सर्बीया : रिपब्लिक ऑफ सर्बीया. आग्नेय यूरोपमधील एक नव-निर्मित भूवेष्टित देश. क्षेत्रफळ ५५,९६८ चौ.किमी. लोकसंख्या ७४,९८,००० (२००२). सर्बीयाच्या उत्तरेस हंगेरी, ईशान्येस रूमानिया, पूर्वेस बल्गेरिया, दक्षिणेस मॅसिडोनिया, नैऋर्त्येस अल्बेनिया, पश्चिमेस माँटनीगो, बॉझ्निया-हेर्ट्‌सगोव्हीना आणि वायव्येस क्रोएशिया हे देश आहेत. दक्षिणेकडील कॉसॉव्हॉ व मेटोहीया आणि उत्तरेकडील व्होज्व्होदिना हे सर्बीयातील दोन स्वायत्त प्रांत आहेत. कॉसॉव्हॉचे क्षेत्रफळ १०,८८७ चौ.किमी. व लोकसंख्या २०,००,००० असून प्रीश्तिना ही या प्रांताची राजधानी आहे. व्होज्व्होदिनाचे क्षेत्रफळ २१, ५०६ चौ.किमी. व लोकसंख्या २०,५०,००० असून नोव्ही साद ही राजधानी आहे. सर्बीयाने पॅनोनियन मैदानाचा दक्षिण भाग आणि बाल्कन प्रदेशाचा मध्य भाग व्यापला आहे. बेलगेड ( लोकसंख्या ११,२०,०९२-२००२) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सर्बीयाची बरीचशी भूमी पर्वतीय आहे. सर्बीया हा मध्य, दक्षिण व पूर्व यूरोप तसेच बाल्कन द्वीपकल्प व पॅनोनियन मैदान यांना जोडणारा दुवा आहे. देशाचा उत्तरेकडील एक तृतीयांश भाग मध्य यूरोपीय पॅनोनियन मैदानात येतो. पॅनोनियन मैदानी प्रदेश पश्चिमेस क्रोएशियाच्या पूर्व भागापासून ईशान्येस रूमानियाच्या सरहद्दीपर्यंत पसरलेला आहे. हा बहुतेक सपाट मैदानी प्रदेश असून येथे अधूनमधून कमी उंचीच्या टेकडया आहेत. देशातील हा महत्त्वाचा कृषी विभाग आहे. अगदी पूर्वेकडील भाग बॉलचेन मैदानात गेलेला आहे. संपूर्ण मध्य यूरोपात पसरलेली कार्पेथियन पर्वतश्रेणी देशाच्या ईशान्य भागात आहे. कार्पेथियन पर्वताचा दक्षिण भाग बाल्कन पर्वताला जाऊन मिळाला आहे. आग्नेय भागात बाल्कन पर्वत रॉडॉपी पर्वताला जाऊन मिळतो. दक्षिणेस अल्बेनिया सरहद्दीवर शारा हा पर्वत असून दाराव्हिका (२,६५६ मी.) हे या प्रदेशातील सर्वोच्च शिखर आहे तसेच नैऋर्त्य भागात बॉबॉटॉव्ह (२,५२२ मी.) हे शिखर आहे.

सर्बीयाचे जलवाहन अनेक नदयांनी केलेले आहे. वेगवेगळ्या नदया एकमेकींना जोडल्या गेलेल्या असून त्या जलवाहतुकीस उपयुक्त आहेत. डॅन्यूब, साव्हा, तिसा ( टिस ) या प्रमुख नदया असून त्या तिमिस व बेगेज नदयांनी एकमेकींना जोडल्या गेल्या आहेत. या सर्व नदयांमुळे सर्बीया उत्तर व पश्चिम यूरोपशी तसेच पूर्व यूरोपशी जोडला गेला आहे. ऱ्हाईन-मेन-डॅन्यूब कालवा-उत्तर समुद्रमार्ग आणि तिसा-तिमिस-बेगेज-डॅन्यूब-काळा  समुद्रमार्ग हे जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. बेलगेड व नोव्ही साद ही डॅन्यूबवरील महत्त्वाची बंदरे आहेत.

