पोर्तू आलेग्रे : दक्षिण ब्राझीलमधील रीओ ग्रांदे दू सूल राज्याची राजधानी. लोकसंख्या १०,४३,९६४ (१९७५ अंदाज). हे रीओ ग्रांदे शहराच्या उत्तर ईशान्येस २८२ किमी. असून अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ दुस पातुस या खारकच्छाच्या उत्तर टोकाशी, ग्वाईबा नदीमुखखाडीच्या पूर्व तीरावर वसले आहे. हे लोहमार्ग, रस्ते व हवाई वाहतूक यांचे, तसेच ब्राझीलच्या अंतर्गत जलवाहतुकीचे सर्वांत महत्त्वाचे केंद्र आहे. अझोर्स येथील पोर्तुगीज वसाहतकऱ्यांनी १७४२–४३ मध्ये हे वसविले. प्रथम ते ‘पोर्तू दोस काझेस’ म्हणून ओळखले जात होते. एकोणिसाव्या शतकात जर्मन व इटालियन आप्रवाशांमुळे या शहराचा उत्तम विकास होत गेला. राज्याचा प्रशासकीय कारभार १७७३ पासून येथून चालू लागला. १८०७ मध्ये येथे राजधानी नेण्यात आली. ब्राझीलमधील प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्रांमध्ये त्याची गणना होते. याच्या आसमंतातील तांदूळ, गहू, तंबाखू, फळफळावळ यांसारख्या कृषी व जंगलउत्पादनांमुळे यांच्याशी संबंधित अशा उद्योगांचा तसेच मांस डबाबंदीकरण, रसायने, कापड, कातडी, जहाजबांधणी इ. उद्योगांचाही विकास झाला आहे. पोर्तू आलेग्रे शैक्षणिक केंद्र असून येथे दोन विद्यापीठे आहेत. ब्राझीलच्या बौद्धिक व सांस्कृतिक जीवनात या शहरास महत्त्वाचे स्थान आहे.

शहाणे, मो. ज्ञा.