केन्या पर्वत: आफ्रिकेतील उंचीने दुसऱ्या क्रमांकाचा पर्वत (५,१९४). नैरोबीच्या ईशान्यउत्तरेस ११२ किमी. ० १०′ द. येथे हा आहे. हा प्लायोसीन काळातील मृत ज्वालामुखी असून, याची उंच शिखरे म्हणजे पूर्वीच्या मुखात बुचाप्रमाणे बसून, थंड होऊन, दीर्घकालीन क्षरणामुळे अनावृत्त झालेले स्फटिकी खडक आहेत. उतारांवर

केन्या पर्वत

लाव्हाजन्य खडक आहेत. विषुववृत्ताजवळ असूनही याचा माथा हिमाच्छादित असतो. येथील हिमनद्या मागे हटत आहेत.  येथील जलप्रवाह ताना किंवा इवासो निरो नद्यांस मिळतात. उत्तर व पश्चिम बाजूच्या पठारावर गवत व बाभूळ जातीच्या वनस्पती, पूर्व व दक्षिण बाजूस उंच गवत व बुटकी झाडे व तेथून ३,२०० मी. उंचीपर्यंत दाट अरण्ये आहेत. त्यात सीडार, यलोवुड, कापूर, बांबू इ. वनस्पती आहेत. तेथून ४,५०० मी. पर्यंत अल्पाइन वनस्पती आहेत. अरण्यात हत्ती, म्हशी, चित्ते व इतर वन्य प्राणी आहेत. ३,२०० मी. उंचीवर मौंट केन्या नॅशनल पार्क आहे. खालच्या उतारांवर किकुयू, एंबू, मेरू वगैरे लोक शेती करतात. हा पर्वत पाहणारा पहिला यूरोपीय क्राप्फ (१८४९) व प्रथम वरपर्यंत चढून जाणारा मॅकिंडर (१८९९) होय.

कुमठेकर, ज. ब.