हवामान : सर्बीयाच्या हवामानात प्रादेशिक भिन्नता आढळते. बहुतांश भागात मध्य यूरोपीय प्रकारचे हवामान आहे. उत्तर भागात थंड हिवाळे, उष्ण व आर्द्र उन्हाळे आणि पर्जन्याचे उत्तम वितरण असलेले खंडांतर्गत प्रकारचे, तर दक्षिण भागात उष्ण व कोरडे उन्हाळे, थंड हिवाळे व भरपूर बर्फवृष्टी असे एड्रिॲटिक प्रकारचे हवामान आढळते. स.स.पासूनच्या उंचीतील फरक एड्रिॲटिक समुद्रापासूनचे अंतर, विस्तृत नदयांची खोरी आणि वाऱ्याचे स्वरूप यांनुसार हवामानात तफावत आढळते. व्होज्व्होदिना प्रदेशातील हवामान वैशिष्ट्यपूर्ण असे खंडांतर्गत स्वरूपाचे असून उत्तर व पश्चिम यूरोपकडून येणाऱ्या वायुराशींमुळे येथील हवामानाचे हे स्वरूप निर्माण झाले आहे. दक्षिण व नैऋर्त्य सर्बीयावर भूमध्य सागरी हवामानाचा प्रभाव जाणवतो. दिनारिक आल्प्स व इतर पर्वतश्रेण्यांमुळे उबदार वायुराशींचे   तापमान कमी होते. सॅन्डझॅक पठारी प्रदेश पर्वतश्रेण्यांनी वेढलेला असल्यामुळे तेथील हिवाळे फारच कडक असतात. ३०० मी. उंचीपर्यंतच्या  भागातील वार्षिक सरासरी तापमान १०.९° से. ३०० ते ५०० मी. उंचीच्या भागात सु. १०° से. तर १,००० मी. पेक्षा अधिक उंचीच्या भागात ते ६° से.च्या दरम्यान असते. बेलगेड येथील जानेवारीचे तापमान १° से. तर जुलैचे तापमान २३.५° से. असते. तेथील वार्षिक सरासरी पर्जन्य ३६७.७ मिमी. असते. सर्बीयाचे सु. एक चतुर्थांश क्षेत्र (२७%) वनाच्छादित आहे.

