सिएरा लिओन : आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील एकस्वतंत्र देश. याचा विस्तार ६° ५५′उ. ते १०°  उ. अक्षांश व १०° १६′प.ते १३° १८′प. रेखांश यांदरम्यान असून देशाची दक्षिणोत्तरलांबी ३३८ किमी, पूर्व-पश्चिम रुंदी ३०४ किमी. वक्षेत्रफळ७१,७४० चौ. किमी. आहे. लोकसंख्या ६०,१९,००० (२०१०).उत्तरेस व पूर्वेस गिनी, आग्नेयीस लायबीरिया, दक्षिणेस व पश्चिमेसअटलांटिक महासागर यांनी हा देश वेढलेला असून महासागरातीलबानाना, टर्टल, शरब्रो या प्रमुखबेटांशिवाय तास्सो, यॉर्क व अन्यलहान द्वीपांचा समावेश सिएरा लिओनमध्ये होतो. देशाला सु. १,३६४किमी. ( पैकी सागरी ४०६ किमी.) लांबीची सरहद्द लाभलेली आहे.फ्रीटाउन ( लोक. ७,७२,८७३–२००४) हे पश्चिम किनाऱ्यावरील सागरीबंदर देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : सिएरा लिओनच्या भूरचनेत विविधता दिसून येते. तीनुसारदेशाचे चार भौगोलिक विभाग पडतात. (१) राजधानी फ्रीटाउनच्याभोवतालचा द्वीपकल्पीय प्रदेश. सु. ४० किमी. लांब व १६ किमी.रुंदीचा हा भूप्रदेश असून अगदी किनाऱ्यालगतचा प्रदेश वगळता हाबहुतांशडोंगराळ व विशेषतः दक्षिण भाग जंगलयुक्त आहे. सस.पासूनसु. ८०० मी. उंचीच्या या प्रदेशातील पिकेट हिल हा ८८८ मी.उंचीचा सर्वोच्च भाग आहे. याच्या डोंगराळ भागात उगम पावणाऱ्यालहान-मोठ्या नद्यांमुळे या प्रदेशाला भरपूर पाणीपुरवठा झाला आहे.(२) किनाऱ्यालगतचा दलदलयुक्त प्रदेश. उत्तरेस स्कारसीझ नदीमुखखाडीपासून दक्षिणेस लायबीरिया सरहद्दीपर्यंतची या विभागातील सागरीकिनारपट्टी बव्हंशी मँग्रूव्ह वनस्पतींनी व भरतीच्या पाण्याने निर्माण झालेल्यादलदलींनी व्यापलेली आहे. हा सु. ८० किमी. रुंदीचा दलदलयुक्त सपाटप्रदेश आहे. (३) अंतर्भागातील मैदानी प्रदेश. हा गवताळ प्रदेश असूनअनेक लहान टेकड्यांनी व कमी उंचीच्यामैदानांनी बनलेला आहे. (४)देशाचा उत्तर भाग. सस.पासून सु. ५०० मी. उंचीवर हा पठारी प्रदेशआहे. याच्या पश्चिमेससु. ७०० मी. उंचीची सुला मौंटन्स ही टेकड्यांचीरांग पसरलेली असून ईशान्य भाग सु. १,८०० मी. उंचीचा आहे. तोलोमा पर्वतरांग व विंगी टेकड्यांनी व्यापलेल्या ग्रॅनाइटी खडकांनीबनलेला दिसून येतो. मौंट लोमा मानसा किंवा बिंतिमानी (१,९४८ मी.)हे देशातील सर्वोच्च शिखर याच प्रदेशात लोमा पर्वतात आहे. दक्षिणेकडील कमी उंचीच्या मैदानांचा जंगलव्याप्त प्रदेश अनेक ठिकाणीलहान लहान टेकड्यांमुळे खंडित झालेला आहे. उत्तरेकडच्या पठारी वडोंगराळ प्रदेशात स्कारसीझ (२५६ किमी.), रोकेल किंवा सिएरालिओन (४०० किमी.), जाँग (१६० किमी.), सेवा, मोआ, मानो,बॅफी, सेली इ. अनेक लहान-मोठ्या नद्या उगम पावतात. बहुतेक नद्याईशान्य-नैर्ऋत्य दिशेने वाहतात वअटलांटिक महासागराला मिळतात.किनारी भागात या नद्यांमुळे नदीमुखखाड्या निर्माण झाल्या असून ग्रेट स्कारसीझ, रोकेल, जाँग इ. नद्यांचे खालच्या टप्प्यातील प्रवाह लहानपडाव अथवा नावांतून वाहतुकीस उपयुक्त ठरले आहेत.

