म्हैसूर शहर : कर्नाटक राज्यातील इतिहासप्रसिद्ध शहर आणि म्हैसूर जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ४,७६,४४६ (१९८१). एकेकाळची ही संस्थानी राजधानी राजप्रासादांची नगरी, उद्याननगरी अशा गौरवास्पद नावांनी ओळखली जाते. कावेरी आणि कब्बनी नद्यांदरम्यान दख्खन पठारावर म्हैसूर वसले असून त्याच्या आग्नेयीस सु. १३ किमी. अंतरावर विख्यात चामुंडी टेकडी आहे. बंगलोरच्या नैर्ऋत्येस १३७ किमी. आणि मुंबईच्या दक्षिणआग्नेयीस ८५० किमी. अंतरावर हे शहर वसले आहे. बंगलोरशी हे रस्त्याने व मध्यममापी लोहमार्गाने जोडलेले आहे.

म्हैसूर प्रासादाच्या दरबार दालनातील स्तंभावली

प्राचीन काळी महिषक, महिषमंडळ, महामंडळ, महिषराष्ट्र यांसारख्या नावांनी हे शहर व त्याचा परिसर ओळखला जात असे. महाभारत, पद्मपुराण, विष्णुपुराण इत्यादींतून महिषक, महिष्मती, महिषमंडळ इ. स्थलवाचक संज्ञाही आलेल्या आहेत. तथापि याबाबत संशोधकांत विभिन्न मते आढळतात. गोपालक यादव आणि निलगिरीजवळचे महिषपालक यांच्यात वैर निर्माण झाले; त्यातून महिषासुरमर्दिनीने महिषजनांचा संहार केला; महिषासुरमर्दिनी पूर्वी यादवांची व पुढे संस्थानांची कुलस्वामिनी ठरली; चामुंडी हे तिचेच दुसरे रूप होय, अशीही माहिती काही संशोधकांनी दिली आहे. म्हैसूर म्हणजे म्हैस + ऊर (प्रदेश) अशी व्युत्पत्तीही दिली जाते. अकराव्या व बाराव्या शतकांतील काही कोरीव लेखांतून महिषनाडू किंवा महिषदेश असे निर्देश आढळतात.

पंधराव्या शतकात हा प्रदेश विजयानगर साम्राज्यात होता. सोळाव्या शतकारंभी येथे ओडेयर घराण्याची सत्ता आली. पुढे सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकांच्या दीर्घ कालखंडात म्हैसूरशी निगडित अशा अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. त्याचप्रमाणे कमीअधिक कालावधीची राजकीय सत्तांतरेही येथे घडून आली. साधारणपणे अठराव्या शतकात कर्नाटकात राजकीय दृष्टीने म्हैसूरपेक्षा श्रीरंगपटणला अधिक महत्त्व प्राप्त झाले. या मुस्लिम सत्तेच्या काळात नझराबाद येथील किल्ल्यासाठी म्हैसूरच्या किल्ल्याचे दगडही नेण्यात आले होते. विसाव्या शतकात संस्थांनी राजधानी म्हणून या शहराचा अत्यंत नियोजनपूर्वक विकास करण्यात आला. येथील नगरपालिका प्रशासन त्या दृष्टीने अधिक कार्यक्षम ठरले. पाणीपुरवठा, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्यसेवा, शैक्षणिक सुविधा, शहरातील एतिहासिक वास्तू, उद्याने इ. बाबतींत शहरात सुधारणा करण्यात आल्या. विसाव्या शतकारंभी येथे फोर्ट, लष्कर, देवराज, कृष्णराज, मंडी, चामराज व नझराबाद असे सात मोहल्ले किंवा विभाग होते. वैभवसंपन्न शहर घडविण्यात येथील संस्थानिकांची कलाभिरुची व सौंदर्यदृष्टी दिसून येते. [→ म्हैसूर संस्थान].

चामुंडेश्वरी मंदिर, म्हैसूर.

