संयुक्त अरब अमीर राज्ये : संयुक्त अरब अमिराती (युनायटेड अरब एमिरेट्स). नैऋर्त्य आशियातील सात स्वतंत्र अमीर राज्यांचे मिळून बनलेले संघराज्य. अरबस्तान द्वीपकल्पाच्या ईशान्य किनाऱ्यावर २२° ३०‘ ते २६° १७‘ उ. अक्षांश व ५१° ३‘ ते ५६° २३‘ पू. रेखांश यांदरम्यान या अमिराती आहेत. त्यांच्या उत्तरेस इराणचे आखात, पूर्वेस व ईशान्येस ओमान देश तसेच ओमानचे आखात, दक्षिणेस व पश्चिमेस सौदी अरेबिया तर वायव्येस कॉटार हे देश आहेत. इराणच्या व ओमानच्या आखातांमुळे या अमिराती इराणपासून अलग झाल्या आहेत. या संघराज्यात नैऋर्त्येकडून ईशान्येकडे कमाकमाने अबू धाबी (क्षेत्रफळ ६७,३४० चौ. किमी.), दुबई (३,८८५ चौ. किमी.), शारजा (२,५९० चौ. किमी.), अजमान (२५९ चौ. किमी.), ऊम अल् काइवाइन (७७७ चौ. किमी.), रास अल्खाइमा (१,६८३ चौ. किमी.) व अल् फुजाइरा (१,१६६ चौ. किमी.) या सात अमिरातींचा समावेश होतो. त्यांपैकी पहिल्या सहा अमिराती इराणच्या आखातावर, तर अल् फुजाइरा (फुजाइरा) ही ओमानच्या आखातावर आहे. १९७१ पूर्वी ह्या अमिराती म्हणजे ब्रिटिश रक्षित राज्ये होती. ती ट्रूशल स्टेट्स, ट्रूशल ओमान, ट्रूशल कोस्ट या नावांनी ओळखली जात असत.

या संघराज्याची पश्चिमेस कॉटारपासून पूर्वेस ओमानपर्यंतची लांबी सु. ६४५ किमी. असून उत्तर- दक्षिण रूंदी ११० किमी. आहे. समुद्रातील सु. १०० बेटे वगळता अमिरातींच्या ताब्यातील एकूण क्षेत्र सु. ८३,६०० चौ. किमी. असून त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र अबू धाबीने व्यापले आहे. देशाला इराणच्या आखाताचा ६५० किमी. लांबीचा, तर ओमानच्या आखाताचा ८० किमी. लांबीचा किनारा लाभला आहे. सर्व अमिरातींच्या लोकवस्तीचे केंद्रीकरण किनाऱ्यालगत झालेले आहे. अमिरातींमधील सदस्य देशांच्या सरहद्दी बऱ्याचशा संदिग्ध आहेत. संघराज्याची लोकसंख्या ४४,९६,००० होती (२००५ अंदाज). अबू धाबी (लोकसंख्या १५,९१,०००-२००३) हे राजधानीचे व देशातील सर्वांत मोठे शहर आहे. प्रत्येक अमिरातीचे नाव हेच तिच्या राजधानीचेही नाव आहे. अबू धाबी व दुबई या अमिरातींच्या सरहद्दीवर देशाची नवीन राजधानी उभारण्याची योजना आहे.

भूवर्णन : या संघराज्याची बरीचशी भूमी वालुकामय, सस.पासून सु. १५० मी.पेक्षाही कमी उंचीची व विरळ वस्तीची आहे. येथील वाळवंटात वालुकागिरी आढळतात. किनाऱ्यावर ओसाड मैदानी प्रदेश आहेत. उत्तरेकडील इराणच्या आखाताच्या किनाऱ्यावर अनेक ठिकाणी खाडया, वाळूचे दांडे, दलदल आणि खारकच्छ, लहानमोठी बेटे व प्रवाळभित्ती आहेत. हा किनारा बराच उथळ असून अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. ओमानच्या आखातात मात्र खोल पाण्याची नैसर्गिक बंदरे आहेत. पूर्वेकडील प्रदेशात मात्र लहान टेकडया, डोंगर व पर्वतरांगा असून ओसाडपणा कमी आहे. या पर्वतीय प्रदेशाची उंची सर्वसाधारणपणे सस.पासून १,२०० मी.च्या आसपास असून सर्वाधिक उंची २,७०० मी.पर्यंत आहे.

