गँबिया : आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले हे स्वतंत्र राष्ट्र म्हणजे गँबिया नदीच्या दोन्ही बाजूंची एक चिंचोळी पट्टी आहे. क्षेत्रफळ नदीसह ११,५६९ चौ. किमी. लोकसंख्या ३,८३,००० (१९७१ अंदाज). १३उ. ते १४ उ. व १४३०’ प. ते १७प. यांत समाविष्ट झालेल्या ह्या अरुंद प्रदेशाच्या उत्तर, पूर्व व दक्षिण ह्या तीनही दिशांना सेनेगलचे राज्य आहे. पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे व त्यावरगँबिया नदीच्या मुखाशी बॅथर्स्ट (हल्लीचे बँजुल) ही राजधानी आहे. अटलांटिक गँबियाची रुंदी सु. ४८ किमी. आहे. अंतर्भागात काही ठिकाणी ती फक्त २४ किमी. आहे. देशाची पूर्व- पश्चिम लांबी ३२० किमी. आहे. नदीमार्गे ती ४७० किमी. भरते.

 

भूवर्णन : गँबिया नदीचे खोरे तिच्या पूरमैदानाने बनलेले आहे. पावसाळ्यात ते पुष्कळदा जलमय होते. त्याच्या दोन्ही बाजूंस सेनेगलच्या पठाराचे काही भाग गँबियात आले आहेत. या पठाराची कड त्यावरून येणाऱ्या नद्यांनी झिजून त्यातून वाटा निघाल्या आहेत व नद्या-नद्यांच्या दरम्यान तेथे टेकड्या दिसतात. पठार व खोरे वालुकाश्मांचे बनलेले आहे व तेथील मृदा जांभा दगडाच्या मृदेसारखी असून ती सुपीक नाही. फक्त गाळाच्या पूरमैदानाची मृदा सुपीक आहे.

येथील हवा एकंदरीत उष्ण आहे. नोव्हेंबर ते मे हा बिनपावसाचा काळ असतो. तेव्हा सहाराकडून उष्ण हरमॅटन वारे येतात. किनाऱ्याजवळ यावेळी १८ से. ते ३२ से. तपमान असते, तर अंतर्भागात १० से. ते ४० से. असते. जून ते ऑक्टोबर पावसाळा असतो. ऑगस्टमध्ये सर्वांत जास्त पाऊस पडतो. पाऊस सरासरी १०० सेंमी. पडतो. अंतर्भागात तो कमी पडतो व कधी ६१ सेंमी. तर कधीकधी १६८ सेंमी. इतका पडतो. या काळात तपमान जास्त असते. गँबिया हीच मुख्य नदी असून ती गिनी देशात उगम पावून सेनेगलमधून या देशात येते. ही मुखापासून कूंता-ऊरपर्यंत २४० किमी. सागरी बोटींना उपयुक्त असून लहान बोटी सरहद्दीवरील कोईनापर्यंत जातात. हिला दोन्ही बाजूंनी अनेक उपनद्या येऊन मिळतात. मुखाजवळ गँबियाची रुंदी सु. ५ किमी. आहे. १५० किमी. आत एलेफंट बेटाजवळ ती १.६ किमी. रुंद आहे.

मुखापासून सु. १५० किमी. आतपर्यंत गँबिया नदीची खाडी आहे तिच्या काठी कच्छ वनश्रीची दाट झाडी आहे. मुखाजवळ तेल्याताडाची पुष्कळ झाडे आहेत. अंतर्भागी दलदलीच्या भागात लहान झुडपे आहेत. त्याच्या पलीकडे सॅव्हाना गवताचा प्रदेश आहे. दलदलीच्या प्रदेशात भाताची आणि सॅव्हानाच्या भागात इतर पिकांची लागवड झालेली आहे. नद्यांच्या काठी अरण्यांचे अरुंद पट्टे आहेत.

