कोर्तेझ, एर्नांदो(१४८५ ? – २डिसेंबर १५४७). स्पॅनिश मेक्सिकोविजेता. याचा जन्म स्पेनमधील मेडलीन शहरी एका खानदानी कुटुंबात झाला. कायद्याचे शिक्षण अर्धवट टाकून १५०४साली तो वेस्ट इंडीजला गेला. १५११ मध्ये व्हेलास्केथ याला क्यूबा जिंकण्यास त्याने मदत केली. राजधानी सांत्यागो दे कूव्हा या शहराचा तो महापौर झाला. त्याने तेथे लग्न केले. व्हेलास्केथने मेक्सिको जिंकण्याची आज्ञा दिल्यावरून त्याने अवघे पाचसातशे सैनिक, अकरा जहाजे, सोळा घोडी व दहा तोफा इतक्या साहित्यानिशी कूच केले. तद्देशीयांना घोडा माहीत नसल्यामुळे कोर्तेझला फायदा झाला. व्हेलास्केथने त्याला परत बोलाविले.

एर्नांदो कोर्तेझ

पण तो तसाच पुढे निघाला. मेक्सिकोच्या यूकातान प्रदेशावर तो उतरला. तेथून पुढे जात असता ताबास्कोच्या राजाशी त्याचे युद्ध झाले. कोर्तेझने त्याचा पराभव केला. धनदौलतीशिवाय राजाने वीस दासी कोर्तेझला नजर केल्या. त्यांपैकी सुंदर असून पुष्कळ भाषा जाणणाऱ्या मालिंची नावाच्या दासीला त्याने आपली रखेली बनविले. तेथून पुढे निघाल्यावर त्याने हल्लीचे व्हेराक्रूझ गाव वसविले व स्वतःला प्रमुख म्हणून नेमून घेतले. आपल्या सैनिकांनी मोठया ॲझटेक साम्राज्याला घाबरून पळून जाऊ नये म्हणून कोर्तेझने आपली जहाजे जाळली, असे म्हणतात. ॲझटेकच्या वाटेवर त्लास्काला येथील पराक्रमी लोकांचा त्याने पराभव करून त्यांच्याशी मैत्री संपादन केली. त्लास्कालाचे ॲझटेकशी वैर असल्याने ही मैत्री फार महत्त्वाची ठरली.  त्लास्कालाचे थोडे सैनिक घेऊन त्याने तेनॉच्तित्लानकडे कूच केले. ही त्यावेळेस ॲझटेक साम्राज्याची राजधानी होती व माँतेझूमा हा तेथील राजा होता. राजाच्या धमक्यांना न जुमानता ८ नोव्हेंबर १५१९ रोजी कोर्तेझने राजधानीत प्रवेश केला. सूर्यपुत्र समजून कोर्तेझचा राजाने आदरसत्कार केला. परंतु कोर्तेझने राजाला पकडून ओलीस ठेवले. इकडे १५२० मध्ये व्हेलास्केथने कोर्तेझला पकडण्यासाठी नार्व्हाएस याला सैन्य देऊन पाठविले. कोर्तेझने आल्व्हारादो यास राजधानी सांभाळण्यास सांगितले व थोड्यासैन्यानिशी जाऊन नार्व्हाएसचा पराभव करून त्याला कैद केले. मध्यंतरी ॲझटेक लोकांनी बंड पुकारले. त्यांना शांत राहण्यास सांगत असता माँतेझूमा जखमी झाला व काही दिवसांनी मरण पावला. कोर्तेझ राजधानीत आल्यावर लढाईस तोंड लागले. ३० जून १५२० च्या रात्री मोठी हानी सोसून कोर्तेझला राजधानीतून परतावे लागले. त्लास्कालाच्या साहाय्याने १३ ऑगस्ट १५२१ रोजी कोर्तेझने राजधानी जिंकली, कित्येक अधिकाऱ्यांची अमानुष हत्या केली, ॲझटेकचे साम्राज्य नष्ट केले, शहर उद्ध्वस्त केले व तेथेच हल्लीचे मेक्सिको सिटी हे शहर वसविले. कोर्तेझने त्यानंतर हाँडुरसपर्यंत प्रदेश काबीज केला. स्पेनच्या दरबारात त्याच्याविरुद्ध झालेल्या आरोपांना जबाब देण्याकरिता तो स्वतः १५२८ मध्ये स्पेनला गेला. तेथे त्याला मोठा किताब बहाल करून राजाने त्याचा सन्मान केला. परंतु तो परतला तेव्हा त्याचे अधिकार कमी केले गेले. १५३६ मध्ये त्याने कॅलिफोर्नियाचे आखात शोधून काढले. १५४० मध्ये तो स्पेनला परतला पण त्यालास्पेनमध्ये कोणी विचारीना. १५४१ मध्ये त्याने अल्जिअर्सच्या मोहिमेत भाग घेतला परंतु त्याचे गलबत फुटले. शेवटी निवृत्त होऊन तो सेव्हिलजवळ आपल्या दौलतीवर मरण  पावला. सोळाव्या शतकातील एक निधड्याछातीचा कर्तबगार पण क्रूर व विश्वासघातकी पुरुष म्हणून त्याची प्रसिद्धी आहे.

शाह, र. रू.