हवामान : अमिरातींच्या किनारी प्रदेशातील हवामान उष्ण व आर्द्र असून आर्द्रतेचे प्रमाण नेहमीच जास्त असते. दक्षिणेकडील वाळवंटी प्रदेशातील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळे अत्यंत कडक असतात. मे ते ऑक्टोबर या कालावधीत उन्हाळा तर नोव्हेंबर ते एप्रिल हिवाळा असतो. हिवाळे थंड व सुखावह असतात. अमिरातींचे उन्हाळ्यातील सरासरी तापमान ३२° से. असून काही ठिकाणी ते कमाल ४९° से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील तापमान क्वचितच १०° से.पेक्षा खाली जाते. दुबईचे जानेवारीचे तापमान २३.४° से. व जुलैचे ४२.३° से. असते. शारजा येथील जानेवारीचे तापमान १७.८° से. व जुलैचे ३२° से. असते. पावसाचे प्रमाण फारच कमी व अनियमित आहे. नोव्हेंबर ते फेबुवारी या काळात थोडाफार पूर्वेकडील डोंगराळ भागात पाऊस पडतो. पूर्वेकडील डोंगर प्रदेशात हवामान सामान्यपणे थंड असते. देशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २ ते १० सेंमी.च्या दरम्यान आहे. अनेकदा अचानक येणाऱ्या वादळामुळे अल्पप्रमाणात होणाऱ्या पूर्वेकडील शेतीचे फार नुकसान होते आणि वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात. हिवाळ्याच्या मध्यास आणि उन्हाळ्याच्या प्रारंभी उत्तरे-कडून व वायव्येकडून येणाऱ्या वाऱ्यांबरोबर (शमाल) धूळ व वाळूही येते. लागवड केलेल्या वनस्पतींव्यतिरिक्त नैसर्गिक वनस्पती फारच तुरळक व लहान झुडुपांच्या स्वरूपात आढळतात. पशुपालनासाठी त्या उपयुक्त ठरतात. हिवाळी पावसानंतर या वाळवंटी प्रदेशात काही फुलझाडे फुलतात. अबू धाबीच्या प्रदेशांमध्ये आता मोठया प्रमाणात कच्छ वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. मरूदयानांच्या परिसरात खजूर, खारीक, आल्फाल्फा व काही फळझाडेही आढळतात. देशातील जंगलांखालील क्षेत्र ३,२१,००० हे. असून ते एकूण भूक्षेत्राच्या फक्त सु. ३.८ टक्के होते (२०००).

येथील जंगलात खोकड, कोल्हा, रानमांजर, बिडाल (लिंक्स), लांडगा इत्यादी सु. २५० जातींचे प्राणी आणि गरूड, घुबड, तीसा, ससाणा हे पक्षी काही प्रमाणात आढळतात. किनारी भागात कुरव, कुररी दिसून येतात. सागर-किनारी टयूना, गूपर, मॅकरेल व क्वचित शार्क, व्हेल हे जलचर आढळतात.

इतिहास व राजकीय स्थिती : या प्रदेशात प्राचीन काळापासून मानवी वस्ती असावी. भटक्या अरब टोळ्यांनी हळूहळू या प्रदेशाचा ताबा मिळविला. सातव्या शतकात येथील लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला. आशिया, यूरोप यांदरम्यानच्या प्राचीन काळातील व्यापारी मार्गावर हा प्रदेश असल्यामुळे यूरोपियन लोकांनी या प्रदेशात व्यापारी ठाणी उभारली. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी पोर्तुगीज लोक इराणच्या आखातात आले. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्यानंतर शंभर वर्षांनी आली. सतराव्या शतकात या प्रदेशाच्या विकासास अरब राज्यांनी सुरूवात केली. त्यांपैकी रास अल् खाइमा व शारजा या राज्यांनी इतर आखाती राज्यांबरोबर अनेक युद्धे केली. नाविक सामर्थ्य आणि मोती व अन्य व्यापारावरील वर्चस्व यांमुळे ते इतरांपेक्षा वरचढ होते. त्यांनी सतराव्या-अठराव्या शतकांत इतर आखाती राज्यांशी अनेक युद्धे केली व या प्रदेशातील व्यापारावर वर्चस्व मिळविले.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभास ब्रिटिशांची इराणच्या आखातात येणारी व्यापारी जहाजे यांच्याकडून लुटली जात. ही चाचेगिरी प्रामुख्याने खाइमा राज्याच्या खाडी प्रदेशातून तसेच लगतच्या इतर राज्यांकडूनही केली जाई. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने कडक कारवाईस सुरूवात केली. १८०९ मध्ये मुंबईहून खाइमाच्या विरोधात एक लष्करी तुकडी पाठविण्यात आली, परंतु ती अपयशी ठरली. १८१९ मधील दुसऱ्या मोहिमेत खाइमा शहर नष्ट करून (१८२०) ब्रिटिशांनी या प्रदेशातील सर्व राजवटींवर तात्पुरत्या युद्धबंदीची सक्ती केली. ब्रिटिश शासन व अमिराती यांच्यात युद्धबंदीचा करार झाला. या युद्धबंदी कराराच्या अंमलबजावणीची जबाबदारी ब्रिटिशांवर होती. अशा रीतीने एकेकाळाचा हा चाचांचा किनारा “ट्रूशल किनारा’ व नंतर ट्रूशल राज्ये बनला.

