गिनी बिसाऊ : आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील छोटेखानी नवोदित प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ३६,१२५ चौ. किमी. लोकसंख्या ४,८७,४४८ (१९७०). १० ५२’ उ. ते १२ ४०’ उ. आणि १३ ३८’ प. ते १६ ४३’ प. यांदरम्यान. याच्या उत्तरेस सेनेगल, पूर्वेस व दक्षिणेस गिनी (कोनाक्री) व पश्चिमेस अटलांटिक महासागर असून, याचा सर्वांत रुंद भाग किनाऱ्यापासून सु. २२२ किमी. पर्यंत अंतर्भागात गेलेला आहे. याचा अत्यंत दंतुर किनारा वायव्येस केप रोशो भूशिरापासून आग्नेयीस कॅजेट खाडी या कोगन खाडीच्या पश्चिम फाट्यापर्यंत गेलेला असून, त्यावर अनेक खाड्या निर्माण झालेल्या आहेत. खाड्यांपलीकडील बोलामा व इतर बरीच बेटे, तसेच किनाऱ्यापासून ४८ किमी. वरील व्हीझगॉश द्वीपसमूह या देशातच समाविष्ट आहे. राजधानी बिसाऊ (लोकसंख्या ६२,१०१—१९७०) येथे आहे.

भूवर्णन : येथील बहुतेक सर्व प्रदेश सखल व दलदलींनी भरलेला असून आग्नेय भाग सर्वांत उंच (२४४ मी.) आहे. कशेऊ, मँझॉअ गेब आणि कॉरबाल या मुख्य नद्या आहेत. पश्चिमेचा प्रदेश तृतीयक कालीन अवसादांचा आणि पूर्वेचा पुराजीव संरचनेच्या फूटा जालनचा आहे.

हवामान उष्ण व आर्द्र असून डिसेंबर ते मे सहाराकडून उष्ण हरमॅटन वारे वाहतात. मासिक सरासरी कमाल तपमान मेमध्ये २९·५ सें. व किमान तपमान जानेवारीत २५ से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १९१ सेंमी. असून पाऊस जून ते नोव्हेंबर या काळात पडतो. ऑगस्टमध्येच तिसरा हिस्सा पाऊस पडतो.

किनारी भाग व बेटे अरण्यमय आणि कच्छवनश्रीयुक्त आहेत. अंतर्भाग कमी अरण्यमय आहे. येथील प्रमुख झाडे आफ्रिकी मॉहॉगनी, ताड, काटेसावरी, गोरखचिंच, कोपेब तेरडा, बाभूळ जातीची झाडे ही आहेत. पपई, पेरू, आंबा, केळे, मुसुंबी ही प्रमुख फळे आहेत. प्राण्यांत म्हशी, हरणे, काळवीट, माकडे, चित्ते, अनेक जातींचे सर्प हे मुख्य असून दक्षिण भागात हत्तीही आढळतो. खाड्यांत सुसरी व शार्क मासे आढळतात. पेलिकन, बगळा, मारबू, ट्रंपेट, इग्रेट व अनेक प्रकारचे पोपट हे मुख्य पक्षी आहेत.

