभागाच्या शोधार्थ स्पेनने इ. स. १८७५ – ८५ दरम्यान शोधमोहीम आखली. त्याला कॅथलिक मिशनऱ्यांचे साहाय्य लाभले. सुर वातीला अन्नाबॉन व नंतर फर्नांदो पो बेट घेऊन (१८८३-१९२४) ती मोहीम स्थिरावली. त्यानंतर स्पॅनिश लोकांनी रीओमूनीकडे आपला मोर्चा वळविला (१८८६-१९२५). १८९८च्या स्पॅनिश-अमेरिकन युद्धात स्पेनचा पाडाव झाल्यानंतर स्पेनचे लक्ष बीओकोच्या सुप्त आर्थिक साधनांकडे गेले आणि तेथे विकास घडविला गेला. १८८० च्या दशकापर्यंत अन्नाबॉन स्वयंनिर्णयित होता. रीओमूनीच्या समन्वेषणानंतर स्पेनने त्यावर आपला हक्क सांगितला. फ्रान्सने करार केल्यावर (१९०२) स्पेनच्या तीन विषुववृत्तीय प्रदेशांचे विलीनीकरण होऊन स्पॅनिश गिनी स्थापले गेले. फँग लोकांचा पराभव होऊन अंतर्भागात स्थिर वसाहती करण्यास १९२७ साल उजाडले. गव्हर्नर एंजेल बरेरा याने महत्‌प्रयासाने फँग लोकांचा पराभव करून हा प्रदेश पादाक्रांत केला. तथापि त्याने प्रशासकीय व्यवस्थेसाठी मेक्सिको आणि पेरू येथील पद्धती (म्हणजे एतद्देशीयांच्या सहकार्याचे धोरण) वापरली. १९४५ पर्यंत रीओमूनी हा दुर्लक्षित प्रदेश होता. दुसऱ्या महायुद्धानंतर स्पॅनिश गिनी ही एक आदर्श वसाहत निर्माण करण्याच्या दृष्टीने योजना आखण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात आफ्रिकेत वाढलेल्या राष्ट्रवादी चळवळीमुळे स्पेनचे धोरण बदलले. समावेशाचे धोरण स्वीकारून इ. स. १९५८ मध्ये स्पॅनिश गिनी हा स्पेनचा एक अविभाज्य प्रांत करण्यात आला. १९६४ मध्ये विषुववृत्तीय प्रदेश म्हणून त्याचे फर्नांदो पो आणि रीओमूनी असे दोन प्रांत करण्यात आले. पण फँग-प्रभावित राष्ट्रवादी चळवळी आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या दबावामुळे या दोन्ही प्रांतांना स्वायत्त प्रशासनव्यवस्था प्रदान करण्यात आली. या प्रांतांना स्पॅनिश संसदेत प्रतिनिधित्व देण्यात आले व येथील लोकांना संपूर्ण स्पॅनिश नागरिकत्व देण्यात येऊन याचे विषुववृत्तीय गिनी असे नाव झाले. १९६६ मध्ये स्पेनने वसाहतीस स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. दोन वर्षे प्रदीर्घ वाटाघाटी होऊन संविधान तयार करण्यात आले. फ्रान्सिस्को मेशिअस एन्‌ग्यूमा याने स्वातंत्र्यपूर्व निवडणुकीत विजय संपादन करून पुढे दि. १२ ऑक्टोबर १९६८ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासन बनविले. स्वतंत्र देशाला रिपब्‍लिक ऑफ इक्वेटोरिअल गिनी असे नाव देण्यात आले. सहा महिन्यांच्या आतच येथील स्थानिक व स्पॅनिश लोकांत संघर्ष सुरू झाला. स्पॅनिश नागरी अधिकाऱ्यांचे शासनातील वर्चस्व, त्यांचे सैन्य आणि नौका, तसेच स्पेनमधील व्यापाऱ्यांचे उद्योगधंद्यातील वर्चस्व ही या संघर्षाची प्रमुख कारणे होती. दोन अवचित सत्तांतरे अयशस्वी झाली, परंतु स्पॅनिश लोकांना घालविण्यात यश मिळाले. सुमारे ७,००० स्पॅनिश अचानक देश सोडून गेल्यावर तांत्रिक आणि व्यवस्थापकीय तज्ञांचा तुटवडा पडला. स्पॅनिश मदतीनेच अर्थव्यवस्थेचा झुकता मनोरा थोडाफार सावरला गेला. पुढे क्यूबा, रशिया आणि चीन यांच्याकडून मदत मिळाली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने समझोता होऊन आरोग्यसेवा व अन्य सवलती ठेवण्यात आल्या. 