ब्रिटनने १८९२ मध्ये झालेल्या एका करारानुसार या प्रदेशाबाबतचे विदेशी धोरण ठरविण्याचा हक्क स्वत:कडे घेतला व परकीयांच्या आक्रमणापासून अमिरातींचे संरक्षण करण्याची हमी दिली. अंतर्गत व्यवहारासंबंधी मात्र त्या त्या राज्याला स्वायत्तता होती. १८७३ ते १९४७ या काळात या ट्रूशल राज्यांचा कारभार भारतातील ब्रिटिश राजवटीकडून, तर १९४७ नंतर लंडनच्या विदेशी कार्यालयाकडून पाहिला जाई. १९६० मध्ये ट्रूशल राज्य परिषदेची स्थापना करण्यात आली. १९६०च्या दशकात या प्रदेशाच्या आर्थिक व राजकीय परिवर्तनास सुरूवात झाली. अबू धाबी व दुबई यांनी १९६२ व १९६६ मध्ये तेल-उत्पादनास सुरूवात केली. ब्रिटिशांनी १९६८ मध्ये या प्रदेशाला १९७१ पूर्वी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. त्यानंतर ट्रूशल राज्ये, बहारीन व कॉटार यांनी स्वायत्ततेच्या तत्त्वावर एकत्र येण्याची योजना जाहीर केली; परंतु सप्टेंबर १९७१ मध्ये ब्रिटिशांनी येथील लष्कर काढून घेतल्यानंतर ही योजना बारगळली. बहारीन व कॉटार यांनी वेगळ्या स्वतंत्र राष्ट्राचा पर्याय निवडला. १ डिसेंबर १९७१ रोजी ग्रेट ब्रिटन व ह्या राज्यांदरम्यान असलेले विशेष संबंध संपुष्टात आले आणि २ डिसेंबर १९७१ रोजी भूतपूर्व ब्रिटिश-रक्षित सातपैकी सहा ट्रूशल राज्यांनी मिळून संयुक्त अरब अमिराती ह्या स्वतंत्र संघराज्याची स्थापना केली. त्याच वर्षी हा देश अरब लीग व संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला. रास अल् खाइमा हे सातवे राज्य फेबुवारी १९७२ मध्ये या अमिरातींत सामील झाले. कालबा हे छोटेसे राज्य १९५२ मध्येच शारजामध्ये विलीन झाले होते. दुबईने आपले स्वतंत्र लष्कर प्रभावीपणे निर्माण केले. १९८१ मधील इराक व इराण यांच्यातील युद्धापासून बोध घेऊन संयुक्त अरब अमिराती व इतर पाच अरब देशांनी मिळून ‘ आखाती सहकार परिषदे’ ची स्थापना केली. १९९० मध्ये इराकने कुवेतवर आक्रमण केले, त्या वेळी अमिरातीच्या फौजांनी कुवेतच्या स्वातंत्र्यासाठी इराकच्या विरोधात लढा दिला. फेबुवारी १९९१ मध्ये कुवेत मुक्त करण्यात आला.

