ॲकन्काग्वा : पश्चिम गोलार्धामधील अत्युच्च पर्वतशिखर. उंची ७,०३५ मी. दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतश्रेणीच्या अर्जेंटिना देशामधील हद्दीत हे शिखर असून याची पश्चिम उतरण चिलीमध्ये मोडते. अणकुचीदार दगडधोंडे, वायव्य व पश्चिम बाजूंकडील २० पर्यंतचे उतार, दक्षिण व नैर्ऋत्येकडील विपुल पर्जन्याचा भाग, नेहमीच पिसाटासारखे वाहणारे वादळी वारे आणि अतिशय झोंबणारी थंडी, यांमुळे हे शिखर चढणे गिर्यारोहकांना एक दिव्यच वाटते. १८९७ मध्ये फिट्सजेरल्ड याच्या तुकडीतील झुरब्रिगेन हा या शिखरावर पोहोचलेला पहिला मानव. याच्या नंतर अनेकांनी यशस्वी प्रयत्‍न केले आणि अलीकडे हे शिखर गिर्यारोहकांचे आकर्षक स्थान बनले आहे. येथून १६० किमी. पश्चिमेस असलेल्या पॅसिफिकचे व त्यावरील सँटिआगो व व्हॅलपारेझो बंदरांची विहंगम दृश्ये, दक्षिण पायथ्याशी असलेली उस्पालाता खिंड, तिच्याखालील बोगद्यातून चिली—अर्जेंटिना यांना जोडणारी ट्रॅन्स-अँडीयन रेल्वे व अँडीजमधील इतर शिखरे यांचे सुरेख दर्शन घडते.

खातु, कृ. का.