मॉरिटेनिया: मॉरिटेनिया इस्लामी प्रजासत्ताक. पश्चिम आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ १०,३०,७०० चौ.किमी. लोकसंख्या १८,३४,५०० (१९८४ अंदाज). दक्षिणोत्तर लांबी सु. १,५०० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी १,०९४ किमी. अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १४° ४२ ते २७ उत्तर आणि ४° ३० ते १७° पश्चिम यांदरम्यान असून मॉरिटेनियाच्या ईशान्येस अल्जीरिया, पूर्वेस आणि दक्षिणेस माली, नैर्ऋत्येस सेनेगल, वायव्येस व उत्तरेस मोरोक्को (सहारा प्रांत) हे देश आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे. देशाच्या सरहद्दीची एकूण लांबी ५,७४० किमी. आहे. न्याकशॉट (लोकसंख्या ३,५०,०००–१९८२ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन: देशाच्या उत्तर भागातून कर्कवृत्त जात असून देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश क्षेत्र कर्कवृत्ताच्या दक्षिणेस आहे. भौगोलिकि दृष्ट्या मॉरिटेनियाचा भूप्रदेश हा सहारा प्रदेशाचाच पश्चिमेकडील भाग असून तो मैदाने व पठारांनी व्यापलेला आहे. भूरचनेनुसार देशाचे तीन विभाग पाडता येतात. दक्षिण भागात सेनेगल नदीखोऱ्याचा अरुंद प्रदेश असून याच्या उत्तरेकडे पठारी व मैदानी प्रदेश आहेत.

नदीखोऱ्याच्या उत्तर भागातील आद्रार, मध्य भागातील टागांट, धार टीशीट, धार वालाटा व दक्षिण भागातील आसाब व आफ्फोल्ले हे प्रमुख पठारी प्रदेश असून यांच्या उत्तरेस वालुकामय मैदानी प्रदेश आहेत. किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशांची सस. पासूनची उंची ४५ मी. पेक्षा कमी असून अंतर्गत भागातील मैदानी प्रदेशांची उंची १८३ ते २२८ मी. पर्यंत आढळते. अंतर्गत व मैदानी प्रदेशांत तुटलेले कडे व द्वीपगिरी आढळतात. वायव्य भागातील केडिएट इजिल हे देशातील सर्वोच्च शिखर (९१५ मी.) आहे. देशात सर्वत्र वाळूच्या टेकड्या विखुरलेल्या असून त्यांनी देशाचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. दक्षिणेकडील केवळ सेनेगल नदीखोऱ्यातच सुपीक मृदा आढळते. वालुकामय प्रदेशात लिथोसॉल गणातील मृदेचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या सरोवरांच्या जागी बनलेल्या मृदेत क्षारांचे प्रमाण अधिक आहे. २५·४ सेंमी. समवृष्टिरेषेच्या दक्षिण भागात वाळूमिश्रित तपकिरी मृदा, अगदी दक्षिण भागात उष्ण कटिबंधीय लोहयुक्त मृदा, तर सेनेगल नदीच्या खोऱ्यात गाळाची मृदा आढळते. 

मॉरिटेनिया-सेनेगल देशांदरम्यान म्हणजेच देशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पश्चिमेस वाहत जाणारी सेनेगल हीच येथील एकमेव महत्त्वाची नदी असून दक्षिण भागात तिच्या अनेक छोट्याछोट्या उपनद्या आहेत. त्याही बहुधा कोरड्याच असतात. अंतर्गत पठारी प्रदेशांवरून अनेक कोरड्या नद्यांची पात्रे दिसून येतात. त्यांतून क्वचितच पाणी वाहताना दिसते. उत्तर व पूर्व भागांतील अतिशय कोरड्या भागांत नद्यांची पात्रेही पहावयास मिळत नाहीत.

हवामान: देशाचा दक्षिणेकडील काही भाग वगळता सर्वत्र हवामान उष्ण व कोरडे आहे. देशाचे हवामान सामान्यपणे वाळवंटी स्वरूपाचे असले, तरी त्यात हवामानाचे तीन विभाग पाडता येतात. दक्षिण मॉरिटेनियाचे हवामान साहेलियन प्रकारचे असून तेथे जुलै ते ऑक्टोबर पावसाळा असतो. मात्र वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७० सेंमी. पेक्षा कमीच असते. अगदी दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६ सेंमी., तर न्वाकशॉट येथे ते १४ सेंमी. आहे. सेनेगल नदीखोऱ्यातील तापमान २४° से. ते ३५° से. असते. किनारी प्रदेश वालुकामय असला, तरी महासागरी व्यापारी वाऱ्यांमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात ३० किमी. पर्यंत तापमान बेताचे राखले जाते. उत्तर मॉरिटेनियाचे हवामान सहारा प्रकारचे असून यात देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतीयांश क्षेत्र मोडते. वर्षातील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ या भागातील दिवसाचे तापमान ३८° से. पेक्षा अधिक असते. रात्रीचे तापमान मात्र त्यामानाने बरेच कमी असते. या भागात हिवाळ्यातील तापमान ०° ते ३८° से., तर उन्हाळ्यातील तापमान १६° ते ५४° से. असते. आटार येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १० सेंमी. आहे. उन्हाळ्यात नैर्ऋत्येकडून वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांपासून देशाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागात वृष्टी होत असते. दक्षिणेकडून उत्तरेकडे वार्षिक पर्जन्यमान व पर्जन्याचा ळाक कमीकमी होत जातो. ध्रुवीय प्रदेशातील हवामान विक्षोभामुळे देशात काही ठिकाणी हिवाळ्यात पर्जन्यवृष्टी होते. एकमेकांविरुद्ध दिशेने वाहत येणाऱ्या आर्द्र नैर्ऋत्य आणि हरमॅटन वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या वादळी स्वरूपाच्या हवामानामुळे किंवा चंडवातामुळे कधीकधी पर्जन्यवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी: दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाणाऱ्या रुक्षतेच्या प्रमाणानुसार वनस्पती प्रकारांमध्येही फरक पडत जातो. उत्तरेकडील सहारा वाळवंटी प्रदेशात काटेरी वनस्पती आढळतात. तेथील मरूद्यानांत मात्र तुलनेने वनस्पतींचे प्रमाण अधिक असून त्यात प्रामुख्याने खजुराची झाडे अधिक आढळतात. दक्षिण भागात सॅव्हाना प्रकारच्या वनस्पती व गवत आढळते. यात गोरखचिंचेबरोबरच ताड आणि काटेरी वनस्पतीही असतात, तर अगदी दक्षिण भागात सेनेगल नदी खोऱ्यात वाळुंज, बोर व बाभळीसारख्या वनस्पती आढळतात.