संयुक्त अरब अमिरातींमध्ये अमिरातीची सत्ता म्हणजे राजेशाही आहे. संघराज्याने १९७१ मध्ये संविधान स्वीकारले असून त्यात दोन वेळा (१९७६, १९८१) दुरूस्त्या करण्यात आल्या. अमीरपद वंशपरंपरागत असते. प्रत्येक अमिरातीचे स्वतंत्र अंतर्गत धोरण असते. खनिजांवरील हक्क, विदेशी व्यापार, करपद्धती, पोलीस-दल, अंतर्गत राजकीय-आर्थिक धोरण इत्यादींबाबतची प्राथमिक धोरणे प्रत्येक अमिरात स्वत:पुरती ठरविते. सुप्रीम कौन्सिल ऑफ रूलर्स हे मंडळ संघराज्याचा राज्यकारभार पाहते. या सर्वोच्च मंडळात सातही अमिरातींच्या अमिरांचा समावेश असतो. कोणताही निर्णय बहुमताने घेताना किमान पाच किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांची मान्यता असावी लागते. हे संघराज्यीय शासन विदेशी व संरक्षणविषयक धोरण राबविते. तसेच संघराज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते. अंतिम सत्ता सर्वोच्च मंडळाकडे असते. मंडळाच्या सभासदांमधूनच अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष यांची पाच वर्षांसाठी निवड केली जाते. राष्ट्राध्यक्ष पंतप्रधानांची व मंत्रिमंडळाची नियुक्ती करतात. मंत्रिमंडळात सु. २५ सदस्य असतात. अबू धाबीचे अमीर शेख झायेद बिन सुलतान हे राष्ट्राध्यक्ष (कार. १९७१-२००४), तर दुबईचे अमीर शेख मुहम्मद बिन रशिद अल्म खल्म हे उप-राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान आहेत (२००४). शेख खलिफा बिन झयेद अल् नाह्यान हे २००४ पासून राष्ट्राध्यक्ष आहेत. चाळीस निर्वाचित सदस्यांचे राष्ट्रीय विधिमंडळ (फेडरल नॅशनल कौन्सिल) असून त्यात अबू धाबी व दुबईचे प्रत्येकी ८ सदस्य आणि उर्वरित पाच अमिरातींचे मिळून एकूण २४ सदस्य असतात. या प्रतिनिधींची नियुक्ती संबंधित अमिरातींचे अमीर करतात. ब्रिटिशांनी इराणच्या आखातातून आपली सत्ता व लष्कर काढून घेतले असले, तरी येथे ब्रिटिशांचा मोठा प्रभाव जाणवतो. ब्रिटिश शासनाकडून अमिरातींना सुरक्षा अधिकारी, अर्थविषयक तज्ज्ञ, शस्त्रास्त्र पुरवठा व लष्करी प्रशिक्षण इ. सुविधा पुरविल्या जातात.

सर्वोच्च न्यायिक सत्ता संघीय सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. कायदयातील मूळ तत्त्वे इस्लामी आहेत. प्रत्येक अमिरातीचीही स्वतंत्र दंडसंहिता असते.

संयुक्त अरब अमिरातीचा संरक्षणावरील एकूण खर्च १६,४२० लक्ष अमेरिकी डॉलर असून दरडोई हा खर्च ४०६ डॉलर आहे (२००३). भूसेनेत ३५,००० नौदलात २,५०० तर वायुसेनेत ४,००० सैनिक होते (२००२). संयुक्त संस्थानांच्या हवाई दलाचे १,३०० जवान येथे आहेत.

आर्थिक स्थिती : साधारणपणे इ. स. १८५० पूर्वी अरब अमिराती मागासलेल्या होत्या. बहुतांश लोक मासेमारी, मोती मिळविणे, उंट पाळणे, शेती, पशुपालन, खजूर-उत्पादन व व्यापार हे परंपरागत व्यवसाय करीत. येथे कृषिविकासास वाव नाही, तरीही समुद्राचे खारे पाणी गोडे करून (निर्क्षारीकरण) शक्य तेथे धरणे बांधून व वृक्षलागवड करून शेतीच्या विकासास प्रोत्साहन दिले जात आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्र ७२,३७० हेक्टर (एकूण भूक्षेत्राच्या सु. १%) होते (१९९४). अल् बुरेमी (अल् ऐन) मरूद्यान सुपीक आहे. त्याचा सर्वाधिक भाग अबू धाबीमध्ये आहे. हे मरूदयान आंब्यांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. १९९४ मध्ये वालुकागिरी हटवून सु. २१,१९४ शेते तयार करण्यात आली आहेत. काही ठिकाणी पाण्याच्या विहिरी व मरूदयाने आहेत. प्रामुख्याने मरूदयानांत व पूर्वेकडील पर्वतीय प्रदेशात शेती केली जाते. पर्वतीय प्रदेशात विहिरींची संख्याही जास्त आहे. शेतीतून खजूर, गहू, बार्ली आणि तृणधान्ये, फळे, भाजीपाला, आल्फाल्फा गवत इ. उत्पादने घेतली जातात. २००० मधील कृषी उत्पादन पुढीलप्रमाणे होते. (उत्पादन हजार टनांत) : टोमॅटो ७८०, खजूर ३१८, वांगी २८, कोबी ५८, भोपळे ३१, लिंबे १८, कलिंगडे ७८. येथून स्ट्रॉबेरी, फुले व खजुराची निर्यात केली जाते. रास अल् खाइमा येथे ब्रिटिशांमार्फत चालविलेले कृषी प्रशिक्षण विदयालय असून प्रायोगिक केंद्रामार्फत कृषी व्यवसायाला उत्तेजन दिले जात आहे.