अरण्यांत व गवताळ प्रदेशांत अनेक प्रकारची हरिणे, माकडे आणि नदीत सुसरी, हिप्पो व मानटी आढळतात. तीनशेंवर विविध प्रकारचे पक्षी नदीकाठी व अरण्यांत आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : गँबिया नदीकाठी प्राचीन काळापासून वस्ती झालेली आहे. जॉर्जटाउनजवळ ख्रि. पू. ४०० च्या सुमाराचे वर्तुळाकार उभारलेल्या दगडी खांबांचे अवशेष सापडतात. पंधराव्या शतकापर्यंत हा प्रदेश घानाच्या सेराहुली साम्राज्यात, सोंघाईच्या राज्यात व नंतर मँडिंकांच्या माली साम्राज्यात समाविष्ट झालेला आढळतो. गँबियाचा शोध यूरोपीयांपेकी प्रथम पोर्तुगीजांना पंधराव्या शतकात लागला आणि सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून त्यांचा तेथे गुलामांचा आणि सोन्याचा व्यापार सुरू झाला. १५८८ मध्ये पोर्तुगालने गँबिया नदीवरील व्यापाराचे हक्क इंग्रजांस दिले. काही इंग्रज कंपन्याही स्थापन झाल्या. पुढे सतराव्या शतकाच्या अखेरीस फ्रेंच व इंग्रज यांचे वैमनस्य वाढून गँबियातील व्यापारात व्यत्यय निर्माण होऊ लागला. परंतु अठराव्या शतकाच्याशेवटी फ्रेंचांनी गँबिया नदीच्या परिसरात व्यापार करण्याचा इंग्रजांचा हक्क संपूर्णपणे मान्य केला. १८२१ मध्ये ह्या प्रदेशाची व्यवस्था सिएरा लिओन ह्या ब्रिटिश वसाहतीच्या ताब्यात देण्यात आली. १८४३ मध्ये पुन्हा या भागाची स्वतंत्र वसाहत करण्यात आली व पुढे १८६६ मध्ये ती पश्चिम आफ्रिकी वसाहतीत सामील करण्यात आली. १८८८ मध्ये पुन्हा या वसाहतीस स्वतंत्र अस्तित्व देण्यात आले. ऑक्टोबर १९६३ मध्ये गँबियाला स्वायत्तता देण्यात आली. फेब्रुवारी १९६५ मध्ये या वसाहतीस संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले. गँबिया राष्ट्रकुलाचा सभासद झाला. २३ एप्रिल १९७० रोजी सार्वमतानुसार गँबिया हे स्वतंत्र प्रजासत्ताक झाले व सर दाउद जावारा हे त्याचे पहिले अध्यक्ष झाले. गँबिया हा संयुक्त राष्ट्रांचा सभासद आहे व संयुक्त राष्ट्रांशी संबंधित असलेल्या इतर काही आंतरराष्ट्रीय संघटनांचाही तो सभासद आहे.

विधिमंडळाने निवडलेला अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख असतो. तो उपराष्ट्राध्यक्ष नेमतो तोच मुख्य प्रधान म्हणून काम करतो. प्रतिनिधिगृहात सभापती, उपसभापती व निवडलेले बत्तीस सभासद असतात. त्याखेरीज स्थानिक सरदारमंडळातर्फे चार प्रतिनिधी निवडण्यात येतात. ह्या गृहात चार सरकारनियुक्त सभासद असतात व त्यांपैकी एक मुख्य सरकारी वकील असतो. सरकारनियुक्त सभासदांस मताधिकार नसतो.

संसदीय लोकशाहीच्या पद्धतीनुसार मंत्रिमंडळात पंतप्रधान आणि सात इतर मंत्री असतात. हे सर्व विधिमंडळातून घेण्यात येतात. देशात पीपल्स प्रोग्रेसिव्ह अलायन्स, युनायटेड पार्टी व पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी हे प्रमुख पक्ष आहेत. सध्या नॅशनल असेंब्‍लीत पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टीचे २४ व युनायटेड पार्टीचे ८ सदस्य असून जावारा हे प्रोग्रेसिव्ह पार्टीचेही अध्यक्ष आहेत.

स्थानिक राज्यकारभारासाठी राज्याचे चार विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागप्रमुखास आयुक्त अशी संज्ञा आहे. त्या चार विभागांचे ३५ जिल्हे करण्यात आले आहेत व त्यांतील प्रत्येक जिल्ह्याचा कारभार तेथील मुख्य सरदाराकडे सोपविलेला असतो. त्याच्या मदतीस खेड्यातील प्रमुख नागरिक व इतर सल्लागार असतात. १९६१ पासून या जिल्ह्यांचे सहा गट तयार करण्यात आले आहेत आणि त्यांसाठी प्रादेशिक समित्याही आयोजित केल्या आहेत. अशा समित्यांत निवडलेल्या प्रतिनिधींचे मताधिक्य असते आणि स्थानिक सरदार अधिकारपरत्वे त्यांत सभासद असतात. राजधानीच्या शहरासाठी स्वतंत्र नगरसमिती योजण्यात आली आहे.