फ्रान्सिस्को एन्‌ग्यूमा याची २३ ऑगस्ट १९७२ रोजी तहहयात अध्यक्षपदावर नियुक्ती झाली. याच्या एकपक्षीय राज्यव्यवस्थेला सैन्याचा पाठिंबा होता. जुलमी राजवटीत विरोधकांचे शिरकाण, रोमन कॅथलिकांचा छळ, बुबींना होणारा त्रास, नायजेरियन मजूरवर्गाला मिळणारी गैरवागणूक यांमुळे देशातील एक चतुर्थांश लोकांनी कंटाळून देशांतर केले. अध्यक्षांच्या काही जबरदस्त शत्रूंची हत्या करण्यात आली. यातून देशात भ्रष्टाचार माजून अशांतता निर्माण झाली. परिणामतः ३ ऑगस्ट १९७९ रोजी त्याचा पुतण्या लेफ्टनंट कर्नल तेओदोरो ओबियांग एन्‌ग्यूमा एम्‌बासोगो याच्या नेतृत्वाखाली लष्करी क्रांती होऊन मेशिअस एन्‌ग्यूमाला अटक करून देहांत शासन दिले गेले. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क संघटनेने केलेल्या अंदाजानुसार मेशिअस एन्‌ग्यूमाच्या अकरा वर्षांच्या कारकीर्दीत किमान पन्नास हजार नागरिकांना कंठस्‍नान घालण्यात आले आणि सु. ४०,००० नागरिकांना वेठबिगारीने शासकीय मालकीच्या मळ्यात कामाला लावलेले होते. ओबियांग एन्‌ग्यूमाच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार करण्यासाठी सर्वोच्च लष्करी मंडळ अस्तित्वात आले व त्याला सर्वाधिकार देण्यात आले. रशियाचा प्रभाव कमी करण्यात आला आणि स्पेनबरोबर लष्करी व आर्थिक साहाय्य देण्याबाबत जुने संबंध पुनर्स्थापित झाले. १९८१ मध्ये प्रथमच नागरी सभासदांचा सरकारात समावेश झाला. १९८२ मध्ये ओबियांग एन्‌ग्यूमा याची सात वर्षांकरिता राष्ट्राध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. १९८३ व १९८८ मध्ये विधान मंडळाच्या निवडणुका झाल्या, परंतु त्या दोन्हींमध्ये निवडून आलेले सर्व उमेदवार राष्ट्राध्यक्षाच्या नामनिर्देशित व्यक्ती होत्या. १९८९ मध्ये प्रथमच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कसल्याही विरोधाशिवाय ओबियांग एन्‌ग्यूमा याची राष्ट्राध्यक्ष म्हणून फेरनिवड झाली. ओबियांग एन्‌ग्यूमा याची अध्यक्ष म्हणून फेरनिवड होईपर्यंतच्या काळात निदान चार अयशस्वी उठाव झाले. बंडखोरांना कठोर शिक्षा झाल्या.