इतिहास : इ. स. सहाव्या शतकात सांप्रत पोलंड, रशिया इ. भागांतून स्थलांतर करून आलेल्या स्लाव्ह जमातीच्या लोकांनी बाल्कन द्वीपकल्प प्रदेशात वस्ती केली. स्लाव्ह लोकांच्या प्रत्येक गटाने आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली. उदा., सर्ब लोकांनी सर्बीया राज्याची, क्रोएटांनी क्रोएशिया राज्याची स्थापना केली. आठव्या व नवव्या शतकांत येथील स्लाव्ह लोकांमध्ये दोन गट निर्माण होऊन ते सर्व रोमन कॅथलिक किंवा ऑर्थोडॉक्स क्रिश्चन बनले. सर्ब लोकांनी प्रामुख्याने ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन पंथाचा स्वीकार केला. दक्षिण भागातील सर्ब लोकांवर बायझंटिन साम्राज्याचे वर्चस्व होते. ते बाराव्या शतकात कमी झाल्यावर सर्ब लोकांनी आपल्या स्वतंत्र एकसत्ताक राज्याची स्थापना केली. स्टेव्हान नेमन्जा (कार. ११६७-९९) तसेच स्टेव्हान दूशान (कार. १३३१-५५) यांच्या कारकीर्दीत सर्बियन राज्य विशेष सामर्थ्यवान होते. दूशानने लगतचा बराचसा प्रदेश जिंकून घेतला होता. त्यानंतर मात्र तुर्कांचा सर्ब राज्याdarc प्रभाव वाढत गेला. दूशानच्या मृत्यूनंतर अनेक थोर सर्बियन नेत्यांनी तुर्कांचे आधिपत्य मान्य केले. १३८९ मध्ये झालेल्या कॉसॉव्हॉच्या लढाईत तुर्कांनी सर्बियनांचा पराभव केला. पुढे सु. ५०० वर्षांपर्यंत येथे तुर्की प्रभाव कायम राहिला. दीर्घकाळ असलेल्या तुर्की साम्राज्याचा ठसा येथील लोकांवर उमटलेला दिसतो. तुर्कांनी सर्बियन लोकांचे ऑर्थोडॉक्स चर्चचे अनुयायीत्व मान्य केले होते. १८७८ मध्ये सर्बीयाने तुर्कांकडून स्वातंत्र्य मिळविले. काराजॉर्जे (ब्लॅक जॉर्ज) व मिलॉश ओबेनोव्हिच यांच्या नेतृत्वाखाली सर्ब लोकांनी तुर्कांविरूद्ध बंड उभारले. त्यावेळी ऑस्ट्रिया-हंगेरियन राजसत्तेचा अनुसेवी म्हणून सर्बीया राहिला. सर्बियन कांतिकारी गटातील सदस्य गाव्ह्रीलो प्रींट्सीप याने ऑस्ट्रियन आर्चडयूक फान्सिस फर्डिनांड याची हत्या केली. या घटनेला सर्बीयाला जबाबदार धरून ऑस्ट्रियाने युद्धाची घोषणा करून सर्बीयावर स्वारी केली. या घटनेतूनच पुढे १९१४ मधील पहिले महायुद्ध भडकले.

पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९१८ मध्ये सर्बियन राजवंशातील राजा पहिला पीटर याच्या नेतृत्वाखाली किंग्‌डम ऑफ दी सर्ब्ज, क्रोएट्स ॲन्ड स्लोव्हेनीज अशा स्वतंत्र देशाची स्थापना करण्यात आली. पीटरच्या मृत्यूनंतर १९२१ मध्ये त्याचा मुलगा पहिला अलेक्झांडर (कार. १९२१-३४) अधिकारावर आला. अलेक्झांडरने १९२९ मध्ये घटक राज्यांची पूर्वीची विभागणी रद्द करून ‘यूगोस्लाव्हिया’ ( दक्षिणी स्लाव्ह लोकांची भूमी ) या नवीन देशाची स्थापना केली. १९४६ च्या संविधानानुसार सहा प्रजासत्ताकांचे मिळून यूगोस्लाव्हिया संघीय प्रजासत्ताकाची तर १९६३ च्या संविधानानुसार सहा प्रजासत्ताके व दोन स्वायत्त प्रांत मिळून यूगोस्लाव्हिया समाजवादी संघीय प्रजासत्ताकाची स्थापना करण्यात आली. १९७१ व १९७४ मध्ये संविधानात बदल करून प्रजासत्ताकांना अधिक स्वायत्तता देण्यात आली. परंतु या वेगवेगळ्या प्रजासत्ताकांना व प्रांतांना संपूर्ण स्वायत्तता हवी होती. १९९० च्या दशकात यूगोस्लाव्हियाने वांशिक आधारावर हा गुंता सोडविण्यास सुरूवात केली. १९९१ मध्ये साल्वेनिया, क्रोएशिया व पूर्वीचे यूगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिया यांनी, तर १९९२ मध्ये बॉझ्निया व हेर्ट्‌गोव्हीना यांनी आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली. एप्रिल १९९२ मध्ये सर्बीया व माँटनीगो यांनी आपल्या नव्या यूगोस्लाव्हिया संघाची स्थापना करून सर्व सर्ब लोकांना त्यात सामील होण्याचे आवाहन केले. बॉझ्नियन युद्धासाठी लष्करी व आर्थिक मदत केल्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी सर्बीयावर आर्थिक निर्बंध लादले. १९९५ मध्ये बॉझ्नियन युद्ध संपुष्टात आले. १९९६ मधील निवडणुकीत सर्बियन सोशालिस्ट पक्षाचा अनेक प्रदेशांत पराभव झाला. १९९८ मध्ये कॉसॉव्हॉमध्ये अल्बेनियन राष्ट्रवादी गट व सर्बियन लष्कर यांच्यात  युद्धाचा भडका उडाला. २००२ मध्ये यूगोस्लाव्हिया संघातील सर्बीया व माँटनीगो या दोन घटकांनी निकटचे परस्परसंबंध प्रस्थापित करण्याच्यादृष्टीने बोलणी सुरू केली. या बोलण्यांचे फलित म्हणजे फेबुवारी २००३ मध्ये यूगोस्लाव्हिया संघ संपुष्टात येऊन तीन वर्षांनंतर एकत्र किंवा अलग राहण्याच्या तरतुदींसह सर्बीया व माँटनीग्रो या स्वतंत्र प्रजासत्ताकाची निर्मिती झाली. सदर तरतुदीच्या आधारे २१ मे २००६ रोजी माँटनीगोने मतदान घेऊन ६६.६ टक्के मतांच्या आधाराने सर्बीयापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.


