सोमनाथसोमनाथ–२ : गुजरात राज्यातील सौराष्ट्रामधील प्राचीन शैव क्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. ते सोमनाथ पाटण, वेरावळक्षेत्र,प्रभासक्षेत्र, अनंतपूर, पाटण-सोमनाथ इ. नावांनीही ओळखले जाते. अलीकडे झालेल्या उत्खननात तेथे इ. स. पू. १५०० मध्ये वसाहत असल्याचे पुरावे मिळाले. सौराष्ट्रात राजकोट-वेरावळ लोहमार्गावर आग्नेयीस ३·२ किमी. वर ते वसले आहे. ऋग्वेदाच्या खिल सूक्तात (ऋग्वेद ९·२०·५) त्याचा उल्लेख आढळतो. शिवपुराणातही कोटिरुद्र संहितेत त्याचे माहात्म्य वर्णिले आहे. हे क्षेत्र प्राचीन काळापासून लकुलीश-पाशुपत पंथाचे मुख्य केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. येथील सोमनाथ मंदिर इ. स. पहिल्या शतकात बांधल्याची वदंता आहे. ते जीर्णशीर्ण झाल्यानंतर त्याच जागी ६४९ मध्ये मैत्रक घराण्यातील राजा चौथा धरसेन याने नवीन मंदिर बांधले. हे मंदिर स्थापत्यकलेचा एक नमुना होते. त्याचा सभामंडप उघडा असून त्याच्या पायऱ्या समुद्राकडे उतरत गेल्या होत्या.

आठव्या शतकात अरबांच्या स्वाऱ्यात ते उद्ध्वस्त झाले. सोळंकी (चौलुक्य) घराण्याच्या कारकिर्दीत ९४१ मध्ये सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी झाली तथापि पहिल्या भीमदेव राजाच्या कारकिर्दीत १०२४ मध्ये महमूद गझनीने सोमनाथवर स्वारी केली आणि शिवमंदिराची मोडतोड करून तेथील अगणित संपत्ती लुटून नेली. पुढे अनहिलवाडच्या कुमारपाल राजाने ११६९ मध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा बांधले. इराणच्या झकेरिया कझीनी या प्रवाशाने १२६३ मध्ये या स्थळाला भेट दिली होती. तो लिहितो, “सोमनाथची मूर्ती भव्य असून शिवपिंडीखाली विपुल द्रव्य व रत्नांच्या राशी होत्या. मंदिराचे सर्व शिल्प अप्रतिम असून सुंदर नक्षी व कलाकृतींनी युक्त होते. मंदिरासमोर २०० मण वजनाची प्रचंड सुवर्णशृंखला व घंटा होती.” हे मंदिर १२९९ मध्ये अलाउद्दीन खल्जी याने उद्ध्वस्त केले. तेव्हा जुनागढचा चुडासमा राजा महिपाल याने त्याचा १३२५ मध्ये जीर्णोद्धार केला. यानंतर हे मंदिर सुस्थितीत दिमाखाने अवशिष्ट होते परंतु पुढे महमूदशाह बेगडा नावाच्या सम्राटाने ते उद्ध्वस्त करून त्या जागी मशीद बांधली. त्यानंतरही सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न झाले पण औरंगजेब बादशाहाने त्याची मोडतोड केली. भग्नावस्थेत असताना अहिल्याबाई होळकर या धर्मशील राणीने १७८३ मध्ये मूळ मंदिराची पीठिका बदलून त्याच्या जवळच दुसऱ्या जागेवर सोमनाथ मंदिर बांधले. या मंदिराच्या भोवताली पार्वती, लक्ष्मी, गंगा, नंदी, सरस्वती इ. देवतांच्या मूर्ती आहेत. कालांतराने हे मंदिरही मोडकळीस आले. स्वातंत्र्योत्तर काळात मंदिराच्या मूळ पीठिकेवरच त्याचे बांधकाम पालिताणा येथील प्रसिद्ध स्थापत्यविशारद प्रभाशंकर सोमपुरा यांनी केले. ११ मे १९५१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिरात शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचे पौरोहित्य वाईचे श्री. केवलानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केले.

पहा : पाटण-१ प्रभासपाटण वेरावळ.

संदर्भ : कुलकर्णी, द. दि. सौराष्ट्रे सोमनाथांच, पुणे, १९७६.

देशपांडे, सु. र.