जनमतपृच्छा घेऊन दिनांक ११ ऑगस्ट १९६८ रोजी स्पॅनिश वसाहतवाल्यांनी विषुववृत्तीय गिनीच्या संविधानास संमती मिळविली आणि हे संविधान १२ ऑक्टोबर १९६८ रोजी स्वातंत्र्य मिळाल्यावर कार्यवाहीत आले. स्वातंत्र्यपूर्व काळातील देशात असणारे सर्व राजकीय पक्ष मार्च १९७० मध्ये नॅशनल पार्टी ऑफ वर्कर्स या एका राष्ट्रीय पक्षात विलीन झाले. नवीन संविधानानुसार हा देश संयुक्त राष्ट्रांचा सभासद व्हावा आणि सकल आफ्रिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याने स्पेनकडून आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय सहकार्य घ्यावे असे त्यात नमूद करण्यात आले. फर्नांदो पो मधील विलगीकरणाच्या चळवळीमुळे १९७१ मध्ये हे संविधान निलंबित करण्यात आले. साहजिकच अध्यक्षाकडे सर्व सत्ता  आली. त्यानंतर दुसरे संविधान जनमतपृच्छेद्वारे जुलै १९७३ मध्ये संमत झाले. या संविधानानुसार युनायटेड नॅशनल वर्कर्स पार्टी हा अधिकृत पक्ष ठरून त्याने आपले प्रतिनिधी राष्ट्रीय मंडळात धाडले. अध्यक्षांची प्रौढ मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे निवड करावी, हे कलमच या मंडळाने रद्द ठरवून मेशिअस एन्‌ग्यूमाची तहहयात अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केली (२३ ऑगस्ट १९७२). १९७९ मध्ये अवचित सत्तांतराद्वारे त्याला पदच्युत करून संयुक्त राष्ट्रांच्या मदतीने नवीन संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला. तसेच युनायटेड नॅशनल वर्कर्स पार्टीचे विसर्जन करण्यात आले. १५ ऑगस्ट १९८२ रोजी ९५%मतदारांनी जनमतपृच्छेद्वारे त्यास संमती दर्शविली. या संविधानानुसार राष्ट्राध्यक्षाची निवड बहुमताने, सार्वत्रिक निवडणुकीद्वारे सात वर्षांकरिता होते. देशाने अध्यक्षीय पद्धती स्वीकारली असून सर्व प्रशासकीय मंडळाचे प्रतिनिधी प्रौढ मताधिकाराने निवडले जातात. मंत्रिमंडळाची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष करतात व ते त्यास जबाबदार असतात. देशात वरील घटनेनुसार ४१ सभासदांचे लोकनियुक्त प्रतिनिधी मंडळ असून त्यातील प्रतिनिधी अध्यक्ष ठरवितो आणि बिनविरोध त्यांची निवड होते. या मंडळाचा अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण मंत्री यांचे राज्यमंडळ असते.

राजकीय हालचालींवरचे कडक निर्बंध तथा आर्थिक मंदी यांमुळे १९८० च्या दशकामध्ये देशाबाहेर परागंदा राजकीय विरोधकांनी आपले गट तयार करून विरोधाची मोर्चेबांधणी केली. १९८७ मध्ये ओबियांग एन्‌ग्यूमाने ‘पार्टीदो डेमोक्रॅटिको दे गिनी इक्वेटोरिअल’ (पी. डी. जी. ई.) या सरकारी पक्षाची स्थापना केली आणि इतर पक्षांना लवकरच परवानगी मिळेल असे जाहीर केले. जून १९८८ मध्ये परदेशातून भेटीला आलेल्या विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींची विरोधी पक्ष कायदेशीर करण्याची मागणी मात्र त्याने फेटाळली. जून १९८९ मधील राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल रद्द ठरवावा अशी मागणी विरोधकांनी केली. राष्ट्राध्यक्षांनी बंडखोरांना मायदेशी परतण्याचे आवाहन केले पण त्याचवेळी बहुपक्ष पद्धतीला असलेल्या आपल्या विरोधाचा त्यांनी पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय सर्वक्षमा ठरावातील (ॲम्‍नेस्टी इंटरनॅशनल) मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याच्या आरोपाचे सावट असतानाही, १९९१ च्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीय सार्वमताने नव्या संविधानाचा मसुदा प्रचंड बहुमताने मंजूर झाला. या संविधानानुसार पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष ही दोन्ही स्वतंत्र पदे असून राष्ट्राध्यक्षांची निवडणूक दर सात वर्षांनी होते. राष्ट्राध्यक्ष पूर्णपणे अबाधित असून राष्ट्राध्यक्षाचा कालावधी बेमुदत वाढविता येतो. विरोधकांना संविधानातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्याबद्दलची कलमे अमान्य होती. जानेवारी १९९२ मध्ये सार्वत्रिक माफीची पुन्हा घोषणा झाली. त्याच महिन्यात फक्त पी. डी. जी. ई. चे सदस्य असणाऱ्या अंतरिम सरकारची नेमणूक झाली. संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे संविधानावर टीका केली गेली. १९९२ या संपूर्ण वर्षात विरोधी पक्षीयांची गळचेपी होत असता नोव्हेंबर १९९२ मध्ये सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन नव्या फळीची उभारणी केली.

मालाबो येथे सर्वोच्च न्यायालय असून क्षेत्रीय उच्च न्यायालये आणि तात्काळ निर्णय देणारी न्यायालये मालाबो व बाटा येथे आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे सहा प्रांतांत १९८० मध्ये विभाजन झाले. १९८१ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक झाली. परंतु लष्करी हुकूमशाहीमुळे त्यांना स्वायत्तता लाभली नाही.