हवामान : येथील हवामान उष्णकटिबंधीय प्रकारचे असून पश्चिमआफ्रिकेतील सर्वांत आर्द्र प्रदेशात सिएरा लिओनचा समावेश होतो.देशात सर्वत्र तापमान, आर्द्रता व पर्जन्य यांचे प्रमाण जास्त असूनकिनारी व पूर्वेकडील पठारी भागात वार्षिक सरासरी तापमान २७° से.असते. नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ कोरड्या ऋतूचा (उन्हाळा), तरइतर काळ वर्षाऋतूचा असतो. एप्रिल हा सर्वांत जास्त तापमानाचा(३६° से.) महिना असतो. एप्रिल ते जून व सप्टेंबर ते ऑक्टोबर याकालावधीत सहारा वाळवंटी प्रदेशातून हरमॅटन वारे या प्रदेशाकडेवाहतात. जुलै ते सप्टेंबर या काळात आर्द्रता जास्त असते व पावसाचेप्रमाणही सर्वाधिक असते. किनारी भागात, विशेषतः द्वीपकल्पीयडोंगराळ व उंच भागांत, पावसाचे प्रमाण जास्त म्हणजे वार्षिक सरासरी५८० सेंमी. पेक्षाही अधिक असते. उत्तर व पूर्व भागांत त्या मानानेपर्जन्याचे प्रमाण कमी ( सरासरी सु. २५० ते २०० सेंमी.) होत जाते.देशात वार्षिक सरासरी ३४३ सेंमी. पाऊस पडतो.

वनस्पती व प्राणी : सिएरा लिओनचा समावेश वर्षारण्यांच्या प्रदेशातहोतो. देशाचा सु. ४० टक्क्यांपेक्षा जास्त भाग जंगलांनी व्यापलेलाआहे. कोरड्या ऋतूच्या तीव्रतेमुळे इतर भागात ( दक्षिण मध्य भागात )कमी प्रतीची झुडूपेआढळतात. डोंगर-टेकड्यांचे उतार व जास्त पावसाचाप्रदेश यांमध्ये जंगलांचे प्रमाण जास्त आहे. २५ ते ३० टक्के ( विशेषतःउत्तर भाग ) क्षेत्र सॅव्हाना गवताळ प्रदेशाने, तर १० ते २० टक्के( मुख्यत्वे पश्चिम भाग ) क्षेत्र दलदलीच्या वनस्पतींनी व्यापले आहे.येथील जंगलांत आफ्रिकन मॅहॉगनी व साग, रोजवूड, सिल्ककॉटन, कोला, नट, एबनी, ओडम ( स्थानिक नाव ) इ. वृक्षप्रकार मोठ्या प्रमाणातआढळतात. सागर किनारी प्रदेशात मँग्रूव्ह, नारळ तर सपाट मैदानी प्रदेशाततेल्या ताड, गोरखचिंच, झुडुपांचे काही प्रकार इ. वनस्पती दिसून येतात.देशात सु. ३,००० चौ. किमी.चे राखीव जंगल व १३० चौ. किमी.चेसंरक्षित जंगल होते (२००४). जंगलांत विविध प्रकारची माकडे, चिंपँझी, टायगर कॅट, सायाळ, हरीण, हत्ती, सिंह, तरस, गवा, पाणथळजागीसुसरी इ. प्राणी आढळतात. आफ्रिकेच्या अन्य प्रदेशातून नामशेष होतचाललेला व आफ्रिकेतील सुंदर पक्षी म्हणून ओळखला जाणारा एमरल्डककू ( हिरवा कोकिळ ) या देशात आढळतो. याशिवाय बुलबुल, सेनेगल फायरफिंच, आफ्रिकन स्विफ्ट, डायड्रिक ककू ( हिरवा-पांढराआफ्रिकन कोकिळ ), ब्राँझ मॅनकिन, बगळे इ. पक्षी दिसून येतात.यांशिवाय हिवाळ्यामध्ये अनेक पक्षी यूरोपातून सिएरा लिओनमध्ये येतात.

