बोगोटा : द. अमेरिकेतील कोलंबिया देशाची राजधानी. लोकसंख्या ४२,९३,९०० (१९८० अंदाज). हे शहर अँडीज पर्वतश्रेणीच्या कूंदीनामार्का या पूर्वेकडील खोऱ्यात सस. पासून सु. २,६४२ मी. उंचीवर वसलेले आहे. हे शहर द. अमेरिकेतील एक सांस्कृतिक केंद्र व विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. विषुववृत्तानजीक असूनही येथील हवा आल्हाददायक असते. हे शहर स्वच्छ व सुंदर असून पर्यटकांस आकर्षित करते.

बोगोटा

येथील रहिवासी चिब्चा इंडियन हे होत. आद्य स्पॅनिश वसाहतकार हिमेनेस द केसादा याने इ. स. १५३८ मध्ये हे शहर वसविले व त्यास ‘सँता फे दे बोगोटा’ हे नाव दिले. लॅटिन अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींच्या इतिहासात या शहराला अत्यंत महत्त्व आहे. १८१० मध्ये येथे होसे ॲकेव्हेदो गोमेस याच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश सत्तेविरुद्ध अयशस्वी उठाव करण्यात आला होता. कोलंबियाचा स्वातंत्र्यवीर बोलिव्हार तसेच सांतादेर इत्यादीनी लढा चालू ठेवला. बोलिव्हारने १८१९ मध्ये बॉइआकाच्या लढाईत स्पॅनिशांचा पराभव केला. १८२१ मध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ग्रेट कोलंबियाची (कोलंबिया, पनामा, व्हेनेझुएला, एक्कादोर) येथे राजधानी करण्यात आली. ग्रेट कोलंबियाच्या विभाजनानंतर १८३० मध्ये न्यू कोलंबियाची (न्यू ग्रानाडा) राजधानीही येथेच होती. १९४८ मध्ये नवव्या ‘पॅन अमेरिकन’ परिषदेच्या वेळी लिबरल पक्षाचा नेता जॉर्ज एलीकार गैतान याचा खून झाला, त्यामुळे बोगोटा शहरात फार मोठी दंगल झाली. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने याच्या परिसरातील १,५५८ चौ. किमी. प्रदेशाचा खास जिल्हा बनविण्यात आला (१९५५). कूंदीनामार्का विभागाची राजधानीही येथेच आहे. ह्या विभागाने नियुक्त केलेला महापौर शहराचा कारभार पाहतो.

देशातील प्रमुख उद्योगप्रकल्प येथे असून रसायने, टायर, साखर, कापड, सिमेंट, तंबाखू, कॉफी-कोको यांवरील प्रक्रियाउद्योग, कातडी वस्तू, काचसामान इ. उद्योग विकसित झालेले आहेत. लोहमार्ग, हवाई मार्ग व रस्ते यांचे हे मोठे केंद्र आहे. ‘सायमन बोलिव्हार’ हा आंतरराष्ट्रीय महामार्ग या शहरातूनच जातो. ‘ॲर्व्हिका’ या दक्षिण अमेरिकेतील पहिल्या व्यापारी हवाई कंपनीची स्थापना याच शहरात झाली. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

शहराच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारी ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया’ (१५७०) येथेच आहे. शिवाय खगोलशास्त्रीय वेधशाळा, राष्ट्रीय ग्रंथालय व संग्रहालय इ. ज्ञानविज्ञानांत अग्रेसर असणाऱ्या संस्थांमुळेच अलेक्झांडर व्हान हंबोल्टने यास ‘अथेन्स ऑफ अमेरिका’ असे गौरवाने म्हटले आहे. यांशिवाय ‘पाँटिफिसिया युनिव्हसिंदाद जव्हेरियाना’, ‘युनिव्हर्सिदाद दे सांतो तोमास’ ही विद्यापीठेही उल्लेखनीय आहेत. येथून पाच दैनिके प्रकाशित होतात. नभोवाणी व दूरचित्रवाणी यांची केंद्रेही येथे आहेत.

बोगोटा वसाहतकालीन नगररचनेबद्दल प्रसिद्ध असून मोठमोठे चौक, रुंद रस्ते, उद्याने, पुतळे इत्यादींनी हे शहर सुशोभित झालेले आहे. बरोक व रोकोको शैलींतील चर्चवास्तू येथे आढळतात. या दृष्टीने सॅन इग्नासिओ कॅथीड्रल व सॅन फ्रॅन्सिस्को चर्च ही उल्लेखनीय आहेत. शहरातील ‘बोलिव्हार चौक’ विशेष प्रसिद्ध असून तेथील कॅथीड्रल, स्वातंत्र्यवीर सायमन बोलिव्हारचा पुतळा, राजभवन इ. प्रसिद्ध आहेत. जुन्या व आधुनिक वास्तुशिल्पांचे सुंदर मिश्रण येथील इमारतींमध्ये आढळते. पर्यटकांना नेहमीच आकर्षून घेणाऱ्या स्थळांत ‘बोटॅनिकल इन्स्टिट्यूट’, ‘काँझर्व्हेटरी ऑफ म्यूझिक’, राष्ट्रीय ग्रंथालय व संग्रहालय, कोलंबस थिएटर, कलाकुसरीच्या सोनारकामासाठी विख्यात असलेले ‘गोल्ड म्यूझीयम’, कलावीथी, कृत्रिम तारामंडळ तसेच शहराजवळील ‘तेकेन्दामा’ धबधबा व सीपाकीरा येथील मिठाच्या खाणींतील कॅथीड्रल यांचा विशेषत्वाने अंतर्भाव करावयास हवा.

शहाणे, मो. ज्ञा. गाडे, ना. स.