जेकबाबाद : पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या त्याच नावाच्या जिल्ह्याचे ठाणे. लोकसंख्या ३५,२७८ (१९७२). पाकिस्तान वेस्टर्न रेल्वेचे प्रस्थानक व सिंधमधील प्रमुख सडकांचे केंद्र असलेले हे शहर सततच्या उच्च तपमानासाठी जगद्विख्यात आहे. मे-जूनमध्ये येथील तपमान ५२से.च्याही वर जाते. गालिचे, जिनगरी सामान, लाकडी व लाखेची खेळणी, दिवे, भरतकाम हे व्यवसाय आणि धान्य, तूप, कातडी इत्यादींचा व्यापार येथे चालतो. जेथे सिंध विद्यापीठाला जोडलेले शासकीय महाविद्यालय, नगरपालिकेचे प्रक्षेपण केंद्र, घड्याळमनोरा, जेकबचे थडगे व सार्वजनिक उद्याने आहेत.

ओक, द. ह.