अचलपूर :अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या ४२,३३३ कँप २४,०८९ (१९७१). वऱ्‍हाडची ही एकेकाळची भरभराटलेली राजधानी. तिचे पूर्वीचे नाव एलिचपूर. सातव्या शतकातल्या ताम्रपटात याचा निर्देश सापडतो. तेराव्या शतकात दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर असा अचलपूरचा बराणीने उल्लेख केला आहे. अलाउद्दीनाच्या कारकीर्दीत तसेच इमादशाही व निजामशाही यांच्या काळात ही वऱ्‍हाडची राजधानी होती. इदगा, हौसकटोरा तलाव व मनोरा, मशिदी, सुलतानपुरा वगैरे तत्कालीन वास्तू प्रेक्षणीय आहेत. अचलपूर अमरावतीच्या वायव्येस ४८ किमी. असून शहर व कँप (पूर्वीचे परतवाडा हे लष्करी ठाणे) यांसाठी दोन नगरपालिका आहेत. दोन्हींचे मिळून क्षेत्रफळ ७․८ चौ.किमी. आहे. १९७१ मध्ये येथील साक्षरता १․२ टक्के होती. येथे एक महाविद्यालय  व सात माध्यमिक शाळा आहेत. एक मोठी कापडगिरणी, आगपेट्यांचा एक कारखाना व सरकी  काढून गठ्ठे बांधण्याचे अनेक कारखाने शहरात आहेत. अरूंद मापी फाट्याने मुंबई-नागपूर रेल्वेमार्गातील मुर्तिजापूर या स्थानकाशी आणि सडकेने अमरावती व इतर नजीकच्या शहरांशी हे गाव जोडलेले आहे.

कुलकर्णी, गो. श्री.