देशाच्या दक्षिण भागातील सॅव्हाना प्रकारच्या प्रदेशात सिंह, बिबळ्या, हत्ती, कोल्हा, चित्ता, तरस, मगर, सुसर, ऊद मांजर, माकड, पाणघोडा, तर उत्तर भागात हरिण, रानमेंढ्या इ. प्राणी तसेच शहामृगासारखे मोठे पक्षी व बदके दिसून येतात. 


इतिहास व राजकीय स्थिती: सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी सहाराचा हा प्रदेश हिरवागार असून त्यांत अनेक प्राणीही होते. परंतु येथील ओलसरपणा जसजसा कमी होत गेला, तसतसे येथील रहिवासी दक्षिणेकडे जाऊ लागले. इ. स. तिसऱ्या व चौथ्या शतकांत उंट पाळणाऱ्या बर्बर लोकांमुळे ह्या स्थलांतराला अधिक वेग आला. उत्तरेकडून दक्षिणेकडे सेनेगल नदीखोऱ्याकडे हे बर्बर लोक जसजसे अतिक्रमण करू लागले, तसतसे त्यांच्या मार्गातील कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकही दक्षिणेकडे सरकू लागले. इ. स. नवव्या शतकात बर्बर व त्यांच्या गटातील इतर टोळ्यांनी या भागात एका संघाची स्थापना केली. त्यांनी प्रामुख्याने दक्षिणेकडील सोने, हस्तिदंत, गुलाम यांच्या मोबदल्यात मीठ व इतर वस्तू देण्याचा व्यापार सुरू केला व तो पुढे भरभराटीस आला. मॉरिटेनियन बर्बरांच्या ॲल्मॉरव्हिड्झ गटाने अकराव्या शतकात घाना ह्या एका मोठ्या साम्राज्याचा नाश केला व ते उत्तर आफ्रिकेत सत्ता स्थापनेसाठी वळले. बाराव्या शतकात ॲल्मॉरव्हिड्झ साम्राज्याचा नाश करून माली साम्राज्याने घानावर व आग्नेय मॉरिटेनियापर्यंत आपले साम्राज्य वाढवून तेथे आपला व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू केला. चौदाव्या व पंधराव्या शतकांत येमेनी बेदूइन उत्तर आफ्रिकेतून मॉरिटेनियाकडे आले व सतराव्या शतकात त्यांनी बर्बरांवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित केले. तेव्हापासून मॉरिटेनियात अरब व बर्बर यांचे मिश्रण आढळते.

पंधराव्या शतकात सोने, गुलाम यांचा व्यापार व मासेमारी यांच्या निमित्ताने या भगात आलेले पोर्तुगीज हे पहिले यूरोपीय होत. त्यांनी अरेबिक डिंकाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर येथून सुरू केला. त्यानंतर या प्रदेशावरील अधिकाराबाबत पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्रज व्यापाऱ्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाल्या. १८१५ मध्ये सेनेगलने या प्रदेशाचा दक्षिण भाग फ्रान्सला वसाहतीस दिल्याने हा स्पर्धेचा प्रश्न मिटला. एकोणिसाव्या शतकात फ्रेंचांनी अंतर्गत प्रदेशाचे समन्वेषण करून मूर प्रमुखांशी काही लेखी करार केले. फ्रेंचांची येथील प्रदेशावर सत्ता वाढविण्याबाबत झेव्हिअर कोप्पोलानी या फ्रेंच व्यक्तीने महत्त्वाची कामगिरी बजावली. १९०५ मध्ये तो मारला गेला तथापि त्याचे सत्ताविस्ताराचे काम जनरल आंरी गूरो याने पूर्ण केले. १९२० मध्ये मॉरिटेनिया ही फ्रेंच वसाहत म्हणून स्थापन करण्यात आली, परंतु तिची राजधानी सेनेगलमधील सेंट लूइस येथे राहिली. अशा प्रकारे मॉरिटेनिया हा ‘फ्रेंच वेस्ट आफ्रिका महासंघा’च्या आठ प्रदेशांपैकी एक बनला.

अंतर्गत व्यवहारांबाबत काही अधिकार असलेल्या मॉरिटेनियन प्रादेशिक सभेची स्थापना १९४६ मध्ये झाली. त्यानंतच्या बारा वर्षांच्या काळात स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना अधिकाधिक राजकीय अधिकार देण्यात आले. २८ सप्टेंबर १९५८ मध्ये घेण्यात आलेल्या सार्वमतानुसार मॉरिटेनिया हा ‘फ्रेंच कम्यूनिटी’ चा स्वयंशासित सदस्य बनला. नोव्हेंबर १९५८ मध्ये ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ मॉरिटेनिया’ या नावाने तो घोषित करण्यात आला, तर २८ नोव्हेंबर १९६० रोजी मॉरिटेनियाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले.

स्वातंत्र्योत्तर काळात देशाला बरेच स्थिर शासन मिळाले. परराष्ट्रीय व्यवहारांबाबतचे शासनाचे धोरण अरब राष्ट्रांच्या बाजूचे आहे. १९७३ मध्ये मॉरिटेनिया अरब लीगला मिळाला व त्याच वर्षी फ्रँक विभागातून बाहेर पडला. परंतु यूरोप (विशेषतः फ्रान्स) व अमेरिकेशी त्याने घनिष्ठ संबंध ठेवले आहेत. तीव्र अवर्षणकाळात, विशेषतः १९६८–७४ मध्ये अमेरिका, स्पेन, फ्रान्स, अरब राष्ट्रे व यूरोपीय आर्थिक समुदायाने (ईईसी) विशेष भरीव स्वरूपाची मदत केली. 