गँबियाची भौगोलिक परिस्थिती ध्यानात घेता त्याच्या बाजूला असलेल्या सेनेगल या प्रदेशाशी त्याचे निकटचे सहकार्य असणे अपरिहार्य होते. त्याप्रमाणे परराष्ट्रव्यवहार, संरक्षण व राष्ट्रीय विकास ह्यांसंबंधी ह्या दोन राष्ट्रांमध्ये तीन स्वतंत्र करार करण्यात आले आहेत.

गँबियातील न्यायदानपद्धती इंग्‍लंडमधील सामान्य कायद्यावर आधारलेली आहे. परंतु त्यात आवश्यक तेथे स्थानिक कायदे करून फेर करण्यात आला आहे. इस्लामधर्मीयांच्या काही विशिष्ट बाबतींसाठी स्वतंत्र वटहुकूम काढण्यात आला असून, त्यास अनुसरून मुस्लिम न्यायालये स्थापण्यात आली आहेत. दोन्ही पक्षकार मुसलमान असले अगर मुसलमानी संस्कृती अगर रीतिरिवाजांशी निगडित असे प्रश्न उद्‍भवले, तर त्यांचा निकाल मुस्लिम न्यायालये करतात. विवाह, वारसाहक्क, धार्मिक देणग्या, मृत्युपत्रे, अज्ञानाचे पालन इ. प्रश्न ह्या न्यायालयात येतात. अशा न्यायालयाच्या प्रमुखास काझी म्हणतात व त्याच्या मदतीस दोन सल्लागार असतात. गँबियामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. ह्या न्यायालयात एक अध्यक्ष आणि निरनिराळ्या भागांतील प्रमुख न्यायाधीश ह्यांचा समावेश होतो.


आर्थिक परिस्थिती : पश्चिम आफ्रिकेत गँबिया ही स्वातंत्र्य मिळविणारी शेवटची ब्रिटिश वसाहत आहे. सेनेगलमध्ये शिरलेली ही चिंचोळी पट्टी असल्यामुळे अनेक राजकीय, विशेषतः आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत व ते सोडविण्यासाठी सेनेगल आणि गँबिया यांचे निकटचे सहकार्य घडवून आणण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. गँबिया नदीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणे व आर्थिक उत्पादनाचे जास्त विविधीकरण करणे,  हा गँबियाच्या आर्थिक नीतीचा मुख्य उद्देश आहे.

