मेहेकर : महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्या तील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २२,३८२ (१९८१). हे बुलढाण्याच्या आग्नेयीस सु. ६७ किमी. वर उंच भागी वसले आहे. याच्या जवळूनच पैनगंगा नदी वाहते.

‘मेघं कर’ हे एका दैत्याचे नाव. त्यावरून मेहेकर हा शब्द बनला, असे म्हटले जाते. या दैत्याने देवांचा छळ केल्यामुळे विष्णूने सारंगधराचे रूप घेऊन त्याचे पारिपत्य केले, अशी दंतकथा आहे. एका मुसलमानी कवीने मेहेकर हिजरी शतकानुसार सु. ७९५ वर्षे जुने असल्याचा उल्लेख केला आहे. अकबरनामा या ग्रंथाच्या तिसऱ्या भागात (आईन-इ-अकबरी) मेहेकर महसुली जिल्ह्याचे मुख्यालय असल्याचा निर्देश आढळतो.

शहरात बालाजीचे प्रसिद्ध हेमाडपंती देवालय असून तेथील मूर्ती (उंची ३·१७ मी.) काळ्या संगमरवरी दगडाची आहे. मंदिराशेजारील धर्मशाळेचा जीर्णोद्धारित परकोट (‘मोमिनगेट’ १४२८) व धर्मशाळेच्या अंतर्भागातील कलाकुसरयुक्त प्रेक्षणीय स्तंभ मुसलमानी अंमलाचे निदर्शक आहेत. येथील मोमिनगेट शिलालेख प्रसिद्ध आहे. त्यावर कुराणातील २६ वा पाठ कोरलेला आढळतो. शहराच्या पूर्वभागातील मोठ्या मैदानावर पंचपीर नावाचा दर्गा आहे.

शहराची १८०३ च्या भूकंपाने बरीच हानी झाली. हे कापूस व धान्ये यांची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असून अन्नधान्ये, कापूस, तयार कपडेइत्यादींचे येथे उत्पादन होते. शहरात नगरपालिका (स्था.१९२९), रुग्णालये तसेच अन्य शासकीय कार्यालये असून येथे महाविद्यालयीन शिक्षणाची सोय आहे.

मिसार, म. व्यं.