मॉरिटेनियाच्या वायव्येस असलेल्या ‘वेस्टर्न सहारा’ (पूर्वीचा स्पॅनिश सहारा) प्रदेशावर सुरुवातील फ्रेंचांची सत्ता होती. तथापि १४ नोव्हेंबर १९७५ रोजी स्पेन, मोरोक्को यांच्यात एक करार झाला. त्यानुसार स्पॅनिश सहारावरील आपला ताबा सोडून तो मॉरिटेनिया व मोरोक्को यांच्या प्रशासनाखाली २८ फेब्रुवारी १९७६पासून सूपूर्त करण्यास स्पेन तयार झाला. त्यानंतर १४ एप्रिल १९७६ रोजी मोरोक्को व मॉरिटेनिया यांच्यात सरहद्दीची मर्यादा ठरविण्याबाबत करार झाला. त्यानुसार मोरोक्कोला यातील दोन तृतीयांशापेक्षा अधिक प्रदेश मिळाला. वेस्टर्न सहारा प्रदेशाच्या या सामीलीकरणाला ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ साग्‌या एलआमा ॲन्ड रिओ दे ओरो’(पॉलिसारिओ) या संघटनेने तीव्र विरोध करून ‘सहारन अरब डेमॉक्रॅटिक रिपब्लिक’ म्हणून ह्या प्रदेशाची घोषणा केली. पॉलिसारिओ फौजांना अल्जीरियाने पाठिंबा दिला व वेस्टर्न सहारातच युद्धाला सुरुवात झाली. मॉरिटेनियातील लोहमार्ग, तेथील लोह खनिजांच्या खाणी, किनाऱ्यावरील वस्ती, न्वाकशॉट इ. ठिकाणानंतर गनिमी काव्याने जोरदार हल्ले करण्यात आले. तेव्हा स्वसंरक्षणासाठी मॉरिटेनियाला फ्रेंच व मोरोक्कोच्या सैन्यांना मदतीसाठी बोलवावे लागले. युद्धामुळे मॉरिटेनियन शासन आर्थिक व राजकीय दृष्ट्या जास्त कमकुवत बनले. १९६१ पासून मॉरिटेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले मोक्तार औल्ड डडाह यांना जुलै १९७८ मध्ये लष्करी कारवाई करून सत्तेवरून काढून टाकण्यात आले.

५ ऑगस्ट १९७९ रोजी न्वादिब्यूजवळील ग्वेरा हा लष्करी तळाचा भाग वगळता बाकीचा प्रदेश मॉरिटेनियाने सोडून दिला व तो प्रदेश मोरोक्कोने आपल्या ताब्यात घेऊन तो आपल्या देशाला जोडला. 


मॉरिटेनियाचा अलीकडचा राजकीय इतिहास म्हणजे अगणित अवचित सत्तांतरांचा इतिहास होय. २० मे १९६१ रोजी तयार झालेल्या देशाच्या संविधानानुसार मॉरिटेनिया हे इस्लामी प्रजासत्ताक म्हणून जाहीर करण्यात आले. त्यानुसार सर्व सत्ता राष्ट्राध्याक्षाच्या ताब्यात देण्यात आली होती. तो देशातील अधिकृत राजकीय संघटनेचा प्रमुखही असे. परंतु १९७८ मध्ये सर्व सत्ता लष्कराच्या ताब्यात गेली. नवीन लष्करी प्रशासनाने ‘मॉरिटेनियन पीपल्स पार्टी’ (पीपीएम्) हा पक्ष तसेच देशाची संसद रद्द केली व सर्व सत्ता ‘मिलिटरी कमिटी फॉर नॅशनल रिकव्हरी’ (सीएम्आर्‌एन्) च्या ताब्यात राहिली. कर्नल मुस्ताफा ओउल्ड सॅलेक या सीएम्आर्‌एन्‌च्या प्रमुखाने अध्यक्षीय पद आपल्याकडे घेतले (२० मार्च १९७९). ६ एप्रिल १९७९ मध्ये सीएम्आर्‌एन्‌चे रूपांतर ‘मिलिटरी कमिटी फॉर नॅशनल सॅल्व्हेशन’ (सीएम्आर्‌एन्) मध्ये करण्यात आले. ३ जून रोजी सॅलेकच्या जागी अहमद लाउली राष्ट्राध्यक्ष झाला. ४ जानेवारी १९८० मध्ये ले. कर्नल मोहमद खाऊना हैदाला याने लाउलीस बाजूला सारले आणि अध्यक्ष व पंतप्रधान ही पदे स्वतःकडेच ठेवली. १९८४ च्या अखेरीस हैदाला बुरूंडी येथे फ्रेंच आफ्रिकी शिखरपरिषदेस उपस्थित राहिला असता, मॉरिटेनियात रक्तहीन अवचित सत्तांतर घडून आले व त्यात हैदालास पदच्युत करण्यात आले. कर्नल तायाने राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान व संरक्षणमंत्री असी तिन्ही पदे स्वतःकडे ठेवली व सतराजणांची नवीन मंत्रिपरिषद बनविली. तायाने पॉलिसॉरिओला आपला पाठिंबा जाहीर केला आणि ‘मॅघरेब बंधुभाव व सहकार्य करारा’चे (अल्जीरिया व ट्युनिशिया या दोन देशांबरोबर करण्यात आलेला) पालन करण्यात येईल असे घोषित केले. राजकीय बंदी व हद्दपार यांना सर्वक्षमा जाहीर करण्यात येऊन १३२ कैद्यांना नंतर मुक्त करण्यात आले-त्यांमध्ये माजी राष्ट्राध्यक्ष सॅलेक व माजी पंतप्रधान अहमद ओउल्द ब्नेइजारा यांचाही समावेश होता. मिलिटरी कमिटी फॉर नॅशनल सॅल्व्हेशन (सीएम्आर्‌एन्) या समितीचे नेतृत्व प्रजासत्ताकाच्या अध्यक्षाकडे असून तिचे २४ सदस्य होते (फेब्रु. १९८५). नियुक्त मंत्रपरिषद राष्ट्राध्यक्षाला साहाय्य करते. प्रशासनाच्या सोयीसाठी मॉरिटेनियाचे बारा विभाग करण्यात आले असून प्रत्येकावर एका राज्यपालाची नियुक्ती केलेली असते.

न्याय व संरक्षण: विधिसंहिता १९६१ मध्ये बनविण्यात आली असून आधुनिक मुसलमानी विधी व सांप्रतच्या इस्लामी संस्था आणि व्यवहार यांची सांगड घालण्याच्या उद्देशाने ती संशोधितही करण्यात आली. देशात सहा विभागांत कार्य करणारी दंडाधिकारी न्यायालये, ४२ दिवाणी न्यायालये, कामगार न्यायालये, लष्करी न्यायालये व राज्यसुरक्षा न्यायालये आहेत. ऑक्टोबर १९७८ मध्ये राज्यसुरक्षाविरोधी गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्यासाठी १३ न्यायाधीशांचे एक विशेष न्यायालय स्थापण्यात आले. गुन्ह्यांना आळा घालण्यात आधुनिक विधीला मर्यादा पडल्याचे लक्षात घेऊन शासनाने मुसलमानी विधी जारी केला. त्यानुसार दोन समुपदेष्टे व दोन उलेमा यांच्या सहकार्याने मुसलमानी विधी जाणणारा एक मुख्य न्यायाधीश यांचे एक खास मुसलमानी न्यायालय स्थापण्यात आले.

देशात सर्वोच्च न्यायालय तसेच ११ न्यायाधीश व एक प्रमुख न्यायाधीश असलेले एक विशेष न्यायालय कार्य करते.  