शेती व इतर व्यापार हा फार मोठ्या प्रमाणावर फक्त भुईमुगावर अवलंबून आहे. एकूण निर्यातीपैकी ९०% किंमतीचा भुईमूग असतो. भाताच्या लागवडीखालील जमिनीचे क्षेत्रफळ वाढत आहे आणि थोड्याच दिवसांत स्थानिक गरज भागवून, काही तांदूळ निर्यात होण्याची शक्यता आहे. इतर शेतकी उत्पादनात ज्वारी, मका, ताडफळांचा गर ही प्रमुख आहेत. कापूस, घायपात, लिंबू जातीची फळे व तंबाखू यांचे उत्पन्न काढण्याचे प्रयत्‍न चालू आहेत. आंबे, केळी, लिंबू, पपया येथे होतात. मॅनिऑकचे उत्पन्न वाढत आहे. कातडी कमावणे आणि मत्स्योद्योग हे येथील आणखी महत्त्वाचे उद्योग होत. गँबियात खनिजे नाहीत. किनार्‍याजवळ इल्मेनाइटचे उत्पादन करण्याचा प्रयत्‍न १९५६ ते १९५९ पर्यंत झाला. पुढे तो बंद झाला. १९७३ मध्ये गँबियात २,७०,००० गुरे १,२९,००० मेंढ्या १,००,००० शेळ्या ३,००० डुकरे ४,५०० गाढवे आणि २,४०,००० कोंबडी-बदके होती. अटलांटिक किनाऱ्यावर मासे भरपूर सापडतात. देशातील फक्त ३·३%जमीन अरण्यांखाली आहे. यामुळे लाकूड निर्यातीवर नियंत्रण आहे. भुईमूग प्रक्रियेच्या एका कारखान्याशिवाय गँबियात मोठे उद्योगधंदे नाहीत. नदीवरील बोटी बांधणे व दुरूस्त करणे, दोन तेलगिरण्या, एक पेयांचा कारखाना व एक पादत्राणांचा कारखाना हे इतर छोटे उद्योग आहेत. १९६७ मध्ये वीज उत्पादनक्षमता ६,३०० किवॉ. ता. होती. ८२% वीज औष्णिक केंद्रात निर्माण होते. १९६८ मध्ये एकूण कामगारांपैकी ९०% लोक शेतीकामगार होते. दरवर्षी शेजारच्या देशातून सु. १०,००० कामगार भुईमुगाच्या शेतांवर मजुरीसाठी येतात. भुईमुगाची निर्यात गँबिया ऑइलसीड मार्केटिंग बोर्डातर्फे होते. सहकारी बँका व बाजारसंघटना भुईमुगाच्या सहकारी संस्थांस मदत करतात. इतर निर्यात ताडगर व सुकविलेले मासे यांची होते. १९७१-७२ साली कापड व कपडे यांची आयात ३४·७% अन्न, पेये, तंबाखू २४·५% यंत्रे आणि वाहतूकसाधने १५·१% होती. निर्यात ब्रिटनकडे ३८%, फ्रान्स १५% व नेदर्लंड्स ११% तर आयात ब्रिटनकडून ३०·८०%, जपानकडून १८·५% आणि तैवानकडून (फॉर्मोसा) १३·७% झाली. व्यापारातील तूट भरून काढण्यासाठी १९७१ मध्ये पंचवार्षिक योजना आखलेली आहे.

गँबियात पूर्वी पश्चिम आफ्रिकी चलन चालत असे. परंतु स्वातंत्र्यानंतर गँबियाने आपले स्वतःचे चलन चालू केले. चलनाचे प्रमुख नाणे गँबियन पौंड आहे व त्याची किंमत ब्रिटिश पौंडाबरोबर आहे. देशात दोन प्रमुख बँका आहेत.

हा देश संपूर्णपणे गँबिया नदीच्या दोन्ही बाजूंस वसला असल्यामुळे जलवाहतूक हीच महत्त्वाची आहे. बॅथर्स्ट हे मुख्य बंदर असून, तेथे एकूण ६,६८,८७९ टनाची ३०६ जहाजे १९७२-७३ मध्ये आली होती. तेथून अंतर्गत वाहतूक आगबोटींनी व मचव्यांनी चालते. बॅथर्स्टच्या आजूबाजूला चांगले रस्ते आहेत परंतु देशातील इतर ठिकाणचे रस्ते पावसाळ्यात बंदच असतात. १,१७० किमी. रस्ते आहेत, पैकी फक्त ५३० किमी. चांगले व १९७ किमी. डामरी सडका आहेत. नदीच्या दक्षिणेकडून बॅथर्स्ट ते बासेपर्यंत जाणारा रस्ता पुढे ट्रान्स-गँबियन हमरस्त्याने सेनेगलमधील डाकार-काझामांस रस्त्याला मिळतो. या रस्त्यामुळे प्रवाशांची वाहतूक नदीपेक्षा अधिक जलद होते. १९७२-७३ मध्ये देशात ५,८३१ स्वयंचलित वाहने होती. गँबियात लोहमार्ग नाहीत. बॅथर्स्टजवळील युंडुम येथे विमानतळ आहे.

टपालासाठी पोस्टाची सोय चांगली आहे. नदीकाठच्या लोकांसाठी एक टपालाची आगबोट ठेवण्यात आली आहे. त्यात पोस्टाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक व परदेशीय तारेचा व्यवहार चालू असून, दूरध्वनी व्यवस्थाही आहे. १९७२ मध्ये दूरध्वनींची संख्या १,७३६ होती. शासननियंत्रित रेडिओ गँबियाचे कार्यक्रम दररोज सु. दहा तास होतात. १९७३ मध्ये ६०,००० रेडिओ संच होते. गँबियात दूरचित्रवाणी सेवा उपलब्ध नाही.