खनिजे : देशात विविध प्रकारची खनिजे आढळतात. जलोदीयमृदेमध्ये, विशेषतः सेवा नदीच्या वरच्या टप्प्यात, हिऱ्याच्या खाणीआहेत. व्यापारीदृष्ट्या  हिऱ्याच्या खाणींचे काम १९३० मध्ये प्रथम कोनीजिल्ह्यात सुरु झाले. हिऱ्यांशिवाय देशातबॉक्साइट, इल्मेनाइट, रुटाइल,लोहधातुक या प्रमुख खनिजांशिवाय अँटिमनी, कोलंबाइट, टिटॅनियम,टंगस्टन, जस्त, सोने, चांदी इ. खनिजे वा त्यांची धातुके आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था : पुरातत्त्वीय संशोधनानुसार सिएरा लिओनच्या प्रदेशात इ. स. ८०० मध्ये लोखंडाचा वापर माहीत होता.इ. स. १००० मध्ये याच्या किनारी प्रदेशातील लोक शेती करत होते.देशाच्या किनारी प्रदेशातील बुलोम, नालाऊ व क्रिम तसेच पूर्व भागातील किस्सी व गोला आणि वारा वारा पर्वतरांगांच्या पायथ्याच्याप्रदेशात राहणारे लिंबा हे सु. दहाव्या शतकापासूनच येथील रहिवासीअसावेत. तेराव्या शतकाच्या बहुधा सुरुवातीस प्रगत देशांतून काहीलोक या प्रदेशाच्या उत्तर व पूर्व भागातील सॅव्हाना गवताळ भागात आलेअसावेत. पोर्तुगीज दर्यावर्दी अल्व्हारो फेर्नांदेझ हा रोकेल नदीमुखखाडीमध्ये १४४७ मध्ये आला होता. त्यानंतर पेद्रो दा सिंत्रा हा पोर्तुगीजसमन्वेषक १४६२ मध्ये या प्रदेशात आला व तेव्हापासून यूरोपीयांचाया भागाशी सतत संपर्क आला असावा. फ्रीटाउनच्या परिसरातीलटेकड्यांचे वर्णन त्यांनी ‘सिएरालिओन’ ( लायन मौंटन्स ) असे केल्याचेदिसते व त्यावरुन या प्रदेशास हे नाव पडले असावे.

