सीदी-बेल-आबेस : अल्जीरियाच्या ओरान विभागातील प्रमुख शहर. लोकसंख्या ६,०३,३६९ (२००८). हे ओरानच्या दक्षिणेस ६५ किमी.वर मेकेरा नदीकाठी महत्त्वपूर्ण अशा कृषिक्षेत्रात वसलेले आहे. सीदी-बेल-आबेस नावाच्या फकीराचे येथे थडगे आहे. यावरूनच शहरास हे नाव पडले असावे. १८४३ मध्ये फ्रेंच लष्कराच्या येथील ठाण्याचे पुढे शहरात रूपांतर झाले. परकीय सैन्याचे हे प्रमुख ठिकाण होते. या ठिकाणी सैनिकी संग्रहालय होते. अल्जीरियाच्या स्वातंत्र्यानंतर येथील सैनिकी संग्रहालय ओबानी या ठिकाणी हलविण्यात आले. शहरातील जुन्या भिंती व बुरुजांचे अवशेष नष्ट करून येथील रस्ते रुंद करण्यात आलेले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली आहेत. येथे शेतकामाची औजारे, सिमेंट, तयार कपडे, फर्निचर इत्यादींचे उद्योगधंदे असून येथे पशुधनाची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होते. याचा परिसर पूर्वी पाणथळ होता परंतु आता तेथे गहू, बार्ली ही पिके व द्राक्षाच्या बागांचीही लागवड झालेली आहे.

 

राऊत, अमोल