भिलाई येथील पोलाद कारखान्याचे दृश्य

भिलाई :  भारतातील लोखंड-पोलाद उद्योगाचे प्रमुख केंद्र. हे मध्य प्रदेश राज्याच्या दुर्ग जिल्ह्यात, दुर्ग शहराच्या पूर्वेस १२.८ किमी. दक्षिण-मध्य लोहमार्गावर वसलेले आहे. लोकसंख्या २,९०,२७६ (१९८१). रशिया व भारत यांच्यातील १९५५ च्या करारान्वये रशियाच्या तांत्रिक व आर्थिक सहकार्याने येथील लोखंड-पोलाद कारखान्याची उभारणी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या ‘हिंदुस्थान स्टील कं लिमिटेड’च्या प्रमुख तीन कारखान्यांत या कारखान्याचा समावेश असून त्याची प्रारंभी उत्पादनक्षमता १० लक्ष टनांपर्यंत होती, ती १९८३ च्या मध्यास ४० लाख टनांपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. येथे लोखंडी-पोलादाव्यतिरिक्त अन्य छोट्या उद्योगांचाही विकास झालेला आहे.

  

शहराची रचना नियोजनबद्ध केलेली दिसून येते. शहरामध्ये अनेक उद्याने व खेळांची मैदाने असून, भारत-रशिया मैत्रीचे प्रतीक म्हणून समजली जाणारी येथील ‘मैत्रीबाग’ (फ्रेंडशिप गार्डन) प्रसिद्ध आहे.

गाडे, ना. स.