नाऊरू: नैर्ऋत्य पॅसिफिकमधील द्वीप-प्रजासत्ताक व जगातील सर्वांत लहान राष्ट्र. क्षेत्रफळ २१·३ चौ. किमी., घेर १९ किमी., लांबी सु. ५·६ किमी., रुंदी सु. ४ किमी. लोकसंख्या ७,१२८ (१९७५ जुलैअखेर). सॉलोमन व गिल्बर्ट बेटांदरम्यान ०° ३२′ द. व १६६° ५५′ पू. यांदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस २,०८० किमी. व ओशन बेटापासून ३०४ किमी. पश्चिमेस असलेल्या या प्रजासत्ताकास अधिकृत राजधानी नाही तथापि यारेन विभागातील डोमानेब येथून राज्यकारभार चालतो. बेटाचे १४ शासकीय विभाग आहेत.

भूवर्णन: भूहालचालींनी ४० मी. उचलल्या गेलेल्या या बेटाभोवती प्रवाळभित्तीचा वेढा असून ती ओहोटीच्या वेळी उघडी पडते. तिचा समुद्राकडील उतार तीव्र असून जमिनीच्या बाजूस वाळूची पुळण आहे. तिच्यात प्रवाळ खडकांची टोके वर आलेली दिसतात.  पुळणीपलीकडे सु. १३५ मी. ते २७५ मी. रुंदीचा सुपीक भूमीचा पट्टा असून, त्याच्या पलीकडे सु. ६६ मी. उंच प्रवाळकडे व त्यांवर विस्तीर्ण उजाड पठार आहे. पठाराच्या नैर्ऋत्य भागात बुआडा हे खारकच्छ आहे. पठारावर उत्तम फॉस्फेटचा मोठा साठा असून त्याच्याखाली प्रवाळाची ओबडधोबड भूमी आहे. या बेटास चांगले बंदर किंवा नांगर टाकण्यास सोयीची जागी नाही.

हवामान: येथील हवामान उष्ण आणि आर्द्र असून ते सागरी वाऱ्यांनी सुसह्य होते. तपमान २५° से. ते ३४° से. पर्यंत, सापेक्ष आर्द्रता ८०% व वार्षिक सरासरी पर्जन्यमान २०० सेंमी. असते. पाऊस पश्चिमी मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. कधीकधी अवर्षणही येते. लोक सुपीक भागात राहतात. पावसाचे पाणी साठवून वापरावे लागते. बेटावरील पाणी मचूळ आहे. तेथे नारळ, आंबे, पेरू, पोपया, केळी, लिंबे, फणस ही पूरक अन्न म्हणून उपयोगी येणारी फळे होतात. नारळ, केवडाजातीची व खुरटी झुडुपे, काही फुलझाडे या नैसर्गिक वनस्पती आहेत. काही पक्षी असून लोकांनी डुकरे व कोंबड्या-बदके पाळली आहेत. १९७५ मध्ये नाऊरूत नारळांचे उत्पादन १,७०० मे. टन झाले त्याच वर्षी ४,००० कोंबड्या व २,००० डुकरे असे पशुधन होते. बेटाभोवती ट्यूना आणि बॉनिटो मासे विपुल आहेत. सुपीक पट्ट्याभोवती ५ मी. रुंद रस्ता असून त्यापासून वस्त्यांपर्यंत रस्ते व पायवाटा जातात.

इतिहास व राज्यव्यवस्था: १७९८ मध्ये कॅ. फर्न याने हे बेट प्रथम पाहिले. तेथील स्थानिक रहिवाशांनी केलेले स्वागत व एकूण दृश्य यांवरून त्याने त्याला ‘प्लेझंट आयलंड’ असे नाव दिले होते. १८८८ मध्ये जर्मनीने ते मार्शल बेटांचा भाग म्हणून त्यांत समाविष्ट केले. पहिल्या महायुद्धात ऑस्ट्रेलियन एक्स्पिडिशनरी फोर्सने ते काबीज केले. १९२० मध्ये राष्ट्रसंघाने ते ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांजकडे महादिष्ट प्रदेश म्हणून सोपविले. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी व जपान या दोन राष्ट्रांनी त्यावर खूपच बाँबवृष्टी केली. १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांचा विश्वस्त प्रदेश म्हणून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व ब्रिटन यांच्यावतीने ऑस्ट्रेलियाकडे नाऊरूचा कारभार आला. १९५१ पासून राजकीय जागृती होऊन जानेवारी १९६६ मध्या नाऊरू विधान परिषद अस्तित्वात आली. जानेवारी १९६८ अखेर विश्वस्त करार संपला व नाऊरूचे स्वतंत्र प्रजासत्ताक स्थापन झाले. तथापि त्याचे ब्रिटिश राष्ट्रकुलाशी खास संबंध राखले गेले. जानेवारी १९७२ अखेर २० वर्षांवरील नाऊरू लोकांनी तीन वर्षांकरिता निवडून दिलेल्या १८ सदस्यांचे एकसदनी संसद अस्तित्वात आले. चार-पाच नियुक्त मंत्र्यांच्या साहाय्याने राष्ट्राध्यक्ष कारभार पाहतो. संसद राष्ट्राध्यक्षाची निवड करते. डिसेंबर १९७६ च्या अध्यक्षीय निवडणुकीत बर्नार्ड दोवियोगो हे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. नाऊरूत सैन्य नाही. १९६८ अखेर ६४ पोलीस मात्र होते. विभागीय, मध्यवर्ती आणि सर्वोच्च न्यायालये आहेत. दक्षिण पॅसिफिक आयोग, आंतरराष्ट्रीय दूरसंदेशवहन संघटना व आंतरराष्ट्रीय टपाल संघटना यांचा नाऊरू सभासद आहे. तो संयुक्त राष्ट्रांचा सभासद नाही.