सोळाव्या शतकात यूरोपीयांनी सिएरा लिओनमधून गुलामांची खरेदीकरण्यास सुरुवात केली. जरी अमेरिकेतून गुलामांनामोठी मागणी होती,तरी सिएरा लिओनमधून वर्षातून सरासरी २००० पर्यंत गुलामांची निर्यातहोत असे परंतु १७८७ नंतर ब्रिटनमधील दास्य विमोचन चळवळीचानेता ग्रॅनव्हिल शार्प याने व काही परोपकारी वृत्तीच्या लोकांनी ब्रिटन वअमेरिकेतील दोन हजारांपेक्षा जास्त गुलामांची मुक्तता करुन फ्रीटाउन येथेप्रथम खाजगी वसाहत स्थापन केली. यावसाहतीमध्ये मुक्त केलेल्यागुलामांशिवाय पळून आलेल्या व निराश्रित गुलामांचाही समावेश असे.तसेच आफ्रिकेतूनगुलाम घेऊन जाणाऱ्या बोटी पकडून त्यांतील गुलामांनामुक्त केले जात असे. त्यामुळे फ्रीटाउन येथील वसाहतीतीलगुलामांचीसंख्या झपाट्याने वाढली. त्यातच १८०७ मध्ये गुलामांचा व्यापारकरण्यास कायद्याने बंदी आली आणि १८०८मध्ये ही वसाहत ब्रिटिशअंमलाखाली आली. त्यानंतर फ्रीटाउन शिवाय इतर भूप्रदेशाचे समन्वेषणकरण्यात आले आणि तोप्रदेश १८२६ मध्ये ब्रिटिश संरक्षणाखालीलमुलूख म्हणून घोषित करण्यात आला. २७ एप्रिल १९६१ रोजी सिएरालिओनला स्वातंत्र्य मिळाले परंतु तो राष्ट्रकुल देशांचा सदस्य म्हणूनराहिला. १९६७ मध्ये लष्करी सत्तेने नागरी सत्तेचा पाडाव केला. परंतुएक वर्षानंतर नागरी सत्तेने लष्कराकडून सत्ता हस्तगत केली आणि नागरीकायदा पुन्हा प्रस्थापितकरुन १९७१ मध्ये सिएरा लिओन प्रजासत्ताकदेश झाला. देशात १९७८ मध्ये एकपक्षीय राज्यपद्धतीहोती तथापि१९९२ मध्ये देशाची आर्थिक स्थिती बिकट होणे, मंत्रिमंडळाचा सततचाअंदाधुंद राज्यकारभारआणि पाशवी यादवी युद्घ इ. कारणांमुळे देशातदडपशाही होत आहे, या कारणास्तव लष्कराने सत्ता हस्तगत केली.शेवटी १९९९ मध्ये शांततेचा करार झाला आणि १४ मे २००२ रोजीदेशात अध्यक्षीय व लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली. तीमध्येसिएरा लिओन पीपल्स पार्टीचे नेते अहमद तेजान कब्बाह हे अध्यक्षम्हणून निवडून आले. २००७ मध्ये एर्नेस्ट कोरोमा हे अध्यक्ष होते.

न्याय व संरक्षण : येथील न्यायदानाची व्यवस्था ब्रिटिश न्यायपद्घतीवरआधारलेली असून स्थानिक न्यायालये पारंपरिक कायदा व रुढी विचारातघेऊन न्यायदानाचे काम करतात. स्थानिक व जिल्हा न्यायालये, उच्चन्यायालय, अपिलीय न्यायालय व सर्वोच्च न्यायालय असे येथीलन्यायदानपद्घतीतील टप्पे आहेत. देशात मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

सहा वर्षांसाठी युद्घविरामाची अंमलबजावणी करण्याच्या अटीवरदेशातून डिसेंबर २००५ पासून संयुक्त राष्ट्रांची शांतिसेना काढून घेण्यातआली आहे परंतु जानेवारी २००६ पासून येथील प्रशासनाला देशातशांतता राखण्याच्या कार्यात सहकार्य करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांचेएक कार्यालय येथे ठेवण्यात आले आहे. येथील यादवी युद्घानंतर मूळचेलष्कर काढून टाकण्यात आले असून नवीन ‘नॅशनल आर्मी’ चेस्थापना करण्यात आली आहे. देशाचे छोटे नौदल फ्रीटाउन येथे असूनते किनारी प्रदेशाचे संरक्षण करते. सिएरा लिओन संयुक्त राष्ट्रांचा वजागतिक बँकेचा सभासद आहे.