वाळवंटातील भटके पशुपालक उंट, शेळ्या, मेंढया पाळतात. एकूण भूक्षेत्राच्या सु. २ % क्षेत्र कुरणांखाली आहे. २००० मधील पशुधन व प्राणिज उत्पादने पुढीलप्रमाणे होती : गुरे १,१०,००० उंट २,००,००० शेळ्या १२,००,००० मेंढया ४,६७,००० कोंबडया १५० लक्ष. प्राणिज उत्पादने १९९८ मध्ये (हजार टनांत) : मटण ३२, कोंबडीचे मटण ३०, अंडी १३, शेळीचे दूध २३.

किनारी प्रदेशातील लोक सागरातून मासे, कोळंबी व इतर सागरी उत्पादने घेतात. देशात ४,००० मासेमारी बोटी (१९९४) ११,०७४ मच्छीमार (१९९२) असून १९९९ मध्ये १,१७,६०७ टन मासे पकडण्यात आले.

अमिरातींमध्ये १९६०च्या सुमारास खनिज तेल साठयांचा शोध लागल्याने त्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदलून गेली. येथील खनिज तेलाचे एकूण साठे सु. चारशेऐंशी कोटी मे. टन (जगाच्या सु. ५%) असून नैसर्गिक वायूचे साठे सु. अठ्ठावीसशे कोटी घ. मी. (जगाच्या सु. ३%) आहेत. अबू धाबीमध्ये १९५८ साली तेलाचा शोध लागला. अबू धाबीच्या अपतट सागरी प्रदेशातून १९६२ मध्ये, तर खुद्द अबू धाबीमधून १९६३ मध्ये खनिज तेल उत्पादनास सुरूवात झाली. १९६६ मध्ये दुबईत विस्तृत तेलसाठे सापडले. शारजामध्ये १९७४ साली तेल उत्पादनास सुरूवात झाली. अमिरातींतून खनिज तेलाबरोबरच नैसर्गिक वायूचेही उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते. २००२ मध्ये एकूण खनिज तेल उत्पादन १,०५६ लक्ष टन झाले. येथील एकूण खनिज तेल उत्पादन जगाच्या ३ % होते (२००२).

अमिरातींची विदयमान अर्थव्यवस्था प्रामुख्याने खनिज तेलाच्या उत्पादन व निर्यातीवर अवलंबून आहे. खनिज तेलाचे कमाल उत्पादन अबू धाबी (८५%) दुबईतून व शारजामधून घेतले जाते. खनिज तेल उत्पादनामुळे या अमिरातींच्या औदयोगिक व नागरी विकासास चालना मिळालेली आहे. काही जागतिक तेल कंपन्या येथे खनिज तेल उत्पादन घेतात. त्यांच्याकडून मोठया प्रमाणावर स्वामित्वशुल्क मिळते. अमिरातींत काही खनिज तेल शुद्धीकरण कारखाने असले, तरी मोठया प्रमाणावर अशोधित खनिज तेल निर्यात केले जाते. या तेल कंपन्यांनी इतरही उदयोगधंदे स्थापन केल्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. खनिज तेल शुद्धीकरण, खनिज तेल रसायन उदयोग, ॲल्युमिनियम प्रगलन, जहाजदुरूस्ती इ. उदयोग येथे विकसित झाले आहेत. या संघराज्यात ९०४ औदयोगिक उत्पादन संस्था आहेत. अबू धाबीमध्ये ॲल्युमिनियम, केबल (तारा), सिमेंट, खते, रसायने दुबई व शारजा येथे लाटीव पोलाद व प्लॅस्टिक तसेच दुबईमध्ये विशेष उपकरणे व कापड इ. उत्पादने होतात. अजमानमध्ये संगमरवर दगड मिळतो. वाळू, रेती व चुनखडी यांच्या उत्पादनामुळे सिमेंट उदयोगाला चालना मिळाली आहे. अमिरातींमध्ये गंधक, जिप्सम, कोमाईट यांचेही उत्पादन घेतले जाते.

