बार्किसिमेटो : व्हेनेझुएलातील लारा राज्याची राजधानी व देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ३,३०.८१५ (१९७१). बार्किसिमेटो हे वायव्य व्हेनेझुएलात बार्किसिमेटो नदीच्या शीर्षप्रवाहावर वसले आहे. देशातील जुन्या शहरांपैकी हे एक असून याची स्थापना ह् वान दे व्हील्येगास या स्पॅनिश गव्हर्नरने १५५२ मध्ये केली. १८१२ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने शहराचा बराच भाग उद्ध्वस्त झाला होता. पॅन-अमेरिकन महामार्गावर, तसेच पश्चिम व मध्य व्हेनेझुएला यांमधील व्यापारी व वाहतुकीच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी वसलेले असल्याने याचा विकास झाला. आसमंतातील सुपीक प्रदेशातून ऊस, तंबाखू, कॉफी, कोको यांचे उत्पादन होते. पशुधन व लघुउद्योग भरपूर आहेत. शहरात सिमेंट, खाद्य पदार्थ, कापड, वाखापासून व चामड्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे इत्यादींचे कारखाने आहेत.

 चौधरी, वसंत