लोक व समाजजीवन: गँबियामध्ये बहुसंख्य प्रजा इस्लाम धर्माची आहे. काही ख्रिस्ती धर्माचे लोकही आहेत.जडप्राणवादी पंथाचे लोक काही ठिकाणी आढळतात. आफ्रिकेतील इतर प्रदेशांप्रमाणे येथेही आदिवासी जमाती आहेत. त्यांतील प्रमुख जमाती व त्यांची १९६३ मधील शेकडेवारी अशी:मँडिंगो ५०·३%, फुला १७%, वॉलॉफ १६%, जोला ८·६% आणि सेराहुली ८.१%. 

बॅथर्स्ट येथे आधुनिक सुखसोयींनी सज्‍ज असे रुग्णालय आहे. आरोग्यकेंद्रे व लहानलहान दवाखान्यांचे जाळे देशभर पसरले आहे. क्षयरोग्यांसाठी एक आरोग्यनिवास व महारोग्यांसाठी एक वसाहत स्थापण्यात आली आहे. प्रसूती व बालसंगोपन केंद्रे ठिकठिकाणी उघडली असून त्यांची संख्या २१ आहे. १९६६ मध्ये ५ रुग्णालयांत मिळून २४० खाटांची सोय होती. एक वेड्यांचे रुग्णालयही आहे. बॅथर्स्ट येथे १९६४ पासून परिचारिका शाळा उघडली आहे.

गँबिया ही मूळची ब्रिटिश वसाहत असल्याने इंग्‍लिश बऱ्याच अंशी सामान्य व्यवहाराची भाषा आहे. परंतु मँडिंगो, वॉलॉफ आणि इतर स्थानिक भाषांचाही वापर आहे. देशात दैनिके नाहीत, एक शासकीय आणि सहा इतर नियतकालिके आहेत. शिक्षणाचा प्रसार सरकारी व खाजगी पातळीवर चालू आहे. प्राथमिक शिक्षण विनामूल्य आहे, परंतु सक्तीचे नाही. १९७३ मध्ये ९५ प्राथमिक शाळा होत्या. त्यांत ४१४ शिक्षक, १९,४२१ विद्यार्थी २२ माध्यमिक शाळांत १९० शिक्षक व ५,३७३ विद्यार्थी होते. सुतारकाम व धातुकाम शिकविणाऱ्या दोन शाळा बॅथर्स्टला आहेत १९७३ मध्ये त्यांत १३ अधिव्याख्याते व १७४ विद्यार्थी होते. युंडुम येथे शिक्षक महाविद्यालय आहे. त्यात १६ अधिव्याख्याते व १४८ विद्यार्थी होते. लोकसंख्येच्या मानाने शिक्षणाचा प्रसार फार कमी असला, तरी स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागात झपाट्याने शिक्षणप्रसार करण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. मुस्लिम शाळांतून अरबी शिकविले जाते. अरबीमध्ये साक्षरता २०% व इंग्रजीत १५% आहे.

कुस्ती देशाचा राष्ट्रीय खेळ समजला जातो. त्याखेरीज मासे पकडणे, नेमबाजी, गोल्फ, क्रिकेट व फुटबॉल हे खेळही खेळले जातात. टेनिस, स्क्वॅश, बॅडमिंटन व व्हॉलीबॉल ह्या खेळांची सोय काही ठिकाणी आहे.

पर्यटन विभागाकडे बरेच लक्ष देण्यात येत असते. हिवाळ्यामध्ये परदेशी प्रवाशांना अनुकूल वातावरण असते. १९७२-७३ मध्ये १७,००० वर पर्यटकांनी गँबियाला भेट दिली. बॅथर्स्ट हे सेंट मेरी बेटावर वसले आहे. त्याशिवाय बॅथर्स्टच्या २०० किमी. पूर्वेस, मॅकार्थी बेटावरील व्यापाराचे व शिक्षणाचे केंद्र जॉर्जटाउन व २५६ किमी. पूर्वेस असलेले बासे ही अन्य महत्त्वाची शहरे आहेत.

नरवणे, द. ना.


बॅथर्स्ट : गँबियाची राजधानी