राज्यकारभाराच्या सोयीसाठी सर्बीयाची विभागणी चोवीस जिल्ह्यांमध्ये व विविध नगरपरिषदांमध्ये करण्यात आली आहे. सर्बीयात व्होज्व्होदिना आणि कोसोव्हो व मेटोहीया असे दोन स्वायत्त प्रांत आहेत. १७ फेबुवारी २००८ रोजी कॉसॉव्हॉने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली असली तरी अद्याप तो संयुक्त राष्ट्रांच्या प्रशासनाखाली आहे. कॉसॉव्हॉच्या स्वातंत्र्याला बेलगेडचा विरोध आहे. सर्बीयात २५० सदस्यसंख्या असलेली एकसदनी राष्ट्रीय सभा असून राष्ट्राध्यक्षांची निवड सार्वत्रिक मताधिकाराने पाच वर्षांसाठी केली जाते. १९९० मध्ये राष्ट्रीय सभेने नवीन संविधान स्वीकारले. राष्ट्रीय सभेने सर्बीया हे समाजवादी ऐवजी लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित केले. येथे बहुपक्षीय निवडणूक पद्धतीचा स्वीकार करण्यात आला आहे. देशात एक सर्वोच्च न्यायालय, ३० जिल्हा न्यायालये व १३८ परगणा न्यायालये असून त्यांमध्ये एकूण २,१८० न्यायाधीश होते तर १७ आर्थिक कायदा न्यायालये असून त्यांत २३७ न्यायाधीश होते (२००२).

आर्थिक स्थिती : सर्बीयात एकूण कृषी क्षेत्र २६,०४,०००हेक्टर होते (२००४). याचवर्षी कृषी उत्पादने पुढीलप्रमाणे झाली ( उत्पादन हजार टनांत ) : मका २,८४३, गहू १,१६५, बटाटे ६९२, आलुबुखार ५१५, द्राक्षे ३४३, कोबी २७३, टोमॅटो १२८, साखरबीट १२५. जगाच्या एक तृतीयांश काळा आंचू ( रासबेरी ) उत्पादन सर्बीयातून होत असून गोठवलेल्या फळांच्या निर्यातीत हा देश अग्रेसर आहे. देशातपशुधन पुढील प्रमाणे होते (आकडे हजारांत ) : गुरे ८६७, डुकरे १,९७५, मेंढया १,३८१, कोंबडया १०,८०८ (२००४).

