संसदभवन, नैरोबी.नैरोबी : पूर्व आफ्रिकेतील केन्या प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या ७,००,००० (१९७५ अंदाज). हे मोंबासा बंदराच्या वायव्येस सु. ४८० किमी.वर आती मैदानात, कीकूयू कड्याच्या पायथ्याशी स. स. पासून १,६७६ मी. उंचीवर वसले आहे. नैरोबी हे लोहमार्ग, हवाईमार्ग, सडका यांचे केंद्र असून मोंबासा बंदराशी व युगांडाशी लोहमार्गाने जोडले आहे. शहराजवळच अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी एक व शहरापासून १४ किमी. वर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी एम्बाकासी नावाचा दुसरा असे दोन विमानतळ आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मोंबासाहूनयुगांडात जाणाऱ्या लोहमार्गावर कामगारांची वसाहत म्हणून हे वसविले. १९०५ मध्ये ही ब्रिटिश पूर्व आफ्रिका संरक्षित प्रदेशाची राजधानी करण्यात आली. १९१९ मध्ये या ठिकाणी नगरपालिका स्थापन झाली असून, यास शहराचा दर्जा १९५४ मध्ये प्राप्त झाला. १९६९ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्येत आफ्रिकनांचे प्रमाण जास्त आहे व त्यामध्ये कीकूयू जमातीचे लोक ४७%, लुह्या १६%, लुओ व कांबा प्रत्येकी १५% व इतर जमातींचे ८% होते तसेच आशियाई व यूरोपीय लोकही येथे आहेत. हे एक शैक्षणिक केंद्र असून येथे नॅशनल यूनिव्हर्सिटी आणि तिच्याशी संलग्न असणारे केन्याटा महाविद्यालय तसेच केन्या तंत्रनिकेतन, काबेटे तांत्रिक विद्यालय इ. शैक्षणिक संस्था आहेत. तेथील हवामान आल्हाददायक असून दुपारी तपमान २७° से. पेक्षा क्वचितच वाढते. वार्षिक सरासरी पर्जन्य ८६ सेंमी. पडतो. हे एक व्यापारी केंद्र असून येथे मांस डबाबंदी, साबण, बिअर, लाकडी सामान, कातडी वस्तू, कागद, आइसक्रीम, रेल्वे एंजिने इ. कारखाने आहेत. चहा, कॉफी, पायरेथ्रम यांची येथून निर्यात होते. संसदभवन, न्यायालये, नगरभवन, मंत्रालये, रोमन कॅथलिक कॅथीड्रल या वास्तू भव्य व प्रेक्षणीय आहेत. कॉरिंडन मिमॉरिअल म्यूझीयम, मॅकमिलन ग्रंथालय,नैरोबी राष्ट्रीय उद्यान, सॉर्सबाय कलावीथी, केन्या राष्ट्रीय रंगमंदिर, केन्या राष्ट्रीय अभिलेखागार इ. प्रवाशांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.