त्रिपुरा राज्य : भारताचे त्याच्या ईशान्य भागातील एक घटक राज्य. क्षेत्रफळ १०,४७६ चौ. किमी. लोकसंख्या १५,५६,३४२ (१९७१). विस्तार २२° ५६ उ. ते २४° ३२ उ. आणि १९° १० पू. ते ९२° २२ पू. यांदरम्यान. हे उत्तर, पश्चिम व दक्षिणेकडून बांगला देशाने वेढलेले असून फक्त ईशान्येस भारतातील आसाम व मिझोराम राज्ये आहेत. राजधानी अगरतला.

भूवर्णन : या बव्हंशी डोंगराळ प्रदेशाच्या पूर्व भागात ४ दक्षिणोत्तर नदीखोरी आणि पश्चिम भागात पश्चिमेकडे उतरत जाणारा मैदानी भाग आहे. सर्वांत पूर्वेकडचे धर्मनगर खोरे पूर्वेच्या ६०० ते ९०० मी. उंचीच्या जमराई व पश्चिमेच्या ३०० ते ७५० मी. उंचीच्या सखन (साखोन) या डोंगररांगांच्या दरम्यान वाहणाऱ्‍या उत्तरवाहिनी देव, जूरी नद्यांचे आहे. उत्तरेत त्याचे रूपांतर उर्मिल सपाटीत होते व तेथे सधन शेती व दाट वस्ती असून, जूरी नदीकाठचा धर्मनगर हा बाजाराचा गाव आहे. या खोऱ्‍याच्या पश्चिमेस कैलाशहर खोरे १९ किमी. रूंदीचे असून ते सबंध दक्षिणोत्तर गेले आहे. त्याच्या पश्चिमेस लांगतराई डोंगररांगेत सर्वोच्च शिखर ४५७ मी. आहे. या खोऱ्‍यात मनू नदी व तिच्या उपनद्या आहेत. खोऱ्‍याचा दक्षिण भाग विच्छिन्न व वनाच्छादित, तर उत्तर भाग खुला व थोड्या दलदलीचा आहे व त्यात भातशेती आढळते. मनू नदीच्या उजव्या तीरावरचे कैलाशहर बाजाराचा गाव आहे. याच्या पश्चिमेच्या कमलपूर खोऱ्‍यातून उत्तरेकडे धालाई नदी वाहते. तिच्या पश्चिमेकडील अथारमुर रांगेची सर्वाधिक उंची ४४६ मी. पर्यंत आहे. या खोऱ्‍याचा दक्षिणेकडील भाग वनाच्छादित असून बाकीच्या भागात जंगलतोड झाली आहे. भात हे मुख्य पीक आहे. बाजाराचा गाव कमलपूर धालाईच्या डाव्या तीरावर आहे. चौथ्या व सर्वांत पश्चिमेकडच्या खोवई खोऱ्‍यात लोकवस्ती दाट आहे. खोऱ्‍याच्या पश्चिमेची देवतामुरा रांग २५० मी. पर्यंत उंचीची आहे. उत्तरवाहिनी खोवईच्या उजव्या तीरावर खोवई गाव आहे. सर्व उत्तरवाहिनी नद्या राज्याबाहेर सुरमेला मिळतात. राज्याच्या दक्षिणार्धातील सोनामुरा, उदयपूर, अमरपूर, बेलोनिया व साब्रूम या पाच उपविभागांत वाहणाऱ्‍या अनेक नद्यांपैकी सर्वांत मोठ्या गुमतीला बरेच दक्षिणवाही नालेओढे मिळतात व ती डोंगररांगा तोडून खोल दरीतून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत राधाकिशोरपूरजवळ सपाट प्रदेशात उतरते व शेवटी मेघनेला मिळते. त्रिपुराचा हा भाग जास्त खुला असून, यात शासकीय ठाण्याच्या गावांखेरीज खेडीही बरीच आहेत. सर्वांत विस्तीर्ण सपाट भूमी देवतामुरा डोंगररांगेच्या पश्चिमेस आहे. तिच्यावर सधन शेती व संपन्न खेडी असून, हाओरा नदीच्या उभय तीरांवर समुद्रसपाटीपासून अवघ्या १३ मी. उंचीवर अगरतला राजधानी वसली आहे. राज्यातील सखल भागात अनेक लहानमोठी तळी आहेत. त्यांपैकी मोठे रूद्रसागर सरोवर अगरतलापासून ५३ किमी. आहे.

