वेकफील्ड : इंग्लंडच्या वेस्ट यॉर्कशर परगण्याचे प्रशासकीय केंद्र, एक काउंटी बरो व शहर. लोकसंख्या उपनगरांसह ३,१८,८०० (१९९८). हे लंडनच्या वायव्येस २८० किमी. तर लीड्सच्या दक्षिणेस १६ किमी. कॉल्डर नदीतीरावर वसले आहे. तेराव्या शतकात हे एक लोकर-उद्योगाचे महत्त्वाचे ठिकाण होते. चौदाव्या शतकापासून हे कापड उद्योगासाठी प्रसिध्द असून सोळाव्या शतकात कापडाच्या व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र बनले. वेकफील्डला १२३१ मध्ये नगराचा, १८४८ मध्ये नगरपालिकीय बरोचा, १८८८ मध्ये शहराचा, तर १९१४ मध्ये काउंटी बरोचा दर्जा देण्यात आला. टाउन्ली प्लेज किंवा वेकफील्ड प्लेजची (३२ धार्मिक अद्‌भुत नाटकांच्या मालिकांची) सुरुवात (१४५०) येथूनच झाली. वेकफील्ड युध्दात (इ. स. १४६०) यॉर्कचा तिसरा डयूक रिचर्ड यास लँकास्ट्रियनांनी याच ठिकाणी पकडून त्याचा शिरच्छेद केला. इ. स. १८८८ मध्ये हा प्रदेश ‘डायसिस’ (बिशपच्या अधिकारातील प्रदेश) म्हणून जाहीर झाला. येथील ‘ऑल सेंट्स’ या जुन्या पॅरिश चर्चचे कॅथीड्रलमध्ये रुपांतर करण्यात आले असून त्याची १३२९ मध्ये पुनर्बांधणी झाली आहे. त्याचा ७५ मी उंचीचा कोरीव निमुळता मनोरा हा यॉर्कशरमधील सर्वाधिक उंचीचा आहे. कॉल्डर नदीवरील जुन्या पुलावर असलेल्या सेंट मेरी या चॅपेलची १८४७ मध्ये पुनर्बांधणी करण्यात आली असून ते सुशोभित करण्यात आले आहे. प्रसिध्द कादंबरीकार जॉर्ज गिसिंग यांचे वेकफील्ड हे मूळ गाव होय.

    येथील द क्वीन एलिझाबेथ ग्रामर स्कूल (स्था. १५९१) प्रसिध्द असून वैद्य जॉन रॅडक्लिफ (१६५०-१७१४) हे या स्कूलचे विद्यार्थी होत. लोकरीचे धागे, तयार कपडे, तारा, अभियांत्रिकी वस्तू, मद्ये, रसायने, काच, धातूचे पत्रे इ. निर्मितीचे उद्योग तसेच कोळसा खाणकाम येथे चालते. येथील गुरांची व कृषिमालाची बाजारपेठ मोठी आहे. लोहमार्ग, महामार्ग व कालवा यांच्या वाहतूक-मार्गावरील हे महत्त्वाचे केंद्र आहे.                                   

चौधरी, वसंत