आर्थिक स्थिती: फॉस्फेट ही येथील अर्थव्यवस्थेचा एकमेव आधार आहे. येथील फॉस्फेटचा शोध १८९० मध्ये लागला व १९०१ पासून ते खणून काढले जाऊ लागले. १९०६ मध्ये एक ब्रिटिश कंपनी येथील फॉस्फेट काढीत असे. १९१९ मध्ये पॅसिफिक फॉस्फेट कंपनीपासून ग्रेट ब्रिटन, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या शासनांनी येथील फॉस्फेटचा धंदा विकत घेतला व तिन्ही शासनांचे मिळून एक आयुक्तमंडळ व्यवस्थेसाठी नेमले. १ जुलै १९७० रोजी नाऊरू फॉस्फेट कॉर्पोरेशनकडे व्यवस्था व नियंत्रण आले. १९७१–७२ मध्ये फॉस्फेटचे उत्पादन १९,०६,००० मे. टन झाले. येथील फॉस्फेट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व जपान यांकडे निर्यात होते. फॉस्फेटचा साठा विसाव्या शतकाअखेरपर्यंतच पुरेल असा अंदाज आहे. अन्नपदार्थ, बांधकाम साहित्य, फॉस्फेट धंद्यासाठी यंत्रसामग्री व वाहने ही मुख्य आयात आहे. फक्त तंबाखू, सिगारेट व मद्यार्क यांवर आयातकर आहे. नाऊरूचे दरडोई वार्षिक उत्पन्न सु. १,६०० ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. २,३०६ कामगारांत ७५८ नाऊरू, ८५४ पॅसिफिक-द्वीपीय, १९८ यूरोपीय व ४९६ चिनी होते. नाऊरूत एकच कामगारसंघटना आहे. जून १९७४ अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी २,५४,६५,९०८ ऑ. डॉलर जमा आणि २,४३,७७,१३८ ऑ. डॉलर खर्च संकल्पित होता. यांपैकी ५,७४,११९ ऑ. डॉलर आरोग्यावर व ११,११,१९५ ऑ. डॉलर शिक्षणावर खर्च व्हावयाचे होते. बेटावरील एका डीझेल जनित्रावर उत्पादन केलेली वीज वापरली जाते. १९७२ मध्ये २१० लक्ष किवॉ. ता. वीज उत्पादन झाले.

मुद्रा व चलन: १०० सेंटचा ऑस्ट्रेलियन डॉलर हे येथील चलन आहे. १ अमे. डॉ. = ९५ ऑ. सेंट आणि १ स्टर्लिंग पौंड = १·५९ ऑ. डॉ. असा विनिमय दर आहे (डिसें. १९७६). १, २, ५, १०, २० व ५० सेंटची नाणी व १, २, १०, २० डॉ. च्या नोटा असतात. वजने-मापे ब्रिटिश आहेत. येथे बँक ऑफ न्यू साउथ वेल्सची शाखा असून तिच्याऐवजी १९७७ मध्ये बँक ऑफ नाऊरूची स्थापना होत आहे. देशात नाऊरू विमानिगम ही एक विमासंस्था आहे.

