मॅराथॉन : ग्रीसमधील इतिहासप्रसिद्ध गाव व मैदान. अथेन्सच्या ईशान्येस ३२ किमी. अंतरावरील हे गाव पेटाल्यॉनच्या आखाताजवळ वसले आहे. मॅराथॉन मैदान सांप्रतच्या मॅराथान गाव्याच्या आग्नेयीस असून ग्रीक पुराणकथेनुसार अथेन्सच्या थीस्यूस या साहसी राजाने मीनोटॉर (वृषभमुखी मावनदेहाचा नरभक्षक प्राणी) याचा वध याच मैदानात केला. अथेनियन आणि प्लाटीयन सैन्याने मिल्टायडीझच्या नेतृत्वाखाली याच मैदानात पर्शियन सैन्याचा पराभव केला (इ.स.पू. ४९०). फायडिपिडीझ या धावपटूने मॅराथॉन ते अथेन्स हे अंतर पळत जाऊन या विजयाची वार्ता अथेन्समध्ये पोहोचवली. या युद्धातील विजयामुळे मॅराथॉन गावाला महत्त्व प्राप्त झाले आणि फायडिपिडीझच्या या विक्रमामुळे लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीला ‘मॅराथॉन शर्यत’ असे नाव मिळाले. अथेन्समध्ये १८९६ मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये प्रथमच या शर्यतीचा अंतर्भाव करण्यात आला.

मॅराथॉन मैदानाच्या नैर्ऋत्य भागात अथेनियन सैनिकांच्या थडग्यांचे अवशेष पहावयास मिळतात. गावाच्या पश्चिमेस मॅराथॉन तलाव असून तेथून अथेन्स शहराला पाणीपुरवठा केला जातो.

  पंडित, भाग्यश्री