एल्बा : इटलीच्या लेगहॉर्न प्रांताच्या कक्षेतील पश्चिम किनाऱ्याजवळील बेट. क्षेत्रफळ २२० चौ. किमी. लोकसंख्या २७,६०२ (१९६१). हे प्योंबीनोपासून अकरा किमी. नैर्ऋत्येस, टिरीनियन समुद्रात आहे. याच्या पूर्व भागात मायकाशिस्ट, नाइस व चुनखडक त्याचप्रमाणे मॅग्‍नेटाइट व लिमोनाइट या लोहधातुकांचे साठे आहेत. मध्यभागात इओसिन, सर्पेंटाइन व ग्रॅनाइट खडक आहेत. पश्चिमेकडील मौंट-कापानी १,०१८ मी. उंच आहे. भूमध्यसामुद्रिक हवामानामुळे विविध वनस्पती, ऑलिव्ह व द्राक्षे विपुल आहेत. अँकोव्ही, टनी व सार्डीनची मासेमारी महत्त्वाची आहे. प्राचीन काळी इट्रुस्कन लोक येथून लोहधातुक नेत असत. बेटास ग्रीक इथालिया व रोमन इल्वा म्हणत. अनेक शतके लोहधातुक काढल्याने खाणी खोल जाऊन खर्च वाढला म्हणून बेटावरून लोहधातुक काढणे १९६० नंतर जवळजवळ बंद झाले आहे. लाँबर्डी, पीसा, प्योंबीनो, फ्लॉरेन्स, नेपल्स इ. अनेक छोट्या राज्यांच्या ताब्यात हे बेट होते. १५९६ ते १७०९ पर्यंत ते स्पेनकडे होते. १८०२ मध्ये नेपल्सने ते फ्रान्सला दिले. १८१४ मध्ये नेपोलियनला येथे हद्दपार करण्यात आले. १८१५ मध्ये नेपोलियन फ्रान्सला परतल्यानंतर हे तस्कनीला मिळाले व १८६० मध्ये इटालियन राज्यात सामील झाले. पॉर्तोफारायो हे बेटाच्या उत्तर किनाऱ्यावरील प्रमुख शहर असून त्यावर झोत भट्‍ट्या आहेत. नेपोलियनचा राजवाडा येथेच आहे. सहा किलोमीटरवरील सान मार्तीनो येथे वस्तुसंग्रहालय व चित्रांचा संग्रह आहे. आज हे बेट हौशी प्रवासीस्थल म्हणून प्रसिद्ध आहे.

डिसूझा, आ. रे.