मोरोक्को व फ्रान्स यांच्या सहकार्याने १९७५–७८ यांदरम्यान मॉरिटेनियाचे संरक्षण दल विस्तारण्यात आले. जुलै १९८४ भूसेनेमध्ये ८,००० नौसेनेमध्ये ३२० आणि वायुसेनेत १५० मिळून ८,४७० सैनिक होते. सैनिकसम दलात २,५०० जवान होते. दोन वर्षांची सक्तीची लष्करी सेवा असते. १९८२ मध्ये संरक्षणावर ६२० लक्ष अमेरिकी डॉलर खर्च करण्यात आले.

आर्थिक स्थिती: आफ्रिकेतील अत्यंत गरीब देशांपैकी हा एक देश असून बरेचसे लोक शेतकरी किंवा भटके गुराखी आहेत. हे दोन्हीही व्यवसाय उदरनिर्वाह स्वरूपाचे आहेत. १९६८–७४ या काळातील दुष्काळाचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊन देशाची परंपरागत अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. पशुपालन करणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. कृषिउत्पादनात प्रचंड घट झाली किंवा ते पूर्णपणे बंद झाले. पॉलिसारिओंनी गनिमी काव्याने केलेल्या हल्ल्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिकच ढासळली (१९७६–७८). त्यातच १९७८ व १९८३ मध्ये पुन्हा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. परिणामतः देशाची अर्थव्यवस्था कमालीची ढासळली. त्यामुळे परकीय, विशेषतः अरब राष्ट्रांच्या मदतीवर व गुंतवणुकीवरच, मॉरिटेनिया अवलंबून आहे. औद्योगिक, खाणकाम आणि मासेमारी क्षेत्रांत अरब गुंतवणुकीचे प्रमाण अधिक आहे.

कृषि: दक्षिणेकडील सेनेगल नदीखोऱ्याचा प्रदेश आणि उत्तरेकडील केवळ मरूद्यानांच्या प्रदेशापुरताच कृषिव्यवसाय मर्यादित आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ ०·२% एवढेच क्षेत्र लागवडयोग्य आहे (१९८०). त्यामुळे जमीनधारणेचे सरासरी प्रमाण फारच कमी आहे. शेती प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहे. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, गुंतागुंतीची भूधारणपद्धती, अविकसित आणि अपुरी वाहतूक व्यवस्था, आर्थिक विकास योजनेत शासनाने शेतीला दिलेले गौण स्थान या कारणांमुळे देशाचा कृषिविकास मर्यादित राहिला आहे. देशाच्या अन्नधान्याच्या एकूण गरजेपैकी केवळ १०% अन्नधान्याचे उत्पादन देशात घेतले जाते. त्यामुळे नेहमीच अन्नधान्याची गरज परदेशाकडून आयात करून भागविली जाते. १९८० मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनात कृषिउत्पादनाचा वाटा केवळ २७% होता. हेच प्रमाण १९६० मध्ये ६०% होते. १९६८–७४ या काळातील दुष्काळामुळे तर हे परावलंबित्व व अन्नधान्य आयातीचे प्रमाण अत्युच्च झाले होते. १९८२ मध्ये प्रमुख कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली : (उत्पादन हजार मेट्रिक टनांमध्ये) ज्वारी व बारीक तृणधान्य ४०, कडधान्ये २६, खजूर १०, भात ९, मका ६, भुईमूग ४, बटाटे २, रताळी व सुरण २  यांशिवाय कापूस, कलिंगड, अरेबिक डिंक, भाजीपाला यांचेही उत्पादन थोड्याफार प्रमाणात घेतले जाते. ज्वारी व बारीक तृणधान्यांचे उत्पादन १९८१–८२ मध्ये ६६,०८६ टन एवढे होते. दुष्काळामुळे हेच उत्पादन १९८२–८३ मध्ये ७,७६२ टन इतके कमी झाले. त्यामुळे १९८३ मध्ये २ लक्ष टन धान्याची आयात करावी लागली. शासन सेनेगल नदीखोऱ्यातील शेतीविकासाचा प्रयत्न करीत आहे. ओएम्‌व्हीएस्‌ने (मॉरिटेनिया, सेनेगल व माली यांची सेनेगल नदी विकास संघटना) जलवाहतूक, जलसिंचन, जलविद्युत्‌शक्तिनिर्मितीच्या उद्देशाने मालीमधील मानांत्यालेस येथे धरण बांधण्याचे काम सुरू केले आहे (१९८१). गॉर्गॉल नदीवरील धरण पूर्णत्वास आले असून त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र ७,२०० हेक्टरनी वाढणार आहे. तसेच इतर धरणांच्या बांधणीमुळे ३०,००० हेक्टर क्षेत्र जलसिंचनाखाली येईल. सेनेगल नदीच्या सुपीक त्रिभुज प्रदेशातून आत येणाऱ्या खाऱ्या पाण्याला नियंत्रण घालणाऱ्या आणखी एका प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.


पशुपालन हा येथील लोकांचा परंपरागत व प्रमुख व्यवसाय असून अनुकूल वातावरणामुळे १९६० च्या दरम्यान तो अगदी भरभराटीला आला होता. ८०% मूर लोक भटके पशुपालक होते. ते मुख्यतः गुरे व मेंढ्या पाळत. १९६८ पर्यंत पाळीव प्राण्यांची संख्याही अतिरिक्त झाली होती. तथापि १९६८–७४ या काळातील दुष्काळात प्राण्यांची संख्या कमालीची कमी झाली. १९७० मध्ये २६ लक्ष असलेली प्राण्यांची संख्या १९७३ मध्ये १६ लक्ष झाली. १९८० मध्ये पूर्वीच्या एकूण चराई क्षेत्रापैकी ८०% चराई क्षेत्र वाळवंटाखाली गेले किंवा ते ओसाड बनले. त्यामुळे मूर लोकांना आपल्या संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक असलेले प्राणी एकतर विकावे लागले किंवा कत्तलखान्याकडे रवाना करावे लागले. त्यांना अन्न व कामाच्या शोधार्थ नगरांच्या ठिकाणी जावे लागले. १९८३ पर्यंत केवळ २५% लोकच आपल्या परंपरागत पशुपालन व्यवसायात राहिले. या वर्षी देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते : उंट ७·५ लक्ष गुरे १५ लक्ष घोडे १५,००० गाढवे १.४३ लक्ष मेंढ्या ५० लक्ष व शेळ्या ३० लक्ष. १९८२ मध्ये सर्व प्रकारचे एकूण मांसोत्पादन ४१,००० मे. टन, दूध २·१२ ल. मे. टन, कोंबड्यांची अंडी २,८९० मे. टन व गुरांच्या कातडीचे उत्पादन २,४३० मे. टन एवढे झाले.

