सोफिया : बल्गेरिया देशाची राजधानी व देशातील औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण. हे बल्गेरियाच्या पश्‍चिम भागात इस्तंबूलच्या ईशान्येस ४६० किमी., बेलग्रेडच्या आग्नेयीस ३२० किमी. ईस्कर व तीच्या उपनद्यांच्या सुपीक मैदानी प्रदेशात वसलेले आहे. लोकसंख्या १२,४१,३९६ (२०१२). हे बल्गेरियाच्या मोठमोठ्या शहरांशी व अथेन्स, बेलग्रेड, इस्तंबूलशी लोहमार्गाने जोडलेले आहे. येथून यूरोपातील प्रमुख शहरांशी हवाई वाहतूक होते.

द ईव्हान आसेन नॅशनल थिएटर

शहराचे नाव वेळोवेळी बदलण्यात आल्याचे शहराचे इतिहासावरून निदर्शनास येते. प्राचीन काळी हे सेर्डिका किंवा सार्डिका या नावाने ओळखले जात असे. याशिवाय स्लाव्ह लोक यास स्त्रेडेट्स व बायझंटिन लोक यास ट्रिऑदिस्ता म्हणत असत. सध्याचे सोफिया नाव चौदाव्या शतकापासून आहे. सार्डी या थ्रेसियन टोळीने इ.स.पू. आठव्या शतकात हे वसविले. इ.स.पू. २९ मध्ये हे रोमनांनी जिंकले होते. सम्राट ट्रॅजनच्या कारकिर्दीत याची भरभराट झाली व सम्राट काँस्टंटिन द ग्रेट याच्या कालावधीत हे वैभव शिखरावर होते. अट्टिला व हन्स यांनी ४४१–४४७ मध्ये याची लूट केली होती. सहाव्या शतकात सम्राट जस्टिनिअन याच्या कारकिर्दीत बायझंटिनांचा येथील हस्तक्षेप वाढला. याने येथील सोफिया चर्चची उभारणी केली. इ.स. ८०९ मध्ये बल्गेरियन खान क्रुम याने याचा ताबा घेतला व हे बल्गेरियन राज्यात समाविष्ट केले. हे बल्गेरियन साम्राज्यात १०१८ पर्यंत होते. १०१८ ते ११८५ पर्यंत हे बायझंटिन साम्राज्यात होते. तुर्कांनी हे शहर १३८२ मध्ये जिंकले. जानेवारी १८७८ मध्ये रशियनांनी ऑटोमन राजवटीतून ते स्वतंत्र केले व एप्रिल १८७९ मध्ये येथे बल्गेरियाची राजधानी केली गेली. दुसज्या महायुध्दात हे शहर जर्मनीच्या ताब्यात होते. मात्र रशियनांनी सप्टेंबर १९४४ मध्ये हे पुन्हा स्वतंत्र केले.

हे बल्गेरियाचे प्रमुख व्यापारी व औद्योगिक शहर आहे. येथे अभियांत्रिकी, धातू उद्योग, विद्युत्-साहित्य, अन्नप्रकिया, सूत व कापड तयार करणे, छपाई, तंबाखूचे पदार्थ, रबर, फर्निचर, मद्य निर्मिती, रसायन इत्यादी उद्योग चालतात.

येथील बल्गेरियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, अकॅडमी ऑफ ॲग्रीकल्चर सायन्स, सोफिया विद्यापीठ या उच्च शिक्षणाच्या प्रमुख संस्था आहेत. येथील सिरिल व मेथोडिअस नॅशनल लायब्ररी, द इव्हान व्हॅझॉव्ह नॅशनल थिएटर, ऑपेरा हाऊस, खगोलशास्त्रीय वेधशाळा, सेंट जॉर्ज चर्च, सोफिया चर्च, शहराजवळील बोयना गावातील १३ व्या शतकातील भित्तिचित्रासाठी प्रसिध्द असलेला चर्च, द बुयूंक जर्न मशीद (सध्याचे पुरातत्त्वीय संग्रहालय, १३ वे शतक), बन्या-बशी मशिद (१६ वे शतक), झार अलेक्झांडर दुसरा याचा पुतळा, अलेक्झांडर नेव्हास्की कॅथिड्रल इत्यादी पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.