आर्थिक स्थिती : विषुववृत्तीय गिनीची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी व्यवसायावर (वनोद्योग व मासेमारीसह) अवलंबून आहे. देशातील सु. ८५ टक्के कामकरी लोक या व्यवसायांत गुंतलेले आहेत. देशातील ८० ते ९० टक्के जमीन लागवडयोग्य आहे. उदरनिर्वाहक व मळ्याची अशी दोन प्रकारची शेती केली जाते. केळी, कसाबा, रताळी, कोको, कॉफी ही प्रमुख कृषी उत्पादने आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात स्पेनच्या आर्थिक सहकार्याने कॉफी आणि कोको यांचे उत्पादन काढून शेतकरी ते स्पेनकडे निर्यात करीत. येथील कोको उत्तम प्रतीचा असून बीओकोची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे. येथे या पिकासाठी योग्य जमीन व हवामान आढळते. ९०% कोको उत्पादन बीओको बेटावर मिळते. स्वातंत्र्योत्तर हुकूमशाही राजवटीच्या काळात अनेक मळेवाले व नायजेरियन कामगार देश सोडून गेल्यामुळे कोको व कॉफी यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. १९९३ मधील देशातील प्रमुख कृषी उत्पादनांचा अंदाज पुढीलप्रमाणे होता (उत्पादन हजार मे. टनांत): रताळी ३५, कसावा ४७, नारळ ८, पामगर ३, केळी १७, कोको बिया ७, हिरवी कॉफी ७. येथील वनोद्योग व मासेमारी व्यवसायही महत्त्वाचे आहेत. ओकमे हा येथील सर्वांत महत्त्वाचा वृक्ष असून त्याच्या लाकडाचा उपयोग प्लायवुड तयार करण्यासाठी होतो. देशातील एकूण लाकूड उत्पादनाचा १९९२ चा अंदाज ६,१३,००० घ.मी.एवढा आहे.  बेटांसभोवतालच्या समुद्रात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अन्नाबॉन बेटावरील लोकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने मासेमारीवर अवलंबून आहे. बीओको बेटावरही मासेमारी व्यवसाय चालतो आणि देशातील प्रमुख मासेमारी केंद्रे तेथे आहेत. पर्च, ट्यूना, मॅकरेल, कॉड, पायीक, शार्क आणि क्रेफिश ह्या येथील माशांच्या प्रमुख जाती आहेत. १९९३ मध्ये ३,६०० मे. टन मासे पकडण्यात आले. देशातील पाळीव जनावरांचा-विशेषतः पशुपालन-उद्योग रक्त शोषणारे (निद्रारोगकारक) जंतू आणि इतर उष्णकटिबंधीय प्रतिबंध यांमुळे मर्यादित झाला आहे. देशात ५,००० गुरे, ३६,००० मेंढ्या, ८,००० शेळ्या, १०,००० डुकरे (१९९३ अंदाज) आणि ८६,००० कोंबड्या (१९८०) होत्या.  

देशात फार मोठे उद्योगधंदे वा कारखाने नाहीत. काही अन्नप्रक्रिया कारखाने आढळतात. उद्योगधंद्यांत देशातील सु. ४.८ टक्के लोक गुंतलेले होते (१९८३). कोको-कॉफीवरील प्रक्रिया हा प्रमुख उद्योग असून ही प्रक्रिया मळ्यांतूनच केली जाते. रीओमूनी प्रदेशात झालेल्या भूशास्त्रीय सर्वेक्षणात युरेनियम, लोह खनिज, सोने, खनिज तेल व अन्य काही खनिजे मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.मात्र अद्यापही खनिजांचे विशेष उत्पादन घेतले जात नाही. खनिज तेल उत्पादनाला अग्रक्रम दिला गेला असून १९९२ पासून खनिज तेल व नैसर्गिक वायू यांच्या निर्मितीस सुरूवात झाली आहे. १९९१ मध्ये १८ द. ल. कि. वॉ. तास विद्युत् निर्मिती करण्यात आली. कोको, कॉफी, लाकूड ह्या निर्यातीच्या वस्तू असून अन्नधान्य, उपभोग्य वस्तू, खनिज तेलउत्पादने , लोह व लोह उत्पादने, यंत्रे, वाहतूकसाधने ह्या आयातीच्या प्रमुख वस्तू आहेत. देशाचा व्यापार प्रामुख्याने स्पेन, फ्रान्स व कॅमेरून यांच्याशी चालतो. देशाचा व्यापार प्रतिकूल संतुलनाचा असून १९९१ मधील तूट २३.८१ द.ल. अमेरिकी डॉलर एवढी होती. हा देश फ्रेंच फ्रँक चलनाशी निगडित अशा फ्रँक झोन (फ्रँक विभाग) आणि सीईईएसी (इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट्‌स) या संघटनेशी निगडित आहे.