मृदा : नदीखोऱ्‍यातल्या गाळाच्या प्रदेशातील मृदा सुपीक आहे. अन्यत्र जंगल जाळून फिरती शेती करणाऱ्‍या गिरिजनांच्या झुमिआ पद्धतीमुळे कुजलेल्या पाल्यापाचोळ्याची उणीव असून मृदा निकस आहेत. कमी डोंगरउतारावरही मृदा भुसभुशीत असल्याने पाणी धरून ठेवीत नाहीत. पावसाने त्यातील खनिजे धुपून जातात आणि नायट्रेट, फॉस्फेट, पोटॅश व सेंद्रीय द्रव्यांच्या अभावी मृदा अम्‍लिक झाल्या आहेत.

हवामान : त्रिपूरा राज्याचे सर्वसाधारण तपमान २०° ते ३०° से. असून हवामान समशीतोष्ण व आरोग्यपोषक आहे. वार्षिक पर्जन्य एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत १९० सेमी. आढळतो.

वनस्पती व प्राणी : राज्याची सु. ६२% भूमी वनाच्छादित असून वनस्पतीत शाल, गरजन, आर्द–पानझडी व सदाहरित वृक्ष, बांबू आणि मैदानी गवत यांचा समावेश होतो. वन्य पशू मुख्यतः हत्ती, रानरेडा, गेंडा, वाघ, चित्ता, कोल्हा, गवा, अजगर हे आढळतात.


इतिहास : परंपरागत समजुतीप्रमाणे चंद्रवंशीय ययातिपुत्र द्रुह्यूचा मुलगा बभ्रु याला कपिलमुनींनी या किरात देशाचा राज्याभिषेक केला. त्या वंशाचा पंधरावा राजा ‘प्रसेन’ दशरथाच्या अश्वमेघ यज्ञाला गेला होता. त्याचा वंशज ‘दैत्य’ हा अश्वत्थाम्याकडून धनुर्विद्या शिकला, तर नंतरचा ‘त्रिपूर’ याचे नाव राज्याला मिळाले. त्याचा पुत्र ‘त्रिलोचन’ युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात हजर होता व त्यानेच राजवंशाच्या चौदा कुलदेवतांची स्थापना केली. हा पुराणाख्यायिकांचा भाग सोडल्यास तेराव्या शतकात गौरच्या सुलतानाने त्रिपुरच्या परागंदा रत्‍न फा राजाला गादी परत मिळविण्यास मदत करून ‘माणिक्य’ ही वंशपरंपरागत पदवी दिली, असा इतिहासातला पहिला उल्लेख आहे. इतिहासकाळातही राज्याचा विस्तार सुंदरबनपासून ब्रह्मदेशापर्यंत व सागरापासून कामरूपपर्यंत होता. तेराव्या, चौदाव्या आणि सतराव्या शतकांत त्रिपुरावर मुसलमानांचे हल्ले झाले. सोळाव्या शतकातल्या पराक्रमी विजयमाणिक्य राजाने शेजारच्या इस्लामी राज्यावर मात करून त्याचा बराच प्रदेश जिंकला होता. अठराव्या शतकात मात्र मोगलांनी त्रिपुराचा मैदानी भाग आपल्या साम्राज्याला जोडला. डोंगरभागात तेवढे राज्य सुखरूप राहिले. १७६५ मध्ये बंगालची दिवाणी मिळाल्यावर इंग्रजांनी त्रिपुराशी राजनैतिक संबंध जोडला व क्रमशः तेथील राजा आपल्या तंत्राने चालेल अशी व्यवस्था केली. संस्थान खंडणी देत नव्हते पण आजुबाजूच्या राज्यांशी संपर्क ठेवण्याचे स्वातंत्र्य त्याला उरले नाही. अठराव्या शतकाअखेर वीरचंद्र या राजाने प्रागतिक धोरण सुरू केले. १८७९ मध्ये गुलामीची व १८८८ मध्ये सतीची पद्धत त्याने बंद केली. तो साहित्य–कलांचा भोक्ता होता व रवींद्रनाथ टागोरांशी त्याचा परिचय होता. १९१९ पर्यंत मध्यवर्ती ब्रिटिश सत्तेला व नंतर १९३६ पर्यंत ईस्टर्न स्टेट्‌स एजन्सीला अंकित असलेले त्रिपुरा राज्य १९४९ मध्ये स्वतंत्र भारतात विलीन झाले. प्रथम ‘पार्ट सी’ राज्याचा त्याचा दर्जा १९५७ च्या राज्यपुनर्रचनेत बदलून तो केंद्रशासित प्रदेश झाला. १९६३ मध्ये त्याला विधिमंडळ व राज्यांतर्गत शासनाधिकार प्राप्त झाले. २१ जानेवारी १९७२ रोजी त्रिपुराला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.