जागतिक बँकेच्या २००७ मधील अंदाजानुसार सर्बीयाची अर्थव्यवस्था ही उच्च मध्यम उत्पन्न असलेली आहे. सर्बीयाचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन ८१.८९ महापद्म डॉलर असून दरडोई उत्पन्न १०,९८५ डॉलर होते. २००६ मधील थेट परकीय गुंतवणूक ५.८५ महापद्म डॉलर होती. या विभागातील ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. १९८९ मध्ये येथे आर्थिक संक्रमणाचा काळ सुरू झाला. पूर्वी येथे अनुकूल आर्थिक स्थिती होती. परंतु राजकारण, संयुक्त राष्ट्रांचे १९९२ ते ९५ या कालावधीतील आर्थिक निर्बंध आणि कॉसॉव्हॉ युद्ध यांमुळे येथील मोठया प्रमाणातील अध:संरचना, उदयोगधंदे व एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्थेची फार मोठी हानी झाली. भूतपूर्व यूगोस्लाव्हिया व कॉमेकॉन यांची बाजारपेठ गेल्यामुळे सर्बीयाच्या समस्या अधिकच वाढल्या. ऑक्टोबर २००० मध्ये भूतपूर्व यूगोस्लाव्ह संघराज्याचे राष्ट्राध्यक्ष मिलोसेव्ही यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर सर्बीयाच्या आर्थिक विकासाला चांगलीच गती आली. यूरोपीय व्यापारी संघाचे सभासदत्व मिळविण्याच्या दृष्टीने सर्बीया प्रयत्नशील आहे.

सर्बीयाला आपली अर्थव्यवस्था पूर्वस्थितीवर आणण्याबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बेकारी, प्रतिकूल संतुलनाचा व्यापार व कर्जबाजारीपणा ह्या त्यांपैकी महत्त्वाच्या समस्या आहेत. नजीकच्या काळात आर्थिक विकासाचा दर वाढविण्यासाठी सर्बीयाने ठोस पावले उचलली आहेत. २००७ पूर्वीच्या तीन वर्षांतील आर्थिक विकासाचा सरासरी दर ६.६% इतका जास्त राखल्याने सर्बीयाला कधीकधी ‘बाल्कन टायगर ’ असे संबोधले जाते. सन २००४ मध्ये देशात औदयोगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली : लाटीव पोलाद १५,४३,४५३ टन लोह खनिज ९,५९,०१९ टन सिमेंट १३,३२,००० टन मोटारी १३,५१६ ट्नक ६४७ सुती कापड ५८,५२,००० चौ.मी. लोकरी कापड १,४४,००० चौ.मी. तर खनिजांमध्ये ३३,७५३ हजार टन लिग्नाइट व ५,४९५ हजार टन तांबे उत्पादन झाले. एकूण लाकूड उत्पादन २६,९१,००० घ.मी. झाले. विद्युत्‌शक्तीचे उत्पादन ३३.८७ द. ल. किवॉ. तास झाले.

देशातील एकूण कामगार संख्या २९,३०,८४६ इतकी असून त्यांपैकी ७,००,६८१ कामगार कृषी, वनोदयोग व पाणीपुरवठा क्षेत्रात ५,५१,४२९ निर्मिती उदयोगांत तर ४,४१,८०० ठोक व किरकोळ व्यापारात आणि प्रतिसंस्करण क्षेत्रात १,७०,८६१ सार्वजनिक प्रशासन व विमा क्षेत्रात १,६६,६१९ आरोग्य व समाजकार्य क्षेत्रात आणि १,६३,६२८ वाहतूक, साठवण व संदेशवहन क्षेत्रात होते. कामगारांचे वार्षिक सरासरी वेतन २१,०८५ दिनार होते, तर बेकारीचे प्रमाण १८.४% होते (२००४). सन २००३ च्या अंदाजपत्रकानुसार एकूण महसूल ३,६६,५०४ द. ल. दिनार व व्यय ३,५३,३२९ द. ल. दिनार होता. न्यू दिनार हे येथील चलन असून १ अमेरिकी डॉलर = ५९.२१ न्यू दिनार असा विनिमय दर होता (२००७).

