लॉमे : पश्चिमेस आफ्रिकेतील टोगो प्रजासत्ताकाची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या ३,६६,४७६ (१९८३). हे देशाच्या दक्षिण भागात अटलांटिक महासागरातील बेनिन उपसागर (गिनीच्या आखाताचा भाग) किनाऱ्यावर वसलेले आहे. महासागर व खारकच्छ यांदरम्याच्या सपाट व वालुकामय किनारपट्टीवर लॉमे शहराचा विस्तार झाला आहे.

पूर्वी लॉमे हे एक लहानसे खेडे होते. १८९७ मध्ये टोगोलँडमधील जर्मन वसाहतीच्या राजधानीचे ठिकाण म्हणून याची निवड झाली व थोड्याच अवधीत व्यापारी, वाहतूक व प्रशासकीय केंद्र म्हणून त्याचा विकास झाला. पहिल्या महायुद्धानंतर फ्रान्सच्या टोगो या ‘महादिष्ट प्रदेशा’ची तसेच स्वातंत्र्यानंतर (१९६०) देशाची राजधानी लॉमे हीच ठेवण्यात आली.

पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील मोजक्या मोठ्या नैसर्गिक बंदरांपैकी हे एक असून ते देशातील महत्त्वाचे प्रशासकीय, व्यापारी, औद्योगिक व वाहतूक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात हे बंदर विशेष खोल नव्हते. १९६० पासून याच्या आधुनिकीकरणास सुरूवात झाली व १९६८ मध्ये बंदराची खोली वाढविण्याचे (खोली ४२० मी) तसेच धक्का बांधण्याचे काम पूर्ण झाले. दरवर्षी १५ लाख टन मालाची हाताळणी करण्याची या बंदराची क्षमता आहे. लॉमे शहर देशातील रेल्वेमार्गांचे केंद्र असून शहरातील रस्ते दुतर्फा ताडवृक्षांची सुशोभित करण्यात आले आहेत. येथील बंदरातून मुख्यत्वे फॉस्फेट, कॉफी, खोबरे, पामतेल या देशातील प्रमुख उत्पादनांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. शहरात १९७८ पासून लॉमे तेलशुद्धीकरण कारखाना सुरू झाला असून त्याच वर्षी एका औष्णिक वीजप्रकल्पाच्या कामालाही सुरूवात झाली आहे. शहरात सर्व प्रकारच्या नागरी सुविधा विकसित झाल्या आहेत. शहराजवळच आंतरराष्ट्रीय विमानतळ असून शहरात बेनिन विद्यापीठ (स्था.१९६५), राष्टीय वैज्ञानिक संशोधन संस्था, टोगोलँड मानव्यविद्या संस्था, राष्टीय ग्रंथालय इ शैक्षणिक व सांस्कृतिक सुविधा आहेत. 

डिसूझा, आ. रे. चौंडे, मा. ल.