देशात २,७६० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ३३० किमी. पक्के रस्ते आहेत. बीओको बेटावर १६० किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. बाटा, लूबा, मालाबो व एम्‌विनी ही प्रमुख बंदरे आहेत. त्यांपैकी मालाबो हे देशातील एकमेव नैसर्गिक बंदर बीओको बेटाच्या उत्तर भागात आहे. मालाबो व बाटा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहेत. देशातील दोन रेडिओ केंद्रे शासनाच्या अखत्यारीत आहेत. त्यांवरून फ्रेंच व स्पॅनिश भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. १९९२ मध्ये देशात १,५५,००० रेडिओ संच व ४,००० दूरचित्रवाणी संच होते. याच वर्षी देशातून एक दैनिक वृत्तपत्र, एक शासकीय राजपत्र व दोन नियतकालिके प्रकाशित होत होती. देशात दशमान पद्धती प्रचारात आहे. फ्रँक सीएफ्‌ए हे देशाचे चलन रूढ असून १, २, ५, १०, २५, ५०, १०० व  ५०० फ्रँक सीएफ्‌एची नाणी व १००, ५००, १,०००, ५,००० व १०,००० फ्रँक सीएफ्एच्या नोटा प्रचारात आहेत. देशाचा राष्ट्रध्वज हिरवा, पांढरा आणि तांबडा असा तिरंगी पट्‌ट्यांचा असून ध्वजदंडाला लागून निळा त्रिकोण असतो. मधल्या पांढऱ्या पट्‌ट्यात मधोमध कापसाचे झाड आणि सहा तारका आहेत. झाड हे राष्ट्रचिन्ह व सहा तारका सहा प्रांत दर्शवितात.

लोक व समाजजीवन : देशातील सु. ८० टक्के लोकसंख्या रीओमूनी प्रदेशात आणि उर्वरितपैकी बहुतांश बीओको बेटावर आहे. रीओमूनीवरील बहुतांश लोक (९०%) विविध बांतू भाषा बोलणारे फँग जमातीचे आहेत. फँग लोकांचे कॅमेरून आणि गाबाँमधील लोकांशी साधर्म्य आढळते. बीओकोवरही त्यांची संख्या वाढत आहे. फँग हे रीओमूनी प्रदेशात पूर्वेकडून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत आले. रीओमूनीत असलेल्या एतद्देशीयांना त्यांनी किनारपट्टीकडे हाकलले. १९६० मध्ये विषुववृत्तीय गिनीत सु. ७,००० यूरोपीय लोक (विशेषतः स्पॅनिश व्यापारी, नागरी सेवक व धर्मप्रसारक) होते. १९६० च्या दशकात या लोकांचा येथील प्रमुख आर्थिक व्यवहारांवर प्रभाव होता. १९६० नंतर यांपैकी काही लोक अंतर्गत प्रशासकीय केंद्रे व किनारपट्टीवरील गावे यांकडे स्थलांतर करू लागले. तसेच बीओको बेटावरील परदेशी मजूर निघून गेले. रीओमूनीवरील किनारपट्टीतच्या भागा फुकू व बिआ लोक राहतात. बीओको बेटावरील मूळ रहिवासी बुबी जमातीचे असून ते बांतू जमातीमधील प्रमुख भूमीतील आप्रवासी असावेत. यांशिवाय बांतू भाषा बोलणाऱ्या आणखी काही जमाती रीओमूनीच्या किनारपट्टीत आणि बीओको बेटावर आढळतात. ब्रिटिशांनी एकोणिसाव्या शतकात गुलामगिरीतून मुक्त केलेल्या काही कृष्णवर्णीय गुलामांचे वारस बीओको बेटावर अधिक आढळतात. अन्नाबॉनवरील निवासी मुख्यत्वे पोर्तुगीजांनी आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत. १९७० नंतर काही फँग लोकांचे बीओकोकडे सक्तीने स्थलांतर घडवून आणले. दरम्यानच्या काळात यूरोपीय व्यापारी व अंतर्गत भागातील फँग यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावणाऱ्या कोम, बजेबास व बेंगा या किनारपट्टीतील जमातींचे महत्त्व कमी झाले. १९९४ मध्ये देशात ३,००,००० रोमन कॅथलिक आणि ८,००० प्रॉटेस्टंट पंथीय होते. 