दळणवळण: नाऊरूत ५ किमी. लांबीचा मीटरमापी लोहमार्ग फॉस्फेट उद्योगक्षेत्राशी निगडीत असून सु. २० किमी. लांबीचा गोलाकार पक्का रस्ता आहे. १९७२ मध्ये १,५३४ नोंदलेली वाहने होती. बंदर नसल्यामुळे प्रवाळभित्तीच्या अलीकडून फिरता पट्टा व अर्धबहाल यांच्या विशिष्ट रचनेने माल पलीकडील जहाजात भरला जातो. नाऊरू पॅसिफिक शिपिंग लाइनच्या ५ जहाजांतून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे व जपान यांच्याकडे वाहतूक होते. बेटावर एक विमानतळ असून एअर पॅसिफिक लि. तर्फे फिजी बेटांकडे दर पंधरवड्यास वाहतूक होते. एअर नाऊरूची विमाने मेलबर्न, हाँगकाँग, आपीआ, होनीआरा, ग्वॉम, तावारा, माजुरो, वालिस बेटे व कागोशिमा येथे जातात. सिडनी, सूव्हा, नंदी, तारावा, ओशन बेटे, पोर्ट मोर्झ्‌बी यांच्याशी बिनतारी संपर्क साधता येतो. सिडनीशी रेडिओ, दूरध्वनीवरून बोलता येते. उपग्रहामार्गे रेडिओ संदेशवहनही १९७६ मध्ये सिद्ध होत होते. तथापि बेटावर रेडिओ किंवा दूरदर्शन केंद्र नाही.

लोक व समाजजीवन: १९७१ मध्ये सु. ७,००० लोकसंख्येपैकी २,७३४ नाऊरू, ९०० चिनी, सु. १,८०० गिल्बर्ट व एलिस बेटांतून फॉस्फेट खाणकामासाठी आलेले व ४४६ यूरोपीय होते. १९७५ च्या ७,१२८ लोकांपैकी ३,८६५ नाऊरू होते. जपान्यांनी १९४२ ते ४५ च्या आपल्या अंमलात १,२०० नाऊरूंना ट्रक बेटावर नेले होते, त्यांपैकी ७३७ लोक १९४५ मध्ये परत आले. शासन व मिशनरी यांच्याकडील थोड्याशा जमिनीशिवाय सर्व जमीन पारंपरिक पद्धतीने व्यक्तींच्या मालकीची आहे. बहुतेक सर्व लोक ख्रिस्ती आहेत. नाऊरू लोक पॉलिनीशियन समूहाचे असून ते मायक्रोनीशियन व नाऊरूअन भाषा बोलतात. शाळा, कारभार, व्यापार यांसाठी इंग्रजी भाषा चालते. त्यांची १२ कुळे असून मातृसत्ताक व पितृसत्ताक पद्धतींचे मिश्रण आढळते. अलीकडे कॉकेशियन, निग्रॉइड आणि इतर पॅसिफिक-द्वीपीय लोकांशी संबंध येऊन मिश्रवंश झाला आहे. बहुतेक कारभार, शिक्षण वगैरे कॉकेशियनांच्या व ऑस्ट्रेलियनांच्या हाती आहे.

शिक्षण: ६ ते १५ वर्षे वयाच्या यूरोपीयांस व ६ ते १६ वर्षे वयाच्या नाऊरूंस शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. १९७५ मध्ये ७ बालवर्ग व प्राथमिक शाळांत ८८ शिक्षक व १,४४० विद्यार्थी २ माध्यमिक शाळांत ३३ शिक्षक व ४७५ विद्यार्थी होते. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये माध्यमिक, उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांस शिष्यवृत्त्या मिळतात. १९७५ मध्ये ७९ नाऊरू विद्यार्थी परदेशात शिकत होते. पापुआ न्यू गिनी व साउथ पॅसिफिक या विद्यापीठांत व इतर केंद्रांत १९७५ मध्ये १३ विद्यार्थी शिष्यवृत्त्यांवर शिकत होते.

आरोग्य व समाजकल्याण: जीवनसत्त्वांच्या अभावी होणारे तसेच क्षय आणि कुष्ठरोग हे प्रमुख रोग आहेत. आधुनिक उपचारांनी ते नियंत्रित केले आहेत. १९६८ मध्ये २ आधुनिक रुग्णालये व १७५ रुग्णशय्या तसेच १० डॉक्टर, ६९ परिचारिका व २ दंतवैद्य होते. बेटावर वैद्यकीय व रुग्णालयसेवा आणि शिक्षण विनामूल्य असते. वार्धक्य, अपंगत्व, आजारपण आणि वैधव्य तसेच बालकसेवा यांची स्थानिक शासकीय परिषदेतर्फे सोय होते. स्वातंत्र्यदिनी ४६२ नाऊरूंची, २१६ यूरोपीयांची व सु. १०० चिनी, गिल्बर्ट आणि एलिस-द्वीपीयांची घरे अथवा गाळे होते. फक्त २ इंग्रजी आणि इतर काही नाऊरू वार्तापत्रिकांशिवाय वृत्तपत्रे बाहेरून येतात. (चित्रपत्रे ३, २५).

डिसूझा, आ. रे. कुमठेकर, ज. ब.