इतिहास : तेराव्या शतकात येथील शेतकरी भात पिकवीत. त्यांना पाणीपुरवठा व लोखंडाचा उपयोग माहीत होता. १४४६ मध्ये पोर्तुगीज खलाशी नूनू त्रिशताऊँ याने हा प्रदेश शोधून काढला. केप व्हर्द बेटांमार्गे होणारा गुलामांचा व्यापार हे येथील प्रमुख आकर्षण होते. त्याशिवाय अंतर्भागासाठी मीठ व अन्नपदार्थ आणि पोर्तुगाल, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स यांकडे जाणारे हस्तिदंत, मेण, कातडी व रंगांसाठी लाकूड यांचाही व्यापार चालू होता. स्पर्धेत ब्रिटिशांना बाजूला करून आणि फ्रेंचांशी १८८६ मध्ये व १९०२ ते १९०५ मध्ये करार करून, कधी बेताबाताने तर कधी दांडगाईने १९१३—१५ पर्यंत पोर्तुगीजांनी आपला अंमल पक्का केला. पोर्तुगीज गिनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पोर्तुगीज वसाहतीस पुढे पोर्तुगालच्या एका सागरपार प्रांताचा दर्जा मिळाला. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर वाढत्या आफ्रिकी राष्ट्रवादामुळे या देशातील लोकांनीही १९६२ मध्ये परकीय सत्तेला आव्हान दिले. पोर्तुगीज शासनाने सु. ३०,००० सैन्य बंदोबस्तासाठी पाठविले. तथापि गिनी आणि केप व्हर्द यांच्या स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या PAIGC या आफ्रिकी पक्षाने देशाचा सु. तीन चतुर्थांश भाग मुक्त केला. आमीलकार काब्राल हा स्वतंत्रवाद्यांचा पुढारी. त्याने कोनाक्री (गिनी) येथून चळवळीचे नेतृत्व चालविले. २४ सप्टेंबर १९६३ रोजी गिनी बिसाऊने स्वातंत्र्य पुकारले. पोर्तुगीज सैन्याने उठाव दडपण्याचे प्रयत्न चालविले परंतु स्वातंत्र्यवाद्यांनी गनिमी काव्याने पोर्तुगीजांना जेरीस आणले. १९७१ मध्ये देशात ५०,००० पोर्तुगीज सैन्य असूनही दोन तृतीयांश मुलूख स्वातंत्र्यवाद्यांच्या ताब्यात होता. एप्रिल १९७२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रतिनिधी मंडळाने या देशास भेट देऊन, मुक्त प्रदेशाचा कारभार नीट चालू असल्याचे प्रतिवृत्त दिले. २४ जानेवारी १९७३ रोजी डॉ. आमीलकार काब्राल याचा कोनाक्री येथे खून झाला. तथापि काब्रालच्या जागी पेरेइरा येऊन चळवळ चालू राहिली. २४ सप्टेंबर १९७३ रोजी मुक्त प्रदेशातील बूए येथे गिनी बिसाऊ सार्वभौम राष्ट्राची घोषणा करण्यात आली. १९७२ मध्ये मुक्त प्रदेशात निवडणूका घेऊन १२० सदस्यांची राष्ट्रीय विधिसभा स्थापन झाली असून, तिच्या वतीने घोषणा होत आहे असे जाहीर करून, ५ सदस्यांचे कौन्सिल ऑफ स्टेट, ८ राज्य आयुक्त व ८ उप आयुक्त यांच्या नेमणुकांना मान्यता दिली गेली. अल्जीरिया, यूगोस्लाव्हिया, टांझानिया, रशिया, चीन, भारत यांनी गिनी बिसाऊला लगेच मान्यता दिली. वसाहतीच्या स्वातंत्र्यलढ्यात पोर्तुगीज सैन्याची अपरिमित हानी होऊ लागल्याने अखेर पोर्तुगीज लष्कराने पोर्तुगालमध्ये उठाव करून क्रांती घडवून आणली. नवीन शासनाचे पोर्तुगालचे परराष्ट्रमंत्री डॉ. मार्यो साअर्स व गिनी बिसाऊचे अध्यक्ष लूईश काब्राल यांच्यात अल्जिअर्स येथे करार होऊन गिनी बिसाऊवरील ४०० वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला. १० सप्टेंबर १९७४ रोजी पोर्तुगालने गिनी बिसाऊला अधिकृत मान्यता दिली. १२ ऑगस्ट १९७४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने गिनी बिसाऊच्या सभासदत्वाची शिफारस केली. शेवटचा पोर्तुगीज सैनिक परत गेल्यावर गिनी बिसाऊचे नेते चौदा वर्षांनंतर बिसाऊत परत आले आणि त्यांनी लोकांच्या उत्स्फूर्त स्वागतात पूर्वीच्या पोर्तुगीज गव्हर्नरांच्या निवासस्थानाचा ताबा घेतला. स्वागत समितीत पोर्तुगीज प्रतिनिधीही होता.