उद्योग: नॅशनल युटिलिटी कंपनी (सोनेलेक) न्वाकशॉट, न्वादिब्यू, काएडी, रोसो, आक्‌झूझट व आटार या नगरांमधील पाणी व विद्युत्‌पुरवठ्याची व्यवस्था पाहाते. देशात १९८१ मध्ये विद्युत्‌शक्तीचा वापर ५,४९,२२,५०० किवॉ. ता. झाला, तर विद्युत्‌निर्मितिक्षमता ५५,००० किवॉ. इतकी होती. यापैकी बहुतेक औष्णिक विद्युत्‌शक्ती होती. समुद्रकिनाऱ्यावर खनिज तेल संशोधनाचे प्रयत्न चालू आहेत. १९८१ मध्ये मॉरिटेनियाने २,०१,००० टन खनिज तेलाची व ६,००० टन कोळशाची आयात केली. लोह खनिज हे देशातील परकीय चलन मिळवून देणारे व आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. ‘आयर्न माइन्स कंपनी ऑफ मॉरिटेनिया’ ची १९५१ मध्ये स्थापना होऊन १९६३ पासून तिने तीन खाणींमधून उत्पादनाला सुरुवात केली. १९७४ मधील १,१८,६०,००० टन या अत्युच्च उत्पादनानंतर पुढे उत्पादन कमी झाले. १९८१ मध्ये केवळ ८४,७३,००० टन एवढेच उत्पादन झाले. १९८० पासून आणखी दोन खाणींमध्ये परकीय कर्ज घेऊन गुंतवणूक करण्यात आली आहे. देशात तांब्याचे साठे भरपूर आहेत. आक्‌झूझट हे प्रमुख तांबे उत्पादक क्षेत्र असून १९६९ पासून तेथे उत्पादनास सुरुवात झाली. यात ५४% गुंतवणूक ब्रिटिश व अमेरिकन व्यापाऱ्यांची, २५% मॉरिटेनिया शासनाची व बाकीची फ्रेंच व्यापाऱ्यांची होती. तथापि व्यापारी दृष्ट्या त्याचे उत्पादन विशेष लाभदायक ठरले नाही. तेव्हा अरब राष्ट्रांच्या आर्थिक मदतीने तांबे उत्पादनाचा देशाचा संकल्प आहे. १९८१ मध्ये जिप्समचे उत्पादन ९१४ टन इतके झाले असून त्याची प्रामुख्याने सेनेगलला निर्यात केली जाते. न्वाकशॉटजवळ जिप्समचे साठे आहेत. सैंधवाचे वार्षिक उत्पादन ५०० टन होते. सेनेगल नदीच्या उत्तरेस बोफालजवळ फॉस्फेटचे साठे सापडले आहेत.

देशात अरण्यांखालील एकूण क्षेत्र १,५१,३४० चौ. किमी. आहे. केवळ दक्षिण भागातच वनसंपदा असून ॲकेशिया वनस्पतीपासून मिळणारा अरेबिक डिंक हे प्रमुख उत्पादन आहे. १९७२ पर्यंत खाजगी व्यापारी तो गोळा करून त्याची निर्यात करीत असत. १९७२ पासून मात्र ‘सोनिमेक्स’ या व्यापारी कंपनीलाच फक्त हा अधिकार देण्यात आला आहे. तथापि शेजारील देशांशी, विशेषतः सेनेगलशी, याचा मोठ्या प्रमाणावर चोरटा व्यापार चालतो. १९८० मध्ये ६,३२,००० घमी. एवढे लाकडाचे ओंडके कापण्यात आले, त्यांपैकी ९३% इंधनासाठी होते.

मॉरिटेनियाला ९०० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला असून हा किनारी प्रदेश मत्स्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. परकीय चलन मिळवून देण्यात खनिजांनंतर माशांनाच महत्त्वाचे स्थान आहे. किनाऱ्यापासून ३७० किमी. पर्यंतच्या सागरी क्षेत्रात मासेमारी केली जाते. मात्र या सर्वच क्षेत्रावर ताबा ठेवणे मॉरिटेनियाला शक्य होत नाही. १९८० पर्यंत या क्षेत्रात मासेमारी करणाऱ्या परकीय मासेमारी बोटीच अधिक होत्या. १९७९ मध्ये असा परवाना देण्याचे मॉरिटेनियाने बंद केले आहे. १९८० पासून या क्षेत्रात मासेमारी करण्यासाठी मॉरिटेनियाने अल्जीरिया, पोर्तुगाल, इराक, फ्रान्स, स्पेन, कुवेत, लिबिया, नायजेरिया, दक्षिण कोरिया, रूमानिया, सोव्हिएट रशिया यांबरोबर संयुक्त कंपन्यांची स्थापना केली आहे. त्यामुळे मासेमारीत प्रचंड वाढ झाली. १९८२ मध्ये देशाने १·८ लक्ष टन माशांची निर्यात केली व त्यांपासून ४४,८९२ लक्ष औग्वीया एवढे उत्पन्न मिळाले. १९८३ मध्ये तर माशांच्या निर्यातीपासून ८७,७३० लक्ष औग्वीया एवढे उत्पन्न मिळाले. हे उत्पन्न लोह खनिज निर्मितीपासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होते. न्वादिब्यू हे माशांवर प्रक्रिया करण्याचे देशातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. याशिवाय सेनेगल नदीत तसेच न्वाकशॉट व न्वादिब्यू येथील समुद्रात परंपरागत पद्धतीने मासेमारी केली जाते. 

पुरेशा भांडवलाअभावी देशाचा औद्योगिक विकास मर्यादित राहिला आहे. माशांवरील प्रक्रियाउद्योग सर्वांत महत्त्वाचा असून तो प्रामुख्याने न्वादिब्यू येथे एकवटलेला आहे. ‘मॉरिटेनियन फिश इंडस्ट्रीज’ ही माशांवर प्रक्रिया करणारी प्रमुख स्पॅनिश कंपनी १९७० मध्ये सुरू झाली असून तीत मॉरिटेनियन शासनाचा ५१% भाग होता (१९८०). न्वादिब्यू येथे प्रतिवर्षी १० लक्ष टन क्षमतेचा खनिज तेल शोध कारखाना १९८३ मध्ये कार्यान्वित झाला. तथापि कच्चे खनिज तेल आयातीसाठी लागणाऱ्या भांडवलाअभावी तो लगेचच बंद करणे भाग पडले. तसेच या शहरी एक लाटण यंत्र कारखाना १९७७ मध्ये उभारण्यात आला असून तेथे वर्षाला ४,००० टन लोखंडी गज व ५,१०० टन पोलाद तयार करण्यात येते. न्वाकशॉट येथील बंद पडलेला साखर कारखाना अल्जीरियाच्या मदतीने पुन्हा सुरू करण्यात आला आहे (१९८२).


