सेंट पीटर्झबर्ग – १ : रशियाची भूतपूर्व राजधानी व रशियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ५०,००,००० (२०१० अंदाज). हे रशियाच्या वायव्य कोपऱ्यात, मॉस्कोच्या वायव्येस ६४० किमी., नीव्हा नदीच्या त्रिभुज प्रदेशातील बेटावर व फिनलंड आखातावर वसलेले आहे. याचा विस्तार ५७० चौ.किमी. आहे.

सेंट आयझॅक कॅथीड्रल

रशियन इतिहासात सेंट पीटर्झबर्गचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पीटर द ग्रेट याने १७०३ मध्ये हे वसविले. त्याने शहराच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. १७१२ मध्ये रशियाची येथे राजधानी करण्यात आली. बाल्टिक समुद्रमार्गे व्यापार व यूरोपशी संपर्क यांमुळे यास ‘विंडो लुकिंग ऑन यूरोप ’ असे संबोधले जात होते. रशियन साम्राज्याची राजधानी १९१८ मध्ये येथून मॉस्कोला हलविण्यात आली. या शहराचे १७०३ ते १९१४ पर्यंत सेंट पीटर्झबर्ग, १९१४ ते १९२४ पर्यंत पेट्रोग्राड, १९२४ ते १९९१ पर्यंत लेनिनग्राड व १९९१ पासून सेंट पीटर्झबर्ग असे नामांतर झाले आहे. रशियन साम्राज्याची येथे राजधानी असल्याने अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील राजकीय घटनांचे हे केंद्रस्थान होते. १८२५ मधील सैनिकांचे अयशस्वी बंड, १९०५ व १९१७ मधील राज्यक्रांती यांचे हे प्रमुख ठिकाण होते. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने या शहरास दिलेल्या ९०० दिवसांच्या वेढ्यानंतरही हे शहर जर्मनीच्या ताब्यात गेले नव्हते. या वेढ्यात येथील बाँबवर्षाव, तोफगोळ्यांचा मारा, आजारपण, उपासमार यांमुळे येथील सु. ६,६०,००० लोक मृत्युमुखी पडले होते.

नीव्हा नदी व तिच्या प्रवाहांमुळे सेंट पीटर्झबर्ग शहराच्या मध्यभागाचे चार विभाग झालेले असून ते ॲडमिरॅल्टी, व्हॅसिल्येव्हस्की बेट, पेट्रोग्राड बेट, व्हीबॉर्ग या नावांनी ओळखले जातात. सेंट पीटर्झबर्गची प्येट्रड्व्हऱ्येट्स, पुश्र्किन, पाव्ह्‌लफ्स्क व गाचीन ही प्रमुख उपनगरे आहेत. नीव्हा नदीच्या पुरामुळे शहराची हानी होते. १७७७, १८२४ व १९२४ मधील पुरांमुळे शहराचे मोठे नुकसान झाले होते.

सेंट पीटर्झबर्ग हे दळणवळणाचे केंद्र असून ते लोहमार्ग व रस्त्यांनी रशियातील मोठ्या शहरांशी जोडण्यात आले आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. यास पुलांचे व जलमार्गांचे शहर म्हणून संबोधले जाते. हे रशियातील प्रमुख सागरी बंदर असून येथून धान्य, लाकूड, चामडे, लोखंड इत्यादींची निर्यात, तर कापूस, कोळसा, तंबाखू, साखर, फळे इत्यादींची आयात केली जाते.

मॉस्कोनंतरचे हे रशियातील यंत्रसामग्री निर्मिती व धातूंच्या जोडकामासाठी प्रसिद्ध असलेले महत्त्वाचे औद्योगिक ठिकाण आहे. शास्त्रीय व तांत्रिक प्रशिक्षणाच्या सुविधांमुळे हे देशातील संशोधनाचे प्रमुख ठिकाण बनलेले आहे. औद्योगिक क्षेत्रात जहाजबांधणी, विद्युत्‌जनित्रे, छपाईची यंत्रे, कापड, चामडे निर्मिती, कागद इ. उद्योग येथे चालतात. येथील रसायन उद्योगांत खते, रबरी वस्तू, सौंदर्यप्रसाधने, औषधे यांच्या निर्मितीचा समावेश होतो. येथून जवळच कीरिशी येथे खनिज तेलशुद्धीकरण कारखाना आहे.

सेंट पीटर्झबर्ग हे रशियातील शैक्षणिक व शास्त्रीय संशोधन केंद्र आहे. येथे व्हॅसिल्येव्ह विद्यापीठ, विज्ञान अकादमी, कला अकादमी, सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठ, स्टेट युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ माइन्स इ. प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत.

येथील पीटर द ग्रेट याचा पुतळा (ब्राँझ हॉर्समन), सेंट आयझॅक कॅथीड्रल, निकोलस (पहिला) याचा पुतळा, अलेक्झांडर स्तंभ, विंटर पॅलेस व त्याच्या जवळील कला संग्रहालय, कझॅन कॅथीड्रल व संग्रहालय, रशियन संग्रहालय, सेंट पीटर व सेंट पॉल कॅथीड्रल, नगरभवन, सेंट कॅथरिन रोमन कॅथलिक चर्च, समर गार्डन, सेंट पीटर्स ल्यूथेरियन चर्च, राज्य सार्वजनिक ग्रंथालय इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.