आर्थिक स्थिती : सिएरा लिओनची विकसित मिश्र अर्थव्यवस्थाआहे. ही अर्थव्यवस्था मुख्यतः शेती उत्पादन व खनिज संपत्तीवरअवलंबून आहे. आयात किंमतीत वाढ, खनिज उद्योगधंदे कमी होणेतसेच अकार्यक्षम मनुष्यबळ व प्रशासन इ. कारणांमुळे आर्थिक विकासाचादर कमी होत आहे. ज्याप्रमाणात लोकसंख्येची वाढ होत आहे, त्याप्रमाणात राष्ट्रीयउत्पन्नात वाढ होत नाही. सिएरा लिओनचे दरडोई उत्पन्नजगामध्ये सर्वांत कमी आहे. देशाच्या अंतर्गत उत्पन्नामध्ये शेती उत्पन्नाचाहिस्सा ४०% आहे. त्यामध्ये एकूण लोकसंख्येच्या ६१% लोक(२००२) शेतीकाम करतात. बहुतेक पुरुष शेतकरी आहेत. ते त्यांच्याकुटुंबाला पुरेल इतकेच उत्पादन काढतात आणि उन्हाळ्यात हिऱ्याच्याखाणींत काम करतात.पुष्कळ स्त्रिया स्थानिक बाजारात भाजीपाला वइतर किरकोळ वस्तू विकतात. शेती उत्पन्नामध्ये ( उत्पादन हजार टनांत २००३) भात (२५०), कसाव्हा (३७७), ऊस (२४), केळी (३०),रताळी (२५) या मुख्य पिकांशिवाय तूर, वाटाणा, आले, भुईमूग इ.पिके घेतली जातात. भात हे मुख्य अन्नधान्य पीक आहे. कॉफी, कोको (काकाओ) व पामतेल ( उत्पादन ३६,००० टन –२००३) ह्यांचे मुख्यतःनिर्यात करण्यासाठी उत्पादन घेतात. शेतीबरोबर गुरेपालनाचा व्यवसायचालतो. देशात २००३ मध्ये ( आकडे हजारात ) गुरे ४००, मेंढ्या ३७५,शेळ्या २२०, डुकरे ५२ इतके पशुधन होते. याच वर्षी देशात ८० लक्षकोंबड्या होत्या. २००५ मध्ये १,४५,९९३ टन मत्स्योत्पादन झाले.

देशाच्या अंतर्गत उत्पादनामध्ये उद्योगधंद्यांचा हिस्सा २५% आहे.तो मुख्यतः खनिज उत्पादनावर केंद्रित आहे. खनिज निर्यातीमध्ये हिरेमहत्त्वाचे आहेत. सिएरा लिओनला परदेशी चलन मिळण्याचे हिरे हेचएक महत्त्वाचे साधन आहे. कोनो जिल्ह्यामध्ये हिऱ्यांच्या खाणी आहेत.१९३० मध्ये हिऱ्यांचा शोध लागला. सिएरा लिओनच्या पूर्वेकडीलपरदेशात नदीपात्राच्या रेती-वाळू व दलदलीमध्ये हिऱ्यांचे साठे आहेत.हिरे उद्योगामध्ये सिएरा लिओन हा जगामधील प्रमुख देशांपैकी एकआहे. २००५ मध्ये ६,९२,००० कॅरेट हिरे उत्पादन झाले. सिएरालिओनला एकूण निर्यात किंमतीच्या निम्मे उत्पन्न हिरे निर्यातीतूनमिळते. याशिवाय बॉक्साईट, खनिज तेल, रुटाइल (टिटॅनियम) यांच्याखनिज उत्पादनाचेहीमहत्त्व वाढत आहे. २००६ मध्ये ७३,६०० टनरुटाइलचे उत्पादन झाले होते. बॉक्साईट, लोह खनिज, सोने यांचासुद्घा मुख्य निर्यातीमध्ये समावेश असतो.

ग्रेट ब्रिटन, अ. सं. सं. व बेल्जियम हे भागीदारीमध्ये व्यापारकरणारे मुख्य देश आहेत. आफ्रिकेतील इतर देशांशी थोड्याफार प्रमाणातव्यापार चालतो.