न्वाकशॉट येथे एक खाणकाम व औद्योगिक संशोधन संस्था तसेच एक फळसंशोधन संस्था आहे. देशात सु. ४,६५,००० कामगारशक्ती असली तरी केवळ ४५,००० एवढेच पगारी कामगार आहेत. देशातील सर्व कामगार संघटना ‘युनियन ऑफ मॉरिटेनियन वर्कर्स’ या महासंघाशी संलग्न आहेत.

व्यापार, वाणिज्य व अर्थ: तांदूळ, साखर व चहा या उपभोग्य वस्तूंची आयात आणि अरेबिक डिंक याची निर्यात यांत सोनिमेक्स या शासननियंत्रित व्यापारी कंपनीची मक्तेदारी आहे. देशाचा व्यापार नेहमीच तुटीचा असतो. लोह खनिज ही प्रमुख निर्यात असून एकूण निर्यात उत्पन्नातील ६०% उत्पन्न लोह खनिज निर्यातीपासून मिळते व बाकीचे बहुतेक निर्यातउत्पन्न माशांच्या निर्यातीपासून मिळते (१९८२). आयातीत सु. एक तृतीयांश हिस्सा अन्नधान्याचा असतो. त्याशिवाय खनिज तेल उत्पादने व उपभोग्य वस्तूंची आयात केली जाते. १९८१ मध्ये एकूण आयात १,२७,९३० लक्ष औग्वीया किंमतीची व एकूण निर्यात १,२५,०५० लक्ष औग्वीया किंमतीची झाली.

आयात निर्यातीसाठी परवाना घेणे बंधनकारक आहे. १९७० मध्ये मॉरिटेनिया सेनेगल यांदरम्यान झालेल्या व्यापार करारानुसार या दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या प्राथमिक वस्तूंच्या व्यापारात जकातकर भरावा लागत नाही. मॉरिटेनियाचा आयात निर्यात व्यापार प्रामुख्याने फ्रान्स, स्पेन, जपान, नेदर्लंड्स, सेनेगल, अमेरिका या प्रमुख देशांशी चालतो. माली व सेनेगल या देशांकडे गुरे, शेळ्या व मेंढ्यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते. अलीकडच्या काही वर्षांत मॉरिटेनियाचा व्यवहारशेष संतुलित असलेला दिसतो. 

‘सेंट्रल बँक ऑफ मॉरिटेनिया’ (स्था. १९७३) ह्या मध्यवर्ती बँकेशिवाय इतर चार व्यापारी बँका देशात आहेत. ‘इंटरनॅशनल बँक फॉर मॉरिटेनिया’ या बँकेत ७०% भांडवल शासनाचे, ‘मॉरिटेनियन बँक कंपनी’त ५५% भांडवल मॉरिटेनियाचे व ४५% यूरोपीय देशांच्या मालकीचे, ‘लिबियन मॉरिटेनियन अरब बँक फॉर फॉरिन ट्रेड अँड डेव्हलपमेंट’मध्ये (स्था. १९७२) ५१% भाग भांडवल लिबियाचे, तर ‘अरब आफ्रिकन बँक इन मॉरिटेनिया’त ५१% भाग भांडवल देशाचे व ४९% कुवेत व ईजिप्तचे होते. ‘मॉरिटेनियन बँक फॉर कॉमर्स अँड डेव्हलपमेंट’ ही विकास बँक असून तिचे ८०% स्थानिक भांडवल आहे. देशात रोखेबाजार नाही.

देशातील विमा व्यवसायाचे काम १९७४ पर्यंत १३ परदेशी कंपन्या करीत होत्या. त्यानंतर हा व्यवसाय पूर्णपणे शासनाच्या अखत्यारीत आला आहे. 

औग्वीया हे मॉरिटेनियाचे अधिकृत चलन असून ५ खोउम = १ औग्वीया होतो. १ खोउम आणि १, ५, १० व २० औग्वीयांची नाणी तर १००, २०० व १,००० औग्वीयांच्या नोटा चलनात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = ७७·९९ औग्वीया १ अमेरिकी डॉलर = ६७·२९ औग्वीया आणि १,००० औग्वीया = १२·८२ स्टर्लिंग पौंड = १४·८६ अमेरिकी डॉलर असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८४).

अर्थकारण: मॉरिटेनियाचे अंदाजपत्रक बहुतेक तुटीचेच असते. देशाचे १९८४ चे अंदाजपत्रक १,१०,५६० लक्ष औग्वीया महसुलीचे व १,३७,४१० लक्ष औग्वीया एवढ्या खर्चाचे होते. आयात कर, निर्यात व खाणकाम कंपन्यांवरील उलाढाल कर, खनिज तेल, अल्कोहॉलयुक्त मादक पेये व तंबाखू यांवरील उत्पादनशुल्क, सेवा कर आणि वाहन कर हे देशातील अप्रत्यक्ष कर आहेत तर वेतन कर, सर्वसामान्य उत्पन्न कर, औद्योगिक व व्यापारी महामंडळांच्या नफ्यावरील कर हे प्रमुख प्रत्यक्ष कर आहेत. अपतट मासेमारीवरील कर व दंड हेसुद्धा देशाच्या उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहेत. औद्योगिक विकासास आवश्यक असणाऱ्या साधनसामग्रीवर कमी दराने आयात कर आकारला जातो. खाणकाम क्षेत्राचे १९७० मध्ये राष्ट्रीयीकरण करण्यात आल्यापासून या क्षेत्रातील परदेशी खाजगी गुंतवणुकीचे प्रमाण फारच कमी झाले. त्याचप्रमाणे आयात व देशांतर्गत व्यापारावर शासनाने घातलेल्या अधिक कडक निर्बंधांमुळेही परकीय भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले. १९०९ मध्ये गुंतवणुकीबाबत केलेल्या नवीन संहितेनुसार कच्च्या मालाची आयात व निर्यात आणि नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीवर १२ वर्षांपर्यंत करात सूट देण्याची तरतूद आहे. खनिज प्रक्रिया क्षेत्रातील गुंतवणुकीस विशेष प्राधान्य दिले जाते.

दळणवळण: देशात वाहतूक व दळणवळणाचा मर्यादित विकास झालेला आढळतो. वाळूच्या टेकड्यांचे स्थलांतर, दक्षिण भागात अकस्मात येणारे पूर व तीव्र उताराचे कडे, हे जमिनीवरील वाहतूक मार्गांच्या विकासातील प्रमुख अडथळे आहेत. अजूनही देशाच्या उत्तर भागात उंट व दक्षिण भागात बैल व गाढवे यांचा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. देशातील लोहमार्गांची एकूण लांबी ६५२ किमी. असून न्वादिब्यू बंदरापासून फ्डेरिकजवळील एनटेरेट येथील लोह खनिजाच्या खाणीपर्यंत हा लोहमार्ग गेलेला आहे. लोह खनिज किनाऱ्यापर्यंत वाहून नेणे हा या लोहमार्गाचा मुख्य उद्देश असून १९८३ मध्ये या लोहमार्गाने १९,२०० प्रवासी व ६७ लक्ष मे. टन एवढ्या मालाची वाहतूक झाली.