संघराज्यामध्ये नैसर्गिक वायूचेही प्रचंड साठे (सु. ६,०१० महापद्म घ. मी.) होते (२००२). याच वर्षी ४६ महापद्म घ. मी. इतके नैसर्गिक वायूचे उत्पादन झाले. येथील नैसर्गिक वायुक्षेत्रांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले आहे (१९७६). दास बेटावर नैसर्गिक वायूच्या द्रवीकरणाचा प्रकल्प आहे. आर्थिक सुबत्तेमुळे अबू धाबीमध्ये मोठया प्रमाणावर सामाजिक सेवा-सुविधा उपलब्ध आहेत. तेल उत्पादनाबरोबरच दुबई हे मध्य-पूर्वेतील महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. दुबईतील हिृयांचा व्यापार वाढत आहे. दुबईच्या प्रशासनांतर्गत येणारे जेबेल अली तसेच शारजा व फुजाइरा हे मुक्त व्यापारी विभाग आहेत. या विभागात अनेक विदेशी व्यापारकंपन्या आहेत.

जगातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणाऱ्या देशांपैकी संयुक्त अरब अमिराती हा एक देश आहे. देशांतर्गत एकूण उत्पादनात ५१% वाटा उदयोगांचा, ४५.५% सेवाव्यवसायांचा व ३५% कृषीचा होता (२००२). त्यांतील खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्पादनांचा वाटा ३३.७% आहे (२००२). अर्थसंकल्पात सर्वाधिक हिस्सा अबू धाबी व दुबई या दोन अमिरातींचा असतो. देशातील एकूण कामगारसंख्या सतरा लक्ष एकुणऐंशी हजार सहाशे चोपन्न असून त्यांपैकी बेकारांची संख्या फक्त २.३% होती (२०००).

देशातील एकूण वीज उत्पादन ३१.८९ महापद्म किवॉ. तास होते (२०००). येथे प्रामुख्याने औष्णिक विजेची निर्मिती केली जाते. संयंत्रांच्या साह्याने सागरी पाण्याचे पिण्याच्या पाण्यात रूपांतर करण्यात येते. १९९४ मध्ये असे १,१७,००० गॅलन पाणी पिण्यायोग्य करून घेण्यात आले.

देशाच्या एकूण निर्यातीतील ३७.६% वाटा अशोधित खनिज तेलाचा व ७.१% नैसर्गिक वायूचा होता (१९९७). याशिवाय येथून काही प्रमाणात खजूर व मासे यांचीही निर्यात केली जाते. निर्यात प्रामुख्याने जपान, कोरिया, भारत, सिंगापूर, ओमान या देशांना होते. बांधकामाचे साहित्य, कपडे, खादयपदार्थ, घरगुती उपयोगाच्या वस्तू, यंत्रसामग्री यांची आयात केली जाते. आयात मुख्यत: संयुक्त संस्थाने, जपान, ग्रेट ब्रिटन, भारत, जर्मनी व कोरिया यांच्याकडून केली जाते. २००१ मध्ये एकूण आयात १२०.६ महापद्म दिराम किंमतीची, तर निर्यात १७६.९ महापद्म दिराम किंमतीची होती. हे संघराज्य खनिज तेल निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेचे (ओपेक) सदस्य आहे.

अमिरातींनी १९७३ पासून दिराम हे आपले स्वत:चे चलन काढण्यास सुरुवात केली. १०० फितसचा १ दिराम होतो. आखातातील संयुक्त अरब अमिराती, बहारीन, कुवेत, ओमान, कॉटार व सौदी अरेबिया या सहा अरब देशांच्या २००१ मध्ये झालेल्या एका करारानुसार २०१० पासून या देशांचे एकच चलन ठेवण्यात येणार आहे. १९८० मध्ये संयुक्त अरब अमिरातींच्या मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. नॅशनल बँक ऑफ अबू धाबी, नॅशनल बँक ऑफ दुबई, एमिरेट्स बँक इंटरनॅशनल, मशरेक बँक, अबू धाबी कमर्शियल बँक या येथील सर्वांत मोठया बँका आहेत. विदेशी बँकांना त्यांच्या प्रत्येकी आठ शाखांपुरतीच परवानगी आहे.

