बृहदीश्वर मंदिर, तंजावर.

तंजावर : तमिळनाडू राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,४०,५४७ (१९७१). हे दक्षिण रेल्वेच्या मद्रास-तिरुचिरापल्ली या फाट्यावरील प्रस्थानक आणि रस्त्यांचे केंद्र असून मद्रासच्या नैर्ऋत्येस ३५१ किमी. तुतिकोरिनपासून ३६१ किमी. आणि कुंभकोणम्‌पासून ३९ किमी. वर कावेरी नदीकाठी वसले आहे. अकराव्या शतकात हे चोल साम्राज्याचे आणि नंतर नायक, तंजावरचे भोसले इत्यादींच्या राजधानीचे ठिकाण होते. सध्या हे एक सांस्कृतिक केंद्र व प्रेक्षणीय स्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. येथे सु. ७४ मंदिरे असून त्यांपैकी बृहदीश्वराचे मंदिर प्रेक्षणीय आहे. प्रसिद्ध नटराजाची मूर्ती याच मंदिरात आहे. या

राजे सरफोजींचे चित्र, सरस्वती महाल, तंजावर.

मंदिरावर एक शिलालेख नंतर खोदलेला असून तो ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. यांशिवाय शिवगंगा तलाव, विजयानगर किल्ला, सरफोजीचा राजवाडा व ‘सरस्वती महाल’ ग्रंथालय ही ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. ग्रंथालयात विविध विषयांवरील, विविध भाषांतील सु. ३०,००० ग्रंथ आहेत. हे नाट्य-नृत्य-संगीत इ. कलांचेही मोठे केंद्र आहे.

येथील रेशमी व सुती पारंपरिक हातमाग कापड, सोन्या–चांदीवरील नक्षीकाम, धातुकाम, गालिचे इ. भारतभर प्रसिद्ध असून येथे साबण, सुगंधी द्रव्ये व वाद्ये (वीणा वगैरे) तयार करणे, भात सडणे इ. विविध व्यवसायही चालतात.

सावंत, प्र. रा.