देशात एकूण सु. ८,९०० किमी. लांबीचे रस्ते आहेत. त्यांपैकी १,५१४ किमी. लांबीचे डांबरी रस्ते आहेत. १९८३ पासून आंतरराष्ट्रीय मदतीने डांबरीकरण व रस्तेविकासाचे काम चालू झाले असून १९८६ पर्यंत नव्याने ३,५०० किमी. लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट आहे. पश्चिमेस न्वाकशॉट ते पूर्वेस नेमा यांदरम्यानचा १,१०० किमी. लांबीचा ट्रान्स मॉरिटेनियन महामार्ग १९८२ पर्यंत बांधून पूर्ण झाला आहे. देशात ८,३३० प्रवासी मोटारगाड्या व ३,७२० व्यापारी वाहने होती (१९८०). सेनेगल नदीला वाहतुकीच्या दृष्टीने विशेष महत्त्व असून तिचा २२० किमी. लांबीचा प्रवाह वर्षभर वाहतुकीस उपयोगी ठरतो. न्वाकशॉट व न्यादिब्यू ही दोन प्रमुख खोल सागरी बंदरे आहेत. खनिज पदार्थांची निर्यात आणि मासेमारी उद्योगाच्या विकासाच्या दृष्टीने न्वादिब्यूच्या दक्षिणेस १० किमी. वर पॉइंट-सेंट्रल बंदराचा विस्तार करण्यात आला आहे. तसेच चीनच्या आर्थिक मदतीने खोल सागरी बंदर म्हणून न्वाकशॉट बंदराचा विस्तार करण्याचे काम १९७९ पासून सुरू असून १९८७ पर्यंत ते पूर्ण करण्यात येणार आहे. 

न्वाकशॉट व न्वादिब्यू येथील दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांशिवाय वेगवेगळ्या २३ ठिकाणी छोट्या धावपट्ट्या आहेत. १९८१ पासून नेमा येथील विमानतळ सुरू करण्यात आला आहे. 

मॉरिटेनियातील बहुतेक डाक कार्यालयांत दूरध्वनी व तारसेवा उपलब्ध आहेत. न्वाकशॉट-पॅरिस यांदरम्यान थेट दूरध्वनी सेवा उपलब्ध आहे. देशात एकूण सु. १०,००० दूरध्वनिसंच वापरात होते (१९८३). प्रशासकीय संपर्क माध्यम म्हणून बिनतारी संदेशवहनाचा अवलंब केला जातो. नभोवाणी ही शासनाच्या अखत्यारीतील बाब असून फ्रेंच, अरबी व इतर आफ्रिकन भाषांमधून नभोवाणी कार्यक्रम प्रसारित केले जातात. देशात सु. १,५०,००० रेडिओ संच होते (१९८०). दूरचित्रवाणी प्रक्षेपण ही सुद्धा शासनाच्या अधिकारातील बाब असून १९८४ पासून न्वाकशॉट येथे रंगीत दूरचित्रवाणी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

लोक व समाजजीवन: देशातील ६८% लोक मूर वंशाचे व बाकीचे ३२% लोक निग्रो वंशाचे आहेत. मूर लोकांमध्ये निम्मे गौरवर्णी व निम्मे कृष्णवर्णी आहेत. मूर लोक बर्बर, अरब किंवा सूदानी गटातील आहेत. निग्रो लोक हे कृष्णवर्णीय असून ते प्रामुख्याने दक्षिणेकडील सेनेगल नदीखोऱ्यात व शहरांच्या ठिकाणी आढळतात. निग्रो लोक तूकूलार, साराकॉल, फुलानी, वोलॉफ व बाबारी गटांतील आहेत. देशात सु. २,००० यूरोपीय लोक असून त्यांत प्रामुख्याने फ्रेंच आणि स्पॅनिश आहेत. लेबानीज व्यापाऱ्यांची थोडी वस्ती येथे आढळते. इस्लाम हा येथील मुख्य धर्म असून ९९% लोकसंख्या मुस्लिमधर्मीय आहे. काही लोक ख्रिश्चनधर्मीय असून त्यापैकी बरेचसे परदेशी आहेत. मूर लोकांना आपल्याला मिळालेल्या अरब आणि मुस्लिम वारशाचा विशेष अभिमान असलेला दिसतो. देशाची लोकसंख्या १७,००,००० (१९८२ अंदाज) एवढी असून त्यांपैकी २८% लोक अस्थिरवासी आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला १·६ एवढी आहे. उत्तरेकडील सहारा प्रदेशात लोकवस्ती फारच विरळ असून ती प्रामुख्याने मरूद्यानांजवळच आढळते. दक्षिणेकडील नियमित पर्जन्याच्या व कृषियोग्य जमिनीच्या प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते. १९७५ ते ८० या काळातील वार्षिक सरासरी जन्म प्रमाण दर हजारी ५०·२ व मृत्युप्रमाण दर हजारी २२·३ होते. वार्षिक लोकसंख्या वाढीचा दर २·८% आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ९०% लोकसंख्या दक्षिणेकडील सु. एक-चतुर्थांश प्रदेशात राहते. ऋतुप्रमाणे होणाऱ्या कुरणांच्या व पाण्याच्या उपलब्धतेनुसार गुराखी आपली गुरेढोरे बरोबर घेऊन भटकत असतात. शेळ्या, मेंढ्या, गुरे, उंट, गाढवे हे त्यांचे प्रमुख प्राणी असून दूध व मांस तसेच वाहतुकीसाठी त्यांचे उपयोग होतो. गुरे विकण्यासाठी ते सेनेगलमध्येही जातात. सेनेगल नदीखोऱ्यातील काही भटके लोक हंगामी व्यवसायात काम करण्यासाठी वा किरकोळ व्यापाराच्या निमित्ताने सेनेगलमधील डाकार येथे जातात. सु. दोन ते तीन हजार मॉरिटेनियन लोक फ्रान्समध्ये राहतात. ‘बिल्डिंग सोसायटी ऑफ मॉरिटेनिया’ ही येथील प्रमुख बांधकाम कंपनी असून पुरेशा मनुष्यबळाचा व भांडवलाचा अभाव हे या कंपनीपुढील प्रश्न आहेत. १९७५ मध्ये घरे आणि हॉटेले यांच्या बांधकामासाठी कुवेत, ईजिप्त व मॉरिटेनिया यांनी मिळून ‘अफार्को मॉरिटेनी’ या कंपनीची स्थापना केली. याचवेळी गृहबांधणी उत्तेजनार्थ शासनाने काही नवीन नियम केले, तरी अजूनही घरांचा प्रश्न विशेष सुटू शकलेला नाही.