 ओक, शा. नि.

राज्यव्यवस्था : प्रशासनाच्या सोयीसाठी त्रिपुरा राज्याचे खोवई, सदर, कैलाशहर, धर्मनगर, सोनामुरा, उदयपूर, बेलोनिया, साब्रूम, कमलपूर, अमरपूर असे दहा उपविभाग पाडलेले आहेत. यांत तीन जिल्हे, ४४ तहसील आणि ६ शहरे आहेत. अगरतला हे राजधानीचे शहर आहे. राज्याची सत्ता राज्यपाल व मंत्रिमंडळ यांजकडे आहे. विधिमंडळ एकसदनी आहे. या राज्यातून लोकसभेसाठी २ आणि राज्यसभेसाठी १ असे सदस्य निवडले जातात. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेस ४१, कम्युनिस्ट १, कम्युनिस्ट (मार्क्सवादी) १६, स्वतंत्र २ असे एकूण ६० सदस्य विधानसभेसाठी निवडले होते. माननीय एल्‌. पी. सिंग हे राज्यपाल असून एस्‌. सेनगुप्ता हे मुख्यमंत्री होते (१९७४). त्रिपुरा राज्यावर आसाम राज्याच्या उच्च न्यायालयाचा अधिकार चालतो. तिसऱ्‍या पंचवार्षिक योजनेच्या काळात त्रिपुरामध्ये पंचायत राज्य मंडळ स्थापन करण्यात आले. ३०४ पंचायतींत १,४३६ खेडी समाविष्ट करण्यात आली. ४४८ ग्रामपंचायती आणि १३४ न्यायपंचायती आहेत.

गोखले, कमल

आर्थिक व सामाजिक स्थिती : १९७१ च्या शिरगणतीत दिसून आले होते, की एकूण कामकऱ्‍यांपैकी शेतकरी व मजूर मिळून सु. ७४·३१% होते. १९७१-७२ मध्ये एकूण भूमीपैकी वनाच्छादित ६,३०,००० (६२%), शेतीयोग्य ३,२६,००० (३०·५%) व पिकांखाली २,४०,००० (२३%) हे. आणि त्यांपैकी ७% सिंचनाखाली, चहाखाली ५,५२६ हे. जमीन होती. वनाच्छादित भाग दक्षिणेकडील डोंगराळ भागात असून शेती विशेषतः उत्तरेकडील व पश्चिमेकडील मैदानी भागात होते. गाळाची जमीन व भरपूर पाऊस यांमुळे भात हे येथे मुख्य पीक आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्राच्या ८३% जमीन भाताखाली आहे. मुख्य पिकांचे उत्पन्न (१९७३-७४ अंदाज) तांदूळ सु. ३·६२ लक्ष टन डाळी ९०० टन ताग, घायपात व कापूस गासड्या अनुक्रमे ४९·२, ६०·४ व २·४ हजार राई व मोहरी १,४०० टन बटाटे १९,००० तीळ ७,००० टन ऊस ६७,००० टन आणि चहा २९·५८ लाख किग्रॅ. व तंबाखू अल्प प्रमाणात असे होते. अन्नोत्पादन अपुरे असून पुरवठ्यातील तूट भरून काढण्यासाठी बाहेरून धान्य आणणे भाग पडते. पशुधन सु. ७,३८,००० जनावरांत १,४७,००० बकरी २० हजार म्हशी ५,२५,००० गाईबैल ४४ हजार डुकरे व बाकीचे घोडे व तट्टे होती. कोंबड्या ५·१८ लाख होत्या. ‘झुमिआ’ शेतीपद्धतीने वनसंपत्तीचे व भूमीचे होणारे अपरिमित नुकसान आवरणे, हिरव्या व रासायनिक खतांचा पुरवठा करणे, अधिक जमीन शेतीयोग्य करणे, नलिका कूप व इतर सिंचनयोजनांनी रब्बी व खरीप दोन्ही पिके शक्य करणे, चहामळ्यांना, अननस, मोसंबी व लिचीच्या फळबागांना आणि ताग लागवडीला प्रोत्साहन देऊन उत्पादन वाढवणे, राज्यातल्या अनेक नद्या–तळ्यांतून मत्स्यसंवर्धन करून पूरक अन्नाची भरपूर तरतूद करणे असा अनेकविध कार्यक्रम यशस्वी करण्याचे प्रयत्‍न राज्य निकराने करीत आहे.