सिएरा लिओनमध्ये पक्का माल तयार करण्याचे कारखाने अगदीचमर्यादित आहेत. परंतु रसायनांचे उत्पादन, धातुउत्पादने, पामतेल, भातगिरण्या आणि लाकडी सामान बनविणे तसेच छापखाने व प्रकाशने हेउद्योगधंदे महत्त्वाचे आहेत. २००५ मध्ये एकूण क्षेत्रफळाच्या ३८·५% क्षेत्र जंगलाखाली होते. त्यातून २००३ मध्ये इमारती लाकडाचे उत्पादन५·५१ दशलक्ष घनमीटर झाले होते. देशाच्या एकूण अंतर्गत उत्पादनाच्या१/३ उत्पादन सेवा उद्योगातून मिळते. लिओन हे देशाचे चलन असून१०० सेंटचा एक लिओन असतो.

दळणवळण : सिएरा लिओनमध्ये महामार्गाचे जाळे पसरले असूनफ्रीटाउनपासून मुख्य रस्ते निघून अंतर्गत भागातील शहरांना मिळतात.फ्रीटाउन हे देशाचे मुख्य नैसर्गिक बंदर असून पश्चिम आफ्रिका किनाऱ्यावरीलउत्कृष्ट बंदरांपैकी ते एकआहे. येथून इंग्लंड, अमेरिका, जपानआणि यूरोपीय बंदरांशी नियमित जलवाहतूक होते. देशाचा आंतरराष्ट्रीयविमानतळ लुंगी येथे आहे. येथून आबीजान, ॲक्रा, ब्रूसेल्स, कोनाक्री,डाकार, लागोस आणि मन्रोव्हिया इ. ठिकाणी नियमित विमान वाहतूकचालते. २००२ साली देशात ११,३०० किमी. लांबीचे रस्ते होते. लोहधातूच्या खाणींना जोडणाऱ्या अरुंदमापीलोहमार्गांशिवाय देशात मोठेलोहमार्ग नाहीत.

सिएरा लिओनमध्ये २००२ साली ९१,००० दूरध्वनिधारक होते.याच वर्षी ४,५०० फॅक्स यंत्रे व संगणक महाजालकाचा वापर करणारे८,००० ग्राहक तसेच ६६,३०० भ्रमणध्वनिधारक आणि फक्त ४५टपाल कार्यालये होती.

लोक व समाजजीवन : सिएरा लिओनमध्ये सु. १८ वांशिकगटाचे लोक आहेत. त्यांमध्ये मेंडे व टेम्ने हे प्रमुख गट आहेत. मेंडेवंशाचे लोक पूर्व व दक्षिण भागांत राहतात. तसेच कोणो, कुरांको, सुसूआणि यालुंका या जमातीच्या लोकांना एकत्रित घेऊन एक मोठा समूहझाला असून तो देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मा झाला आहे तरउत्तर भागात राहणाऱ्या टेम्ने वंशाच्या लोकांनीसुद्घा लिंबा जमातीच्यालोकांना एकत्रित घेऊन मोठा समूह तयार केला आहे. त्यांची लोकसंख्याएकूण लोकसंख्येच्या २/५ आहे. अल्पसंख्यांक असलेल्या गटांच्याचालीरीती टेम्ने प्रमाणेच आहेत. केओलीस या जमातीचे लोक एकूणलोकसंख्येच्या २% पेक्षा कमी आहेत. परंतु ते एकोणिसाव्या शतकातमुक्त गुलाम म्हणून आलेल्या व वसाहत केलेल्या वंशाचे असून त्यांचादेशाच्या राजकारणात व प्रशासनात महत्त्वाचा सहभाग आहे.