आर्थिक स्थिती : देश कृषिप्रधान असून भात, ताडतेल, भुईमूग, नारळ, तेलबिया ही प्रमुख उत्पन्ने आहेत. इमारती लाकूड व मेण ही अरण्योत्पादने असून काही कातडीही निर्यात होतात. शेती मुख्यतः निर्वाहशेतीच आहे. तथापि भुईमूग, ताडतेल, तेलबिया, नारळ निर्यात होतात. १९७०-७१ मध्ये देशात २,७०,००० गुरे, ६५,००० मेंढ्या, १,७५,००० शेळ्या, १,५०,००० डुकरे आणि ३,००० गाढवे होती. १९७० मध्ये ५,४३,८२८ काँटो वसूल व ५,१८,७२४ काँटो खर्च झाला होता. १ काँटो = १,००० एस्कुडो १ एस्कुडो = १०० सेंटाव्हो ५९·४५ एस्कुडो = १ पौंड स्टर्लिंग व २५·१२५ एस्कुडो = १ अमेरिकन डॉलर असे १९७४ मध्ये विनिमय दर होते. १९६७ मध्ये आयात ४,७२,००० व निर्यात ५,९१,००० होती. १९७१ मध्ये ८,७९,१७२ काँटो आयात व ५७,१८९ काँटो निर्यात होती. शक्तिसाधनांचा अभाव ही औद्योगिक प्रगतीतील मुख्य अडचण आहे. १९६८ मध्ये ५,६०० किवॉ. वीज उत्पादनक्षमता होती व ७७ लक्ष किवॉ. ता. विद्युत्‌निर्मिती झाली. काही थोड्या छोट्या कारखान्यात शेतमालावर प्रक्रिया केली जाते व साबण तयार केला जातो. अन्नपदार्थ, मद्ये, कापड, औद्योगिक उत्पादने इ. आयात करावी लागतात.

लोक व समाजजीवन : मूळच्या लोकांत बॅलांटे, फुलानी, माजाको, मेंडिगो, पेपेल या प्रमुख जमाती आहेत. सु. ४५% लोक मुस्लिम असून थोडेसे ख्रिस्ती आहेत. बाकीचे पारंपरिक धर्माचार पाळतात. केप व्हर्द गिनी क्रओल ही मुख्य भाषा आहे. बहुसंख्य लोक मागासलेले अशिक्षित आहेत. ते गवती छपराच्या झोपडीवजा घरांतून राहतात. ते परकीय अंमलाखाली जाच, जुलूम, वेठबिगार यांनी बेजार झालेले, अपपोषण, हिवताप, क्षय, खुपऱ्या इत्यादींनी जर्जर झालेले आहेत. त्यांचे आरोग्य आणि जीवनमान सुधारणे ही स्वातंत्र्योत्तर महत्त्वाची समस्या लोकधुरीणांपुढे आहे. १९७२ मध्ये १० रुग्णालये, ६७५ खाटा, ९३ आरोग्य केंद्रे व प्रसूतिगृहे व ८३ सरकारी डॉक्टर होते.

शिक्षण : १९७२-७३ मध्ये ५०९ प्राथमिक शाळांतून १,१४८ शिक्षक व ४८,००७ विद्यार्थी ७ माध्यमिक प्रिपरेटरी शाळांत १७६ शिक्षक व ४,१३३ विद्यार्थी होते.

वाहतूक व दळणवळण : वाहतूक मुख्यतः नद्या, खारकच्छ व कालवे यांतून चालते. प्रमुख बंदर बिसाऊ हे असून बोलामा, कशेऊ, फारिम ही इतर बंदरे आहेत. १९७२ मध्ये ३,५०० किमी. रस्ते असून त्यांपैकी ५४० किमी. पक्के होते. बिसाऊ येथे विमानतळ आहे. तेथून केप व्हर्द व पोर्तुगाल यांकडे नियमित विमान वाहतूक होते. देशात लोहमार्ग नाहीत. १९७२ मध्ये ८,१३७ रेडिओ संच व १९७१ मध्ये २,६१६ दूरध्वनी होते. नजीकच्या काळात दूरचित्रवाणीचीही सोय करण्याचे सरकारने ठरविले आहे.

कुमठेकर, ज. ब.


गिनी बिसाऊ

  

गिनी बिसाऊची राजधानी बिसाऊ