गुहा : भूपृष्ठात किंवा डोंगराच्या कुशीत निसर्गतःच निर्माण झालेली पोकळी. ही सामान्यत: मनुष्याला बाहेरून आत शिरता येण्याजोगी, आत हिंडताफिरता येण्याजोगी व बहुधा अंधारी असते. मनुष्याने मुद्दाम खडक खोदून काढलेल्या गुहा वेगळ्या त्यांना लेणी म्हणतात. काही गुहा खूपच ऐसपैस आणि प्रशस्त असतात, तर काही केवळ आसऱ्यापुरत्या खबदाडी किंवा कपारी असतात.

काही गुहा खडक तयार होत असतानाच निर्माण होतात. लाव्हा रस वाहत असताना त्याचा वरचा थर निवून घट्ट झाला आणि त्याखालचा वाहता थर निघून गेला म्हणजे त्याच्या जागी लांबच लांब, नळीसारखी किंवा बोगद्यासारखी पोकळी राहते, ती लाव्हाजन्य गुहा होय. समुद्रकाठच्या उभ्या खडकावर लाटांचा मारा सतत होत राहून खडकाच्या तळचा भाग झिजून जाऊन समुद्रकाठची गुहा तयार होते. तथापि यांपेक्षा पुष्कळच अधिक प्रमाणात आढळून येणाऱ्या गुहा म्हणजे विद्रावजन्य गुहा होत. चुनखडकात किंवा डोलोमाइटमध्ये जोडांच्या उभ्या भेगांतून पृष्ठभागावरील पाणी झिरपत खाली जाते, तेव्हा त्यातील सेंद्रिय अम्लांमुळे किंवा विरघळलेल्या कार्बनडाय-ऑक्साइड वायूमुळे त्या खडकाचा काही भाग त्यात विरघळतो. यामुळे भेगा रुंदावतात, भूमिगत पाण्याचे मार्ग मोठे होतात व खडकात पोकळी तयार होते. खडकांचे जोड, भेगा, विभंग या ठिकाणी खडकांच्या थोड्याशाही हालचालींमुळे तोंडे पडतात व ती मोठी होत जाऊन लहान मोठ्या गुहा निर्माण होतात. काही वेळा वरील भार सहन न होऊन गुहांची छपरे कोसळतात. कार्स्ट प्रदेशातील विवरे म्हणजे छपरे कोसळलेल्या गुहात होत [→ कार्स्ट भूमिस्वरूप].

विद्राव्यजन्य गुहांबाबत तीन अवस्था दिसून येतात : (१) प्रथम खडक विरघळून पोकळी तयार होते, (२) भूपृष्ठावरून येणाऱ्या पाण्याबरोबर आलेली माती, वाळू, दगडधोंडे इत्यादींनी पोकळी भरून जाते व (३) गुहेतून वाहणाऱ्या पाण्याबरोबर हे पदार्थ वाहून जातात. याच वेळी विद्रावातील क्षारादी द्रव्ये गुहेच्या भिंतीवर, तळावर, छपराच्या खालच्या बाजूवर साठू लागतात. काही शास्त्रज्ञांच्या मते या तिन्ही क्रिया एकाच वेळी घडून येतात, तर काहींच्या मते या तिन्ही अवस्था वेगवेगळ्या, स्वतंत्र आहेत. पहिली जलरेषेच्या बरेच खाली, दुसरी त्या रेषेच्या जवळ व तिसरी भूपृष्ठ व जलरेषा यांच्या दरम्यान घडून येते.

काही गुहांत आत खोलवर उतरून जावे लागते, तर काही गुहांतील मार्ग सरळ पुढे गेलेले असतात. काही गुहांमधील लांबच लांब वाटा एकावर एक अनेक पातळ्यांवर असतात. गुहांच्या तळावर प्रवाहाबरोबर आलेली मऊ माती असते. क्वचित तिच्यात लहानमोठे दगड असतात. प्रवाशांच्या दृष्टीने विद्रावजन्य गुहांतील प्रमुख आकर्षण म्हणजे गुहेच्या छपरापासून खाली एखाद्या प्रचंड झुंबरासारखे लोंबणारे अधोमुख लवणस्तंभ व तळावर उभे राहिलेले सुळक्यासारखे किंवा मनोऱ्यासारखे ऊर्ध्वमुख लवणस्तंभ हे होत. कधीकधी हे दोन्ही एकमेकांस मिळालेले दिसतात, तर कधीकधी त्यांतील काही अर्ध पारदर्शकही असतात. गुहांच्या भिंतीवरही क्षारांचे चित्रविचित्र आकाराचे थर पडद्यासारखे साचलेले दिसतात आणि तळावर क्षारांचे थर व त्यांचे बनलेले लहानमोठे बांध दिसतात. अलीकडे अशा गुहांतून प्रवाशांसाठी वाटाडे, प्रवाह असल्यास त्यातून जाणाऱ्या नावा, विजेचे दिवे, खालीवर जाण्यासाठी विजेचे पाळणे, क्वचित विजेच्या गाड्या इ. सोयी केलेल्या आढळतात. त्या उत्पन्नाच्या बाबी होत. काही गुहांतून मिळणारे क्षार, वाळू, माती, पक्ष्यांची विष्ठा याही उत्पन्नाच्या बाबी होत. अमेरिकेतील काही गुहांत मिळालेल्या सोऱ्याचा उपयोग यादवी युद्धाच्या वेळी बंदुकीची दारू तयार करण्यासाठी केलेला होता.