वाहतूक व दळणवळण : सर्बीयातील मोराव्हा खोरे हा पूर्व व पश्चिम  यूरोपीय देशांना जोडणारा दुवा आहे. या खोऱ्यातील मार्ग पर्वतीय प्रदेश  टाळून काढलेले असल्याने खंडीय यूरोप ते ग्रीस व आशिया मायनर यांदरम्यानचा प्रवास सुकर होतो. अनेक यूरोपीय महामार्ग सर्बीयातून जातात. देशात १४,८१,४९८ मोटारगाडया १६,०४२ दुचाकी ९,६२६ बसगाड्या १,१६,४४० ट्रक २८,२२२ विशेष वाहतूक वाहने १,२६,८१६ ट्रॅक्टर व १,०१,४६५ ट्रेलर होते (२००५). शेजारील देशांपेक्षा आधी ( इ. स. १८६९) आधुनिक सर्बीयातील लोहमार्ग सुरू झाला होता. ‘सर्बियन लोहमार्ग विभागा ‘ मार्फत येथील लोहमार्ग वाहतूक व्यवस्था पाहिली जाते. जगातील सर्वांत जुन्या हवाई वाहतूक कंपन्यांपैकी ‘ जाट एअरवेज ’ ही कंपनी येथे आहे ( स्था. १९२७). देशात बेलगेड निकोला टेस्ला, निस कॉन्स्टटाइन द गेट व व्हर्सक इंटरनॅशनल हे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. देशातील नदया व कालवे जल-वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. मध्य यूरोपीय देशांना काळ्या समुद्राला जोडणारी डॅन्यूब नदी सर्बीयातून वाहते. डॅन्यूब-ऱ्हाईन-मेन कालवामार्गाने उत्तर समुद्रात उतरता येते. तिसा नदीमार्गाने पूर्व यूरोपात जाता येते. साव्हा नदीमार्गाने भूतपूर्व यूगोस्लाव्हियाच्या पश्चिमेकडील एड्रिॲटिक समुद्रापर्यंत जाता येते. सर्बीयातील ८९% घरांमध्ये दूरध्वनी सेवा आहे. लोकसंख्येपेक्षा सु. २३% अधिक भ्रमणध्वनी आहेत. ४९% घरांत संगणक, २७% लोकांकडे इंटरनेट व ४२% लोकांकडे दूरचित्रवाणीसाठी केबल सेवा होती (२००७).


लोक व समाजजीवन : सर्बीयाची एकूण लोकसंख्या ( कोसोव्हो वगळता ) ७४,९८,००० इतकी होती. एकूण लोकसंख्येत सर्वाधिक म्हणजे ८२.६६% लोकसंख्या सर्ब लोकांची असून इतर अल्पसंख्यांकांमध्ये हंगेरियन ३.९१%, बॉझ्नियन १.८२%, यूगोस्लाव्ह १.०८%, क्रोएट ०.९४%, स्लोव्हाक ०.८९% व इतर ८.७०% अशी होती (२००२). सर्बीयातील ( कॉसॉव्हॉ वगळता ) वेगवेगळ्या धर्मीयांची संख्या पुढीलप्रमाणे होती : ईस्टर्न ऑर्थोडॉक्स ८४.१%, रोमन कॅथलिक ६.२४%, इस्लाम ४.८२%, प्रॉटेस्टंट १.४४%, इतर धर्मीय ३.४%. उत्तरेकडील व्होज्व्होदिना प्रांतात वांशिक व धार्मिक भिन्नता आढळते.