उद्योग : १९७१ च्या शिरगणतीत ४,३२,४६३ कामकऱ्‍यांपैकी ७४,०७५ स्त्रिया होत्या. २,३५,२९२ शेतकरी ८६,३४० शेतमजूर खाणी–पशुपालन–वनोद्योग–मच्छीमारी कामांत ९,५७० लहानमोठ्या कारखान्यांतून १५,२२९ वाहतूक व दळणवळण इ. ६,१९४ बांधकामात ३,१३८ व्यापारवाणिज्यात २४, ४३७ व इतर नोकरीधंद्यांत ५२,२६३ कामगार होते. हातमाग विणकाम, टोपल्या विणणे, रेशीम पैदास असे कुटिरोद्योग असून, लघुउद्योगांत लाकूड कापण्याच्या गिरण्या, विटांचे कारखाने व फळे डबाबंद करणे यांचा समावेश होतो. शासनाने १५ हजार चात्यांची सूतगिरणी, प्लायवुडचा कारखाना, वन व कृषी उद्योगांसाठी केंद्रे अशा योजना हाती घेतल्या आहेत तसेच कागद व ताग गिरणी उभारली जात आहे. सहकारक्षेत्रात १ राज्यसहकारी व १ भूतारण बँक, सेवा व बहु–उद्देशी यांच्या प्रत्येकी १७८ सोसायट्या, ६७ विणकर सोसायट्या आणि भिन्न भिन्न व्यावसायिक, शेती, खरेदीविक्री ग्राहक, अशांच्या एकूण सु. २५० संस्था आहेत. १९६८-६९ च्या अर्थसंकल्पात राज्याची अपेक्षित आवक १२·७६ कोटी रु. असून खर्चाचा अंदाज १४·३७ कोटी रु. होता. पुरेशा शक्तिसाधनांच्या अभावी राज्यात मोठे उद्योगधंदे नाहीत, उदयपूर व अरूंधतीनगर येथे औद्योगिक वसाहती असून त्यांत लोहारकाम व सुतारकाम हे मुख्य व्यवसाय आढळतात. अगरतला, अंबासा, खोवई, धर्मनगर, कैलाशहर, उदयपूर, बोगाफा या ठिकाणी २८६ किवॉ. क्षमतेची ७ डीझेलनिर्मित वीज उत्पादन केंद्रे असून ५५ गावांना वीज पुरवठा होतो. राज्याचे मे १९७५ मध्ये वीज उत्पादन ५,१५० किवॉ. होते. गुमती जलविद्युत्‌ प्रकल्पाचे बांधकाम सुरू झाले आहे. राज्यातील ३,५९९ किमी. रस्त्यांपैकी १,२४९ किमी. पक्के झाले आहेत. आसाम–अगरतला महामार्ग हा देशाच्या मुख्य भूमीशी या प्रदेशाला जोडणारा एकमेव मर्मपथ आहे. लोहमार्गाने धर्मनगर हे एकच ठिकाण आसाममधील कलकालिघाट स्थानकास जोडलेले आहे. प्रदेशातील बहुतेक नद्यांतून पावसाळ्यात ४ टनी व उन्हाळ्यात २ टनी नावा वावरू शकतात. दळणवळणाच्या अडचणींमुळे विमान वाहतुकीला इकडे फार महत्त्व असून अगरतला येथील विमानतळाखेरीज अन्यत्र ३ धावपट्‌ट्या आहेत. त्रिपुरा राज्यात २६२ डाकघरे, १७ तारकचेऱ्‍या व ७ दूरध्वनीकेंद्रे आहेत.

लोक व समाजजीवन : १९७१ च्या शिरगणतीत त्रिपुराच्या प्रजेपैकी ८९·५% हिंदू, ६·७% मुसलमान व बाकीच्यांमध्ये ख्रिस्तांच्या अडीच पटीपेक्षा थोडे जास्त बौद्ध होते. प्रदेशात अनुसूचित जाती व जमातींचे सु. ४१·३४% लोक होते. चकमा, हलम, मोग, गारो, लुशाई या जमाती शेजारच्या आसाम टेकड्यांतून आलेल्या आहेत. खुद्द त्रिपुरी लोक मंगोलियन मानववंशाचे असून ब्रह्मी आराकानच्या मृंग लोकांपैकीच आहेत. त्यांच्यात पुराण, जमातिआ, नवातिआ व रियांग अशा उतरत्या सामाजिक श्रेणी आहेत. त्यांच्या धर्मात मूळ जडात्मवादी कल्पनांना हळूहळू हिंदू स्वरूप आलेले दिसते. त्यांच्यामध्ये बालविवाह नाहीत. काडीमोड व विधवाविवाह मान्य आहेत, प्रेतांचे दहन करण्यात येते.

