क्वीबेक : क्वेबेक. कॅनडाच्या क्वीबेक प्रांताची राजधानी. लोकसंख्या १,९३,९८४ (१९७१), उपनगरांसह ४,८७,००० (१९७२). हे माँट्रिऑलच्या ईशान्येस २४० किमी. सेंट लॉरेन्स व सेंट चार्ल्स नद्यांच्या संगमावर असून जवळच लॉरेन्सचे पात्र एकदम चिंचोळे होते. अल्गाँक्वियन रेड इंडियनांच्या भाषेत क्वीबेक याचा अर्थ ‘येथे नदी चिंचोळी होते’ असा आहे.

क्वीबेक : एक दृश्य.

क्वीबेकचा लोअर क्वीबेक हा भाग बंदराच्या आसपासच्या सपाटीवर असून अपर टाउन हा बाग सु. १०० मी. उंचीच्या टेकडावर आहे. अपर टाउनमध्ये सुदंर घरे, प्रशस्त सरळ रस्ते, भव्य शासकीय इमारती, चर्चेस इ. असून लोअर टाउनमध्ये वाकडेतिकडे अरुंद रस्ते, दीडदोनशे वर्षांपूर्वीची जुनी घरे, इमारती वगैरे  असली, तरी तोच शहराचा व्यापारी विभाग आहे. क्वीबेकमध्ये सु. ४०० लहानमोठे कारखाने असून कागदासाठी लगदा व कागद तयार करणे, जहाजबांधणी व दुरूस्ती, कातडी कमावणे, दारू गाळणे, धातुसामान, पादत्राणे, तंबाखूचे पदार्थ, तयार कपडे इ. तयार करणे हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. धान्य व फर यांचा मोठा व्यापार येथे चालतो. क्वीबेक कॅनडाचे महत्त्वाचे औद्योगिक शहर आणि धक्के, गोद्या, धान्याची उंच कोठारे इ. सोयींनी युक्त बंदर असून येथून माँट्रिऑल, कॅनडाचे समुद्रीप्रांत आणि अमेरिकेतील व यूरोपातील बंदरे यांच्याशी व्यापार चालतो.  

 

क्वीबेकमध्ये ९३ टक्के फ्रेंच भाषिक वस्ती असून ९७ टक्के लोक रोमन कॅथलिक आहेत. शहराचे वातावरण पूर्णत: फ्रेंच असून कॅनडातील फ्रेंच संस्कृतीचे ते प्रमुख केंद्र आहे. अनेक महाविद्यालये, लाव्हाल विद्यापीठ, कला विद्यालय, इतिहासमंडळ, ग्रंथालये, संग्रहालये इत्यादीवरून त्याचे सांस्कृतिक व शैक्षणिक महत्त्वही लक्षात येते.

क्वीबेक हे कॅनडातील सर्वांत प्रसिद्ध ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. उ. अमेरिकेतील ते तटबंदीयुक्त एकमेव शहर असून जुन्या वेशींपैकी तीन अजूनही उभ्या आहेत. ते १६०८ मध्ये फ्रेंच समन्वेषक शांप्लँ याने वसविले. क्वीबेक ही १६६३ मध्ये न्यू फ्रान्सची व १७९१ मध्ये लोअर कॅनडाची राजधानी होती .१७५९ च्या प्रसिद्ध संग्रामात आणि १७६३ च्या पॅरिसच्या तहाने क्वीबेक ब्रिटिशांच्या ताब्यात आले. तेव्हापासून अमेरिकेच्या अर्वाचीन इतिहासाला सुरूवात झाली. ते घेण्याचे अमेरिकेचे १७७५ मधील प्रयत्न फसले. १८६७ मध्ये येथे कॅनेडियन कॉन्फेडरेशनची स्थापना झाली.

माँटकाम, वुल्फ आदी प्रसिद्ध पुरूषांची स्मारके, पार्लमेंटची सभागृहे व इतर शासकीय इमारती, जुनी प्रसिद्ध ख्रिस्ती प्रार्थनामंदिरे, रूग्णालये, जुनी घरे ही प्रवाशांची आकर्षणे आहेत. क्वीबेक येथे अनेक लोहमार्ग व राजरस्ते एकत्र येतात. येथून मोटार व विमानवाहतूक मोठ्या प्रमाणावर चालते. हिवाळ्यात समुद्र गोठत असल्यामुळे पूर्वी डिसेंबर ते एप्रिलपर्यंत क्वीबेक बंदर बंदच असे परंतु १९५० पासून बंदराच्या काही भागातून मर्यादित वाहतूक होऊ लागली आहे.

ओक, द. ह.