प्रसिद्ध बेलेम मनोरा, लिस्बन.लिस्बन : पोर्तुगालची राजधानी, देशातील सर्वांत मोठे शहर व बंदर आणि याच नावाच्या प्रांतातील एश्त्रिमुदुरा परगण्याचे मुख्य ठिकाण. यांचे प्रसचिन नाव ‘ओलिसपो’ असून पोर्तुगीज भाषेत या शहराला ‘लिझ्बोआ’ म्हणतात. लोकसंख्या ८,१२,३८५ (१९८१) पोर्तुगालच्या पश्चिमेस अटलांटिक समुद्रकिनाऱ्यावरील टेगस (तेझू) नदीमुखखाडीच्या उत्तर काठावर मुखापासून आत १३ किमी. वर हे वसलेले आहे. रंगमंडलाप्रमाणे त्याचा अर्धवर्तुळाकृती विस्तार ८४ किमी. क्षेत्रात झाला आहे.

लिस्बनच्या स्थापनेविषयी अनेक दंतकथा आढळतात. तथापि फिनिशियनांनी प्रथम येथे वसाहत केली. त्यानंतर कार्थेजियन व रोमन लोकांनी त्यावर अधिसत्ता मिळविली. पुढे व्हिसिगॉथांनी ते रोमनांकडून इ.स. पाचव्या शतकात बळकावले, तर आठव्या शतकात ते मूर लोकांनी घेतले. त्यांनी त्याचे ‘लिक्सबना’ असे नाव ठेवले. नॉर्मनांनी ८४४ मध्ये त्यावर स्वारी केली. ११४७ मध्ये पोर्तुगालचा पहिला राजा पहिला अफांसो यांनी ख्रिस्ती सैन्याच्या बळावर मूर लोकांकडून हे शहर हस्तगत केले. तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात लिस्बन ही पोर्तुगालची अधिकृत राजधानी बनली. पोर्तुगीज समन्वेषकांचे व साहसी प्रवाशांचे लिस्बन हे प्रमुख केंद्र होते. १५३१ व १५५१ मधील भूकंप, १५६९ मधील प्लेगची साथ यामुळे येथील लोकसंख्या घटली. १ नाव्हेंबर १७५५ रोजी झालेल्या भूकंपात ६६टक्के शहर उद्ध्वस्त झाले आणि त्यात ६०,००० पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडले. १८०७-०८ च्या सुमारास ते फ्रेंचांनी ताब्यात घेतले. नेपोलियनच्या पराभवानंतर १८२३ मध्ये मूळ घराणे सत्तेवर आले. दुसऱ्या महायुद्धकाळात सुरुवातीस ते तटस्थ होते. अँतान्यू सालाझार (१९३३-६८) याने देशाची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली.

हे देशातील सर्वात महत्त्वाचे औद्योगिक , व्यापारी, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. युरोपमधील सर्वांत मोठा जहाज बांधणी कारखाना येथे असून यंत्रसामग्री, पोलाद, सावण, रसायने, सिमेंट, युद्धसामग्री, कागद, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक, कापड, अत्तरे, काच, इलेक्ट्रॉनिकीय साहित्य, तंबाखू उत्पादने, पीठ, साखरनिर्मिती, खनिजतेल शुद्धिकरण इ. उद्योग शहरात चालतात. सर्व प्रकारच्या वाहतूक मार्गांचे हे प्रमुख केंद्र आहे. युरोपातील सर्वांत मोठ्या नैसर्गिक बंदरांत त्याची गणना होते. या बंदरातून मुख्यतः बुचाची उत्पादने, मृद्‌भांडी, डबाबंद मासे, टोमॅटो उत्पादने, मद्य इ. मालाची निर्यात केली जाते. शहराबाहेर वायव्येस १० किमी. अंतरावर पोर्तेला हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. उपमार्ग व जमिनीखालून नेलेल्या तारांवर चालणाऱ्या  ट्रामगाड्यांमार्फत येथील सार्वजनिक वाहतूक केली जाते. येथे टेगस नदीवर १,०१३ मीटर मीटर लांबीचा ‘ट्वेंटिइथ एप्रिल ब्रिज’नावाचा झुलता पूल १९६६ मध्ये बांधला. त्याने लिस्बन शहर सितूबल द्वीपकल्पाशी जोडलेले आहे. जगातील मोठ्या झुलत्या पुलांपैकी हा एक असून त्याला ‘सालाझार पूल’ असेही म्हणतात. पोर्तुगालमधील प्रमुख बँका, विमा कंपन्या, इतर पतसंस्था व भांडवल गुंतवणूक कंपन्या ह्यांची कार्यालये लिस्बनमध्ये आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या व्यापारी केंद्रास ‘लोअर सिटी’ असे म्हणतात. हा सखल भाग असून शहराची पुनर्बांधणी करताना या भागाची निर्मिती केली गेली.

राष्ट्रीय ग्रंथालय (१७९६), लिस्बन विद्यापीठ (१९११), लिस्बन तांत्रिक विद्यापीठ (१९३०), सैनिकी व नौसेना महाविद्यालय, संगीत व रंगभूमीविषयक राष्ट्रीय शाळा, शारीरिक शिक्षणविषयक राष्ट्रीय संस्था, सागरपार प्रशासनिक विद्यालय, विविध वस्तुसंग्रहालये इ. शैक्षणिक-सांस्कृतिक संस्था शहरात आहेत.

सार्वजनिक चौक, पोर्तुगीज नेत्यांचे पुतळे, दुतर्फा वृक्षराजींनी सजलेले रुंद रस्ते, उद्याने, साओ कार्लोज ऑपेरा हाऊस, सेंट जॉर्ज किल्ला, वास्को द गामाच्या सन्मानार्थ बांधलेला बेलेम मनोरा, प्राचीन किल्ले, आजूदा राजवाडा ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. येथील प्राचीन चर्चवर बरोक, रोकोको शैलींतील अलंकरण असून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. छप्परविरहित कार्मेल चर्चच्या दालनात पुरातत्त्वीय अवशेषांचा संग्रह आहे. सुप्रसिद्ध पोर्तुगीज कवी कामाँइश (१५२४-८०) याचे लिस्बन हे जन्मग्राम आहे.

सावंत, प्र. रा. चौधरी, वसंत