नैनिताल : भारतातील एक प्रसिद्ध गिरिस्थान व थंड हवेचे ठिकाण. लोकसंख्या लष्करी छावणी आणि उपनगरांसह २५,१६७ (१९७१). उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे हे प्रशासकीय स्थान असून येथे त्या राज्याचे उन्हाळी अधिवेशन भरते. हे दिल्लीच्या ईशान्येस सु. २३३ किमी. वर शिवालिक पर्वतश्रेणीत स. स. पासून १,९३४ मी. उंचीवर, बरेली–बैजनाथ रस्त्यावर वसले असून याचे जवळचे लोहमार्ग स्थानक काथगोदाम आहे. शहराची स्थापना ब्रिटिशांनी १८४१ मध्ये केली १८४५ साली येथे नगरपालिका स्थापन झाली. येथील १,४३३ मी. लांब, ४६३ मी. रुंद आणि २८ मी. खोलीच्या नयनमनोहर सरोवरावरूनच ‘नैनिताल’ (ताल–सरोवर) हे नाव पडले असावे. या सरोवराभोवती शहराचा विस्तार झाला असून आसमंतात ओक, सायप्रस वृक्षांच्या जंगलवेष्टित टेकड्या आहेत.

नैनितालचे सरोवरदृश्यअतिपर्जन्यवृष्टीमुळे (१८८०) झालेल्या भूमिपातात शहराची बरीच वित्तहानी व प्राणहानी झाली. शहराच्या ईशान्येस २१ किमी. वरील मुक्तेश्वर येथे ‘इंपीरिअल व्हेटेरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूट’ ही पुण्यातील संस्था १८९३ मध्ये हलविण्यात आली. शहराच्या दक्षिणेस गंधकयुक्त उष्ण पाण्याचे झरे आहेत. वायव्येस दीड किमी. वरील २,६१० मी. उंचीचे जवाहर (चायना) शिखर हे जिल्ह्यातील अत्युच्च स्थान असून, येथे सूर्योदय व सूर्यास्ताचे रमणीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी जमते. पश्चिमेकडील देवपथ (२,४३५ मी.) व आर्यपथ (२,२७४ मी.) ही येथील आणखी दोन उंच शिखरे होत. अलमोडा व गढवाल या बर्फाच्छादित पर्वतराजींचे येथून सुंदर दृश्य दिसते. विविध खेळांचे जिमखाने, शीडजहाज शर्यती, मासेमारी, शिकार, विहारनौका, आल्हाददायक हवामान व रमणीय सृष्टिसौंदर्य यांमुळे पर्यटकांची येथे खूप गर्दी होते. आधुनिक शहराला साजेशी विद्यालये, विद्यानिकेतने (पब्लिक स्कूल्स), महाविद्यालये, आलिशान निवासस्थाने व आहारगृहे इ. सुखसोयींनी नैनिताल सुसज्ज झाले आहे.

चौधरी, वसंत