डॅन्झिग : गादान्यस्क. पोलंडचे एक प्रसिद्ध बंदर व गदान्यस्क प्रांताचे राजधानीचे शहर. लोकसंख्या ३,६४,३०० (१९७०). ते बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावरील व्हिश्चला नदीमुखावर वसले आहे. हे बाल्टिक समुद्रावरील पोलंडच्या ताब्यातील एक महत्त्वाचे बंदर असून सु. ३,००० बोटींचे ये-जा होते. ते लोहमार्गाचे मोठे केंद्र आहे. त्यातून कोळसा, लाकूड, सिमेंट, अन्नधान्ये, खाद्यपदार्थ वगैरे विविध वस्तू निर्यात होतात. डॅन्झिग बंदर

आयात होणाऱ्या मालात लोखंड, खते, अन्नधान्ये व इतर कच्चा माल यांचा वाटा मोठा आहे. बाल्टिक समुद्र आणि व्हिश्चला नदी यांचेवरील जलवाहतूक नोव्हिपॉर्ट ह्या ठिकाणी एकत्र येऊन मालाची चढ-उतार होते. नोव्हिपॉर्ट (नवीन बंदर) ह्या भागात अनेक गोद्या, जहाजांत धान्य भरणारी अजस्र यंत्रे, रसायने, औषधे, दारू गाळणे वगैरेंचे उत्पादक धंदे आहेत. येथील प्राचीन वास्तूंत कॅथरीन चर्चचे अवशेष, टाउनहॉल इ. ख्यातनाम आहेत. दुसऱ्या महायुद्धात ह्या बंदराची व शहराची मोठी नासधूस झाली. गदान्यस्क या प्राचीन नावाने ते सध्या प्रसिद्ध असून त्यात डॅन्झिग, गदिनीआ आणि सॉपॉट या शहरांचा समावेश होतो.

याचा उल्लेख प्रथम ९९७ मध्ये आढळतो. त्या वेळी ते पॉमेरील्याचे राजधानीचे स्थळ होते. पुढे तेराव्या शतकात जर्मन व्यापाऱ्यांनी येथे वसाहती स्थापल्या व त्यानंतर त्या शहराचा हॅन्सिॲटिक संघात समावेश झाल्यापासून, बाल्टिक समुद्रावरील एक महत्त्वाचे बंदर म्हणून हे ओळखले जाऊ लागले. १३०८ मध्ये ट्यूटॉनिक सामंतांनी घेतल्यानंतर तो एक संघर्षाचा प्रदेश झाला. १४६६ मध्ये डॅन्झिगचा पोलंडमध्ये समावेश होऊन त्याला स्वायत्त शहराचा मान मिळाला आणि पॉमेरील्या भागही पोलंडच्या राजाला मिळाला. पुढे पोलंडची जी विभाजने झाली, त्यांमध्ये डॅन्झिग बंदर जर्मनीला मिळावे म्हणून हिटलरने पोलंडवर स्वारी केली व ह्यामुळे दुसरे महायुद्ध सुरू झाले. १९७० मध्ये ह्या बंदरातून एकंदर एक कोटी टन मालाची आयात-निर्यात झाली. येथे ललित कला, वैद्यक, अभियांत्रिकी वगैरे विषयांची विद्यालये असून ते सागरी संशोधन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.

लिमये, दि. ह.