राज्यातील ४,७२७ खेड्यांत १९७१ मध्ये ८९·५७% व अगरतला (लोकसंख्या १,००,२६४), धर्मनगर, खोवई, राधाकिशोरपूर, बेलोनिया आणि कैलाशहर या सहा गावांत १०·४३% वस्ती होती. वस्ती घनतेचे प्रमाण चौ. किमी. स १४९ असून दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९४३ होते. लोकसंख्यावाढ ही प्रदेशाची निकडीची समस्या आहे. ५० वर्षात त्रिपुराची वस्ती ६·७ पटींनी वाढली. शेजारच्या बांगला देशातील लोक पहिल्यापासूनच त्रिपुरात स्थलांतर करीत होते. १९४१ च्या हिंसक दंगलीनंतर हिंदूंचा एक लोंढाच त्रिपुरात आला व फाळणीनंतर निर्वासितांचे प्रमाण बेसुमार वाढले. १९५१–६१ या प्रदेशाची लोकसंख्या ७९ टक्‍क्यांनी वाढली व १९६१–७१ या काळात ३६·२८ टक्‍क्यांनी वाढली. १९६३ मध्ये २६,०४१ लोक आले व नंतरच्या वर्षांतही ह्यांची रीघ चालू आहे. त्रिपुरात सार्वजनिक आरोग्यासाठी ११ रुग्णालये, २३ आरोग्यकेंद्रे, १२४ औषधालये, ७९० रुग्णशय्या, १८२ डॉक्टर व २७४ परिचारिका उपलब्ध असून १२ विशेष रोग उपचार केंद्रे आणि ३२ कुटुंबनियोजन केंद्रे जनतेला वैद्यकीय मदत करीत आहेत.

भाषा व शिक्षण : राज्यातल्या सु. ३ लाख लोकांची त्रिपुरी अथवा मृंग भाषा असून ती बोडो भाषासमूहांपैकी काचारी व गारोसारखी एक उपभाषा आहे. गिरिप्रदेशातल्या विविध जमाती आपापल्या वेगळ्या भाषा बोलतात. या प्रदेशात स्थलांतरितांची बहुसंख्या होऊन बंगाली ही सर्वांत जास्त लोकांची भाषा ठरण्याचा संभव आहे. अगरतल्याहून ९ बंगाली दैनिके प्रसिद्ध होतात. १९७१ मध्ये साक्षर पुरुष ४०·१%, स्त्रिया २१·५% व एकूण साक्षरता प्रमाण ३०·९% होते. १९७०-७१ मध्ये ३५७ शिशुवर्गात १६,८२५ १,३८४ प्राथमिक शाळांत १,२७,०१३ २२० माध्यमिक विद्यालयांत ५३,७३६ ८९ दुय्यम विद्यालयांत ४२,८६८ व १२ व्यवसाय व हुन्नरशाळांत मिळून १,०२० ४५४ प्रौढ शिक्षण केंद्रांत ९,३७३ ४८ हिंदी व इतर विशेष शिक्षणसंस्थांत २,३२४ व मानव्य, विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, संगीत इ. विषयांच्या विविध महाविद्यालयांतून मिळून ७,५५३ विद्यार्थी होते.

बांबू, वेत व गवताच्या नाना वस्तूंची कुशल कारागिरी, अनेक प्रकारची मातीची भांडी, वैशिष्ट्यपूर्ण हातमाग कापड अशा हस्तव्यवसायांत त्रिपुराची कलादृष्टी आढळते. भिन्नभिन्न जमातींच्या समूहनृत्यांतून त्यांच्या क्रिडावृत्तीचा आविष्कार होतो. प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांपैकी अगरतलापासून ८ किमी. वर पुरातन मंदिरातील चतुर्दशदेवता, बारी राजवंशाच्या कुलदेवतांचे अष्टधातूंचे प्राचीन १४ मुखवटे, ५३ किमी. वर रुद्रसागर तलावातला भव्य नीरमहाल, ११६ किमी. वर गुमतीच्या उगमस्थानाचा डमबर धबधबा, माताबारी किंवा त्रिपुरसुंदरी देवीचे पीठस्थान, खडकात कोरलेल्या प्रचंड मूर्ती असलेले उनाकोटी तीर्थ ही विशेष उल्लेखनीय आहेत.

ओक, शा. नि.


त्रिपुरा राज्य

१ मेलाघर येथील ऐतिहासिक नीरमहालप्राचीन राजवाडा, अगरतला.

ॲल्युमिनियम कारखाना, अगरतला.

रिमांग जमातीचे नृत्य