गेल्या काही शतकांपासून येथील ऑर्थोडॉक्स व रोमन कॅथलिक पंथीय लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण होते. पुढे त्यामध्ये इस्लामचा शिरकाव झाला. त्यामुळे सर्बीया हा एक विविधतेचा देश बनला आहे. सन २००२ च्या जनगणनेनुसार ८२% लोकांनी आपले राष्ट्रीयत्व सर्बियन असेच जाहीर केले आहे. येथील इतर ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन समाजात माँटनीगोनियन, रूमानियन, मॅसिडोनियन, व्लाच इत्यादींचा समावेश होतो. कॉसॉव्हॉ या दक्षिणेकडील प्रांताची जनगणना करण्यात आलेली नाही. या प्रांताची अंदाजे लोकसंख्या १३,५०,००० आहे. त्यातील ९०% अल्बेनियन, ८% सर्ब व इतर २% आहेत. कॉसॉव्हॉमधून हद्दपार झालेले सु. २,००,००० सर्बियन व इतर निर्वासित या देशात आहेत. यूरोपातील निर्वासितांची सर्वाधिक संख्या सर्बीयातच आहे. १९९० च्या दशकात सु. ५,००,००० लोक सर्बीयातून बाहेर पडले. देश सोडून जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पदवीधरांची आहे. कॉसॉव्हॉ प्रांतात ९०% लोक मुस्लिम, व्होज्व्होदिना प्रांतात २५% कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट तर मध्य सर्बीया व बेलगेड प्रदेशात ९०% पेक्षा अधिक लोक ऑर्थोडॉक्स क्रिश्चन समाजातील आहेत. सर्बीयाच्या दक्षिण भागात इस्लाम धर्मीय प्रबळ आहेत.  स्पेनमधून ज्यू लोकांना हद्दपार व्हावे लागले, तेव्हा त्यांनी फार मोठया संख्येने बाल्कन प्रदेशात स्थलांतर केले. परंतु पुढे या प्रदेशातील युद्धजन्य  परिस्थितीत फार मोठया प्रमाणावर सर्बियन ज्यू लोक मारले गेले किंवा त्यांनी इतरत्र स्थलांतर केले.

सर्बीयामध्ये विविध संस्कृतीचे मिश्रण झालेले दिसून येते. उत्तर सर्बीयाची पश्चिम यूरोपशी तर दक्षिण सर्बीयाची बाल्कन व भूमध्य सागरी प्रदेशाशी विशेष जवळीक आहे.सर्बीयातील बरेचसे मठ मध्ययुगीन काळात बांधलेले आढळतात. देशाच्या इतिहासातील बहुतांश राण्या या जन्माने परदेशातील होत्या. देशातील आठ सांस्कृतिक स्थळांचा समावेश यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये होतो.

कॉसॉव्हॉ व मेटोहीया प्रांत वगळता देशात २००३ मध्ये एकूण ८७,३७० बालके जन्माला आली तर १,०९,६५० लोक मृत्यू पावले. दर हजारी जन्मदर १०.७ तर मृत्यूदर १३.६, बालमृत्यूमान ९.२ होते तर लोकसंख्या वाढीचा दर ०.२% होता. याचवर्षी ४५,९६४ विवाह तर ८,४३२ घटस्फोट झाले. येथील सरासरी आयुर्मान ७०  वर्षे असून साक्षरतेचे प्रमाण ९६.४ % आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ९७.७ आहे. सर्बियन ही देशाची अधिकृत भाषा असून ९५%  लोक ही भाषा बोलतात. ५% लोकांची अल्बेनियन ही भाषा आहे.