देशात इंग्रजी ही प्रशासकीय भाषा आहे. मेंडे व टेम्ने या भाषाजास्त प्रमाणात ( विशेषतः उत्तर व दक्षिण भागांत ) बोलल्या जातात.क्रिओ ही क्रीओल लोकांची मातृभाषा असून देशाची मुख्य भाषा (राष्ट्रभाषा ) आहे. ती आफ्रिकन्स भाषांपैकी एक आहे. सिएरा लिओनमध्ये पारंपरिक ‘जडप्राणवादी’ धर्माशिवाय मुस्लिम व ख्रिश्चन हे दोनप्रमुख धार्मिक गट आहेत.२००१ मध्ये २५% (२·४९ दशलक्ष)मुस्लिम तर ५%ख्रिश्चन होते. ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत. देशाच्यापूर्व-मध्य भागातदाट लोकवस्ती आहे. त्याहीपेक्षा जास्त दाट लोकवस्तीपश्चिम भागात फ्रीटाउन येथे आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या १/३लोक शहरी भागात राहतात. शहरी भागाची दिवसेंदिवस वाढ होत आहे.लोकांच्या राहणीमानात सुधारणा होत आहे.

सिएरा लिओनमध्ये जन्मदर पश्चिम आफ्रिकेच्या मानाने कमीअसला, तरी आफ्रिका खंडाच्या तुलनेने जास्त आहे. २००० मध्ये १४५सर्वसाधारण व्यवसाय करणारे डॉक्टर, १,३३१ परिचारिका व ५ दंतवैद्यहोते. तसेच १६४ रुग्णालयात ६९२ खाटा होत्या.

सिएरा लिओनमध्ये प्राथमिक शिक्षण अंशतः मोफत असले, तरीसक्तीचे नाही. २००३ मध्ये साक्षरतेचे प्रमाण २९·६% ( पुरुषांमध्ये३९·८% तर स्त्रियांमध्ये २०·५%) होते. २००१-०२ मध्ये २,७०४प्राथमिक शाळांमध्ये ५,५४,३०८ विद्यार्थी व १४,९३२ शिक्षक होते.तसेच २०००-०१ मध्ये २४६ माध्यमिक शाळांत १,०७,७७६ विद्यार्थीव ५,२६४ शिक्षक होते. शिक्षकप्रशिक्षण संस्थांमध्ये ९,६६० विद्यार्थीव १,३२१ शिक्षक होते. १७४ तांत्रिक व व्यवसाय शिक्षण संस्थांमध्ये४९,४८८ विद्यार्थी व २,५१४ शिक्षक होते. ५ उच्च शिक्षण संस्थांत४,७४२ विद्यार्थी व ६०० शिक्षक होते. फ्रीटाउन येथे सिएरा लिओनविद्यापीठ ( स्था. १९६७) आहे. फोराह बे महाविद्यालय व एन्. जालायुनिव्हर्सिटी ही दोन महाविद्यालये सिएरा लिओन विद्यापीठाशी संलग्न आहेत.

परदेशांशी व्यापार, हिऱ्यांच्या खाणी, तसेच पाश्चिमात्यांचे अनुकरणइ. कारणांमुळे सध्या सिएरा लिओनमध्ये काही प्रमाणात बदल घडूनयेत आहेत. देशात पर्यटन व्यवसाय हळुहळू विकसित होत आहे. २००४मध्ये ४४,००० पर्यटकांनी देशाला भेट दिली. फ्रीटाउन येथील पुळणी, बिंतिमानी व लोमा पर्वत येथील निसर्गसौंदर्य, सोनफॉन सरोवर, बुंबुनाधबधबा इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. ( चित्रपत्र).

कुंभारगावकर, य. रा.; चौंडे, मा. ल.

निसर्गसुंदर फ्रीटाउन पुळणप्रसिद्ध राष्ट्रीय संग्रहालय, फ्रीटाउनफ्रीटाउन बंदरातील 'किंग जिमी' धक्का.

देशातील धार्मिक विधी नृत्यप्रसंगीचा मुखवटा