पोरबंदर : गुजरात राज्याच्या जुनागढ जिल्ह्यातील एक पुण्यक्षेत्र, महात्मा गांधीचे जन्मग्राम आणि अरबी समुद्र किनाऱ्यावरील शहर व बंदर. लोकसंख्या ९६,८८१ उपनगरांसह १,०६,७२७ (१९७१). जुनागढच्या वायव्येस ८८ किमी. आणि अहमदाबादच्या नैर्ऋत्येस ३२६ किमी.वरील हे शहर राजकोटहून आलेल्या लोहमार्गाचे अंतिम स्थानक आहे.

श्रीकृष्णाचा मित्र सुदाम या गावी राहत होता, असे मानतात व त्यामुळेच हे पुण्यक्षेत्र ‘सुदामपुरी’या नावानेही ओळखले जाते. सोळाव्या शतकापासून हे जेठवा राजपुतांच्या ताब्यात होते. १७८५ पासून संस्थान विलिन होईपर्यंत ते पोरबंदर संस्थानाच्या राजधानीचे ठिकाण होते. पूर्वीपासून हे शहर इमारतीच्या दगडांसाठी प्रसिद्ध असून शहराचे बांधकाम पांढऱ्या दगडांतच आहे. येथील चुनखडक बांधकामासाठी उत्कृष्ट समजला जातो. कापूस, गळिताची धान्ये यांची पोरबंदर ही बाजारपेठ असून येथील बंदरातून कोकण, मलबार, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, अरबस्तान इत्यादींशी व्यापार चालतो. शहरात एक विमानतळही आहे. 

शहराच्या परिसरात कापड, सिंमेट, आगपेट्या, मीठ, रंग, लाकडी वस्तू, चांगल्या प्रतीचे लोणी व तूप, 

पोरबंदर : एक दृश्य.

रसायने इ. तयार करणे तसेच मासेमारी हे उद्योग चालतात. शहराजवळच पोरवाई मातेच्या मंदिराचे अवषेश असून हे मंदीर ८०० वर्षांपूर्वींचे असावे, असे विद्वानांचे मत आहे. जेथे गांधीचा जन्म झाला, त्या ठिकाणाजवळच गांधीस्मारक म्हणून बांधलेले ‘किर्तीमंदिर’तसेच सुदाम्याचे मंदिर, समुद्रातून २५ किमी वरून दिसणारे २७ मी. उंचीचे दीपगृह इ. वास्तू प्रेक्षणीय आहेत.

सावंत, प्र. रा. फडके, वि. शं.