प्राचीन काळी मानवाने गुहांचा उपयोग आश्रयासाठी केलेला होता हे तेथे सापडलेली त्याची उपकरणे, हत्यारे, त्याने मारून आणलेल्या प्राण्यांची हाडे, शेकोट्या, त्याने तेथील भिंतीवर रेखाटलेली चित्रे यांवरून दिसून येते. आजही काही मागासलेल्या भागातील लोक गुहांचा आश्रय घेतात, तर भारतासारख्या देशात ईश्वरचिंतनासाठी गुहांत राहणारे साधू पुष्कळ आहेत. वन्यपशूही गुहांचा, विशेषतः खबदाडींचा, आसरा घेतात. हिमयुगापूर्वीच्या गुहावासी अस्वलांचे, सिंहांचे व तरसांचे अवशेष सापडलेले आहेत.

गुहांच्या तोंडाशी पृष्ठभागावरच्यासारखेच तपमान आणि आर्द्रता आढळते. परंतु अंतर्भागात सरासरी वार्षिक तपमानाइतकेच तपमान व कित्येकदा १००% आर्द्रता आढळते. अनेक तोंडांच्या गुहांत हवा खेळती राहते, तर काही गुहांत श्वासोच्छ्‌‌वासाप्रमाणे हवा आलटून पालटून आतबाहेर येत असते. काही गुहांत, विशेषतः लाव्हाजन्य गुहांत, वर्षभर बर्फ आढळते.

वटवाघुळासारखे काही प्राणी गुहांचा तात्पुरता आसरा घेतात, तर काही अधिक काळ गुहेत राहतात. गुहेत कायम राहणारे काही कीटक, कोळी, मासे, सरडे इ. आंधळे असतात परंतु त्यांचे स्पर्शज्ञान फार तीव्र असते. 

गुहांचा काळ लवणस्तंभांच्या वाढीच्या वेगावरून, तेथील जीवाश्मांवरून किंवा चुनखडकाच्या विरघळण्याच्या वेगावरून ठरविता येतो.

हिमालय, आग्नेय आशिया, इंडोचायना, यूरोपातील फ्रान्स ते स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटलीमधून यूगोस्लाव्हियापर्यंत गेलेला दक्षिण व मध्य आल्प्सचा चुनखडकाचा प्रदेश, अमेरिकेतील कित्येक राज्ये व जगातील इतरही अनेक देश यांत विद्रावजन्य गुहा आढळतात. अमेरिकेतील केंटकीमधील मॅमथ गुहेतील ४८ किमी. लांबीचे मार्ग माहीत झाले आहेत. न्यू मेक्सिकोमधील कार्ल्झबॅद गुहेतील एक दालन ०·८ किमी. लांब, १३३ मी. रुंद व १२३ मी. उंच आहे. फ्रान्समधील ग्रनॉबलजवळील गुहा ही मनुष्याने गाठलेल्या जास्तीत जास्त खोलीची (१,१२२ मी.) गुहा होय. स्वित्झर्लंडमधील हॉलॉक गुहेची ५० किमी. लांबी ही जगातील मोजलेल्या गुहेची जास्तीत जास्त लांबी आहे. इटलीतील काप्री येथील ब्लू ग्रातो या किनारी गुहेच्या तोंडातून सुंदर निळा प्रकाश येतो. यूरोपातील काही गुहांत प्राचीन मानवाचे अवशेष सापडले आहेत. कॉकेशसमधील गुहेत रेडियम आढळले आहे. महाराष्ट्रात अहमदनगरजवळील डोंगरात चुनखडकाच्या थरात विद्रावजन्य गुहा पहावयास सापडते. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरही लाटांमुळे तयार झालेल्या पुष्कळ गुहा आढळतात.

हल्ली गुहांचा अभ्यास करण्याचे स्पेलिऑलॉजी हे एक स्वतंत्र शास्त्रच बनले आहे. त्याच्या अभ्याससंस्था अमेरिकेतील व यूरोपातील प्रमुख देशांत निघाल्या आहेत. अनेक शास्त्रांच्या अभ्यासाची आवश्यकता आणि साहसप्रवृत्तीला वाव यांमुळे अधिकाधिक तरुण या शास्त्राकडे आकर्षिले जात आहेत. 

  

कुमठेकर, ज. ब.


भारतातील आदिम गुहाचित्र, भीमबेटका, मध्य प्रदेश हिमकणांनी तयार होणारे नैसर्गिक शिवलिंग, अमरनाथ गुहा 
 आदिम चित्रकलेच्या ॲ्क्झिअल दालनाचे प्रवेशद्वार, लॅस्को गुहा, माँतेन्याक (फ्रान्स)  गोरखनाथ गुहा, त्र्यंबकेश्वर
 अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, कार्ल्झबॅद गुहा, न्यू मेक्सिको