वाहतूक सुविधांचा फार मोठा विकास १९७० पासून झाला. प्रत्येक वस्तीपर्यंत फरसबंदी रस्ते तयार करण्यात आले आहेत. रस्त्यांची एकूण लांबी १,१४५ किमी. होती (२००२). अत्याधुनिक सागरी बंदरांची व विमानतळांची निर्मिती करण्यात आलेली आहे. १५ व्यापारी सागरी बंदरे असून त्यांपैकी इराणच्या आखातावरील झईद (अबू धाबी), रशीद व जेबेल अली (दुबई), खलीद (शारजा), सक (रास अल् खाइमा) तर ओमानच्या आखातावरील फुजाइरा व खोर फक्कन ही बंदरे प्रमुख आहेत. दुबई, अबू धाबी, अल् ऐन, फुजाइरा, रास अल् खाइमा व शारजा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. देशात २००२ मध्ये पुढीलप्रमाणे संदेशवहनाची साधने होती : दूरध्वनी संच ३५,२१,७०० (हजार व्यक्तींमागे १,१००.५), संगणक ४,५०,००० (हजारी १४०.६), भमणध्वनिधारक २४,२८,१०० फॅक्स यंत्रे १५,७०० महाजालकांचा वापर करणाऱ्यांची संख्या ११,७५,६०० डाकघरे २७९ (२००३). देशात २००१ साली ७,८०,००० दूरचित्रवाणी संच व २००० साली १०,३०,००० रेडिओ संच होते.

लोक व समाजजीवन : संयुक्त अरब अमिरातींच्या एकूण लोक-संख्येमध्ये स्त्रियांपेक्षा पुरूषांचे प्रमाण जास्त आहे (५९%). १० % लोक भटक्या जमातीचे आहेत. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ५४ होती (२००५). सु. ८५ % लोक नागरी वस्तीत, प्रामुख्याने अबू धाबी व दुबई या सर्वांत मोठया शहरांत राहतात. वेगवेगळ्या अमिरातींची २००३ मधील लोकसंख्या पुढीलप्रमाणे : अबू धाबी १५,९१,००० अजमान २,३५,००० दुबई १२,०४,००० फुजाइरा १,१८,००० रास अल् खाइमा १,९५,००० शारजा ६,३६,००० ऊम अल् काइवाइन ६२,००० दर हजारी जन्मदर १९.८, मृत्युदर २ (२००२) व बालमृत्युमान ८ होते (१९९९). सरासरी आयुर्मान पुरूषांचे ७२.७३ वर्षे व स्त्रियांचे ७७.८७ वर्षे आहे. लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर ७.१% होता (१९९९-२००३).

अमिरातींमधील बहुतांश मूळ रहिवासी सुन्नी मुस्लिम व अरब आहेत. काही कृष्णवर्णीय आफिकनांचे वंशज आहेत. बरेचसे अरब मध्यपूर्व देशांतून स्थलांतर करून आलेले आहेत. १९६० च्या दशकापासून शेजारील अरब राष्ट्रे, भारत, इराण, पाकिस्तान इ. देशांतून हजारो लोक येथे आले. १९९० च्या दशकाच्या अखेरीस अमिरातींतील एकूण लोकसंख्येपैकी ७८ % लोक परदेशी होते. परदेशी आप्रवाशांच्या वाढत्या संख्येला छेद देण्यासाठी अमिरातीच्या नागरिकांची लोकसंख्या वाढविण्यास शासन प्रोत्साहन देत आहे.