सर्बीयातील शिक्षण पद्धतीची पाळेमुळे ११ व्या, १२ व्या शतकापर्यंत पाठीमागे जातात. त्या काळात येथील पहिली कॅथलिक महाविदयालये व्होज्व्होदिना येथे स्थापन करण्यात आली होती. बाराव्या शतकापासून सुरू झालेली मध्ययुगीन शिक्षणव्यवस्था सर्बियन ऑर्थोडॉक्स धर्मगुरूच्या व्यवस्थापनाखाली चालत असे. सर्बियातील सर्वांत जुने सामान्य महाविदयालय साँबॉर येथे १७७८ मध्ये तर पहिले विदयापीठ १८०८ मध्ये बेलग्रेड येथे सुरू करण्यात आले. आठ वर्षांच्या प्राथमिक शिक्षणासाठी वयाच्या सातव्या वर्षी मुले शाळेत दाखल होतात. सन २००३-०४ मध्ये देशात १,८०४ बालोदयाने व शिशुविदयालये यांत १,६१,९३८बालके ३,५९२ प्राथमिक शाळांत ६,६४,५७७ विदयार्थी ४९१ माध्यमिक विदयालयांत ३,०३,५९६ विदयार्थी तर २२३ उच्च शिक्षण संस्थांत २,१८,३६८ विदयार्थी  शिक्षण घेत होते.

सर्बीयात प्रामुख्याने फुटबॉल, बास्केटबॉल, वॉटरपोलो, व्हॉलीबॉल, हँडबॉल व टेनिस हे खेळ खेळले जातात. रेड स्टार बेलग्रेड व केके पार्टीझन हे देशातील दोन प्रमुख फुटबॉल क्लब राजधानी बेलग्रेड येथे आहेत. दोन प्रतिस्पर्धी क्लबमधील सामन्याला ‘इंटरनल डर्बी’ असे म्हणतात. अनेक सामन्यांचे आयोजन देशात केले जाते. एक्झिट फेस्टिव्हल, गुका ट्रंपेट फेस्टीव्हल यांसारखे अनेक लोकप्रिय उत्सव येथे मोठया प्रमाणात साजरे होतात.

महत्त्वाची स्थळे : बेलग्रेड या राजधानीच्या ठिकाणाशिवाय टीटोग्रँड (पॉडगॉरिका) व नोव्ही साद ही प्रमुख शहरे आहेत. आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्टया तसेच चित्रपट निर्मिती यांसाठी बेलग्रेड महत्वाचे आहे. देशातील पर्वतीय प्रदेश आणि गावे ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.झ्लातिबॉर, कोपाउनीक व तारा ही प्रमुख पर्वत पर्यटन स्थळे आहेत. व्हन्‌जॅका बंजा, सोको बंजा, निस्का बंजा यांसारखे अनेक ‘स्पा’ (खनिजयुक्त औषधी पाण्याचे झरे) आहेत. त्यांपैकी व्हन्‌जॅका बंजा हा सर्वांत मोठा आहे. बेलग्रेड, नोव्ही साद, नीश ही शहरे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाची आहेत. ख्रिश्चनांची देशभरातील धार्मिक स्थळे, डॅन्यूब, साव्हा, तिसा या नदयांच्या काठावरील पर्यटन केंद्रे व जलक्रीडास्थाने, एव्होल्जा वारोस हे प्रसिद्ध ज्वालामुखी ठिकाण इ. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. २००७ मध्ये २.२ द. ल. पर्यटकांनी सर्बीयाला भेट दिली होती.

पहा : यूगोस्लाव्हिया.

चौधरी, वसंत


सर्बीया

राजधानी बेलग्रेड : एक दृश्य. पादचाऱ्यांसाठीची मध्यवर्ती बाजारपेठ, बेलग्रेड.

खुली भाजी मंडई : बेलग्रेड, एक दृश्य. नोव्ही साद : देशातील औदयोगिक शहर.
ऐतिहासिक तुर्की किल्ल्याचे अवशेष, बेलग्रेड. प्रीश्तिनाजवळील प्रसिद्ध ग्राचानित्सा मोनॅस्टरी, १४ वे शतक.
नैर्ऋत्य सर्बीयातील वैशिष्ट्यपूर्ण मोनॅस्टरी