‘नॅशनल सोशल इन्शुअरन्स फंड’ हा विभाग कुटुंब भत्ता, औद्योगिक अपघात लाभ, व्यावसायिक रोग विमा, वार्धक्य वेतन यांबाबतची कामे पाहतो. सामाजिक व सांस्कृतिक कारणांमुळे  मॉरिटेनियन स्त्रियांना अत्यंत मर्यादित स्वातंत्र्य मिळते. गर्भपात बेकायदेशीर असून स्त्रियांची सुंता करण्याची पद्धत सर्रास अवलंबिली जाते. स्त्रियांचे प्रसूतिमान ६·९ इतके होते (१९७०). आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना वैद्यकीय सेवा मोफत पुरविल्या जात असल्या, तरी देशात आरोग्यसेवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. न्वाकशॉट येथील ४५० खाटांचे एकमेव मोठे रुग्णालय असून त्याशिवाय ११ प्रादेशिक रुग्णालये आहेत. १९७६ मध्ये देशात ७१ डॉक्टर, ४ दंतवैद्य, ५ औषधनिर्माते, २० प्रसाविका व ५६० परिचारिका होत्या. मलेरिया, क्षय, गोवर, आमांश, फ्ल्यू या आजारांचे प्रमाण येथे अधिक आढळते. आयुर्मान अतिशय कमी म्हणजे पुरुषांच्या बाबतीत ते ४०·६ वर्षे व स्त्रियांच्या बाबतीत ४३·८ आहे.

अरबी व फ्रेंच ह्या देशातील अधिकृत भाषा असून त्यापैकी अरबी ही राष्ट्रभाषा आहे. बहुसंख्य मूर लोक अरबी भाषा बोलत असून मॉरिटेनियामध्ये ती ‘हिस्सानिया’ नावाने ओळखली जाते. दक्षिण भागातील फ्रेंच भाषिक निग्रो लोक तूकूलार, वोलॉफ, प्यूलार व सोनिंके या भाषा बोलतात. एल् छाब हे न्वाकशॉट येथून फ्रेंच व अरबी भाषांतून निघणारे प्रमुख दैनिक वृत्तपत्र आहे. याशिवाय जर्नल ऑफिशल हे पाक्षिक व फ्रेंच आणि अरबी भाषांतून निघणारे पेउपल हे द्वैमासिक आहे. न्वाकशॉट येथील ‘नॅशनल लायब्ररी’ (स्था. १९५५) हे देशातील सर्वांत मोठे व मुख्य ग्रंथालय असून त्याशिवाय वेगवेगळ्या प्रमुख नगरांमध्ये अरब ग्रंथालये आहेत.


देशात सर्वत्र शिक्षणाचा प्रसार करण्याचे जोरदार प्रयत्न १९६० पासून सुरू झाले असले, तरी १९७६ पर्यंत देशातील ८२·६% लोक निरक्षर होते. हेच प्रमाण नागरी भागात ६१·१%, तर ग्रामीण भागात ८८·५% आहे. भटक्या जमातींमधील मुलांसाठीही शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत. ६ ते १२ वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे असले, तरी १९८० मध्ये प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ ३५%, तर माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण केवळ १०% होते. १९७९ मध्य शालेय शिक्षणात अरबी ही पहिल्या क्रमांकाची आवश्यक भाषा म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि दक्षिणेकडील फ्रेंच भाषिक लोकांनी याला विरोध केल्यामुळे सहा वर्षांपर्यंत हा प्रश्न लांबणीवर टाकण्यात आला आहे. बूटीलीमीट येथे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायर इस्लामिक स्टडीज’ (स्था. १९६१) व न्वाकशॉट येथे ‘नॅशनल स्कूल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’ (स्था. १९६६) या शैक्षणिक संस्था असून त्यांतील एकूण विद्यार्थी संख्या ५०० होती (१९८०). १९८२ मध्ये न्वाकशॉट येथील दोन शैक्षणिक संस्थांमधून पदवी अभ्यासक्रमास सुरुवात झाली, तर १९८३ मध्ये न्वाकशॉट विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ९७४ होती. १९८१ मध्ये ९०,५३० विद्यार्थी प्राथमिक शाळेत, २०,२४८ माध्यमिक शाळेत तसेच १,००४ विद्यार्थी तांत्रिक शिक्षण व ८५० विद्यार्थी शिक्षक-प्रशिक्षण संस्थांत होते. अलीकडच्या काळात मॉरिटेनियात ईश्वरशास्त्र, काव्य व संगीत विशेष भरभराटीस आलेले दिसते. देशात उत्तम प्रकारचे सुवर्णकाम केले जाते.

महत्त्वाची स्थळे: राजधानी न्वाकशॉट देशातील सर्वांत मोठे शहर असून त्याशिवाय न्वादिब्यू (लोकसंख्या २१,९६१–१९७६), काएडी (२०,८४८), झाउएराटे (१७,४७४), रोसो (१६,४६६) व आटार (१६,३२६) ही येथील प्रमुख शहरे आहेत. न्वाकशॉट वगळता इतरत्र पर्यटकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध नाहीत. उष्ण हवामानामुळे नोव्हेंबर ते मे हा काळ पर्यटनाच्या दृष्टीने सोयीचा ठरतो. मरूद्याने, शिकारीची क्षेत्रे, बर्बरांची खेडी, प्राचीन ॲल्मॉरव्हिड्झ साम्राज्याची आटार, शिंग्गेटी व तेथील तेराव्या शतकातील घरे आणि मशिदी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. देशात एकूण १२ चित्रपटगृहे असून त्यांत ८,८०० प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे. फ्रेंच नागरिक व आफ्रिकेतील पूर्वीच्या फ्रेंच प्रदेशातील नागरिक वगळता इतरांना परिपत्र व प्रवेशपत्र अत्यावश्यक आहे. १९८० मध्ये पर्यटन व्यवसायापासून मॉरिटेनियाला ६० लक्ष अमेरिकी डॉलर एवढे उत्पन्न मिळाले. 

मॉरिटेनिया

बलाटा व नेमा भागांत मुले व प्राण्यापासून खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्याचा नक्षीदार खांबकातडी पिशवी : बूटीलीमोट येथील स्त्रियांच्या चर्मोद्योगाचा एक नमुनातांबड्या मातीची बाहुली प्रागेतिहासिक सुफलतादेवता व्हीनसचे प्रतीकइस्लामी कलाप्रभावदर्शक अंगुली रेखित भित्तीचित्र, बालाटा

चौधरी, वसंत