चॅड सरोवर : आफ्रिकेतील चॅड, कॅमेरून, नायजेरिया व नायजर या देशांच्या सीमांवरील सरोवर. पूर्वीच्या एका मोठ्या जलाशयाचा अवशेष असलेले हे सरोवर १२ ५०’ उ. ते १४ १०’ उ. व १३ ते १५ पू. यांदरम्यान असून त्याचा विस्तार पर्जन्यमानाप्रमाणे १०,००० ते २६,००० चौ. किमी. पर्यंत बदलता असतो. हे २८१ मी. उंचीवर, सहारा प्रकारचा प्रदेश व सॅव्हाना प्रकारचा प्रदेश यांदरम्यान असून याच्या ईशान्येस ३० मी. पर्यंत उंचीच्या वाळूच्या टेकड्या आहेत. याला शारी व कोमाडूगू योबे या प्रमुख नद्या व इतर अधूनमधून वाहणारे प्रवाह मिळतात. पुराच्या वेळी याचे काही पाणी शारीची उपनदी लोगोनच्या तसेच बोरो, फयांगा व टिकेम सरोवरांच्या मार्गाने बेन्वे नदीत जाते व काठावर दलदली माजतात. याच्या पूर्व भागात अनेक सखल बेटे आहेत. उत्तर भाग ४ ते ७ मी. व दक्षिण भाग ३ ते ५ मी. खोल आहे. दक्षिण भागात सरासरी ६४ सेंमी. व उत्तर भागात १२ सेंमी. पाऊस पडतो. या सरोवराचे पाणी सतत बाहेर वाहून नेणारी नदी नसली, तरी याचे पाणी बऱ्याच भागात गोडे व काही भागात काहीसे खारे किंवा मचूळ असते. बाष्पीभवन, वाऱ्यांबरोबर उत्तरेकडून येणारी वाळू, दक्षिणेकडून शारीच्या त्रिभुज प्रदेशाची वाढ इत्यांदीमुळे सरोवराचे आंकुचन होत आहे. सरोवरात मासळी भरपूर आहे. काठावर व बेटांवर बुदुमा, कुरी, कानेंबू इ. जमातींचे लोक राहतात. किनाऱ्यावर गुरे व शेळ्यामेंढ्या चरतात आणि दक्षिणेकडील प्रदेशात मका, कापूस व गहू पिकतात. सरोवरापासून मासे, मीठ, पोटॅश यांचे उत्पन्न मिळते. वॉल्टर ऑडने, ह्यू क्लॅपरटन व डिक्सन डेनम यांनी १८२३ मध्ये या सरोवराचा प्रथम शोध लावला.

लिमये, दि. ह.