देशात बहुतांश लोक बांतू भाषा बोलणारे असले, तरी स्पॅनिश ही विषुववृत्तीय गिनीची अधिकृत भाषा आहे. शासकीय व्यवहार, व्यापार व शाळांमध्ये तिचा वापर केला जातो. बीओको बेटावर पिजन इंग्‍लिश आणि अन्नाबॉनवर पोर्तुगीज-बांतू या संमिश्र बोलीभाषा सर्रास बोलल्या जातात. फँग भाषाही बरीच प्रचलित आहे. प्रत्येक जमात आपापली बोलीभाषा बोलते. जवळजवळ चार पंचमांश लोक रोमन कॅथलिक असूनसुद्धा देशातील जमाती आपले पारंपरिक संस्कार पाळतात. बुवींमध्ये त्यांचा परंपरागत जडप्राणवाद आचरणात आहे. मुसलमान अल्प असून ते प्रामुख्याने हौसा जमातीतील व्यापारी आहेत. बहुतांश लोकसंख्या (६५%) ग्रामीण असून बीओको बेटावरील लोकसंख्या मालाबो शहरात एकवटल्याने तेथे नागरी वस्ती अधिक आहे.

पश्चिम आफ्रिकेतील इतर देशांच्या तुलनेत विषुववृत्तीय गिनीची लोकसंख्यावाढ संथ आहे. देशात जननप्रमाण कमी असून मृत्यूप्रमाण अधिक आहे. राजकीयदृष्ट्या जागृत लोकांत ८० ते ९० टक्के लोक फँग आहेत. १९७०-८० दरम्यान राजकीय छळाला कंटाळून अनेकांनी, विशेषतः नायजेरियातून आलेल्या मळे शेतीतील कामगारांनी, हा भूप्रदेश सोडला. राजकीय छळामुळे सु. एक तृतीयांश लोक हद्दपारीत राहतात. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स १२.५ लोक इतकी आहे.

शिक्षणाच्या बाबतीत हा देश अतिशय मागासलेला असून स्पेनने आपल्या या वसाहतीत शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने काहीच विशेष प्रयत्‍न केले नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळात सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे केले असूनसुद्धा सु. पन्नास टक्केच मुले शाळेत जातात. कारण शिक्षकांचा फार मोठा तुटवडा येथे आहे. मालाबो व बाटा येथेच फक्त उच्च शालेय शिक्षणाची सोय आहे. सर्व सुविधा व विद्याशाखा असलेले विद्यापीठ अद्याप देशात नाही. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे लागते. निरक्षरता मोठ्या प्रमाणात असून स्पॅनिश सहकार्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. १९८७-८८ मध्ये देशातील प्राथमिक शाळांत ६३,८५० विद्यार्थी व १,१८० शिक्षक माध्यमिक शाळांत ९,२०४ विद्यार्थी व ३०१ शिक्षक होते. १९९३ मध्ये येथे दोन शिक्षक प्रशिक्षण विद्यालये, दोन उच्च माध्यमिक व्यवसायशाळा व एक कृषि संस्था होती. अपुऱ्या आरोग्य सुविधा हा देशातील महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे. देशात अगदी मोजके डॉक्टर आहेत. मलेरिया, गोवर व इतर रोगांचा फैलाव बराच आढळतो. १९८९ मध्ये येथे ८२९ आरोग्य खात्यातील कर्मचारी व १०० डॉक्टर होते. राष्ट्राध्यक्ष मेशिअस एन्‌ग्यूमा याची १९७९ मध्ये सत्ता संपुष्टात येण्यापूर्वी काही परदेशी पर्यटकांनी विषुववृत्तीय गिनीला भेट दिली होती. मात्र देशातील पर्यटन व्यवसाय अविकसित राहिला आहे. मालाबो, बाटा ही देशातील प्रमुख शहरे आहेत.

चौधरी, वसंत देशपांडे, सु.र. पंडित, अविनाश


विषुववृत्तीय गिनी

स्वातंत्र्यपूर्व काळातील स्पॅनिश गव्हर्नरचे निवासस्थान, मालाबो.

लाकूड - उद्योग : देशाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार, रीओ मूनी.