सियालकोट : पाकिस्तानच्या लाहोर विभागातील (पंजाब प्रांत) एक औद्योगिक शहर आणि त्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय. शहराची लोकसंख्या १२,०३,४३१ जिल्ह्याची लोकसंख्या ४२,००,००० (२०११). जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५,३५४ चौ. किमी. त्याचा विस्तार आग्नेयीकडील रावी नदी खोऱ्यापासून उत्तरेस चिनाब नदीच्या कालव्यापर्यंत आढळतो. सियालकोट शहर चिनाब नदीकाठी लाहोरच्या उत्तरेस सु. १२८ किमी.वर वसले आहे. ते रेल्वेने वझिराबाद व पाकव्याप्त जम्मू यांच्याशी जोडले असून, लाहोर व गुजराणवाला शहरांशी रस्त्याने जोडले आहे. याच्या स्थापनेविषयी अनेक दंतकथा-वदंता प्रचलितघड्याळ मनोरा, सियालकोट असून,महाभारतातील एका पौराणिक कथेनुसार पांडवांचा चुलता शाल याने ते प्रथम वसविले. पुढे विक्रमादित्याच्या कारकीर्दीत शालिवाहन राजाने त्याची पुनर्रचना केली. इंडो-ग्रीक राजा मीनांदर (इ. स. पू. १११— ९०) आणि हूण राजा मिहिरकुल (कार. ५१५— ५४०) यांची प्राचीन शाकल (साग) राजधानी म्हणजेच आधुनिक सियालकोट असावे. मूळ शहराभोवती लहानलहान अनेक खेडी होती. ती एकत्र करुन ब्रिटिशांनी १८६७ मध्ये या शहरास नगरपालिकेचा दर्जा दिला. नगरपालिका शहराचा पाणीपुरवठा, स्वच्छता, जलनिःसारण, आरोग्य, पर्यावरण इ. सुविधांची पूर्तता करते. ब्रिटिशांनी तेथे लष्करी छावणी प्रस्थापित केली. पूर्वी हे शहर कोफ्तगारी कलेसाठी प्रसिद्घ होते. भिन्न अशा धातूंच्या तारांच्या मदतीने कलात्मक आकार-निर्मिती करुन भांडी, तबके, तलवारी, खंजीर, ढाल, म्यान यांसारख्या वस्तू सुशोभित-अलंकृत करण्यात येत. सांप्रत सियालकोट शहरात रबरी वस्तू, मृत्तिकाशिल्पे (सिरॅमिक्स), शस्त्रक्रियेची उपकरणे, चाकू-सुऱ्या (कटलरी) इ. तयार करण्याचे कुटीरोद्योग असून कापडगिरण्या तसेच क्रीडासाहित्य बनविण्याचे कारखाने आहेत.

रावी व चिनाब खोऱ्यांमुळे जिल्ह्यातील मृदा सुपीक बनलेली असून, नऊ दशांश जमिनीला चिनाब कालव्यामुळे पाणीपुरवठा (सिंचनाची व्यवस्था) होतो. त्यामुळे गहू, भात, ज्वारी, सातू , मका व ऊस ही काही प्रमुख पिके घेतली जातात. सातूचा उपयोग बीर तयार करण्यासाठी केला जातो. उसापासून साखर बनविली जाते. नगदी पिकांबरोबरच गहू-ज्वारी देशांतर्गत निर्यातही होते. शहरात दोन मोठी ग्रंथालये, अनेक रुग्णालये आणि महाविद्यालये आहेत. महाविद्यालये पंजाब विद्यापीठाशी संलग्न आहेत. याशिवाय शहरात एक जुना किल्ला, आद्य शीखगुरु ⇨ नानकदेव यांचे स्मृतिस्थळ— गुरूद्वारा— आहे. मुहम्मद इक्बाल या प्रसिद्घ उर्दू कवीचे हे जन्मस्थान होय.

सोसे, आतिश सुरेश