कागद कारखान्याचे एक दृश्य, नेपानगर.

नेपानगर : भारतातील वृत्तपत्र कागदनिर्मितीचे एक प्रमुख ठिकाण. हे मध्य प्रदेश राज्याच्या खांडवा जिल्ह्यात असून खांडव्याच्या दक्षिणेस  सु. ४० किमी. व भुसावळच्या ईशान्येस सु. ८० किमी., मध्य रेल्वेच्या मुंबई–दिल्ली या लोहमार्गावर आहे. लोकसंख्या १५,७४३ (१९७१). येथील नॅशनल न्यूजप्रिंट व पेपर मिल्स लि. (नेपा) या कारखान्यातून जानेवारी १९५५ मध्ये वृत्तपत्र कागदनिर्मितीस सुरुवात झाली. १९५८ पर्यंत हा कारखाना खाजगी क्षेत्रात होता परंतु नंतर याचे पुनर्संघटन  होऊन हा भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार या दोहोंच्या मालकीचा झाला. येथून देशातील वृत्तपत्र कागदमागणीच्या २०% पुरवठा होतो. याची वार्षिक उत्पादन क्षमता ६०,००० टन असून ती ७५,००० टनांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. १९७६–७७ मधील उत्पादन सुमारे ५७,६९०  टन होते. खांडवा जिल्ह्यातून व सातपुडा पर्वत भागांतून उपलब्ध होणारे साबई गवत, बांबू व वाहतुकीच्या सोयी इत्यादींमुळे येथे कागदउद्योगाचा विकास झालेला आहे.

सावंत, प्र. रा.