स्ट्रेबो"स्ट्रेबो : ( इ. स. पू. सु. ६३ ? — इ. स. २४ ?) प्रसिद्ध ग्रीक भूगोलवेत्ता, इतिहासकार व तत्त्वज्ञ. जन्म आशिया मायनरमधील पाँटस राज्यातील ( सध्याच्या टर्की देशा-तील ) आमास्या येथे. त्याकाळी ज्ञात असलेल्या प्राचीन जगाची सविस्तर माहिती ग्रथित करणारा भूगोलवेत्ता म्हणून त्याची ख्याती आहे. त्याचे कुटुंब ग्रीक व स्थानिक मूळ रहिवासी यांचे मिश्रवंशीय होते. कुटुंबातील काही लोक पाँटसच्या राजदरबारी उच्चाधिकारी होते. स्ट्रेबोने वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत आशिया मायनर, ग्रीस इ. प्रदेशांत तसेच रोम व ॲलेक्झांड्रिया येथे जाऊन विद्यार्जन केले होते. पुढे इतिहास आणि भूगोल यांविषयीची माहिती गोळा करण्यासाठी त्याने अनेक देशांचा प्रवास केला.

स्ट्रेबोवर होमर, एराटॉस्थनीझ, पॉलिबिअस व पॉसाडोनीअस या इ. स. पू. सु. चौथ्या ते पहिल्या शतकांतील इतिहासकारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा व ऐतिहासिक दाखल्यांचा पुरेपूर वापर करून स्ट्रेबोने आपले लेखनकार्य पुढे चालू ठेवले होते. त्याच्या मते, पृथ्वीवरील ज्ञात प्रदेशाचे यथातथ्य वर्णन करणे हे भूगोलवेत्त्याचे काम आहे आणि त्यासाठी गणितादी शास्त्रांचा अभ्यास असणे अत्यावश्यक आहे. स्ट्रेबोे कर्तव्यपालनाचे नीतिशास्त्र सांगणार्‍या स्टोइक पंथाचा अनुयायी होता. त्यामुळे सुशिक्षित वाचक ज्ञानसंपन्न व्हावा हा उद्देश त्याच्या लेखनकार्यात स्पष्ट दिसून येतो. त्याने ऐतिहासिक आणि भौगोलिक माहिती मिळविण्यासाठी दक्षिण यूरोप, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशिया या प्रदेशांचा प्रवास केला होता. या प्रवासात मिळविलेली माहिती त्याने इ. स. पू. २० मध्ये हिस्टॉरिकल स्केचेस म्हणून एकूण ४७ पुस्तकांच्या स्वरूपात तयार केली होती परंतु ते बहुतांश लेखन कालौघात नष्ट झाले. त्यानंतर त्याने जिऑग्राफिका हा १७ खंडीय ग्रंथ लिहिला. या १७ खंडांमध्ये भूगोलाच्या प्राकृतिक, गणितीय, ऐतिहासिक, स्थलवर्णनात्मक इ. शाखांची माहिती दिलेली आहे. यांपैकी सातव्या भागाव्यतिरिक्त ( मॅसिडोनिया व थ्रेस संबंधीचा ) इतर सर्व अस्तित्वात आहेत. यांमध्ये त्याकाळी ज्ञात असलेल्या जगाच्या प्रत्येक भागाचे सविस्तर वर्णन असून त्यांत ऐतिहासिक, पौराणिक तसेच राजकीय घडामोडी, तत्कालीन प्रमुख शहरांची वर्णने, तेथील प्राणी, वनस्पती, लोकजीवन व थोर व्यक्ती इ. माहितीचा समावेश आहे. कोलंबसने या माहितीचा आपल्या प्रवासात उपयोग करून घेतला होता. या १७ खंडांपैकी दोन खंड प्रास्ताविक स्वरूपाचे असून त्यांमध्ये मुख्यत्वे भूगोलाच्या व्याख्येविषयीची तज्ञांची मते व विश्लेषण तसेच भूगोलाची व्याप्ती दर्शविणार्‍या माहितीचा समावेश आहे. आठ खंड यूरोप, सहा खंड आशिया व एक खंड आफ्रिका ( विशेषतः ईजिप्त ) यांच्या वर्णनांसाठी वापरलेले आहेत. १४७२ मध्ये यांचे लॅटिनमध्ये भाषांतर झाले असून मूळ ग्रीक भाषेतील मुद्रित प्रत १५१६ मध्ये तयार करण्यात आली आहे. त्यानंतरच्या काळात याची अनेक भाषांमध्ये भाषांतरे प्रसिद्ध झाली आहेत.

पृथ्वी आणि अंतरिक्ष ही दोन्ही गोलाकार असून त्यांचा मध्यबिंदू आणि आस एकच आहेत. पृथ्वी स्थिर असून अंतरिक्ष पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असते. पृथ्वीतलावरील मानवाची वस्ती असलेले भूमिप्रदेश ( यूरोप, आशिया व आफ्रिका ) म्हणजे पूर्व – पश्चिमेस निमुळते झालेले लांबट आकाराचे एक मोठे बेट असून ते सर्व बाजूंनी सागराने वेढलेले आहे, अशा प्रकारची त्याची मते या ग्रंथात आढळतात. अर्थात ती सर्वच सत्य नाहीत, हे उघड आहे. स्ट्रेबोचे बहुतेक लेखन भूमध्य व त्याजवळचे पूर्व भाग यांविषयी विस्तृतपणे झाल्याचे दिसते. एकूणच स्ट्रेबो हा स्वतंत्र प्रज्ञेचा संशोधक मानता येत नसला तरी, त्याचे व्यक्तिगत अनुभव व त्याने केलेली वर्णने, तसेच प्राचीन काळातील ऐतिहासिक घटना आणि व्यक्ती यांविषयीची मौलिक माहिती मिळविण्याचे महत्त्वाचे साधन म्हणून त्याच्या ग्रंथांची उपयुक्तता वादातीत आहे.

त्याचे रोम येथे निधन झाले.

चौंडे, मा. ल.