आधुनिक म्हैसूर शहरात सुती आणि रेशमी कापड, भात आणि तेलाच्या गिरण्या, चंदन तेल, रसायने, कातडी वस्तू इ. उद्योगधंदे विकसित झाले आहेत. बेलागुला या वायव्येकडील उपनगरात रंग व रासायनिक खते यांचे कारखाने आहेत. पूर्वेकडील शिवसमुद्रम बेटाजवळील जलविद्युत्‌निर्मिती केंद्रातून शहराला वीजपुरवठा करण्यात येतो. हातमाग, तंबाखू आणि कॉफी प्रक्रिया, बिड्या इत्यादींचे कुटिरोद्योग शहरात विकसित झाले आहेत. म्हैसरचे हस्तिदंती, चंदनी कलाकाम, तसेच रेशमी साड्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहेत. येथे विमानतळ असून लोहमार्गाचे हे मोठे प्रस्थानक आहे. येथील केंद्रीय अन्न तंत्रशास्त्रीय संशोधन संस्था, चंदनी तेल व रेशीम या दोहोंचे शासकीय कारखाने उल्लेखनीय आहेत. भारतीय भाषा प्रशिक्षण व संशोधन संस्था याच शहरात आहे.

या इतिहासप्रसिद्ध नगरीत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. चामुंडी टेकडीवरील चामुंडी देवीचे मंदिर, मंदिराच्या अलीकडे असलेला महिषासुराचा पुतळा, महाबळेश्वराचे मंदिर व राजेंद्रविलास राजवाडा या इतिहासकालीन वास्तू धार्मिक दृष्टीनेही महत्त्वाच्या आहेत. मंदिराच्या वाटेवरच लागणारी व एकसंध दगडात कोरलेली ४·८ मी. उंचीची नंदीची भव्य मूर्ती आहे. शहरात जगन्मोहन व शहराबाहेर ललितमहाल हे दोन प्रासाद असून, जगन्मोहन प्रासादात श्री चामराजेंद्र कलावीथी असून, तीत राजा रविवर्म्याची व आधुनिक चित्रकारांची चित्रे जतन केलेली आहेत. ललितमहालाचे आता एका आलिशान हॉटेलात रूपांतर करण्यात आले आहे. शहराच्या मध्यभागीच प्राचीन किल्ला आहे. या फोर्ट विभागातच राजवाडा, कर्झन पार्क, घड्याळाचा सिल्व्हर जूबिली मनोरा, गांधी चौक इ. प्रेक्षणीय स्थळे आहेत. देशातील सर्वांत भव्य असा हा राजवाडा असून, त्यात हिंदू–मुस्लिम वास्तुशैलींचे संश्लेषण आढळते. विजयादशमी व तीआधीचे नवरात्र या काळात हा राजवाडा रात्री विद्युत्‌रोषणाईने झगमगत असतो. राजवाड्यातील दरबार हॉल, कल्याण मंडप (विवाहाचे दालन) उत्कृष्ट व कलात्मक असून राजाचे सुवर्णगजसिंहासन आहे.

शहराच्या मध्यवर्ती चौकात संस्थानी अधिपतींची संगमरवरी पुतळे उभारलेले आहेत. शहराच्या पश्चिमेला गॉर्डन पार्कजवळ पूर्वकालीन ब्रिटिश रेसिडेन्सी, ओरिएंटल ग्रंथालय, म्हैसूर विद्यापीठाच्या इमारती व शासकीय कार्यालये आहेत.

म्हैसूरच्या परिसरातील काही प्रेक्षणीय स्थळे उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी १९ किमी. अंतरावरील कृष्णराजसागरजवळचे वृंदावन उद्यान प्रसिद्ध आहे. जगातील एक सुंदर उद्यान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या वृंदावनातील कारंजी, फुलांचे ताटवे, पाण्याचे पाट व एकूण बांधणी अत्यंत कलात्मक आहे. रात्रीच्या वेळी शेकडो कारंज्यांची रंगीबेरंगी तुषारशोभा आणि विद्युत्‌ रोषणाई अत्यंत वेधक दिसते. १२ किमी. अंतरावरील ⇨ श्रीरंगपटण या ऐतिहासिक नगरीत टिपू सुलतानाचा दरिया दौलत बागेमधील ग्रीष्मकालीन राजवाडा, टिपू सुलतान व हैदर अली यांच्या कबरी, रंगनाथाचे प्राचीन मंदीर इ. प्रेक्षणीय आहेत. रामानुजाचार्यांचा या मंदिराशी निकटचा संबंध होता. श्रीरंगपटणपासून ३ किमी. अंतरावर, कावेरीतील छोट्या बेटांवर पक्षांचे छोटे अभयारण्य आहे. म्हैसूरपासून ३५ किमी. अंतरावर सोमनाथपूर येथील होयसळकालीन सोमनाथाचे कलात्मक दृष्ट्या श्रेष्ठ मानले गेलेले मंदिर आढळते.

जाधव, रा. ग.