संयुक्त अरब अमिरातींमध्ये शिक्षण, आरोग्य व शासकीय सेवा इत्यादींची चांगली प्रगती झाली आहे. देशातील साक्षरतेचे प्रमाण २००२ मध्ये ७७.३ टक्के (७५.६% पुरूष व ८०.७% स्त्रिया) होते. ६ ते १२ वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे आहे. पूर्वप्राथमिक शाळांमध्ये ६७,७४९ विद्यार्थी व ३,६९१ शिक्षक प्राथमिक शाळांत २,८०,२४८ विद्यार्थी व १७,५७३ शिक्षक माध्यमिक शाळांत २,२०,१३४ विद्यार्थी व १६,९५० शिक्षक होते (२००१). एमिरेट्स विद्यापीठात १६,१२८ विद्यार्थी तर उच्च तंत्रविद्या महाविदयालयांत १४,२६५ विद्यार्थी होते (२००३). याच वर्षी विदयापीठांतील चार विद्याशाखांमध्ये २,२४५ तर शारजामधील ‘युनिव्हर्सिटी सिटी’ मध्ये १,००० विद्यार्थी होते. संयुक्त अरब अमिराती विद्यापीठाची स्थापना १९७७ मध्ये झाली. प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ७७.३% असून हेच प्रमाण पुरूषांच्या बाबतीत ७५.६% तर स्त्रियांबाबत ८०.७% होते (२००२). अरबी ही अधिकृत भाषा असून इंग्रजी, उर्दू , हिंदी, इराणी या भाषाही बोलल्या जातात. देशातून ९ दैनिके प्रसिद्ध होत होती; त्यांपैकी ५ अरबी व ४ इंग्रजी भाषेतून होती (१९९६).

संघराज्याच्या शासनाकडून लोकांना मोफत आरोग्यसेवा पुरविली जाते. देशात ३८ शासकीय रूग्णालये (५,७२२ खाटा), २७ खाजगी रूग्णालये, १३१ शासकीय आरोग्य केंद्रे, एक वनौषधी निर्माण केंद्र १,२८१ खाजगी औषधोपचार केंद्रे होती (२००३). २००१ मध्ये ५,८२५ डॉक्टर, ९५४ दंतवैदय व १२,०४५ परिचारिका होत्या. खनिज तेलाचा शोध लागेपर्यंत येथील लोकांचे राहणीमान अगदी सामान्य होते. त्यानंतर अमिरातींमधील लोकसंख्या वेगाने वाढत आहे व राहणीमानही उंचावले आहे. त्याचबरोबर राहत्या घरांची टंचाई व इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. बहुतांश लोक आधुनिक पद्धतीच्या घरांमध्ये किंवा सदनिकांत राहतात. लोकसंख्येच्या सु. ९०% लोक मोठया शहरांत राहतात. ग्रामीण भागातील लोक परंपरागत कुडाच्या झोपड्यांत राहतात. आहारामध्ये भात, कडधान्ये, मासे व अन्य मांसाहाराचे प्रमाण नित्य असते. वाटाण्याचे पदार्थ लोकप्रिय आहेत. खजूर, खारीक, तीळ, मध व साखर यांचा उपयोग करून अनेक गोड पदार्थ बनविले जातात. चहा-कॉफी ही नित्य पेये आहेत. सार्वत्रिक ठिकाणी मादक पेये निषिद्ध आहेत. पामच्या टोपल्या, लोकरी अभे, ब्लँकेटे, पिशव्या, सतरंज्या यांची येथील कारागिरी प्रसिद्ध आहे.

उंटांच्या व घोड्यांच्या शर्यती हे देशातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहेत. या खेळांत सट्टा लावण्यास बंदी आहे. वाळूवरील स्कीईंग हा येथील एक वैशिष्टपूर्ण खेळ आहे. अलीकडच्या काळात टेनिस, रग्बी, व्हॉलि-बॉल, सॉकर व किकेट इ. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळही देशात लोकप्रिय झाले आहेत. येथील शारजा कप’ किकेट स्पर्धा प्रसिद्ध आहेत.

देशात पर्यटन व्यवसायाचा विकास करण्यात येत असून येथील संग्रहालये, मरूद्याने, पुळणी, प्राणिसंग्रहालये, मत्स्यालये ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. अबू धाबी, दुबई, शारजा, रास अल् खाइमा ही अमिरातींमधील प्रमुख तसेच समृद्ध शहरे आहेत. अबू धाबी हे सर्वांत समृद्ध आहे. येथील संग्रहालये प्रसिद्ध आहेत. येथे पर्यटक मोठया संख्येने येतात. २००२ मध्ये ३९,२०,००० विदेशी पर्यटकांनी अमिरातींना भेट दिली व त्यापासून देशाला १३,२८० लक्ष अमेरिकी डॉलर महसूल मिळाला. (चित्रपत्र)

चौधरी, वसंत